जतिन देसाई

गुजरातच्या सौराष्ट्र येथील ढसा नावाचं एक लहान राज्य गोपालदास देसाई आणि भक्तीबेन यांच्याकडे होतं. गोपालदास हे देशातील पहिले राजे होते ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यासाठी आपल्या राज्याचा त्याग केला. गोपालदास किमान पाच वेळा तर भक्तीबेन किमान तीन वेळा स्वातंत्र्य आंदोलनात तुरुंगात गेले होते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

गुजरातच्या समाजजीवनात आणि राजकारणात खेडा जिल्हा महत्त्वाचा आहे. वसो या लहान गावात त्यांना दत्तक घेण्यात आले होते. अलीकडे, वसो या ठिकाणी जाऊन दोघांबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा मी प्रयत्न केला. स्वातंत्र्य आंदोलनव्यतिरिक्त त्या दोघांनी केलेल्या प्रचंड सामाजिक कामाची गुजरात राज्यातदेखील लोकांना फारशी माहिती नाही. वसो या गावात त्यांच्या घराण्यातली २५० वर्षांहून अधिक जुनी एक अतिशय देखणी हवेली आहे.
‘दरबार साहेब’ गोपालदास आणि भक्तीबेन यांनी महिला, मागासवर्गीय समाज, अल्पसंख्याक अशा सगळय़ांच्या शिक्षणाला महत्त्व दिलं. त्यासाठी त्यांनी शिक्षण मोफत केलं होतं. शैक्षणिक संस्थांना मोठय़ा प्रमाणात जमिनी दिल्या होत्या. आर्ट्स कॉलेजच्या प्राचार्य डॉ. पंकज पटेल यांनी गोपालदास आणि भक्तीबेन यांच्याबद्दल माहिती दिली.

१९१६ च्या ऑक्टोबर महिन्यात अहमदाबाद येथे मुंबई प्रांताची राजकीय परिषद आयोजित करण्यात आली होती. ब्रिटिशांनी गोपालदास यांनी त्यात सहभागी होऊ नये असं सुचवलं होतं. पण ते सहभागी झाले. आणि नंतर ब्रिटिशांनी खुलासा मागितल्यावर कळवलं, ‘मला परिषदेत सहभागी न होण्याबद्दल सुचवलं होतं, पण तो आदेश नव्हता.’ पहिल्या विश्वयुद्धासाठी ब्रिटिशांनी सगळय़ा राजघराण्यांना मोठय़ा संख्येत सैनिक व आर्थिक मदत करण्याचा आदेश दिला होता. त्यावर गोपालदास यांनी ब्रिटिश ते ठरवू शकत नाही असं ब्रिटिशांना कळवलं होतं.

१९२१ च्या सुरुवातीला साबरमती आश्रम येथे ते गांधीजींना प्रत्यक्ष भेटले आणि त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले. १९२१ ला खेडा जिल्हा काँग्रेसची जबाबदारी त्यांना देण्यात आली. साहजिकच ब्रिटिश खवळले. त्यांनी ढसा संस्थान १७ जुलै १९२२ ला जप्त केलं. तरी लोक ‘दरबार साहेब’च्या बाजूने होते. गोपालदास आणि भक्तीबेनची लोकप्रियता वाढत होती. १९२५ मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मुलाचं लग्न भक्तीबेन यांच्या भावाच्या मुलीशी झालं.

१९२८ च्या ऐतिहासिक बारडोली सत्याग्रहात सरदार पटेलांसोबत हे दोघे होते. १९३२ आणि १९३३ चा बहुतेक काळ गोपाळदास-भक्तीबेन तुरुंगात होते.
१९१२-१३ च्या दरम्यान ढसा येथे चार शाळा सुरू झाल्या. ढसा, राय आणि संकली यांची लोकसंख्या सुमारे १५०० होती. गुजरातीत एक मुख्य शाळा, मुलींसाठी शाळा, दलितांसाठी शाळा आणि तिसरीपर्यंत इंग्रजी शाळा ढसा येथे सुरू होती. त्यांच्या या धोरणाबद्दल अनेक जण नाराज होते. दलित आणि इतर एकत्र दांडिया खेळतील अशी व्यवस्था त्यांनी केली. गोपालदास यांना कळणार नाही अशा पद्धतीने गावकऱ्यांनी दलितांना वस्तू न विकण्याचा निर्णय घेतला. गोपालदास यांना ते कळताच त्यांनी दलितांच्या वस्तीत एक नवीन दुकान सुरू केले आणि तिथे ५० टक्के किमतीत दलितांना वस्तू मिळायला लागल्या. दलितांना पाण्याचा अधिकारही गोपालदास यांनी मिळवून दिला.

८ ऑगस्ट १९४२ ला मुंबईच्या गोवालिया टँक येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीने ‘छोडो भारत’ जाहीर केले. प्रकृती बरी नसल्यामुळे गोपालदास – भक्तीबेन मुंबईच्या अधिवेशनात येऊ शकले नव्हते. ९ तारखेच्या पहाटे ब्रिटिशांनी त्या दोघांना नडियाद येथे अटक केली. ब्रिटिशांनी २३ मे १९४७ ला ढसा, राय आणि संकली गोपालदास यांना परत दिले. एक गोष्ट मुद्दाम सांगितली पाहिजे की, इतर राजांनी आपली संस्थानं, राज्यं भारतात विलीन करण्यापूर्वीच गोपालदास यांनी त्यांचं संस्थान भारतात विलीन केलं.

नंतर गोपालदास यांनी भारताच्या संविधान समितीचे सभासद म्हणूनही काम केलं. संबंधित बैठकीसाठी २५ नोव्हेंबर १९४७ ला दिल्लीत असताना त्यांना वसो येथे हिंदू-मुस्लिमात दंगल झाली असल्याचं कळालं. ते ताबडतोब वसो येथे आले आणि दोन्ही समाजांच्या लोकांना एकत्र करून दंगल थांबवली.
गुजरातचे प्रसिद्ध वास्तववादी लेखक झवेरचंद मेघाणी यांनी १९२० च्या दशकातील काठियावाडबद्दल ‘सोरठ तारा वहेता पाणी’ नावाचं पुस्तक १९३७ मध्ये लिहिलं. त्यातील सुरेंद्र देव ही व्यक्तिरेखा गोपालदास यांना डोळय़ासमोर ठेवून उभं करण्यात आली आहे, असं राजमोहन गांधी यांनी त्यांच्या ‘प्रिन्स ऑफ गुजरात’ नावाच्या पुस्तकात म्हटलं आहे.

लेखक ज्येष्ठ पत्रकार व शांततावादी कार्यकर्ते आहेत.

jatindesai123@gmail.com

Story img Loader