लोकशाहीचे वस्त्रहरण रोखण्यासाठी जनता आणि राजकीय पक्ष उभे राहात असतील, तर त्याला अराजकता म्हणता येणार नाही, याची आठवण देणारा हा प्रतिवाद…

संपूर्ण विरोधी पक्ष व आंदोलक मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता यांचा राजीनामा मागत असताना भाजपला पोटशूळ का उठावा बरं? ज्ञानेश कुमार यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इतके प्रेम का की त्यांच्या निवडीसाठी साक्षात सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना निवड समितीतून बाहेरचा रस्ता दाखवावा लागला?

ज्ञानेश कुमार यांच्या निवडीपूर्वी मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करण्यासाठी पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अशी निवड समिती होती. या व्यवस्थेत ‘सरन्यायाधीशांऐवजी केंद्रीय मंत्री’ असा बदल करून गृहमंत्री अमित शहा यांना समितीत सामील करण्यात आले. त्यामुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधानंतरही मोदी आणि शहा यांच्या मर्जीने दोन विरुद्ध एक मतांनी ज्ञानेश कुमार यांची निवड झाली.

पुढे मोदी सरकारने विरोधी पक्षाच्या बहिष्काराला न जुमानता मुख्य निवडणूक आयुक्तांना निवृत्तीनंतरही कायदेशीर कारवाईपासून संरक्षण देणारी तरतूद संसदेत मंजूर करून घेतली. पदावर राहून असा कोणता गुन्हा ते करणार हे अपेक्षित होते की ज्यातून त्यांना संरक्षणाची गरज होती? म्हणूनच ज्ञानेश कुमार आणि भाजप यांच्यातील नात्याबद्दल ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी आधी दिले पाहिजे.

मुख्यमंत्री आपल्या लेखात ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे वर्णन ‘काँग्रेस जिताओ पार्टी’ असे करतात.  अवघ्या चार दिवसांत समाजमाध्यमांवरील एका पेजला कोट्यवधी युवकांनी प्रतिसाद दिला. यातूनच युवकांच्या मनातील असंतोषाची व्याप्ती लक्षात येते. ‘आमच्याकडे राजीनामे होत नाहीत,’ असे म्हणणार्‍या मोदी सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागूनही जर या असंतोषाची जाणीव होत नसेल, तर ते विरोधी पक्षांसाठी चांगलेच आहे. परंतु काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या विरोधात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ आंदोलन जवळपास तीन वर्षे चालले.

याच आंदोलनात सहभागी असलेल्या एका प्रमुख नेत्याने या आंदोलनामागे संघ आणि भाजपचा छुपा हात होता, असे खुलेआम सांगितले आहे.  भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबाही जाहीर केला होता. त्यावेळी काँग्रेस पक्षाने या आंदोलनाला ‘भाजप जिताओ आंदोलन’ म्हटले नव्हते, की या आंदोलनामागे परकीय शक्तींचा हात असल्याचा आरोपही केला नव्हता. मुख्यमंत्र्यांनी आपल्या लेखाचा बराचसा भाग ‘रेजिम चेंज’ या शब्दाची फोड करण्यात खर्च केला आहे.

भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये आंदोलनांच्या माध्यमातून राजवटी बदलल्या, त्याच पद्धतीचा अवलंब भारतातही केला जात असल्याचा त्यांचा दावा आहे. तसेच देशात राजवट नसून सरकार आहे आणि लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुकांमधून सरकार बदलत असते, असे ते म्हणतात. त्यामुळे आंदोलनकर्ते लोकशाही आणि संविधान न मानणारे अराजकवादी आहेत, असा मुख्यमंत्र्यांच्या युक्तिवादाचा अर्थ होतो.

नुकतेच संघाच्या वार्षिक मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात ‘रेजिम चेंज’ होणार नाही, असे मत मांडल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वत: ऐकले. मग भागवत यांच्या मते देशात असे कोणते ‘रेजिम’ आहे, जे बदलणार नाही, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे. भाजप आणि तथाकथित सांस्कृतिक संघटना असलेल्या संघाची भूमिका आणि शब्दावली एकसारखीच असल्याचे दिसते. हे पाहता देशात संघाचेच रेजिम आहे, असे म्हणण्यास वाव नाही का?

भाजपचा इतिहास विसरू नये!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गोव्यातील भाषणात निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे भाजपशी संगनमत असल्याचा आरोप केला. यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते अशी बेजबाबदार विधाने कशी करू शकतात, असा प्रश्न मुख्यमंत्री करतात. मुख्यमंत्र्यांना आता भाजपच्याच अलीकडच्या इतिहासाचे स्मरण करून देणे गरजेचे आहे. २००६ ते २००९ या काळात तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांचा काँग्रेसशी संबंध असल्याचा आरोप करून राजीनामा मागण्यात लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच अग्रेसर होता, हे मुख्यमंत्री विसरले का? २००६ मध्ये लालकृष्ण अडवाणी सुमारे २०० खासदारांचे शिष्टमंडळ घेऊन तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याच्या मागणीसाठी राष्ट्रपतींना भेटले होते. ईव्हीएमला विरोध करणारे लालकृष्ण अडवाणी हेच आद्य नेते होते.

मे २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाने सुरक्षेच्या कारणास्तव नरेंद्र मोदी यांच्या सभेला परवानगी दिली नाही. त्यावेळी अरुण जेटली, अमित शहा आणि व्यंकय्या नायडू यांसारख्या भाजप नेत्यांनी निवडणूक आयोग पक्षपाती असल्याचा आरोप करत मोठे धरणे आंदोलन केले.

याच काळात अनेक ठिकाणी भाजपने मतदारयाद्यांवरही आक्षेप घेतले होते. त्यावेळी भाजप ‘अराजकतावादी’ होता की नव्हता? निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे अराजकता नव्हे. मुख्यमंत्री निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरील प्रश्नांना बगल देण्यासाठी न्यायालयीन निर्णयांचा आधार घेत आहेत.  अलीकडेच न्यायमूर्ती एस. के. कौल यांनी आपल्या पुस्तकातून मोदी सरकारच्या कार्यकाळातील न्यायव्यवस्थेच्या स्थितीवर भाष्य केले आहे ते मुख्यमंत्री वाचतील ही अपेक्षा आहे.

मतदार याद्यांचे केवळ ‘समरी रिव्हिजन’ २००४ मध्ये झाले होते, ते सखोल पुनरीक्षण नव्हते, याची आठवण मुख्यमंत्री देतात; परंतु २००२ मध्ये महाराष्ट्रात ‘एसआयआर’ प्रक्रिया झाली होती, याचा उल्लेख ते सोयीस्करपणे टाळतात. त्यामुळे ‘एसआयआर’ प्रक्रियेदरम्यान शहरी भागांत अधिक दुबार मतदार आढळल्याचे त्यांनी दिलेले स्पष्टीकरण कितपत सयुक्तिक आहे, हा प्रश्न उपस्थित होतो.

आंदोलनाचा आधार केवळ विरोधी पक्षांचे आक्षेप नसून ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने केलेल्या सखोल शोधपत्रकारितेतून समोर आलेले मुद्दे आहेत. या वृत्तमालिकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘ईसीआयनेट’ सारख्या सॉफ्टवेअरद्वारे स्थानिक निवडणूक अधिकार्‍यांच्या मतदारांची नावे जोडण्याच्या किंवा वगळण्याच्या अधिकारांवर अतिक्रमण केल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनीही यासंदर्भात दुजोरा दिला आहे. कर्नाटक व तेलंगणामध्ये तर पूर्वमुद्रित फॉर्म क्रमांक ७ निवडणूक अधिकार्‍यांकडे सादर करण्यात आल्याचेही समोर आले. तेलंगणामध्ये या प्रक्रियेमागे आपला पक्ष असल्याची कबुली भाजपने दिली आहे. लाखो मतदारांना वगळण्याचा हा डाव आहे.

महाराष्ट्रात २०१९ ते २०२४ या पाच वर्षांत ३२ लाख मतदारांची वाढ झाली होती. मात्र, २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यानच्या अवघ्या पाच महिन्यांत ४१ लाख मतदारांची वाढ झाली. त्यातही १६ ते १९ ऑक्टोबर २०२४ या चार दिवसांत ६ लाख ५५ हजार मतदारांची वाढ झाली. राहुल गांधी यांनी याच प्रश्नांची उत्तरे मागितली होती.

‘एसआयआर’ साधारणपणे निवडणुकीच्या दोन वर्षे आधी केली जात असे. मात्र, बिहारमध्ये ही प्रक्रिया निवडणुकीच्या काही महिने आधी सुरू करण्यात आली आणि ६८ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. पश्चिम बंगालमधील ‘एसआयआर’ प्रक्रियेतून वगळलेल्या मतदारांपैकी ९१ टक्के मतदारांचा निवडणुकीनंतर पुन्हा यादीत समावेश करण्यात आल्याचे निवडणूक आयोगानेच स्पष्ट केले आहे. असे असेल, तर पात्र मतदारांना बंगालच्या निवडणुकीत मतदान करण्यापासून वंचित ठेवण्यात का आले, हा गंभीर प्रश्न उपस्थित होतो. भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील मतांच्या फरकाच्या पार्श्वभूमीवर या मतदारांना मतदान करता आले असते, तर निकाल वेगळा लागला नसता का?

 बंगालमध्ये १६ लाख पात्र मतदारांच्या नावांवर निवडणूक अधिकार्‍यांनी पुन्हा आक्षेप घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, हे कोणाच्या आदेशाने करण्यात आले, हे स्पष्ट केले जात नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाला सॉफ्टवेअर पुरवणारी कंपनी कोणती, हेदेखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. फॉर्म क्रमांक ६ मध्ये बदल कसे आणि का करण्यात आले? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

लोकशाहीचा पाया असलेल्या निवडणूक प्रक्रियेत निष्पक्षता अपेक्षित असताना, तिच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार्‍या मुद्द्यांची उत्तरे मागून राहुल गांधी देशसेवाच करत आहेत. निवडणूक आयोगाच्या प्रमुखांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे अराजकता नव्हे. राहुल गांधी हे आरोप शपथपत्रावर का करत नाहीत, असा प्रश्न विचारण्यापूर्वी लालकृष्ण अडवाणी यांनी तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्तांवरील आरोप शपथपत्रावर केले होते का, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे.

राहुल गांधी हे देशाचे विरोधी पक्षनेते आहेत आणि निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असलेल्या विरोधी पक्षाची भूमिका मांडत आहेत. ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांना शपथपत्र देण्यास सांगून तसे न केल्यास कारवाई करण्याची धमकी दिली होती, तर अद्याप कारवाई का केली नाही, हा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी ज्ञानेश कुमार यांनाच विचारावा.

मोदी आणि संघाच्या राजवटीत शांततापूर्ण विरोध करणार्‍यांना पोलिसांनी खिळे लावलेल्या दांडक्यांनी निर्दयपणे मारणे, पोलिसांकडूनच दगडफेक होणे, पेलेट गनचा वापर करणे, भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांना खासगी वेशात पाठवून पोलिसांच्या संरक्षणात आंदोलकांवर हल्ले करण्याची मुभा देणे आणि आंदोलकांना अतिरेक्यांप्रमाणे वागणूक देणे, हे सर्व प्रकार गंभीर आहेत. अशा परिस्थितीत मोदी सरकारला लोकशाही मान्य आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरेल. 

देशात इंग्रजांचेच राज्य सुरू असल्याचे वाटावे, अशी परिस्थिती आहे. यूपीए सरकारच्या काळात सातत्याने भारत बंदची हाक देणार्‍या भाजपला आज स्वत:च्या विरोधात आंदोलने होत आहेत म्हणून आगपाखड करण्याचा अधिकार नाही. ज्या प्रक्रियेतून १३ कोटी ३० लाख मतदारांची नावे वगळली गेली, ती प्रक्रिया सदोष असेल, तर ती नावे पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी अयोग्य कशी? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनीही इतक्या मोठ्या संख्येने मतदारांना वगळणे नागरिकांना दुय्यम नागरिक बनवण्याचा प्रयत्न असल्याचे मत व्यक्त केले आहे. मग मुख्यमंत्र्यांच्या तर्कानुसार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीही अराजकतावादी आहेत का?

लोकशाहीचे वस्त्रहरण गेली बारा वर्षे खुलेआम होत असताना घटनात्मक संस्था स्वस्थ बसून पाहात असतील आणि अशा वेळी जनता पुढे येऊन लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी उभी राहत असेल, तर त्याला अराजकता म्हणता येणार नाही. तो लोकशाहीच्या पुनरुज्जीवनाचा, जनजागृतीचा आणि नव्या आशेचा प्रारंभ आहे.

राष्ट्रीय सचिव – अखिल भारतीय काँग्रेस समिती