गायत्री लेले

देशभरात सातत्याने निरनिराळे चित्रपटमहोत्सव व नाट्यमहोत्सव होत असतात. यातल्या बहुतेक महोत्सवांची दोन ठळक वैशिष्ट्ये आढळतात. एक म्हणजे, हे महोत्सव सशुल्क आणि काहीएक ठराविक कालावधीसाठी असतात. अनेकवेळा मनात असूनही त्या ठराविक वेळा जमवून आणता येतीलच असे नाही आणि दुसरे म्हणजे, बहुतेक महत्वाचे महोत्सव हे देशाच्या मुख्य शहरांमध्ये भरवले जातात. त्यामुळे ग्रामीण भागांत राहणाऱ्या मोठ्या जनसमुदायाला या आनंदापासून मुकावे लागते. अर्थात यात कालपरत्वे अनेक बदल झाले आहेत. तंत्रज्ञान, इंटरनेट आणि समाजमाध्यमांमुळे जग जवळ येत चालले आहे. एकमेकांना जिथे प्रत्यक्ष भेटतो ते ऑफलाईन जग तर आहेच, शिवाय ऑनलाईन जगही अस्तित्वात आहे. तरीही महोत्सवांमध्ये माणसांच्या एकत्र येण्याचे, चित्रपट अथवा कलेचा एकत्र आस्वाद घ्यायचे महत्व कमी झालेले नाही. चित्रपटानंतर झालेल्या चर्चांमुळे, प्रश्नोत्तरांमुळे या अनुभवांना एक खोली प्राप्त होते. त्यातून सजग प्रेक्षकवर्ग तयार होऊ शकतो. अनेक अज्ञात, तसेच नव्या चित्रपटांना येथे स्थान मिळते, त्यामुळे कलाकारांना हुरूप येतो. असाच एक चित्रपटमहोत्सव म्हणजे ‘समभाव’.

Preparation for mpsc Geography Main Exam mpsc exam
mpsc ची तयारी: भूगोल (मुख्य परीक्षा)
father and daughter connection shown in indian films
उंगली पकड के तूने चलना सिखाया था ना…
Win and Live, Pursue Dreams,
जिंकावे नि जगावेही : पाठपुरावा स्वप्नांचा!
cyber police hate videos
नाशिक: समाजमाध्यमातील द्वेषयुक्त चित्रफितींविरुध्द कारवाई, सायबर पोलिसांकडून गुन्हे
my friend article by vinod muley about his beautiful friendship
माझी मैत्रीण: ‘या, स्वागत हैं, वेलकम!’
Urdu, Akshar gappa,
कोल्हापूर : उर्दू ही केवळ मुस्लिमांची भाषा हा मोठा गैरसमज – पी. डी. देशपांडे; गजलांच्या मराठी अनुवादाने अक्षरगप्पा रंगल्या
artificial intelligence in libraries artificial intelligence role in libraries
कुतूहल : ग्रंथालयात कृत्रिम बुद्धिमत्ता – वास्तवदर्शी अनुभव
A vision of a smooth innocent spirit OTT web series Lampan
नितळ, निरागस भावविश्वाचं दर्शन

समभाव हा ‘मावा’ या संस्थेने साकारलेला एक फिरता सिनेमहोत्सव आहे. १९९३ साली स्थापन झालेली ‘मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अँड अब्युज’ म्हणजेच ‘मावा’ ही लिंगभाव समानतेच्या क्षेत्रात काम करणारी व लिंगभाव निगडित प्रश्नांबाबत जाणीवजागृती करणारी एक अग्रगण्य संस्था आहे. हरीश सदानी हे या संस्थेचे सहसंस्थापक आहेत. लिंगभावनिगडीत अत्याचारांबाबत बोलत असताना नेहमी स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवले जाते, जे सुयोग्य आहे. परंतु त्याचबरोबर पुरुषांनाही या संवादात समाविष्ट करून घेणे अत्यंत गरजेचे असते. फक्त स्त्री-पुरुषच नव्हेत, तर वेगवेगळ्या लिंगभाव-ओळखी असणाऱ्या व्यक्तींना म्हणजे एलजीबीटी समुदायालाही या चर्चाविश्वात स्थान मिळायला हवे. ‘मावा’ यासंदर्भात अनेक उपक्रम सातत्याने राबवते. त्यात ‘समभाव’ चित्रपटमहोत्सवाचा उल्लेख प्रामुख्याने करायला हवा. ‘समभाव’चे हे पाचवे वर्ष आहे.

२०१७ साली ‘समभाव’ ला सुरुवात झाली आणि या आगळ्यावेगळ्या प्रयोगाचा देशभरात प्रवास सुरू झाला. या महोत्सवात दाखवण्यात येणारे चित्रपट व माहितीपट मुख्यतः लिंगभावविषयक प्रश्नांची व समस्यांची चर्चा करणारे असतात. लिंगभावाला धरून त्यासोबत येणारे इतर मुद्दे- जात, धर्म, वर्ण, रंग, सामाजिक- राजकीय वास्तव व या सगळ्याची सरमिसळ यांचाही आढावा घेतला जातो. ही ‘इंटरसेक्शनॅलिटी’ (आंतरसंबंध) प्रत्यक्षात कशी जटील असते, याचा अंदाज प्रेक्षकांना या चित्रपटांच्या माध्यमातून येऊ शकतो. महोत्सवाचे ब्रीदवाक्य आहे ‘फेस्टिवल ऑन जेन्डर इक्वॉटी अँड डायव्हर्सिटी’. महोत्सवातून लिंगभाव समानता आणि विविधतेचा सन्मान ही दोन तत्त्वे समाजात, विशेषतः तरुणांमध्ये रुजावीत असा उद्देश आहे. चित्रपट दाखवल्यानंतर तज्ज्ञ मंडळींशी झालेल्या चर्चाही महत्वाच्या ठरतात. या सगळ्यातून लिंगभावविषयक प्रश्नांकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन आकाराला येईल अशी शक्यता निर्माण होते. तरुण मंडळी, विद्यार्थी, शिक्षक, विषयतज्ज्ञ, कलाकार, कार्यकर्ते, डॉक्टर्स अशी विविध क्षेत्रांत कार्यरत असणारी मंडळी या चर्चासत्रांमध्ये सहभाग नोंदवतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने ‘समभावी’ दृष्टिकोनातून लिंगभावाकडे बघण्याचा एक यशस्वी प्रयत्न होतो, असे म्हणायला हरकत नाही.

गेल्या चार वर्षांत ‘समभाव’ने भारतातल्या २३ लहानमोठ्या शहरांमध्ये आणि १२ जिल्ह्यांतील वेगवेगळ्या गावांमध्ये प्रवास केला. जवळपास बारा हजारांच्या आसपास तरुण यानिमित्ताने जोडले गेले. हे वर्ष मात्र आणखी खास होते, कारण देशाच्या सीमा ओलांडून परदेशीही या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात भूतान, बांग्लादेश, नेपाळ आणि इंडोनेशिया या देशांचा समावेश आहे, तसेच पोलंडसारख्या युरोपीय देशातही ‘समभाव’ पोहोचला आहे. त्यामुळे हा खऱ्या अर्थाने ‘आंतरराष्ट्रीय’ महोत्सव आहे, असे म्हणता येते. भारतातही ‘काश्मीर ते कोची’ असा प्रवास ‘समभाव’ ने केला. उल्लेखनीय बाब म्हणजे काश्मीरसोबतच ईशान्य भारतातील आसाम व नागालँड या राज्यांतही या महोत्सवाचे आयोजन झाले. उस्मानाबाद येथील ग्रामीण भागांतील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील २६० शिक्षकांसाठी ‘युनिसेफ’च्या सहकार्याने समभाव महोत्सवाचे आयोजन यंदा झाले. बारामती, जळगाव, उस्मानाबाद या जिल्ह्यांतील विद्यार्थी असोत वा मुंबई-पुण्यातील मंडळी, अथवा जकार्ता, थिंफूसारख्या शहरांतील तरुणाई… सर्वांनाच वेगवेगळ्या पातळ्यांवर ‘जेंडर’संदर्भातले प्रश्न भेडसावत असतात. साऱ्यांनाच त्याबाबत चर्चा करण्यासाठी किंवा मन मोकळं करण्यासाठी सुरक्षित अवकाश मिळेलच असे नाही. पण या महोत्सवाच्या निमित्ताने तो मिळतो, असे निश्चितच म्हणता येते.

दरवर्षी ‘समभाव’मध्ये वेगवेगळ्या भाषांतील चित्रपट आणि माहितीपट दाखविले जातात. यंदा लघुपटांपासून साधारण एक-दीड तासाच्या सिनेमांपर्यंत विविध कलाकृती दाखवण्यात आल्या. आधी म्हटल्याप्रमाणे, यात वेगवगेळ्या आर्थिक आणि सामाजिक समुदायांना भेडसावणारे प्रश्न हाताळले गेले. ‘लाईक अ मून फ्लॉवर’ सारख्या गाजलेल्या भूतानी लघुपटाचाही समावेश केला गेला. ‘टिंडर’ या डेटिंग कंपनीने ‘वी नीड टू टॉक’ हा शहरी परिघातही ‘कन्सेंट’ म्हणजेच सहमतीचा असलेला अभाव यावर भाष्य करणारा लघुपट बनवला आहे, तो येथे दाखवला गेला. ‘काउंटरफीट कुंकू’ या डॉक्युमेंट्रीत एकल महिलेची पुरुषांवरच्या अवलंबित्वामुळे झालेली घुसमट दाखवण्यात आली आहे. ‘ट्रान्स काश्मीर’ या लघुपटात काश्मीरसारख्या ठिकाणी पारलिंगी मंडळींना येणाऱ्या समस्यांचा उहापोह केला आहे. ‘तळ’ या सिनेमात दिग्दर्शक स्वप्नील शेटे यांनी जातीय हिंसाचाराच्या वेगवेगळ्या परिघांमधील पडसादांचे चित्रण केले आहे. ‘समभाव’मध्ये दाखवलेल्या कलाकृतींमधील ही काही उदाहरणे. यासारख्या अनेक चित्रपटांची केलेली चपखल निवड हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.

‘समभाव’साठी अनेकांचा हातभार लागतो. त्यामध्ये ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्था’, पुणे विद्यापीठ यासारख्या शैक्षणिक संस्था आहेत. त्याचसोबत काही कॉर्पोरेट संस्थादेखील आहेत. या सर्वांच्या मदतीने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘समभाव’ आपला ठसा उमटवत आहे.

के. इ. एस. श्रॉफ कॉलेज, मुंबई येथील विद्यार्थी साहिल म्हणतो- “अशा पद्धतीचे संवाद माझ्या आसपास इतक्या खुलेपणाने घडलेले मी कधी पाहिले नव्हते. त्यामुळे हा महोत्सव म्हणजे माझ्यासाठी एक आगळावेगळा अनुभव आहे. इथे येण्याआधी मला माहित नव्हतं की अशा पद्धतीच्या महोत्सवांकडून नेमकी काय अपेक्षा करायला हवी. परंतु नंतर मात्र मला अतिशय प्रोत्साहित झाल्यासारखं वाटत आहे. एलजीबीटीक्यूआय प्लस समुदायांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचा निर्णय मी घेतला आहे!” तर नागालँडमधील कोहिमा येथील एक विद्यार्थी म्हणाला, “या फेस्टिवलमधील काही सिनेमांमुळे माझे डोळे उघडले. सहमती आणि समावेशकतेचे महत्व मला आता कळले आहे. असे खुले संवाद अधिकाधिक व्हायला हवेत.”

१८ ऑक्टोबर रोजी मुंबईतील अमेरिकन कौन्स्युलेटमध्ये ‘समभाव’ च्या सांगता समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चेन्नईस्थित ‘एस-स्ट्रेट सर्कल फाउंडेशन’ या लिंगभाव-संदर्भात काम करणाऱ्या संस्थेच्या संचालक लावण्या सोमण, आयआयटी गुवाहाटी येथील प्राध्यापक शकुंतला महंता तसेच ‘तळ’ या चित्रपटाचे दिग्दर्शक स्वप्नील शेटे सहभागी झाले. महोत्सवाच्या प्रमुख सल्लागार रश्मी लांबा यांनी त्यांच्याशी संवाद साधला. एकूणच अशापद्धतीच्या चित्रपट महोत्सवांचे महत्व आणि गरज काय आहे, याचा या चर्चेतून अंदाज आला. आधी म्हटल्याप्रमाणे, देशातच नाही, तर संपूर्ण जगातच लिंगभावविषयक विविध प्रश्न आहेत. पितृसत्ताक सामाजिक संरचनाही सगळीकडेच कमी-अधिक प्रमाणात आहे आणि त्याचे बळी असलेल्या सर्वलिंगी व्यक्तींची घुसमटही सगळीकडे सारखी आहे. या सांगता सोहळ्यादरम्यान काही ठिकाणी झालेल्या चर्चांच्या चित्रफिती दाखवण्यात आल्या. त्यातून अंदाज आला, की लोकांना खूप बोलायचं आहे आणि समजूनही घ्यायचं आहे. आपले अनुभव इतरांना सांगायचे आहेत. त्याचवेळी या चर्चांना एक निश्चित दिशाही द्यायची गरज आहे. त्यामुळे विशेषतः तरुणांसाठी अधिकाधिक व्यासपीठे निर्माण करायची गरज आहे.

आयआयटीच्या प्रा. महंता यांनीही ही गरज अधोरेखित केली. “विशेषतः शिक्षक संस्थांमध्ये आज विविधता आणि सर्वसमावेशकता यांबद्दल चर्चा होण्याची गरज आहे. या चित्रपटांमुळे विद्यार्थ्यांना तो पैस मिळाला,” असे प्रा. महंता म्हणाल्या. यातील काही फिल्म्स आवर्जून पाठ्यक्रमात समाविष्ट करण्यात याव्यात, असेही त्यांनी नमूद केले. ‘एस स्ट्रीट सर्कल फाउंडेशन’च्या लावण्या सोमण म्हणाल्या, “मुळात प्रेक्षकांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींचा समावेश असणेही खूप उपयोगी ठरते.” लावण्या यांच्या संस्थेने चेन्नई आणि कोची येथे ‘समभाव’चे आयोजन करण्यात हातभार लावला होता. येथे त्यांनी चित्रपटांच्या अनुषंगाने उपक्रम घ्यायचा आणि तरुणांशी संवाद साधायचा प्रयत्न केला. दिग्दर्शक स्वप्नील शेटे यांनीही “जात, लिंगभाव, धर्म, वर्ग या आंतरसंबंधांचा अधिकाधिक उहापोह व्हायला हवा,” हे आवर्जून नोंदवले. “ओटीटी माध्यमांमुळे या शक्यता निर्माण झाल्या आहेत, परंतु मुख्यप्रवाही सिनेमांतही असे विषय हाताळले गेले पाहिजेत,” असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या शेवटी ‘माय फ्रेंड निखिल’ या सुप्रसिद्ध सिनेमाचे दिग्दर्शक ओनिर यांच्याशी संवाद साधला गेला. त्यांचा ‘पाईन कोन’ हा चित्रपट येऊ घातला आहे. एका गे जोडप्याभोवती ही कथा फिरते. ओनिर म्हणतात, “ही कथा क्वीअर मंडळींना जशी दिसेल, तसा दृष्टिकोन सिनेमात आहे. एरवी असे चित्रपट जेव्हा निर्माण केले जातात, तेव्हा ते भिन्नलिंगी व्यक्तींच्या दृष्टिकोनातून बनवले जातात. त्याअर्थाने ‘पाईन कोन’ वेगळा ठरतो. अर्थात याला सेन्सॉरचे प्रमाणपत्र मिळणे अवघड आहे, हेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाच्या आदल्याच दिवशी समलिंगी व्यक्तींच्या विवाह कायद्याबाबत न्यायालयाने निकाल दिला होता. ओनिर यांनी त्यावरही भाष्य केले. “काही विशिष्ट लैंगिक समुदायांनाच आज समान अधिकार का आहेत?” हा कळीचा प्रश्न त्यांनी विचारला. एकूणच चित्रपटांमध्ये समलिंगी व्यक्तींना भूमिका करताना येणाऱ्या अडचणीही त्यांनी सांगितल्या. आपला समाज आणि चित्रपट महोत्सवांची व्यासपीठे काही ‘वेगळ्या’ समजल्या जाणाऱ्या लोकांना सामावून घेण्याइतपत सक्षम झाली आहेत का? चित्रपटांमध्ये हिंसेला जेवढी अधिमान्यता मिळते, तितकी कधी सर्वप्रकारच्या ‘प्रेम’ या संकल्पनेला खऱ्या अर्थाने मिळेल का? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. या संवादामुळे प्रेक्षकांच्याही मनात विचारचक्रे सुरू झाली, यात शंका नाही.

‘समभाव’चा प्रवास असाच समभावी पद्धतीने यापुढेही सुरू राहील, याची ग्वाही या कार्यक्रमातून मिळाली. याप्रकारचे कल्पक चित्रपट महोत्सव समाजाला अधिकाधिक समावेशक बनवण्यासाठी सुयोग्य दिशा देतील, त्यासाठी तरुणाईला पाठबळ देतील याची खात्री वाटते.

gayatrilele0501@gmail.com