मुळात, ‘तुम्ही याल तर तुमच्याबरोबर नाही आलात तर तुमच्याविना.’ हा सावरकरांचा ‘विचार’ म्हणता येईल का? आणि सावरकरांचा हा एवढाच ‘विचार’ मान्य करावा लागेल- तोही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला! पण सावरकरांचे विज्ञान विचार भाजपला कधी पटतील का?
आताशा राजकीय नेत्यांच्या वादावादीत आणि रस्त्यावरील भांडणात विशेष फरक उरलेला नाही. कोण कोणाला केव्हा काय बोलेल, याला काही ताळतंत्र राहिलेले नाही. हे केवळ विरोधकांशी होणाऱ्या वादावादी बाबतच होते असे नाही, तर एकाच आघाडी वा युतीत एकाच सरकारात मंत्री असलेले नेते सुद्धा, एकमेकांविषयी काय बोलतील, याला कुठलाही धरबंध उरलेला नाही. आपण कुठे बोलतो आहोत याचाही काही पोच नेत्यांना राहिलेला दिसत नाही. आमसभा असो, वा एखादा कार्यक्रम, एखादी अंतर्गत बैठक असो वा अगदी विधिमंडळ वा संसद; नेत्यांचा बोलण्याचा स्तर, विषय किंवा भाषा यात काही फरक दिसत नाही. गल्लीतील नेत्यांपासून ते थेट पंतप्रधानानपर्यंत कोणीही काहीही बोलू शकते. याला कारण सामान्य जनता ते काय बोलतात, काय करतात, याबद्दल फारशी गंभीर नाही.

राज्यात भाजप सोबत सरकारात असलेले अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. भाजपच्या भ्रष्टाचारबद्दल ते बोलले तेव्हा भाजपचे त्यांच्या सोबत मंत्रिमंडळात असलेले मंत्रीद्वय चंद्रशेखर बावनकुळे आणि आशीष शेलार त्यांच्यावर भडकले. बावनकुळेंनी तर सिंचन घोटाळा न्याय प्रविष्ट असल्याची धमकीच दिली. तर आशीष शेलार यांनी भाजप हा सावरकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. सोबत राहायचे तर अजित पवारांच्या पक्षालाही सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील असे सांगितले. या सर्व बाचाबाचीत आपण काय बोलतो आहोत याचे भान या नेत्यांना नाही. अजित पवारांना महायुतीत घेऊन महाराष्ट्राच्या तिजोरीच्या किल्ल्या सोपवण्याच्या चार दिवस आधी खुद्द पंतप्रधानांनी भोपाळमध्ये वक्तव्य केले होते, की सिंचन घोटाळ्याच्या दोषी लोकांना तुरुंगात मध्ये टाकू. चार दिवसांनी तेही विसरले आणि जनता देखील विसरली. आता आशीष शेलार देखील विसरले की, त्यांच्या पक्षाचा विचार कोणी दिला आहे?

एक तर भाजपच्या विरोधकांनी सावरकर द्वेषापाई, ‘सावरकर’ भाजपला आंदण देऊन टाकले. ज्या संघ परिवारात औषधलादेखील, स्वातंत्र्याच्या लढ्यात लढलेला कोणी स्वयंसेवक नव्हता. इतकेच काय, पण स्वातंत्र्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांपासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न संघ परिवार करत होता. वानगीदाखल संघाची वैचारिक बैठक शब्दबद्ध करणाऱ्या गोळवलकर गुरुजींच्या पत्रातील एक दाखला पुरेसा आहे. हे पत्र त्यांनी आपले स्नेही बाबुराव तेलंग यांना २४ जानेवारी १९२९ रोजी लिहिले आहे. यात ते शहीद भगतसिंग, राजगुरू आणि रामप्रसाद बिस्मिल यांनी सँडहर्स्टच्या केलेल्या हत्येबद्दल लिहीत आहेत.

ते लिहितात, “लालाजी (लाला लाजपतराय) यांच्या प्रतिशोधाबद्दल माझे म्हणणे आपण सर्वांना सांगाल, असे वाटले नव्हते. तेथील काही विद्यार्थी गुप्त वार्ता विभागात काम करतात, म्हणून चुकून कुठेतरी ‘विश्वबंधुत्वाबद्दल बोलणारा गोळवलकर असे म्हणतो’ असे आपण सांगून जाल, म्हणून सावध राहण्याची सूचना आपल्याला केली होती.” (समग्र श्रीगुरुजी खंड ६, पृष्ठ क्रमांक १८७) स्वातंत्र्य आंदोलनापासून अलिप्तता बाळगणाऱ्या त्या संघ परिवाराला, ‘सावरकर तुमचे’, ‘सावरकर तुमचे.’ म्हणून विरोधकांनी त्यांची ही उणीव भरून काढली. त्यामुळे संघ परिवारदेखील, सावरकर आमचे म्हणून मिरवू लागला. यात ना विरोधकांना सावरकर माहिती ना संघ परिवाराला किंवा दोघांनाही ते माहिती असावेत, पण जनतेला काहीच माहीत नाही; त्यामुळे ते सकारात्मक आणि नकारात्मक प्रतीक म्हणून वापरणे दोघांच्याही सोयीचे आहे, असेच म्हणावे लागेल.

विरोधकांचा सावरकरांना कुठल्याही कारणाने का असेना, विरोध असाल तरी, ते संघाच्या विचारांचे नाहीत; हे न कळण्याइतके विरोधक दूधखुळे नाहीत हे निश्चित. तेव्हा नका म्हणू तुम्ही सावरकरांना स्वातंत्र्यवीर, ते माफी मागून अंदमानातून सुटून आले; असे म्हणून म्हणा त्यांना माफीवीर. पण संघ परिवाराला हा फुकटचा उपहार का देता? दोघेही हिंदुत्वाचा पुरस्कार करतात म्हणून? पण सावरकरांचे जे वैज्ञानिक विचार आहेत, ते संघाचे आहेत का? ते संघ परिवाराला पचतील का? ज्या ‘गोमाते’च्या नावावर भाजप गेली अनेक वर्षे राजकारण करत आला आहे. गेली दहा वर्ष तथाकथित ‘गोरक्षकां’नी जो आतंक निर्माण केला आहे. त्या गाई संदर्भातले सावरकरांचे विचार भाजपला पेलवता येणार आहेत का? पण विरोधकांच्या या भूमिकेमुळे भाजपला चांगलाच फायदा झाला आहे. त्याचीच परिणती म्हणजे, शेलार असले धादांत खोटे आणि बेजबाबदार वक्तव्य करू शकतात आणि विरोधकांसकट सामान्य जनतादेखील ते खरे मानते.

आशीष शेलार म्हणजे काही दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता नाहीत, की ज्या दीनदयाल उपाध्याय यांना भाजपचे संस्थापक म्हणू शकतात. शेलार यांना त्यांच्या पक्षाचा इतिहास, विचार आणि मोठे नेते सर्व चांगलेच ज्ञात आहे. पण तरीही ते, ‘भाजप हा सावरकरांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे.’ असे वक्तव्य करतात. याचाच अर्थ ते हे जाणतात की, त्यांच्या नेत्यांच्या नावाने तो परिणाम नाही साधता येत जो सावरकरांच्या नावाने शक्य आहे. तेव्हा शेलार यांनी हे स्पष्ट केले पाहिजे की, सावरकरांच्या कोणत्या विचारांबद्दल ते बोलत आहेत. वर्तमानपत्राच्या बातमीत त्यांचे जे वक्तव्य आलेले आहे, त्याप्रमाणे ‘तुम्ही याल तर तुमच्याबरोबर नाही आलात तर तुमच्याविना.’ हा सावरकरांचा विचार आहे, असे छापून आलेले आहे. पण हे वाक्य हा विचार नसून, धोरण असू शकते. आणि ते देखील सर्वकालिक नसून विशिष्ट वेळी ठरवलेले धोरण असू शकते.

वर उद्धृत केलेले गाई संदर्भातले सावरकरांचे विचार शेलारांना आणि मुख्य म्हणजे भारतीय जनता पक्षाला मान्य आहेत का? गाईच्या संदर्भात सावरकर लिहितात, “गोठ्यांत उभ्या उभ्या गावटकडब खत असलेल्या, एकीकडे खाताखाताच उभ्या उभ्या दुसरीकडे मलमूत्रोत्सर्ग निःसंकोच पणे करणाऱ्या, थकवा येताच रवंथ करीत त्याच मलमूत्रोत्सर्गात स्वेच्छया बैठक मारून बसणाऱ्या, शेंपटीच्या फटकाऱ्याने स्वतःच्या शेण मूत्राचा तो चिखल अंगभर उडवून घेणाऱ्या, दावे सुटून थोडा फेरफटका करण्याची संधि मिळतांच अनेक समयी कोठेतरी जाऊन घाणीत तोंड घालणाऱ्या, नी तसेच ओठ चाटीत गोठ्यात आणून बांधल्या जाणाऱ्या त्या गायीस, शुद्ध नी निर्मल वसने नेसलेल्या सोज्वळ ब्राम्हणाने वा महिलेने हाती पूजापात्र घेऊन गोठ्यात पूजवयास जावे, नी तिच्या शेपटीस स्पर्शून आपले सोंवळे न विटाळता उलट अधिक सोज्वळले आणि तिचे ते शेण नी ते मूत्र चांदीच्या पेल्यात घोळून पितांना आपले जीवन अधिक निर्मळले असे मानावे ते सोवळे, की जे आंबेडकर महाशयांसारख्या महनीय स्वधर्मबंधूसारख्या श्रेष्ठ मनुष्याची सावली पडतांच विटाळावे ते ब्राह्मक्षात्र जीवन की जे तुकरामांसारख्या संताच्या नुसत्या पंक्तीस बसून दहीभात खाल्ला असताही भ्रष्टावे! ते सोवळे नी ते ब्राम्हक्षात्र जीवन त्या गोठ्यातल्या अमंगळ खाऊ गायीच्या मलमूत्रात लडबडलेल्या शेपटीस शिवता सोज्वळवे, गोमय, गोमूत्र पिता निर्मळवे, पवित्रावें!! पशू तो देव, देवसारखा माणूस तो पशू ! ह्या दोन्ही रूढी धर्म नी सदाचार म्हणून एकसमयीच एकत्र गौरविणाऱ्या वस्तुस्थितीहून, धर्माचा छाप पडतांच केवळ विसंगत मूर्खपणा, सुसंगत शहाणपणा, सचछील पवित्रपणा वाटू लागतो, मनुष्याची कशी बुद्धिहत्या होते, याचे आणखी दुसरे समर्पक उदाहरण ते कोणते द्यावे?” गायी संदर्भातले हे सावरकरांचे विचार आहेत.

सावरकरांच्या या विचाराचा पाईक भाजप आहे का? हे शेलार यांनी स्पष्ट केले पाहिजे. इतकेच नव्हे, तर सावरकर आणीबाणीच्या प्रसंगी शत्रूच्या वेढ्यात अडकलेल्या सैन्याने गायी कापून खाऊन युद्ध करावे असा सल्ला देतात. इतिहासात गायी, ब्राह्मण यांना मारण्याचा धाक दाखवून, देवळे पडण्याची धमकी देऊन एतद्देशीयांना शत्रूने कसे हरवले याची उदाहरणे देत, सावरकर लिहितात, “दहा देवळे, मूठभर ब्राह्मण, दहापाच गायी मारण्याचे पाप टाळावे यास्तव राष्ट्र मरू दिले! गोहत्येचे पाप टाळावे म्हणून राष्ट्र हत्या घडू दिली! तिथे या पोथीनिष्ठ, विवेकशून्य, राष्ट्रघातक धर्मभोळेपणाचा आम्हांस तिटकारा यावा ह्यांत कोणाचा दोष बरें ! आम्हां उपयुक्ततावाद्यांचा का त्या राष्ट्रबुडाऊ धर्म भोळेपणास अजूनही चिकटून राहणाऱ्या आमच्या भाबड्या पोथीवाद्यांचा?”

हे आहेत सावरकरांचे विचार. त्यांच्या या विचारांवर भाजप चालतो का, हे शेलार यांनी स्पष्ट केले पाहिजे. आणि त्यांच्या सावरकर छद्म प्रेमाने प्रभावित होणाऱ्या जनतेनेदेखील हे तपासून पहिले पाहिजे. तसेच सावरकर हे संघाच्या किंवा भाजपच्या विचारांचे होते हा विरोधकांनी केलेला प्रचार किती खरा किती खोटा हादेखील विचार सुशिक्षित (केवळ साक्षर नव्हे) तसेच जागरुक नागरिकांनी केला पाहिजे. अन्यथा कोणीही काहीही बरळावे आणि आम्ही ते खरे मानून प्रभावित व्हावे; हे आम्हा सजग नागरिकांस शोभणारे नाही.

लेखक विदर्भातील सामाजिक कार्यकर्ते असून त्यांचा निवडणुकांच्या राजकारणाशी थेट संबंध नाही. (समाप्त)

kishorejamdar@gmail.com