सतीश जकातदार

‘सुधीर नांदगावकर गेले…’ या बातमीवर तसा माझा विश्वास बसणे अशक्य आहे. वयाच्या ८३ व्या वयापर्यंत त्यांच्या कामाचा उरक, त्यांचे दौरे, त्यांचा अमाप उत्साह, महाराष्ट्रात फिल्म सोसायटी चळवळ रुजविण्याचा त्यांचा ध्यास आणि ‘मला’ कामाला लावणारा व न चुकता येणारा त्यांचा सकाळचा फोन… हा ठरलेला शिरस्ता! पण गेले काही दिवस आजारपणामुळे त्यात खंड पडला… आणि परवा ते निवर्तल्याची बातमी समजली. तीव्र धक्का बसला… आणि ३०-४० वर्षांचा त्यांचा आयुष्यपट झर्रकन चमकून गेला.

Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
Pune Rainwater Harvesting Project lead by retired colonel shashikant Dallvi
गोष्ट असामान्यांची Video: पुण्यातील निवृत्त कर्नल शशिकांत दळवींचं ‘मिशन पाणी वाचवा!’
mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत
Discovery of four new species of lizard from Kolhapur and Sangli districts  Nagpur
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमधून पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध; महाराष्ट्रातील तरुण संशोधकांचे यश

नांदगावकरांची माझी प्रथम भेट कधी झाली तसे मला फारसे आठवत नाही, पण ‘प्रभात चित्र मंडळा’शी माझी ओळख माझ्या पंचविशीत झाल्याचे स्मरणात आहे. मी मुक्त पत्रकार असतानाच ‘ग्रंथाली वाचक चळवळी’त ८२ साली कार्यकर्ता म्हणून सामील झालो. ‘ग्रंथाली’चे कार्यालय ‘प्रभात’च्याच ऑफिसमध्ये मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात होते. तेथे मी जात-येत असे. माझी प्रथम दिनकर गांगल व ‘ग्रंथाली’शी घसट झाली व मग ‘प्रभात’ व सुधीर नांदगावकरांशी! माझ्यातील सिनेप्रेमाने ग्रंथप्रेमावर कुरघोडी केली. मी काही मित्रांच्या सहकार्याने ‘ग्रंथाली’त असतानाच ‘आशय’ची स्थापना केली. फिल्म क्लब फेडरेशनशी संपर्क झाला. त्याचे सचिव नांदगावकरांशी भेट झाली व त्याचं दृढ नात्यात रूपांतर झालं. ‘आशय’च्या प्रारंभीच्या काळात एकदा ते चर्चेसाठी पुण्यात आले होते. त्या चर्चेतही महाराष्ट्रात फिल्म सोसायटी चळवळ कशी रुजणार हाच त्यांच्या चिंतेचा सूर होता.

खरे तर, त्याआधी दोन दशकांपूर्वीच हा सूर त्यांना गवसला होता. त्यातूनच त्यांनी १९६८ साली ‘प्रभात’ची स्थापना केली. मुंबईतील मराठी चित्ररसिकांसाठी पहिली फिल्म सोसायटी. ‘प्रभात’च्या काळात त्यांनी अनेक कल्पक कार्यक्रमांचे आयोजन केले. अल्पावधीतच ‘प्रभात व नांदगावकर’ हे समीकरण बनले. सरत्या काळात मुंबईत व देशभर अनेक फिल्म सोसायट्या निर्माण होत गेल्या व बंद पडल्या, पण ‘प्रभात’ने हा ध्यास सोडला नाही. आज ‘प्रभात’ सुवर्णमहोत्सवी वर्षात आहे. ‘प्रभात’ हे नांदगावकरांचे ठोस स्वप्न!

कलात्मक चित्रपटांचे जागतिक भान चित्रपट रसिकांना देण्याचे धडे त्यांनी ‘प्रभात’मध्ये गिरवले आणि पुढे महाराष्ट्रभर ते गिरविण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्यांनी पहिला राज्यव्यापी रसिक मेळावा घेतला. पण एवढ्यावरच ते थांबले नाहीत. दिल्ली, कलकत्ता, त्रिवेंद्रम येथे त्या काळात चित्र महोत्सव होत होते. पण मुंबई चित्रनगरी असूनही चित्र महोत्सव नव्हता. नांदगावकरांनी किरण शांतारामांच्या सहकार्याने मुंबईत ‘मामी’ चित्रमहोत्सव सुरू केला. आजच्या लोकप्रिय ‘मामी’ चित्र महोत्सवाचे जन्मदाते खरं तर नांदगावकरच आहेत.

आशियाई चित्रपटांची महाराष्ट्राला ओळख व्हावी म्हणून ‘एशियन फिल्म फाऊंडेशन’ स्थापन करून आशियाई चित्र महोत्सव सुरू केला. चित्रपट अभ्यास व संशोधन करणाऱ्यांना या संस्थेमार्फत प्रोत्साहन दिले. याच संस्थेमार्फत ‘शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा व चित्रपट संस्कृती’ या संदर्भग्रंथाचे स्वत: लेखन केले.

‘मामी’ व ‘आशियाई’ असे चित्र महोत्सव आयोजित करून चित्रपट महोत्सवाचे सूत्र महाराष्ट्राला दिले. मुंबईपाठोपाठ पुणे, कोल्हापूर व नागपुरात महोत्सव आयोजित केले. त्याला ते ‘नॅनो’ महोत्सव म्हणत असत. महाराष्ट्रात महोत्सव संस्कृती रुजवण्यास नांदगावकरच कारणीभूत होते.

सिनेपत्रकार असलेल्या नांदगावकरांना मराठी चित्रपट- पत्रकारितेच्या स्वरूपाबाबत नेहमीच खंत वाटत असे. त्यातूनच त्यांनी चित्रपट कलेचा गंभीरपणे विचार करणारे ‘रूपवाणी’ मासिक सुरू केले. गेली २५ वर्षे हे मासिक सुरू आहे, यातच त्यांचे संपादकीय कसब अधोरेखित होते. मराठी माणसात ‘चित्रपट संस्कृती’ रुजायची असेल तर चित्रपट रसास्वादाचे महत्त्व मातृभाषेतून सांगितले पाहिजे यावर त्यांचा विश्वास होता. त्यातूनच ‘मराठीतून चित्रपट रसास्वाद’ या कार्यशाळेला त्यांनी आकार दिला. सत्यजित राय हे त्यांचे ‘वीक पॉइंट!’ राय यांची महाराष्ट्राला ओळख व्हावी यासाठी राय यांच्यावरील ‘अभिजात’ हे पुस्तक त्यांनी मराठीत अनुवादित केले. एवढेच नव्हे, तर चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रात ‘फिल्म सोसायटी’ उभी राहील, त्याचे बीज कसे फुलेल याचा माग ते काढत असत आणि जराशी सुपीक जमीन सापडली तर तेथेही ‘फिल्म सोसायटी’चा अंकुर ते लगोलग फुलवत असत.

चित्रपट संस्कृतीचा हा माहोल उभा करतानाच नांदगावकरांचे व्यक्तिमत्त्व घडले. भाजप-संघ व सिनेमा अशी दुहेरी निष्ठा त्यांनी जोपासली. पण आपल्या कार्यकर्तेपणाची सावली त्यांनी सिनेप्रेमावर कधी पडू दिली नाही. अगदी ते म्हणतात त्याप्रमाणे, ‘आधी कुतूहल म्हणून ते सिनेमाकडे आकर्षित झाले, मग ‘पॅशन’पोटी ‘प्रभात’ सुरू केले आणि ‘मिशन’पोटी महाराष्ट्रात ‘फिल्म सोसायटी चळवळ’ रुजवली. राज्यात ५० फिल्म सोसायट्या निर्माण करण्याचे स्वप्न नांदगावकरांनी उराशी बाळगले आणि ते पूर्ण केले!’

स्वातंत्र्योत्तर काळाच्या पहिल्या दशकात चित्रपटांचा उत्तम प्रेक्षक निर्माण होण्यास पूरक वातावरण तयार करण्याच्या दृष्टीने तीन महत्त्वपूर्ण घटना घडल्या. (नांदगावकरांच्या भाषेत; नंबर एक… नंबर दोन… नंबर तीन!). पहिली, १९५१ साली स. का. पाटील कमिटीच्या शिफारशीनुसार, ज्यातून महोत्सव, चिल्ड्रेन फिल्म सोसायटी, फिल्म फायनान्स कॉर्पोरेशन व अर्काईव्ह या संस्था निर्माण झाल्या. १९५५ साली ‘पथेर पांचाली’ रूपाने नवसिनेमाची वाट निर्माण झाली आणि १९५९ साली ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी’ या शिखर संस्थेची स्थापना होऊन देशभर ‘फिल्म क्लब’ निर्माण होण्यास प्रारंभ झाला.

भारतीय सिनेप्रेक्षकाला जागतिक भान देणाऱ्या आणि चित्रपट कलामाध्यम म्हणून संस्कार करण्यास कारणीभूत ठरलेल्या या तीन घटनांच्या पार्श्वभूमीवर नांदगावकरांचे आयुष्य-नाट्य रंगलं… खरं तर या तीन घटनांचा वारसा टिकविणारे आणि त्याची रुजुवात करणारे नांदगावकरच खरे वारसदार आहेत. त्यातही दैवदुर्विलास इतका, की परवा ३१ डिसेंबरला केंद्र सरकारने पाटील समितीच्या शिफारशीनुसार जन्माला आलेल्या या साऱ्या चित्रसंस्थांना एका छत्राखाली आणून त्यांचा स्वायत्तपणा संपुष्टात आणला आणि दुसऱ्याच दिवशी- १ जानेवारीला सुधीर नांदगावकर अंतर्धान पावले! ते असते तर त्यांच्या सकाळच्या फोनने मी खडबडून जागा झालो असतो… आता तो फोन कधीच येणार नाही, हे विदित!

लेखक आशय फिल्म क्लब या चित्रपटविषयक संस्थेचे पदाधिकारी आहेत.