राजा देसाई
कुठे येऊन पोहोचलो आहोत आपण?
भारत ही धर्मभूमी असेल तर ती आम्हा अनभ्यासी सामान्य धार्मिकांच्या हृदयांतील शबरीच्या धर्म-भावामुळे. आणि तरीही आपल्या हृदयाला तीव्रपणे टोचणार्‍या अधर्माचा अतिरेक होतो तेव्हा तरी आपण अंत:करण मोकळं करून सतत शुद्ध करत राहण्यात धर्मसेवा आहे. पश्चिमेच्या रूढ अर्थाने भारतीय संस्कृती-विचारात धर्म हा शब्द नाही. महाभारतात कृष्ण अर्जुनाला सांगतात ‘धारयति इति धर्म:’… जो समाजाचं धारणपोषण करतो तो धर्म! यासाठी प्रेम आणि ऐक्यभाव यापेक्षा अधिक मौल्यवान ते काय असू शकणार? या आदर्शांच्या जवळपासही आपण सामान्य कधी पोहोचू शकत नाही हे वास्तव. असंख्य रागलोभापोटी जशी कुटुंबातर्गत भांडणं होतच असतात तसेच धर्मांतर्गत व धर्मांधर्मांतही जगभरच संघर्षं होतात, कदाचित होतही राहतील; पण त्या रागलोभांपोटी आपल्या धर्म-प्रवासासाठी प्रेमाऐवजी द्वेष/वैर व ऐक्याऐवजी टोकाचा दुजाभाव हे आदर्श म्हणूनच स्वीकारण्यालाच धर्मसेवा म्हणायचं का?   

धर्माच्या नावाखाली…

मोहम्मद अखलाखच्या फ्रीजची तपासणी व हत्या, ‘अबक’ धर्माच्या व्यापार्‍यांकडून खरेदी करू नका, गणपतीसारख्या देवांच्या उत्सव मंडपांना लागणारं सामान ‘त्यांच्या’कडून घेऊ नका, अगदी मिरवणुकांतील वाजंत्रीवाल्यांतही ‘ते’ असणार नाहीत याची काळजी घ्या, ‘कावडिया’सारख्या यात्रांच्या मार्गावरील हॉटेल मालकांची नावे तपासून पहा वगैरे ठिकठिकाणच्या ‘हृदय-सम्राटां’कडून निघालेले अनेक ‘आदेश’ आपण रोजच वाचत असतो. नागपूरला दसर्‍याला बौद्धबांधव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीचं दर्शन घेत होते जवळपास त्याच वेळी ‘धम्म-परिवर्तित’ बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी जाहीर केलं : ‘दुर्गादेवीचं पावित्र्य व परंपरेचं रक्षण यासाठी देवीच्या विसर्जन सोहळ्यात मूर्तीला ‘सनातन’ धर्माच्या अनुयायांशिवाय कोणालाही स्पर्शही करता येणार नाही!’

पण परधर्मीयांच्या स्पर्शाचा मुळात प्रश्नच का उपस्थित झाला? कारण कोलकाता आणि संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा हा केवळ एका धर्माचा सण नाही, तर मोठा सांस्कृतिक उत्सव आहे. विसर्जनाच्या वेळी ट्रकांमधून किंवा पंडालमधून जड मूर्ती उतरवून त्या घाटापर्यंत नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर श्रमिकांची मदत घेतली जाते. यामध्ये अनेक वर्षांपासून विविध धर्मीय, विशेषत: मुस्लिम समाजातीलही, श्रमिक रोजगाराचा भाग म्हणून काम करीत आले आहेत. त्यातून आपोआपच होणारी सांस्कृतिक सरमिसळ राष्ट्रैक्याला पोषकच असते. ‘फतव्या’मागे राजकीय ध्रुवीकरण वगैरे आहे का ते आम्हांला कळत नाही; ते बाजूला ठेवू. पण तेवढ्या दूरान्वयी स्पर्शानेही बाटण्याइतका आमचा हिंदू धर्म दुबळा झालाच असेल तर तो आम्हीच केलाय याचं भान असू द्या!

पण गाडी तेवढ्यावरही थांबली नाही. दुर्गापूजेच्या मंडपांबाहेर साम्यवादी मंडळींनी लावलेल्या अनेक पुस्तकांच्या स्टॉल्सवर ‘धर्मरक्षकां’चे हल्ले झाले; तेराव्या शतकांत नालंदा जाळणारे बख्तियार खिलजी निदान मध्ययुगीन अंधारयुगातले! आता संविधान रक्षणाची शपथ घेतलेले सुवेंदु म्हणाले : ‘ज्यांचा पूजेवरच विश्वास नाही त्यांनी आपलं निधर्मी साहित्य पूजामंडपांबाहेर विकावंच का?’ याची दोन उत्तरं विवेकानंदांनी कधीच देऊन ठेवली आहेत : एक, ‘निरिश्वरवादीही हिंदू राहू शकतो!’ (मात्र इतक्या धक्कादायक शब्दांचा अर्थ काय हा प्रश्न ना कधी धर्मींना पडला ना विवेकवादी निधर्मींना!) दोन, अमेरिकेत काही पाद्रींनी विवेकानंदांना विचारलं, ‘तुम्ही आमच्याकडे येऊन आपल्या धर्माचा प्रचार करता, तर आम्हीही भारतात जाऊन हे केलं तर?’,यावर हिंदू असणं म्हणजे  ‘विश्वधर्मी’असणं आलंच (‘सर्वं खल्विदं ब्रम्ह)  हाच विचार स्वामीजींनी मांडला.

म्हणून ‘शिकागो ट्रिब्यून’ म्हणालं की ‘अशा देशात आपण धर्म प्रचारक पाठवणं हा मूर्खपणा आहे!’ त्यांनी वा पश्चिमेत गेलेल्या तिथं असंख्य अनुयायी लाभलेल्या कोणाही भारतीय गुरूंनी सामान्यत: कोणालाही ना हिंदू केलं ना आपापली जीवन पद्धती सोडायला वा चर्चमध्ये जायला बंदी केली. त्यांनी मूलत: जगायला दृष्टी आणि सामर्थ्य देणारे निखळ जीवनविचार मांडले. त्याचाच भाग म्हणून मन:शांतीसाठी ध्यान प्रक्रिया शिकवली.

‘भारत सहिष्णुता सोडील तर जगातीलच सहिष्णुता नष्ट होईल!’  का म्हणतात असं इतिहास-तत्वज्ञ ॲरनॉल्ड टॉयनबी? पण आता ‘नव’-भारताचं इतिहासाशी देणंघेणं उरलंय ते केवळ सूडापुरतं का? सूड-द्वेष यांमागेही निसर्ग आहे पण ते आता आदर्शच का? प्रत्येक घटनेला कारणं,  इतिहास असतो; लोकशाहीत ‘अस्मिते’चं राजकारण झालं तर आश्चर्य नाही. पण ते संस्कृती राष्ट्रैक्य यांच्या मुळावरच येणारं तरी नसावं ना?

  स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास घडवणारा, ५०-६० वर्षं देशावर राज्य केलेला राष्ट्रीय विरोधी पक्ष, त्याचं नेतृत्व यावर राष्ट्रद्रोह, परकीय शक्तींशी हातमिळवणी इत्यादी आरोप सातत्यानं सत्ताधार्‍यांचं खुद्द सर्वोच्च नेतृत्वच करीत आहे. एवढंच नाही तर राष्ट्रीय ऐक्यासाठी केलेल्या ज्या सुवर्ण मंदिर कारवाईमुळे (पश्चातबुद्धीने मतभेद होऊ शकतात) देशाच्या पंतप्रधानांचे प्राण गेले हेही दुर्लक्षून तो पक्ष आणि त्याच्या अख्ख्या नेतृत्व-घराण्याविषयीच एका धर्म समूहात पराकोटीचा द्वेष निर्माण होईल अशी वक्तव्य जाहीरपणे कशाचंही निमित्त करून सतत केली जातात.

या मागची सारी मनोवृत्ती भारताच्या धर्मसंस्कृतीला केवळ क्षुद्रता आणून थांबत नाही तर राष्ट्रीय ऐक्यालाही तडे पाडते. दिवसांनुदिवस अधिकाधिक भयाण होत चाललेल्या स्पर्धात्मक सत्ताकारणात (जगभरच) ‘उडदामाजी काळेगोरे’च निवडावं लागतं. आमची चिंता आहे ती मुख्यत: टोकाचा वैर/द्वेषभाव भरून असलेलं सामाजिक पर्यावरण, त्याचे भारतीय संस्कृती, राष्ट्रीय ऐक्य यांवर होत असलेले गंभीर परिणाम यांची.

असो. हल्ली ‘हिंदू’ऐवजी हे ‘सनातन’ प्रकरण कसं काय आलंय? वास्तविक आता सतत ‘गर्जना’ होते ती ‘हिंदुराष्ट्रा’ची, ‘सनातन राष्ट्रा’ची नव्हे! तसंच रोज कानांवर पडतात ते हल्ले ‘सनातन’  धर्माचा अवमान झाल्याचे! म्हणजे (आणखी एकाद्या ‘प्राणप्रतिष्ठे’नंतर!) सत्ता-धर्मपीठ आणखीनच मजबूत झाल्यावर ‘हिंदू’ नाव, परकीयांनी दिल्यामुळं, बदलायचा तर विचार नाहिये? आम्हां धार्मिकांची हरकत नाही!

‘सनातन धर्मा’चा नेमका अर्थ काय? 

‘सनातन धर्मी’ म्हणजे काय? ज्यातून सर्व जड सृष्टी जन्मते आणि ज्यातच ती विलय पावते (हे चक्र अनादी/अनंत) अशा एकमेव अविनाशी चैतन्य तत्वावर विश्वास म्हणून आपोआप सृष्टैक्य मानणारे लोक एवढंच, बस्स! संपूर्ण अस्तित्वच ज्याच्या पोटात त्याला कोणांपासूनही वेगळं काढण्याच्या संकल्पनेलाही इथं स्थान उरत नाही; मग दुर्गादेवीची ‘शिवाशिव’ कुठून? तसं करू जाणे  म्हणजे एकाच समुद्राचे काल्पनिक वेगळे भाग पाडून त्यांना वेगवेगळी नांवं देणं एवढंच : ‘एकं सत् विप्रा बहुदा वदंति’! म्हणूनच भारताला कोणाच्या कपाळी ‘हिंदू’ वगैरे लेबल लावण्याची जरूरीही कधी वाटली नाही. अगदी बौद्ध, जैन धर्मांनी काही वेगळे विचार मांडले तरी इथं कोणालाच कोणी वेगळं वाटलं नाही. भारतीय राष्ट्रीय ऐक्याचा हा आत्मा राहिला आहे; त्याच्यावरील कितीही हल्ल्यांना तो पुरून उरला आहे आणि भविष्यातही उरेल.

आमचा राष्ट्रवादही ‘जय जगत्’कडे जाणारा! सर्वच धर्म आणि भौतिकवादी विचारसरणींचाही व्यवहार अगदी भरपूर कलुषित राहात आला नाहीये का? त्याचबरोबर आपापल्या अस्मितेपासून कोणताही मनुष्य समूह मुक्त नाही. मग ती भाषा, वंश, जमात, आता राष्ट्र वगैरे काहीही असो. मात्र धर्म ही अस्मिता सर्वात अधिक जाज्वल्य सर्वत्रच राहिली आहे. त्याआधारे भरपूर रक्तही सांडलं गेलं आहे. ऐतिहासिक परिप्रेक्षात पाहता भारतात ते फारच कमी घडलं असं अनेक तटस्थ अभ्यासकांचं मत आहे. त्याचं कारण शेकडो वर्षांचं या भूमीतील  भेदभावाला मृगजळ (माया) ठरवणारं वरील आत्मतत्त्व-सिंचन या शिवाय दुसरं काही दिसत नाही; मनुष्य जीवनांत विचार आणि संस्कार यांना काही मौलिक अर्थ असेल तर!

अध्यात्मविचार आणि विज्ञान

पण मुळात हा सर्व भारतीय विचार केवळ भावनात्मक कल्पनेच्या स्वप्नाळू भरार्‍या आहेत की त्यात विज्ञानाचा अंश तरी आहे? आम्ही विज्ञान निरक्षर पण बुद्धी शक्य तेवढी तटस्थ करून पहाता काही वैज्ञानिक/अभ्यासक यांची पुढील मतं आढळतात: क्वांटम फिजिक्सचे पितामह म्हटले जाणारे एर्विन श्रोडिंगर (फिजिक्स नोबेल १९३३), वेर्नर हाइजेनबर्ग  व नील्स बोहर (फिजिक्स नोबेल १९२२) हे वैश्विक चेतना एकच असून ती मूलभूत आहे असं काहीसं म्हणतात.

कार्ल सॅगन, फ्रिटजोफ काप्रा असे काही विज्ञान अभ्यासक व समाज चिंतक वैश्विक ऐक्याला आधारभूत अशी भारताच्या उपनिषद विचारांतील अविनाशी चैतन्याची संकल्पना नाकारीत नाहीत. संपूर्ण वैज्ञानिक प्रगतीचा आढावा घेणार्‍या अहवालाचा रिव्ह्यू घेताना ‘इकॉनॉमिस्ट’ साप्ताहिकाचा २०२५ सालातील अंक म्हणतो : ‘चैतन्य (कॉन्शसनेस) म्हणजे काय याची व्याख्याही अजून विज्ञान करू शकलेलं नाही. विज्ञानांतील तो ‘हार्ड प्रॉब्लेम’ आहे व तो भविष्यातही तसाच रहाण्याचीही शक्यता आहे’’.  थोडक्यात कोअर भारतीय (खरं तर सर्वच धर्मांतील) अध्यात्म विचारांना ना कोणी अभिमानाचा विषय बनवावा ना कोणी त्यांना, विज्ञान निर्णय देईपर्यंत, अंधश्रध्दा ठरवून मोकळं व्हावं.

थोडक्यात सर्वच बाजूंनी नेहमीच कमीजास्त केल्या जाणार्‍या लोकशाही नावाच्या सत्ताकारणी चिखलांतील खेळ चालू राहू द्या, तो तसा राहणारच. पण आजच्या विज्ञान युगात व विज्ञानाच्या वरील स्थितीत भारताच्या अध्यात्मविचार-आकाशात निदान ‘शिवाशिव’, भेदाभेद, राष्ट्र/धर्मद्रोह अशा चिखलांच्या अतिक्षुद्र डबक्यांतून ‘सनातना’ला रोज रोज बुडवणं (तेही ‘सनातना’च्याच नांवावर), याच्याइतका भयंकर ना ‘सनातन-धर्म’-द्रोह, ना भारतीय संस्कृतीचा घोर अवमान!       

rajadesai13@yahoo. com