सैफ अली खानवर मुंबईत त्याच्या राहत्या घरात हल्ला झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर वृत्तवाहिन्या तसेच समाज माध्यमे यांच्यावर जे काही सुरू आहे, त्याला चेव या खेरीज दुसरा शब्द नाही. एकतर कोणतीही लहानमोठी घटना घडली की तिच्याबद्दल मलाच कसं जास्तीत जास्त माहीत आहे, हे सांगण्याची, दाखवण्याची स्पर्धा सुरू होते आणि मग त्या घटनेचं उसासारखं चिपाड केल्याशिवाय मंडळी थांबत नाहीत. त्यामुळेच सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा त्याची पत्नी करिना कपूर कशी घरात नव्हती, तिने केलेल्या इन्स्टा रीलवरून ती कशी पार्टी करण्यात मग्न होती, सैफ अली खानला इब्राहिम या त्याच्या मोठ्या मुलाने नाही, तर तैमूर या आठ वर्षांच्या मुलाने कसं रुग्णालयात आणलं, सैफ अली खानच्या विशिष्ट धर्मामुळेच कसा त्याच्यावर हा हल्ला झाला आहे अशा सगळ्या चर्चा या माध्यमांमधून सतत सुरू आहेत. अशी एखादी घटना घडते तेव्हा तिच्यामुळे बसलेला धक्का, निर्माण झालेलं वातावरण सगळ्यांनाच चर्चा करायला उद्युक्त करतं, त्यामुळे ती होणं हे अगदी स्वाभाविक आहे, पण अशा कोणत्याही घटनेमुळे होणाऱ्या चर्चेचा दर्जा ही खरोखरच चिंतेची बाब आहे. मध्यरात्रीच्या वेळी स्वतच्या घरात झोपलेल्या एखाद्या माणसाच्या घरात शिरून कोणी त्याच्यावर हल्ला करत असेल तर त्याचा धर्म, त्याची बायको काय करत होती हे चर्चेचे विषय कसे होऊ शकतात? याच समाजात एकेकाळी आवडत्या अभिनेत्यावर काही संकट आलं तर प्रार्थना व्हायच्या, देवाला साकडं घातलं जायचं यावर आज तरी विश्वास ठेवणं कठीण आहे. सैफ अली खान तेवढा लोकप्रिय नसेलही कदाचित, पण मुंबई आता कुणासाठीही सुरक्षित नाही या विषयावर आपण का बोलत नाही? दुसऱ्याच्या घरात शिरून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्याइतकी माणसांची मनं का भडकली आहेत, याचा विचार केव्हा होणार? समाजामधल्या आर्थिक असमानतेविरोधात जो भडका आहे, त्याचं काय करणार? सैफ अली खानने त्या चोराचं कधीच काही वाकडं केलं नसेल, पण आज तो ‘आहे रे’ वर्गाविरोधातील असंतोषाचा चेहरा अथवा बळी ठरला आहे, याचं काय करायचं?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा