विज्ञान प्रदर्शन हा शालेय जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या क्षेत्रात प्रयोगशील होण्यासाठी आणि त्यांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी हा एक उत्तम मंच असतो. परंतु बहुतेक शालेय विज्ञान प्रदर्शनांतील प्रकल्प बघितले तर या मंचावर खऱ्या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्या ऐवजी, काही अपवाद वगळता, बहुसंख्य प्रदर्शने ही औपचारिकता म्हणून भरविली जातात असे दिसते. अशा प्रदर्शनांतील व्यावहारिक अडचणी आणि त्यावर उपाययोजना यांचा उहापोह.

१.विज्ञान प्रदर्शनात जुनेच आणि ठराविक प्रकल्प का?

दरवर्षी शालेय विज्ञान प्रदर्शनांमध्ये आपण समान प्रकल्पांचा पुनरावृत्ती होताना पाहतो. जसे की ज्वालामुखीचे मॉडेल, जलचक्र, सौरऊर्जा वापर, हायड्रॉलिक क्रेन, वीज निर्मितीच्या सोप्या संकल्पना इत्यादी. हीच उदाहरणे पुन्हा पुन्हा विविध विद्यार्थ्यांकडून सादर केली जातात. यामागची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत…

  • इंटरनेटवर सहज उपलब्ध माहिती: आजकाल विद्यार्थ्यांना इंटरनेटवर अगदी सहज विज्ञान प्रकल्पांचे संपूर्ण वर्णन, साहित्य आणि पद्धती मिळतात. त्यामुळे नवनवीन प्रयोगां पेक्षा रेडिमेड प्रकल्प तयार करण्याकडे कल असतो.
  • शिक्षक आणि पालकांचा प्रोत्साहन अभाव: नवीन काही तरी तयार करण्यासाठी वेगळ्या दृष्टिकोनाची गरज असते. मात्र, शिक्षक आणि पालक सहजतेने उपलब्ध असलेल्या जुन्या संकल्पनांनाच पसंती देतात.
  • स्पर्धात्मक दडपण: प्रदर्शन हा स्पर्धात्मक कार्यक्रम असल्याने ‘नवीन काही करण्याच्या जोखमीपेक्षा सुरक्षित आणि ठरलेली कल्पना चांगली’ असा विचार केला जातो. सहज सादर करता येणारे प्रकल्प: विदयार्थ्यांना खूप तयारी करावी लागू नये, म्हणून अशी प्रकल्पे निवडली जातात, जी फक्त माहिती सादर करण्यापुरती मर्यादित राहतात. याचा मोठा परिणाम म्हणजे प्रदर्शन हे नावापुरते राहते, खऱ्या वैज्ञानिक संशोधनाला आणि नवीन शोधांना संधी मिळत नाही.

२. बहुदा शिक्षकच प्रकल्प सुचवतात आणि चुणचुणीत मुलांना संधी मिळते

सहसा विज्ञान प्रदर्शनांमध्ये अशी परिस्तिथी पाहायला मिळते की शिक्षक स्वतः प्रकल्प निवडून ठराविक विद्यार्थ्यांना ते तयार करायला देतात. याचे काही परिणाम पुढीलप्रमाणे आहेत :

सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळत नाही: वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक विद्यार्थ्यात रुजवायचा असेल, तर सर्वांना स्वतंत्रपणे विचार करण्याची संधी मिळायला हवी. मात्र, शिक्षक वर्गातील हुशार आणि चुणचुणीत विद्यार्थ्यांनाच संधी देतात.

शिक्षकांची ठराविक मानसिकता: काही अपवाद वगळता, बऱ्याचदा बरेच शिक्षक स्वतः विज्ञान प्रदर्शनाकडे ‘आणखी एक शालेय उपक्रम’ म्हणून पाहतात. त्यामुळे ते जुन्या मार्गानेच जातात आणि नाविन्यपूर्ण प्रयोग सुचवण्याऐवजी विद्यार्थ्यांना ठराविक कल्पना देतात.

विद्यार्थ्यांची स्वतंत्र विचारसरणी खुंटते. जेव्हा शिक्षक स्वतःच प्रकल्प ठरवतात, तेव्हा विद्यार्थ्यांना स्वतंत्र संशोधन करण्याची गरज वाटत नाही. परिणामी, ते नवीन काही शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत. विज्ञान प्रदर्शन हे नाविन्य आणि सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी असेल, तर प्रत्येक विद्यार्थ्याला आपली कल्पकता वापरण्याची संधी मिळाली पाहिजे.

३. प्रकल्प मूल्यमापन पद्धतीतील त्रुटी

विज्ञान प्रदर्शनांमध्ये प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यासाठी ठराविक निकष असतात, त्यामध्ये प्रकल्पाची संकल्पना, नाविन्यता आणि त्याचा व्यावहारिक उपयोग याबरोबरच विद्यार्थ्याची सादरीकरणाची पद्धत, आत्मविश्वास व प्रकल्पाची रंगरंगोटी (presentation) या घटकांकडे विशेष लक्ष दिले जाते. विद्यार्थी किती चांगला बोलला, त्याने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केले का, त्याचे उत्तर देण्याचे कौशल्य किती प्रभावी आहे या घटकांना जास्त गुण दिले जातात. तसेच प्रकल्पाच्या मुख्य संकल्पनेऐवजी, त्याच्या बाह्यरूपालाही महत्व दिले जाते. या मूल्यमापन पद्धतीमुळे काही दुष्परिणाम होतात.

कल्पकतेपेक्षा बोलण्याच्या कौशल्याला महत्त्व दिले जाते. विद्यार्थ्याने स्वतः प्रकल्प तयार केला असेल, पण तो प्रभावी सादर करू शकत नसेल, तर त्याला कमी गुण मिळतात. याउलट, कोणीतरी सहजगत्या सादरीकरण उत्तम करू शकतो, पण त्याने कल्पकता दाखवली नसेल, तरी तो जिंकतो. यामुळं खरं संशोधन दुय्यम ठरतं.

विज्ञान प्रदर्शन हे वैज्ञानिक शोध कौशल्य वाढवण्यासाठी आहे, पोपटपंची करण्यासाठी नाही. परंतु मूल्यमापन पद्धतीमुळे शिक्षक चांगले बोलू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रकल्पासाठी प्रोत्साहन देतात व अबोल मुलांमधील सृजनशीलतेला वाव मिळत नाही. त्यामुळे मूल्यमापन करताना ‘कल्पकता, नावीन्य आणि उपयोगिता’ यालाच प्राधान्य द्यायला हवे. कारण आपल्याला चांगला कल्पक, संशोधक विद्यार्थी शोधायचा आहे, चांगला वक्ता नव्हे.

४. पेटंटविषयी शिक्षकांची अनभिज्ञता:

शालेय विज्ञान प्रदर्शनांमध्ये एक मोठी उणीव म्हणजे पेटंट आणि बौद्धिक संपत्ती हक्क (Intellectual Property Rights – IPR) याविषयी अनभिज्ञता. अनेकदा विद्यार्थी उत्तम आणि नवीन प्रयोग करतात, पण त्यांना त्यांचे पेटंट घेता येते, याची माहिती नसते. शिक्षकांनाही पेटंट कसे घ्यावे, त्याची प्रक्रिया काय असते, याविषयी माहिती नसल्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. काही विद्यार्थ्यांचे प्रकल्प एवढे नावीन्यपूर्ण असतात की ते पुढे उद्योग धंद्यांमध्ये उपयोगी पडू शकतात, पण पेटंट प्रक्रिया माहीत नसल्यामुळे ती कल्पना वाया जाते.

या समस्यांवर खालील प्रकारे उपाय योजना करता येतील.

प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कल्पकतेविषयी आत्मविश्वास निर्माण करायला हवा

प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता ठासून भरलेली असते. तिला प्रोत्साहन द्यायला हवे. प्रत्येक विद्यार्थी संशोधक बनू शकतो असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करायला हवा. त्यासाठी कल्पक विचार करण्याच्या पद्धती, समस्या शोधन याविषयी मुलांसाठी चर्चासत्रे घ्यायला हवीत. नवीन आणि नावीन्यपूर्ण प्रकल्पांना प्रोत्साहन द्यायला हवे, सर्व विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून द्यायला हवी.

शिक्षक व विद्यार्थ्याना बौद्धिक संपदा कायद्याविषयी मार्गदर्शन करणे गरजेचे

विज्ञान प्रदर्शनांमध्ये पेटंट आणि IPR विषयी मार्गदर्शन सत्रे घ्यायला हवीत. तसेच विज्ञान शिक्षकांना या विषयी प्रशिक्षण देण्यात यावे. पेटंटचे प्रकार कोणते आहेत व विद्यार्थ्याचा प्रकल्प कोणत्या प्रकारात, श्रेणीत बसतो हे विज्ञान शिक्षकांना प्रकल्प सार्वजनिक करण्यापूर्वी माहिती व्हायला हवे व प्रकप्ल प्रदर्शनात सादर करण्याआधी तो पेटंट साठी सादर करता येऊ शकतो का? याची चाचपणी करायला हवी.

शाळांनी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना पेटंट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी शासन स्तरावरून ही प्रयत्न होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपले प्रयोग आणि संकल्पना कुठेही सादर करताना त्याचे हक्क सुरक्षित आहेत का याची माहिती ठेवायला हवी. पेटंट आणि बौद्धिक संपत्ती हक्क यावर शिक्षक आणि विद्यार्थी यांना जागरूक करणे गरजेचे आहे.

विज्ञान प्रकल्प मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल करणे गरजेचे आहे

मूल्यमापन करताना, कल्पकता नाविन्य व समस्या निर्विकरण तसेच पेटंटची शक्यता हे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत. प्रकल्पाचे बाह्यरूप व सादरीकरणाची पद्धत हे मुद्दे मूल्यमापन पद्धतीतून वगळायला हवेत. शाळांचा औद्योगिक कंपन्यांबरोबर समन्वय हवा. शासन स्तरावरून शाळांचा परिसरातील औद्योगिक आस्थापणांशी समन्वय साधला जायला हवा. यामुळे उद्योगांमध्ये संशोधन कसे चालते, कोणते टप्पे असतात, कोणते मुद्दे महत्त्वाचे असतात, हे विद्यार्थी प्रत्यक्ष पाहू शकतील. त्यांना प्रयोगशाळांमधील संशोधन आणि उत्पादन यामधील फरक शिकता येईल.

अनेक उद्योगांसमोर उत्पादन कार्यक्षमता, ऊर्जा बचत, व्यवस्थापन, स्वच्छ तंत्रज्ञान असे मोठे प्रश्न असतात

अशा समस्यांवर विद्यार्थी आपले नवे उपाय मांडू शकतात, त्यामुळे त्यांचे ‘प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल’ विकसित होईल. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळेल. एखाद्या उद्योगातील संशोधक, अभियंते आणि तंत्रज्ञ विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेऊ शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरील ज्ञान आणि उद्योग जगतातील गरजा समजतील. काही विद्यार्थ्यांचे प्रकल्प उद्योगांसाठी उपयुक्त ठरू शकतात. एखादी कल्पना उत्कृष्ट असेल, तर उद्योग त्या विद्यार्थ्याला पुढे संशोधनासाठी संधी देऊ शकतात, आर्थिक सहाय्य करू शकतात किंवा पेटंट प्रक्रियेसाठी मदत करू शकतात. शाळांनी प्रकल्पांसाठी अशा समन्वयक उद्योगांकडून, उद्योगांना काही समस्या असतील, तर त्याविषयी माहिती घेऊन त्यावर उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्याना प्रोत्साहन द्यायला हवे.

विज्ञान प्रदर्शनात त्या समस्यांवर विद्यार्थी नवे उपाय शोधू शकतात

शाळा आणि उद्योग यांच्यातील समन्वयामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून खऱ्या संशोधनाची गोडी लागेल. केवळ शाळेतील शिक्षकांवर ही जबाबदारी टाकण्याऐवजी, औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग असायला हवा. यामुळे केवळ पुस्तकातील विज्ञान शिकण्याऐवजी, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वैज्ञानिक विचार, प्रयोग आणि नाविन्यपूर्ण संशोधन करण्याची संधी मिळेल. यातून नवनवीन प्रकल्प आकार घेतील.

शालेय विज्ञान प्रदर्शन केवळ स्पर्धा न राहता, केवळ औपचारिकता न राहता नावीन्यपूर्ण विचार करण्याचा मंच बनला, तर मुलांच्या कल्पकतेला पंख मिळून भविष्यातील शास्त्रज्ञ आणि संशोधक तयार होतील.

(लेखक पेटंटधारक उद्योजक असून बौद्धिक संपदा हक्काचे अभ्यासक आहेत)
mahendra.pangarkar@rediffmail.com