पाकिस्तान सरकारने २२ जून, २०२५ रोजी एक राजपत्र प्रकाशित करून उर्दूचे प्रख्यात कथाकार सआदत हसन मंटोंच्या सर्व माध्यमांवर उपलब्ध असलेल्या समग्र साहित्यावर बंदी घातली. ती घालत असताना स्पष्ट करण्यात आलं की, मंटोंचं साहित्य पाकिस्तानी समाजमान्य नैतिक, सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांविरोधी आहे. मंटोंसाठी ही गोष्ट काही नवीन नाही. यापूर्वी ते भारतात होते तेव्हा त्यांच्या तीन कथा वादग्रस्त ठरल्या होत्या. खटले भरले गेले होते. त्यातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर मंटोंनी पाकिस्तानात राहण्याचा पर्याय स्वीकारला, पण तिथेही यापूर्वी त्यांच्या तीन कथांवर तीनदा बंदी घालण्यात आली होती आणि तिथेही न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. नाही म्हणायला एकदा ‘असं लिहायचं नाही,’ बजावत न्यायालयाने दंड ठोठावला होता. याच पाकिस्तानातल्या सरकारने २००५ मध्ये मंटोंच्या सुवर्णमहोत्सवी स्मृतिदिनाप्रीत्यर्थ स्मृतितिकीट प्रकाशित केलं होतं. मंटो ‘आमचे लेखक’ आहेत, म्हणून मिरवूनही घेतलं होतं. एवढंच नव्हे तर मंटोंच्या जन्मशताब्दी वर्षात १४ ऑगस्ट, २०१२ रोजी त्यांना मरणोत्तर ‘निशान-ए-इम्तियाज’ हा किताब बहाल केला होता.
मंटो यांचं मोठेपण रूढ जगापलीकडच्या अनवट जीवन आणि साहित्यात होतं. त्यांच्या लिखाणावर नेहमी अश्लीलतेचे आरोप होत राहिले. ते कथांत संवेदनशील विषय हाताळत, म्हणून वादग्रस्त ठरत. लैंगिक संबंध, वेश्या जीवनाचं यथार्थ चित्रण ते करत राहिले. ‘आशिया खंडाचा विवेक’ असं वर्णन करत समीक्षक त्यांना डोक्यावर घेत; पण दुसरीकडे सनातनी, धर्मांध खटल्यांमागून खटले भरून त्यांना भंडावून सोडत; पण मंटोंनी आपल्या साहित्यिक विवेकाशी कधीही प्रतारणा केली नाही. त्यांच्या ‘काली सलवार’, ‘धुआं’, ‘बू’, ‘थंडा गोश्त’, ‘ऊपर नीचे, दरमियां’सारख्या कथा वादग्रस्त ठरल्या. नंदिता दास यांनी ‘मंटो’ हा चरित्रपट केला. तोही वादग्रस्त ठरला. नंदिता दास यांचं म्हणणं होतं की, ‘‘आजच्या जगात जिथे आपण ‘पोस्ट ट्रुथ’ आणि ‘फेक न्यूज’सारख्या कल्पनांवर चर्चा करीत आहोत, तिथे नैतिकतेची जाणीव, मानवता आणि सत्याची जाणीव अधिक महत्त्वाची आहे. सत्याचा अवकाश आखूड, अरुंद होत जाणं, ही वर्तमानाची खरी समस्या आहे.’’ मंटोंच्या साहित्यात भारत-पाकिस्तान फाळणीचं माणुसकीला काळिमा फासणारं वर्णन केंद्रीभूत दिसतं. ‘स्याह हाशिये’ (काळे रकाने) सारखा कथासंग्रह वाचताना तत्कालीन दंगली, जाळपोळ, हिंसा, धर्मांधता अंगावर येत राहते, आणि व्यथित करते. मानवी मूल्यांना दिलेली तिलांजली हा मंटोंच्या चिंता नि चिंतनाचा खरा विषय होता. माणूस सहिष्णुतेच्या कितीही गप्पा मारू दे, त्यातला हिंस्रा पशू अद्याप मेलेला नाही, हे मंटो आपल्या कथांतून ठामपणे मांडत. मंटोंनी एका ठिकाणी आपल्या कथासंग्रहाची भूमिका मांडताना लिहून ठेवलं आहे की, ‘‘तुम्ही वाचक मला एक कथाकार म्हणून ओळखता आणि या देशातील न्यायालयं मला एक अश्लील लेखक म्हणून ओळखतात. सरकार कधी मला कम्युनिस्ट म्हणतं, तर कधी महान लेखक. बहुतेक वेळा मला उपजीविकेची सर्व साधनं आणि मार्ग नाकारले जातात. कधी कधी मला सांगितलं जातं की, माझं नाव काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे. मला हे जाणून घ्यायचं आहे की, जगातलं सर्वांत मोठं इस्लामिक राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशात माझं स्थान काय आहे? माझा येथे काय उपयोग आहे? मला या पाकिस्तान नावाच्या देशात आतापर्यंत स्वत:साठी जागा सापडलेली नाही. म्हणून मी नित्य अस्वस्थ, अशांत असतो. मला मनोरुग्ण ठरवून रुग्णालयात डांबण्यात येतं.’’
पाकिस्तान सरकार सआदत हसन मंटो यांच्या साहित्यावर बंदी का घालतं, हे समजून घेण्यासाठी मंटोंचं हे निवेदन पुरेसं बोलकं, स्वयंस्पष्ट आहे. १८ जानेवारी, १९५५ ला मंटोंचं निधन झाल्यावर लाहोरच्या मियानी साहब दफनभूमीत त्यांचं दफन करण्यात आलं. त्यांच्या थडग्यावर त्यांनीच सुचवून ठेवलेला मजकूर कोरण्यात आला आहे. थडग्याच्या स्मृतिपटलावर लिहिलं आहे, ‘‘इथे सआदत हसन मंटो आहे… त्याच्यासोबत त्याच्या लघुकथा लेखनाच्या सर्व कला आणि विचार, रहस्यं दफन झाली आहेत. तो या मातीच्या ढिगाऱ्याखाली पडून आहे. विचार करत आहे की, दोघांपैकी कोण खरा लघुकथाकार आहे : देव की तो.’’ फ्रांझ काफ्कानी लिहून ठेवलं आहे, ‘‘जर आपण एखादं पुस्तक वाचलं आणि ते आपल्याला कवटीवर हातोडा मारल्यासारखं जागं करत नसेल, तर आपण ते का वाचावं? पुस्तक आपल्या आत गोठलेल्या नदीस फोडणाऱ्या बर्फाच्या हातोड्यासारखंच असलं पाहिजे.’’ या निकषावर सआदत हसन मंटोच उतरू शकतात. असं घणाघाती लेखन फक्त नि फक्त मंटोच करू शकतात. बंदी असते ती या असह्य वेदनांच्या आक्रोशावर! सत्य असह्य असतं. सत्तेची झोप उडवणारं सत्य कोणतीच सत्ता पेलू शकत नाही. म्हणून मंटो कुणाचा मित्र असतो, कोणाचा कट्टर शत्रू. मोहम्मद असदुल्ला यांच्या एका लेखाचं शीर्षक आहे, ‘मंटो मेरा दोस्त.’ याचा व्यत्यास आहे- हिंदीतले प्रख्यात कथाकार उपेंद्रनाथ अश्क यांचा ‘मंटो मेरा दुश्मन’ हा लेख. एकाच नाण्याच्या या दोन बाजू. बुद्धिप्रामाण्यवादी विचाराला आव्हान आहे- ‘मंटो नक्की कोण होते?’ कोणी मंटोंना मानवतावादाचा पैगंबर म्हटलं, कोणी मानसशास्त्रज्ञ, कुणी इतिहासकार, तर कुणी अश्लील कथा लेखक. या सर्वांतून मंटोंमधल्या कथाकाराचेच विविध पैलू प्रतिबिंबित होत राहतात.
मंटोंचं उत्तरायुष्य संघर्षमय होतं. हातावर पोट अशी अवस्था होती. शेवटच्या दिवसांत मंटो रोज कथा लिहीत. एक कथा अवघ्या ३० रुपयांना विकत. मंटो ऐन बहरात लिहीत होते, तेव्हा त्यांच्या कथासंग्रहाच्या ३० हजार प्रती छापल्या जात. १९३० ते १९५० चा तो काळ. ही संख्या आज ३०० वर येऊन ठेपली आहे. मग त्या काळाला साक्षरतेचा काळ आणि आजच्या काळास सुशिक्षिततेचा काळ कोणत्या आधारावर ठरवायचं? १९४८ ते १९५५ हा मंटोंचा उत्तरकाळ मुश्किलीचा होता. पाकिस्तानात जाऊन ते एकप्रकारचं वैयर्थ अनुभवत होते. अशा पश्चात्तापदग्ध अस्वस्थेत हृदय पिळवटून टाकणारी काही पत्रं त्यांनी उर्दूच्या प्रसिद्ध कथाकार इस्मत चुगताईंना लिहिली. त्यात त्यांनी आपली घुसमट व्यक्त केली होती. याउलट १९४८मध्ये ते भारतात राहात होते तेव्हा मुस्लिमांनी अनन्वित अत्याचार केलेल्या हिंदू आणि शिखांचे लोंढे पाकिस्तानातून येत होते. तेव्हा मंटोंना इथे असुरक्षित वाटत राहायचं. त्यांचं कुटुंब पाकिस्तानात गेलं होतं. त्या चिंताक्रांत अवस्थेत त्यांनी भारत सोडला; पण उर्वरित आयुष्यात पश्चात्तापदग्ध जीणं पदरी पडलं.
सआदत हसन मंटो गतशतकातले असे श्रेष्ठ लेखक होते, जे हयातीत अनेकदा बंदी भोगूनही आपल्यातील कथाकाराशी प्रतारणा न करता त्याला जिवंत ठेवत राहिले. त्यांची तुलना समीक्षक नेहमीच डी. एच. लॉरेन्ससारख्या साहित्यिकांशी करत आले आहेत. मंटो नेहमीच वर्ज्य मानल्या गेलेल्या विषयांवर लिहीत राहिले. त्यांना कथेत अंग-उपांगांना खरे शब्द वापरण्यात कधीच संकोच वाटला नाही. अशा ठिकाणी संभ्रान्त साहित्यिक वापरत असलेले शब्द वापरणं मंटोंना प्रतारणा वाटत आलं. मंटोंचे कथाविषय वसाहतकालीन आणि उत्तरकाळातही प्रचलित सामाजिक, आर्थिक अन्यायापासून ते प्रेम, लैंगिकता, अनाचार, पुरुषी ढोंगीपणा चित्रित करत राहिले. असे विषय हाताळताना मंटोंचं नि:संकोच राहणं संभ्रान्तांना अश्लील वाटणं स्वाभाविक; पण वास्तवाला पाठ दाखविण्याचा बेगडी संभावितपणा त्यांच्या मनाने कधीच स्वीकारला नाही. त्यांच्या मनाने खरी स्थिती लपविण्याचे कष्ट घेणं नाकारलं, हा त्यांचा गुण की दोष, हे कालसापेक्षच! मंटोंच्या लघुकथा एक गुंता असतो. स्पष्ट व्यंग आणि निखळ विनोदाच्या सीमा त्यांच्याइतक्या कुणालाच कळत नव्हत्या. हा दोष त्यांचा की समाजाचा, हे काळच ठरवेल.
मंटोंनी लिहून ठेवलं आहेच,
‘अरग आप इन अफसानों को बर्दाश्त नहीं कर सकते, तो ये जमाना नाकाबिल-ए-बर्दाश्त हैं।’
जर तुम्ही माझ्या कथा सहन करू शकत नसाल, तर हा काळ आणि हा समाजच अस्वीकारार्ह आणि असह्य आहे. आपल्या लेखनाविषयी एवढा दृढ विश्वास दर्शवणं त्याच साहित्यकाराला शक्य आहे, ज्याचा विवेक सूर्यप्रकाशाइतका पारदर्शी व प्रखर असतो. बाकी सारं साहित्य ‘हा खेळ सावल्यांचा’ बनून राहतं. त्यात मग न आश्चर्य राहतं, ना खंत, ना खेद. सारे प्रवासी घडीचे. मंटो मात्र चिरप्रवासी, कालातीत!
लेखक साहित्यिक, समीक्षक व संशोधक आहेत.
drsklawate@gmail.com