“गेट वे ऑफ इंडियाच्या शिवपुतळ्यापासून आजवर मी स्वतः किमान पाच ते सहा शिवरायांचे अश्वारूढ आणि मोठे असे पुतळे साकार केले आहेत” – हे खरेतर ज्यांना सांगावेही लागत नव्हते, असे ख्यातकीर्त शिल्पकार म्हणजे दिवगंत सदाशिव साठे ऊर्फ भाऊ साठे! यंदाचा ३० ऑगस्ट हा भाऊ साठे यांचा तिसरा स्मृतिदिन. त्याआधी, १५ ऑगस्ट रोजी मुंबईत वरळीच्या नेहरू सेंटर कलादालनात ‘हा ध्यास जीवनाचा’ या त्यांच्या आत्मपर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सतीश कान्हेरे हे या पुस्तकाचे शब्दांकनकार आहेत आणि ‘ग्रंथाली’तर्फे ते पुस्तक प्रकाशित झाले आहे. हे देखणे पुस्तक वाचकांच्या हाती येत नाही तोच, मालवणच्या पुतळ्याची अप्रिय बातमी आली… त्यामुळे तर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार-उभारणीच्या द्रष्टेपणाला मानवंदना देणाऱ्या तलवारधारी शिल्पामागचे खरे संकल्पनाकार सदाशिव ऊर्फ भाऊ साठेच होते, याची आठवण अत्यंत तीव्रतेने अनेकांना झाली असेल!

ही मूळ संकल्पना भाऊ साठे यांचीच कशी होती, याचा उलगडा पुढे होईलच. पण त्याआधी साठे यांनी निराळ्या पोझमधला पुतळा घडवण्याचे धाडस कसे केले याबद्दल ते लिहितात, “वेगळ्या रुपात शिवरांयाच्या प्रतिमा साकार करायची इच्छा वा संकल्पना कलावंतांच्या मनात असल्या तरी त्या नेत्यांच्या गळी उतरवायाचा प्रयत्न करणं म्हणजे त्या मिळणाऱ्या कामापासून स्वतःलाच दूर लोटण्या-सारखंच असतं. ऐतिहासिक घटनांबद्दल आणि व्यक्तिमत्त्वांच्या आपल्या संकल्पना इतक्या ठाशीव असतात की घोड्यावरचा शिवाजी सोडून आम्ही दुसरा शिवाजी स्वीकारूच शकत नाही. अधून मधून कधीतरी सिंहासनावर बसायची परवानगी आम्ही शिवाजी राजांना देतो. मान तिरकी करून, हाताची घडी घालून पाहण्याशिवाय स्वामी विवेकानंदांना स्वातंत्र्य नाही. पाठीवर बांधलेलं मूल याशिवाय झाशीची राणी आम्ही चालवूनच घेऊ शकत नाही. त्याच त्याच संकल्पना वापरल्या की त्यातलं नाविन्यही हरवून जातं. आणि त्या व्यक्तिमत्त्वातले अन्य पैलू जगासमोर येऊ शकत नाहीत. या अशा पुतळ्यांच्या रूपाने महापुरुषांना अशा प्रकारे कोणत्याही एकमेव पैलूमध्ये जखडून टाकणे हा खरंतर त्यांच्यावरचा खूप मोठा अन्यायच आहे. ”

हेही वाचा…आर्थिक उन्नतीचे ‘जनधन’

साठे यांची संकल्पना त्यांच्याच कल्याण शहरात साकारसुद्धा झाली असती, पण तिचे काय झाले? याबद्दल पुस्तकातला मूळ उताराच वाचू या-

“ एक वेगळी आणि समर्पक अशी एक संकल्पना पन्नास वर्षांपासून माझ्या मनात आहे. पण आजवर ती प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही. गेट वे ऑफ इंडियाचा शिवपुतळा केल्यानंतर कल्याणात खाडी किनारी एक भव्य स्मारकशिल्प करावं असा प्रस्ताव कल्याण नगरपालिकेने माझ्याकडे आणला होता. यावर विचार करताना शिवाजीची केवळ अश्वारुढ मुद्रा, एवढ्याच संकल्पनेत अडकून न राहता, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाशी निगडीत; इतिहासातील अन्य गोष्टींचा मी विचार सुरू केला. शिवचरित्रातील एका विलक्षण पराक्रमाचा आणि त्याहूनही अधिक दूरदर्शीपणाचा भाग मला भारावून गेला होता. तो म्हणजे कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांनी केलेली आरमाराची स्थापना.

आरमार हे युद्धतंत्राचं एक स्वतंत्र आणि महत्त्वाचं अंग म्हणून पूर्वापार प्रचलित आहे. आरमारी सामर्थ्याचं प्रतिक मानल्या जाणाऱ्या युद्धनौकेचा प्रतिकात्मक (symbolic) वापर यासाठी करायचं असं मी ठरवलं. त्या काळच्या आरमारी नौकांचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ‘शीड’! याच भव्यतम शिडाच्या पार्श्वभूमीवर, पायथ्याशी शिवाजी महाराजांची उभी खड्गहस्त वीरमुद्रेतील प्रतिमा हा त्या संकल्पनेचा मूळ गाभा.

पंचवीस ते तीस फूट उंच नौकेचा आकार भासमान व्हावा असा चबुतरा, त्यावरील भव्य शीड आणि शिडाच्या पायथ्याशी शिवप्रतिमा यांची रचना अशाप्रकारे असावी की या साऱ्यातून एक कलात्मक अनुबंध निर्माण व्हावा. प्राथमिक मॉडेल तयार झालं, आवडलंही पण काही कारणांनी ही योजना पुढे सरकलीच नाही.

हेही वाचा…सरकारवर टीका म्हणजे नक्षलवाद नव्हे!

त्यानंतर अनेक वर्षांनी म्हणजे जुलै २००४च्या सुमारास कल्याणकरांतर्फे बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्ताने त्यांचा मुक्काम माझ्याकडे होता. आठवणी आणि विविध विषयांवर चर्चा रंगल्या होत्या. त्यातच या संकल्पनेवरही चर्चा झाली, आणि मी ते मॉडेल बाबासाहेबांना दाखवलं. शिवाजी राजांच्या उत्तुंग व प्रतिभाशाली युद्धतंत्राचा तो कलात्मक अविष्कार त्यांनी पाहिला आणि ती संकल्पना त्यांना अत्यंत आवडून गेली. संध्याकाळच्या सत्काराच्या प्रसंगी त्यांनी अनपेक्षितपणे आपल्या भाषणात या स्मारक योजनेची मुक्तकंठाने स्तुती केली. इतकंच नाही तर कल्याणच्या महापौरांना जाहीर आवाहन केलं; त्यांच्या कारकिर्दीत हे स्मारक उभारून कल्याणकरांनाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असं कार्य करावं. या गोष्टींची वर्तमानपत्रांनी आणि दूरदर्शन वाहिन्यांनी मोठी दखल घेतली. पुन्हा एकदा हा विषय नव्याने सुरू झाला. महापालिकेच्या सभेत त्याला तात्त्विक मंजुरीही देण्यात आली.

मधल्या काळात या स्मारकाला राष्ट्रीय दर्जा मिळावा असं आयुक्तांनी सुचवलं, त्यासाठी त्यावेळेचे लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांची आयुक्तांसह आम्ही काही प्रमुख मंडळींनी भेटही घेतली. या स्मारकाची जागा ठरविण्यापासून, प्रत्यक्ष शिल्प तयार करण्यासाठी सर्व गोष्टींची माझी तयारीही जोरात सुरू होती. माझ्या योजनेला महापालिकेने तत्त्वतः मान्यता दिली होती आणि अर्थसंकल्पातही त्याची तरतूद करण्यात आली होती. आता या कामाची माझ्या नावे ऑर्डर निघणे एवढीच औपचारिक गोष्ट बाकी आहे या समजूतीतच मी होतो.

हेही वाचा…अमेरिकेतील निवडणूक कोण जिंकणार?

शिल्पकलेतील कोणतंही शिक्षण वा अशा एकाही शिल्पाचा अनुभव नसलेल्या कुणाच्या नावाने; काही मंडळी वेगळीच घोडी दामटत असल्याचं मला समजलं होतं. पण एकतर माझ्याच मॉडेलला महापालिकेने तत्त्वतः मंजुरी दिली होती आणि त्यासाठी आर्थिक तरतूदही केली होती. तसेच या बाबतीत अन्य काही विषय वा विचार असल्याचं महापालिकेकडूनही ना कधी सांगण्यात आलं होतं ना सुचविण्यात आलं होतं.

प्रत्यक्षात मला अंधारात ठेवून महापालिकेतील काही चलाख प्रतिनिधी मंडळींचे मनमुचे वेगळेच होते. माझ्या योजनेची स्तुती करणारे काही नगरसेवक पाठीमागे माझ्याच विरोधात सूत्रं हलवत होते. अचानक एके दिवशी वर्तमानपत्रातून आणि टी.व्ही. आदी माध्यमांतून माझ्याऐवजी वेगळ्याच कोणत्या नावाने हे काम महानगरपालिकेने मंजूर केल्याचं समजलं.

हेही वाचा…चिनी थेट गुंतवणुकांचा ‘विरोधविकास’

डावपेच आणि खेळी खेळण्यातच मश्गूल असणारी ही राजकीय प्रतिनिधी मंडळी, महत्त्वाच्या विषयांना अपेक्षित अशी अर्थपूर्णता लाभली; की पक्षभेद विसरून, खेळीमेळीच्या वातावरणात, योजनांना हव्या त्या नावाने कशी मंजुरी देतात याचंच प्रत्यंतर मला आलं होतं…”

दिवंगत सदाशिव साठे यांच्या ‘हा ध्यास जीवनाचा’ या आत्मकथनाचे सहलेखन/ शब्दांकनकार सतीश कान्हेरे हे असून ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केलेल्या या १७० पानी पुस्तकाची किंमत ७५० रुपये आहे.