ॲड. शारदा वाडेकर
महात्मा ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील जातीय विषमता, धार्मिक कर्मकांड, सामाजिक अन्याय आणि अज्ञान याविरुद्ध विवेकाच्या आधारे संघर्ष उभा करणारी ही चळवळ होती. तळागाळातील समाजाला शिक्षण, मानवी हक्क आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणे, विषमता नष्ट करणे आणि समताप्रधान समाजनिर्मिती करणे ही सत्यशोधक समाजाच्या कार्यामागची मूलभूत दिशा होती.
या ऐतिहासिक दिवसाशी पुण्याचे आणि महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे एक विशेष नाते आहे. महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी १९७३ पासून २४ सप्टेंबर हा सत्यशोधक समाजाचा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू केली. महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करणे आणि सत्यशोधकी विचारांचा प्रसार करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू होता. गेली पाच दशके आणि त्यापुढील काळात प्रतिष्ठानने ही परंपरा सातत्याने पुढे नेली आहे. महात्मा फुले वाडा हे या उपक्रमाचे महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. सत्यशोधक समाजाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक आणि प्रबोधनकार यांची व्याख्याने आयोजित करून फुले यांच्या विचारांचा वर्तमानाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. डॉ. बाबा आढाव यांचे ८ डिसेंबर २०२५ रोजी निधन झाले. श्रमिक, हमाल, असंघटित कष्टकरी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. त्यांच्या निधनानंतरही त्यांनी सुरू केलेली सत्यशोधक समाजाच्या वर्धापन दिनाची परंपरा थांबलेली नाही. प्रतिष्ठानचे कार्यकर्ते ती पुढे नेत आहेत. व्यक्ती जाते, परंतु विचार आणि चळवळ जिवंत राहिली पाहिजे, हीच या परंपरेची खरी ताकद आहे.
सत्यशोधक समाज नेमका कशासाठी होता?
सत्यशोधक समाजाची स्थापना केवळ धार्मिक सुधारणेसाठी झालेली संस्था नव्हती. महात्मा फुले यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता. माणसामाणसातील विषमता दूर करणे. जात जन्माने श्रेष्ठत्व देत नाही, माणसाचे श्रेष्ठत्व त्याच्या गुणांमध्ये आहे, हा विचार सत्यशोधक समाजाने मांडला. पुरोहित किंवा मध्यस्थाशिवाय व्यक्तीला आपल्या श्रद्धेचा अधिकार असावा, शिक्षणाचा प्रसार व्हावा, स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित व्हावी आणि तळागाळातील माणसाला सामाजिक प्रतिष्ठा मिळावी, या विचारांना चळवळीने महत्त्व दिले. महात्मा फुले यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथातून सत्यशोधकी विचारांची तात्त्विक मांडणी केली. सत्य, मानवता, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित सामाजिक जीवनाची दिशा त्यातून दिसते. त्यामुळे सत्यशोधक समाजाचा विचार केवळ १८७३ च्या संदर्भात पाहणे म्हणजे त्याची व्याप्ती कमी करणे होय. आजच्या काळातील अनेक प्रश्नांकडे पाहण्यासाठीही सत्यशोधक दृष्टी आवश्यक आहे.
आज सत्यशोधक विचारांची गरज का आहे?
आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. माहिती मिळविण्याची साधने प्रत्येकाच्या हातात आली आहेत. परंतु माहितीच्या या महास्फोटाबरोबरच खोटी माहिती, अफवा, अंधश्रद्धा, जातीय पूर्वग्रह आणि द्वेषपूर्ण प्रचार यांचाही वेग वाढला आहे. अशा परिस्थितीत सत्यशोधक वृत्ती म्हणजे प्रत्येक गोष्ट चिकित्सक बुद्धीने तपासणे. कोणतीही गोष्ट केवळ परंपरा आहे म्हणून स्वीकारायची नाही आणि केवळ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली म्हणून खरी मानायची नाही. पुरावा, विवेक, तर्क आणि मानवी हित यांच्या कसोटीवर विचार करण्याची आवश्यकता आहे. याच अर्थाने आजच्या पिढीसाठी सत्यशोधक समाजाचा विचार अधिक महत्त्वाचा ठरतो.
जातीय विषमता अजून संपलेली नाही
संविधानाने सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार दिला आहे. अस्पृश्यता कायद्याने नष्ट केली आहे. तरी सामाजिक जीवनातील जातीय पूर्वग्रह पूर्णपणे संपलेले आहेत का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. उच्च शिक्षण संस्थेतील कॅम्पसमध्ये होणारा दलित विद्यार्थ्यांबाबत जातीय भेदभावाच्या घटना सर्रास होताना दिसतात. रोहित वेमुला, पायल तडवी, साहिल वाकोडे हे विद्यार्थी त्याचे बळी आहेत. शिक्षण, रोजगार, सामाजिक प्रतिष्ठा, संसाधनांवरील अधिकार आणि राजकीय प्रतिनिधित्व या क्षेत्रांत समान संधीचा प्रश्न आजही चर्चेत आहे. म्हणूनच सत्यशोधक विचाराचा अर्थ कोणत्याही जातीविरुद्ध संघर्ष असा नसून जातीय विषमतेविरुद्ध आणि मानवी प्रतिष्ठेसाठी संघर्ष असा घेतला पाहिजे.
स्त्री-समानतेचा विचार
सावित्रीबाई आणि जोतिराव फुले यांनी स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्यामागे स्त्रीला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आणि समान मानवी प्रतिष्ठा मिळावी ही भूमिका होती. आज मुली शिक्षण घेत आहेत, विविध क्षेत्रांत पुढे जात आहेत. तरी कार्यस्थळावरील लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसा, आर्थिक असमानता आणि निर्णयप्रक्रियेत अपुरा सहभाग यांसारखे प्रश्न अद्याप आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष समानता हा सत्यशोधक विचार आजही अपूर्ण राहिलेला सामाजिक अजेंडा आहे. स्त्री पुरुष लिंगभेद भावात भारत जगात १३९ व्या म्हणजेच तळाच्या क्रमांकावर आहे.
लोकशाहीसाठीही सत्यशोधक दृष्टिकोन
सत्यशोधक समाजाची एक महत्त्वाची देणगी म्हणजे प्रश्न विचारण्याची वृत्ती. कोणत्याही व्यक्तीला किंवा विचाराला अंतिम सत्य मानण्याऐवजी चिकित्सकपणे विचार करणे ही लोकशाहीचीही गरज आहे. आज समाजमाध्यमांच्या काळात मतभिन्नता वाढली आहे. मतभेद शत्रुत्वात बदलू नयेत, असहमतीचा आदर केला जावा आणि संविधानाने दिलेली स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही मूल्ये सार्वजनिक जीवनाच्या केंद्रस्थानी राहावीत, यासाठी सत्यशोधक विचारांची आवश्यकता आहे.
फुले वाड्यापासून गौरी आळीपर्यंत—इतिहास जपण्याची गरज
ज्या पुणे शहरात २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली, त्या ऐतिहासिक स्मृतीचे जतन करणे ही पुणेकरांची आणि प्रशासनाचीही जबाबदारी आहे. महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या वतीने पुणे महानगरपालिकेकडे गौरी आळी येथे, ज्या परिसरात सत्यशोधक समाजाच्या स्थापनेची ऐतिहासिक स्मृती जोडलेली आहे, सत्यशोधक समाजाच्या स्मरणार्थ निल फलक लावण्याची मागणी करण्यात आली आहे. अशा स्मृतिफलकांमुळे पुढील पिढ्यांना केवळ इतिहास कळत नाही, तर त्या इतिहासामागील सामाजिक संघर्षाची जाणीवही होते. पुणे हे केवळ फुले-आंबेडकरी विचारांचे ऐतिहासिक केंद्र नाही; तर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींचे शहर आहे. त्यामुळे अशा ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि त्यांची माहिती सार्वजनिक स्मृतीचा भाग बनवणे आवश्यक आहे.
आजचा सत्यशोधक कोण?
आज सत्यशोधक समाजाची आवश्यकता आहे का, या प्रश्नाचे उत्तर शोधताना आपण सत्यशोधकाची नवी व्याख्या केली पाहिजे. आजचा सत्यशोधक म्हणजे, केवळ अफवा ऐकून न घेता सत्य तपासणारा नागरिक, जातीय भेदभावाला प्रश्न विचारणारा तरुण, स्त्रीला समान अधिकार देणारा समाज, अंधश्रद्धेपेक्षा विवेक आणि विज्ञान स्वीकारणारी पिढी, शोषित-कष्टकरी माणसाच्या हक्कासाठी उभा राहणारा कार्यकर्ता आणि संविधानातील समता-स्वातंत्र्य-बंधुता-न्याय या मूल्यांवर विश्वास ठेवणारा नागरिक. यावर्षी गणेश उत्सवामध्ये विद्यानंद बापट नावाच्या सामान्य माणसाने सिद्ध करून दाखवले की धर्माच्या नावाखाली लोकांच्या मूलभूत नागरी हक्कांचे उल्लंघन करता येणार नाही. त्यासाठी पुणेकर नागरिक देखील रस्त्यावर येऊन ध्वनी प्रदूषणाला प्रखर विरोध केला व काही अंशी त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवता आले. हा विवेकी आवाज प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या व समाजाच्या रक्षणासाठी उठवला पाहिजे . महात्मा फुले यांनी १८७३ मध्ये सुरू केलेला सत्यशोधक प्रवास दीडशे वर्षांनंतरही संपलेला नाही. त्याचे स्वरूप बदलले आहे, आव्हाने बदलली आहेत; परंतु सत्याचा शोध, विषमतेला विरोध आणि माणसाच्या प्रतिष्ठेचा आग्रह ही त्याची मूलभूत मूल्ये आजही तितकीच आवश्यक आहेत.
डॉ. बाबा आढाव यांनी १९७३ मध्ये सुरू केलेल्या सत्यशोधक समाज वर्धापन दिनाच्या परंपरेचा पुढे चालू राहणारा प्रवाह हीच या विचाराची जिवंत साक्ष आहे. महात्मा फुले वाड्यात होणारा हा जागर केवळ स्मरणाचा कार्यक्रम न राहता आजच्या प्रश्नांवर सत्यशोधक पद्धतीने विचार करण्याचा सार्वजनिक उपक्रम बनला पाहिजे. सत्यशोधक समाजाची गरज आज इतिहासाच्या स्मरणासाठी नाही; तर वर्तमान अधिक न्याय्य, समताधिष्ठित आणि विवेकशील करण्यासाठी आहे.
सरचिटणीस, म. जोतीराव फुले समता प्रतिष्ठान, पुणे
shardawadekar@gmail.com
