विजया जांगळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सगळ्यांना गर्लफ्रेन्ड आहे, मी किती दिवस एकटा राहू?’

किंवा

‘थोडा चेंज हवाय यार, कर के तो देखते है…’

एखाद्या अनोळखी नंबरवरून किंवा सोशल मीडिया अकाउंटवरून कोणीतरी ‘हाय!’ करतं तेव्हा अनेकांच्या मनात अशा भावना निर्माण होतात. अशा वेळी सोशल मीडिया हायजिन, प्रायव्हसी, सायबर क्राइम असं सारं शहाणपण मागे पडतं. ‘हाय!’ला प्रतिसाद दिला जातो आणि सुरू होतं एक दुष्टचक्र. मित्र वा मैत्रीण म्हणत विश्वास संपादन करणं, मग नग्न छायाचित्र अथवा व्हिडीओ पाठवण्याची गळ घालणं आणि असा काही ऐवज हाती लागताच ब्लॅकमेलिंग सुरू करणं… सेक्स्टॉर्शनची मोडस ऑपरेंडी थोड्याफार फरकाने अशीच असते. पुणे येथील किशोरवयीन मुलाच्या आत्महत्येनंतर पुढे आलेल्या वास्तवाची व्याप्ती मात्र याहूनही अधिक आहे.

सीमा भाग, मग ते राज्यांचे असोत वा देशांचे तिथे गुन्हेगारीसाठी पोषक वातावरण निर्माण होणं स्वाभाविक असतं. गुन्हा एका राज्यात करायचा, मुद्देमाल दुसऱ्या राज्याच्या हद्दीत नेऊन लपवायचा. एका राज्याचे पोलीस आले की दुसऱ्या राज्याच्या हद्दीत पसार व्हायचं. अलवार, नुह, मेवात… राजस्थान, हरयाणा आणि उत्तर प्रदेश अशा तीन तीन राज्यांच्या सीमा लाभलेल्या जिल्ह्यांत गेली कित्येक वर्षं हेच झटपट श्रीमंत होण्याचं सोपं सूत्र ठरलं. यंत्रणांना गुंगारा देणं इथल्या सायबर गुन्हेगारांसाठी अगदी सोपं होतं. अख्खी गावंच्या गावं, जिल्हे याच व्यवसायात असल्यामुळे गुन्ह्यांना सर्वांचाच पाठिंबा. असं असताना पोलिसांना कोण दाद देणार?

गुन्हेगार जेवढा भटका तेवढा तो यंत्रणांच्या हाती लागणं दुरापास्त. यातले काही गुन्हेगार ट्रकचालक आहेत. त्यांचं कामच फिरतीचं. सकाळी एका राज्यात तर संध्याकाळी वेगळ्याच. अशांचा ठावठिकाणा शोधणं किती कठीण. राजस्थानातली सेक्स्टॉर्शन रॅकेट्स अशाच काही सूत्रांवर सुरू झाली. एकाचं यश पाहून दुसऱ्यालाही तेच सूत्र वापरून पाहण्याचा मोह न होता तरंच विशेष. झारखंडच्या ‘जामतारा’ने समोर एक उदाहरण ठेवलं होतंच. राजस्थानात गावंच्या गावं, जिल्हे सेक्स्टॉर्शनमध्ये बुडून गेले.

या गुन्ह्यांना काही सीमा नाहीत. देशाच्या एका कोपऱ्यात बसून देशभरातल्या अन्य कोणत्याही गावातलं सावज हेरणं, त्याची शिकार करणं शक्य होतं. यंत्रणा गावापर्यंत पोहोचल्याच तर रस्ते खोदून, दगडफेक करून, सहकार्यास नकार देऊन त्यांचे प्रयत्न फोल ठरवले जात. सायबर गुन्हेगारीबाबत समस्या ही की, त्यात गुन्हे करण्याचे अनंत मार्ग आहेत आणि त्यात रोज नवी भर पडत असते. गुन्हेगारांना चाप लावायचा तर यंत्रणांनी त्यांच्या चार पावलं पुढे राहायला हवं. मात्र हे अद्याप शक्य झालेलं नाही. गुन्ह्यांची व्याप्ती, वेग, गुन्हेगारांची पुरावे नष्ट करण्याची क्षमता, लोकलज्जेमुळे गुन्हे नोंदवलेच न जाणं अशा अनेक आव्हानांचा सामना यंत्रणांना करावा लागत आहे. आर्थिक गुन्हे झाले तर लोक पुढे येतात तरी, पण सेक्स्टॉर्शनसारखे गुन्हे आपसातच मिटवण्याचा प्रयत्न होतो. तो फोल ठरला तर मग आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं जातं.

सेक्स्टॉर्शन हा काही नवा प्रकार नाही. तो ऑनलाइन आर्थिक लुटमारीएवढाच जुना आहे. कधी समाजमाध्यमांतून मैत्री वाढवली जाते, कधी वेब कॅमेरा हॅक केला जातो तर कधी समाजमाध्यमी अकाउंट हॅक केलं जातं… विविध मार्गांनी अशा प्रकारचे गुन्हे घडत आले आहेत. मुंबईतील सेक्स्टॉर्शनच्या प्रकरणात यंदा मोठी वाढ झाली आहे. २०२१ या पूर्ण वर्षभरात सेक्स्टॉर्शनच्या ५४ तक्रारी दाखल झाल्या होत्या. २०२२मध्ये पहिल्या सहा महिन्यांतच ४७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. अन्य शहरांतही थोड्याफार फरकाने हीच स्थिती आहे.

सायबर सुरक्षातज्ज्ञ ॲड. प्रशांत माळी सांगतात, ‘सायबर गुन्हेगारीला काही सीमा राहिलेली नाही. मानवी मेंदूला गुन्ह्याच्या ज्या ज्या कल्पना सुचू शकतात, त्या सर्व इथे प्रत्यक्षात आणणं शक्य असतं. या गुन्ह्यांपासून स्वतःला सुरक्षित राखण्याचा सर्वांत उत्तम मार्ग म्हणजे आपली समाजमाध्यमांवरची खाती, आपला फोन, ईमेल, बँक खाती असा आपला जो काही डिजिटल वावर आहे, तो कडी- कुलपात बंदिस्त ठेवणं. कोणतीही व्यक्ती खरोखरच आपल्या ओळखीची आहे, याची खातरजमा केल्याशिवाय तिच्यासाठी या वावराचे दरवाजे न उघडणं. पण एवढं करूनही आपली फसवणूक झालीच तर लोकलज्जा काही काळ बाजूला ठेवून सर्वांत पहिलं काम म्हणजे, जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणं. आपण त्यातले नाहीच, हे सिद्ध करण्यासाठी अनेकजण अशा प्रकारची चॅट्स, फोटो, व्हिडीओ घाई-घाईत डिलीट करून टाकतात, अशाने गुन्ह्याच्या तपासात अडथळा येऊ शकतो. याव्यतिरिक्त एरवी योग्य वेगाने चालणारा आपला फोन अचानक मंद झाला किंवा त्याचं तापमान नेहमीपेक्षा जास्त वाढू लागलं तर, फोन हॅक झालेला नाही ना याची खात्री करून घ्यावी. फोन हॅक केला जातो तेव्हा त्यातील डेटा इतरत्र अपलोड होत राहतो. साहजिकच प्रोसेसिंग वाढून तापमान वाढते आणि वेगही कमी होतो. त्यामुळे सावध राहणं हाच उत्तम मार्ग आहे.’

लैंगिक गरजा प्रत्येकाच्याच असतात आणि त्या भागवण्याचा प्रयत्न करण्यात अपराधी वाटण्यासारखं काही नाही, हे लक्षात ठेवायला हवं. आपल्या जवळच्या माणसांना विश्वासात घेऊन त्यांना याची कल्पना द्यायला हवी. अनोळखी व्यक्तींना प्रतिसाद देऊ नये, हा धडा अगदी लहानपणापासून अनेकदा गिरवून घेण्यात आलेला असूनही अनेकजण असा प्रतिसाद देतात. धोके माहीत असूनही देतात. असं का होतं, ही काय मनासिकता असते, याविषयी मानसोपचार क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात, विविध समाजमाध्यमं ही या गुन्हेगारांसाठी खुली कुरणं झाली आहेत. ज्यांना स्वतःच्या रंग-रूपाविषयी आत्मविश्वास नाही, आपल्याला मित्र-मैत्रिणी नाहीत, सोशल लाइफ नाही, असा न्यूनगंड आहे, ज्यांना प्रशंसेची आस आहे, अशा व्यक्ती सहज आपले सावज ठरू शकतात, हे सूत्र या सायबर गुन्हेगारांच्या डोक्यात पक्के असते. समाजमाध्यमांवरील पोस्ट्स पाहून व्यक्तिमत्त्व जोखणं सोपं होतं. मग अशा व्यक्तींशी संपर्क साधला जातो. अर्थात अनेकांशी संपर्क साधून पाहिल्यावर एखादाच त्यात अडकतो. मग त्यांच्याशी प्रेमाने गप्पा मारून, त्यांची वारेमाप प्रशंसा करून विश्वास संपादन केला जातो. यातून बहुतेकांना या लाडिक गप्पांची सवय लागते. त्याचा फायदा घेत नग्न छायाचित्र वा व्हिडीओ पाठविण्याची किंवा व्हिडीओ कॉल करून नग्न होण्याची गळ घातली जाते. काही जण बेसावधपणे हे सारं करण्यास तयार होतात, अशा वेळी गुन्हेगारांचं फावतंच. मात्र नकार दिल्यास, ‘तुझा माझ्यावर विश्वासच नाही’, ‘तुझ्यात हिंमतच नाही’, अशी टीका केली जाते. इमोशनल ब्लॅकमेलिंग करून संपर्क तोडण्याची धमकी दिली जाते. याला बळी पडत बहुतेक जण समोरचा म्हणेल त्याप्रमाणे करण्यास तयार होतात. अशा प्रकारची छायाचित्रे वा व्हिडीओ हाती लागताच पैशांसाठी ब्लॅकमेलिंग सुरू होते. या क्लिप्स आई-वडिलांना, पत्नीला किंवा अन्य नातेवाईकांना पाठविण्याची धमकी दिली जाते. काही वेळा केवळ एक व्हिडीओ कॉल केला जातो आणि त्यात अचानक अश्लील व्हिडीओ सुरू होतो. या कॉल्सचे रेकॉर्डिंग नातेवाईकांना पाठवण्याची धमकी दिली जाते.

आपण असे व्हिडीओ इतरांना पाठवतो, स्वतः पाहतो हे इतरांना कळल्यास समाजात नाचक्की होईल, या भीतीने बरेचजण पैसे देत राहतात आणि पैसे देण्याची क्षमता संपली की मग आत्महत्येसारखे मार्ग स्वीकारले जातात.

गेल्या काही वर्षांत अशा घटना वाढत आहेत. हल्लीच्या किशोरवयीनांचं संपूर्ण आयुष्यच समाजमाध्यमांभोवती फिरू लागलं आहे. साहजिकच त्यांना त्यांची समाजमाध्यमांतली, आभासी जगातली प्रतिमा अतिशय महत्त्वाची वाटते. आपल्या बहुतेक मित्रांना गर्लफ्रेन्ड अथवा बॉयफ्रेन्ड आहे, ते त्यांच्याबरोबर चिल करतात, त्यांच्यासोबतचे सेल्फी इन्स्टावर पोस्ट करतात आपण मात्र एकटेच… असं वाटून त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो आणि त्यातूनच ते अशा प्रलोभनांचे बळी ठरतात, असं मानसोपचार क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा सांगतात, ‘गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती समाजमाध्यमांवर लक्ष ठेवून असतात. साधारण किशोरवयीन मुलांना जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न अधिक प्रमाणात केले जातात. एखादी व्यक्ती आपलं संपूर्ण आयुष्य समाजमाध्यमांवर प्रदर्शित करत आहे का, ती कशा प्रकारचे फोटो पोस्ट करत आहे यावरून त्या व्यक्तीला इतरांचं लक्ष वेधून घेण्याची किती इच्छा आहे, हे स्पष्ट होतं. एखाद्या व्यक्तीला घरातून किंवा मित्रपरिवाराकडून पुरेशी प्रशंसा मिळत नसेल, तर ती अन्यत्र प्रशंसा शोधू लागते आणि ते समाजमाध्यमांत प्रतिबिंबित झाल्यास अशा व्यक्ती सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात अडकवल्या जाण्याची शक्यता वाढते.

हे टाळण्यासाठी शाळेत जसं गुड टच, बॅड टच शिकवतात, तसंच सायबर क्राइमविषयी जनजागृती करण्याची गरज आहे. ज्या मुलांना बाहेरून भावनिक पाठबळ मिळवण्याची गरज भासते त्यांनी आपल्या खऱ्या आयुष्यातल्या किमान एक-दोन मित्रांशी त्याविषयी चर्चा केली पाहिजे. आपल्या आयुष्यात काय घडत आहे हे आपल्या जवळच्या माणसांना माहीत असले, तर ते आपली चुकीच्या दिशेने पडणारी पावलं रोखू शकतात. ज्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव आहे, त्यांनी समुपदेशकाकडे जाणं गरजेचं आहे.’

याउपरही आपल्याबाबतीत असा एखादा गुन्हा घडलाच, तर सर्वप्रथम घरच्यांना माहिती द्यायला हवी आणि त्यानंतर जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला हवी. लोक काय म्हणतील, हा प्रश्न बाजूला ठेवला पाहिजे. आपल्या परिचयातल्या एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असं काही घडलं तर त्यावर थेट टीका करण्याऐवजी मानसिक आधार द्यावा, त्याला समुपदेशकाकडे घेऊन जावं.

अशा संकटातून बाहेर पडल्यानंतरही अनेकांना मानसिक समस्या भेडसावू लागतात. स्वतःच्या मनातली स्वतःचीच प्रतिमा ढासळते. ते आत्मविश्वास गमावून बसतात. अशा व्यक्तींना समुपदेशकाची गरज भासू शकते. काही व्यक्तींची इम्पल्सिव्ह पर्सनॅलिटी असते. अशा व्यक्तींच्या बाबतीत गुन्हा घडल्यानंतरही ते त्याच वर्तनाची पुनरावृत्ती करत राहतात. त्यांनाही समुपदेशन आवश्यक असतं.

आपलं मूल अशा चक्रव्यूहात अडकलं आहे हे पालकांच्या वेळीच लक्षात आलं तर पुढचे गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, अशा मुलांमध्ये काही विशिष्ट लक्षणे दिसतात. एरवी गप्पा मारणारी मुलं अबोल होतात, मोठी माणसं दिसताच लॅपटॉप बंद करून टाकतात, एरवी आपला फोन कोणालाही देणारी मुलं फोनचा ॲक्सेस देणं बंद करतात, आपल्याच तंद्रीत दिसतात, तेव्हा ती अशा एखाद्या सापळ्यात अडकत आहेत किंवा अडकली आहेत का, हे तपासून पाहणं गरजेचं आहे.

सायबर गुन्हेगारांची संख्या, त्यांच्या डोक्यातून निघणाऱ्या कल्पना, त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांच्या हाती असली तांत्रिक कौशल्ये याला काही सीमा नाही. सामान्य व्यक्ती एकच करू शकते. आपलं डिजिटल विश्व कडीकुलपात बंद ठेवणं आणि खातरजमा करून घेतल्याशिवाय कोणालाही त्यात शिरकाव करू न देणं. थोडक्यात कोणत्याही अनोळखी ‘हाय!’ला प्रतिसाद न देणं…

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sextortion digital security online blackmailing digital footprint asj
First published on: 27-11-2022 at 10:16 IST