भूषण कोरगांवकर
‘‘शकुबाई, तुमच्यासारख्या महान कलाकाराने घरी बसणं हा लोकांवर अन्याय आहे.’’ २००९ साली अकाली निवृत्ती घेतलेल्या शकुबाईंना मी म्हणालो. त्या लगेच म्हणाल्या, ‘‘मला पण घरी बसायला आवडत नाही. पण आता काय करू ? मी स्वत: काही कार्यक्रम काढू शकत नाही. मला पार्टी चालवायची नाही आणि सध्या जे लावणीचे कार्यक्रम सुरू आहेत त्यात काम करायचं मन करत नाही. तूच नवीन कार्यक्रम काढ, त्यात मी तुला शेवटपर्यंत साथ देईन’’. मी हसलो आणि विसरून गेलो. त्यावेळी त्यांना, मला किंवा कुणालाच ही कल्पना नव्हती की खरंच पुढे जाऊन मी कार्यक्रम काढेन आणि त्या निमित्ताने त्यांची ‘सेकंड इनिंग’ एवढी यशस्वी होईल.

शकुंतलाबाई नगरकर यांची आणि माझी पहिली भेट २००७ साली सणसवाडीच्या जय अंबिका कला केंद्रात झाली. प्रचंड मिश्किल, खोडकर, तितक्याच फटकळ आणि कडक, शिस्तबद्ध. संगीत बारीच्या क्षेत्रात राहूनही मिनिटा-मिनिटाची शिस्त पाळणार्‍या माझ्या मते त्या एकमेव. इथली व्यवस्थाच एवढी निवांत असते की अध्र्या-पाऊण तासाची दिरंगाई कुणी गणतीतच धरत नाही. पण ‘‘दिलेल्या वेळेच्या १५ मिनिटं आधी मी सांगितलेल्या ठिकाणी हजर असेन’’ हा २०१४ साली दिलेला शब्द त्यांनी शेवटपर्यंत पाळला. ‘‘आपल्या कामाचा आणि वेळेचा योग्य तो मोबदला घेतलाच पाहिजे’’ ही गोष्ट मी त्यांच्याकडूनच शिकलो.

आधार कार्डानुसार त्यांचा जन्म १९६० सालचा पण त्यांच्या आठवणीनुसार त्या जन्मल्या १९७२ साली. लावणी खेळायला त्या उभ्या राहिल्या तेव्हा १८ वर्षाच्या होत्या. म्हणजे आजचं त्यांचं वय ७२. गेल्या सहा वर्षांपासून त्या कॅन्सरला हसतहसत हरवत आल्या होत्या. २०२० सालच्या फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या छातीत दुखायला लागलं. सुरुवातीला अपचन, गॅस यावर प्रथम उपचार झाले. मग झालेल्या हृदयाच्या तपासण्या नॉर्मल आल्या. त्यातच कोविडची टाळेबंदी आली. दुखणं अधूनमधून जीवघेणी उचल खायचं. पण त्याच्याकडे बघायची आता काही सोयच उरली नाही. शेवटी नोव्हेंबरमध्ये टाळेबंदी उठली तशी पुन्हा एकदा सगळ्या तपासण्या झाल्या. त्यात फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचं समजलं. तोही चौथ्या टप्प्यावरचा. कॅन्सरतज्ज्ञ डॉ. प्रसाद दांडेकर यांनी लगेच उपचार सुरू केले पण ‘‘हे आता शेवटचे काही महिने’’ असंही सांगितलं. त्या म्हणाल्या, ‘‘जिंदगीत कधीच कुणाला घाबरले नाही. कॅन्सरला कसली घाबरतेय? कशी चुटकीसरशी पळवून लावते याला बघशील तू.’’ मी वरवर हसून दाखवलं पण मनातून खूप हताश वाटलं. किमो सुरू झाली. आश्चर्य म्हणजे त्यांचे केस गळाले नाहीत. आपल्या सुंदर, घनदाट केसांचा त्यांना प्रचंड अभिमान होता. (शेवटपर्यंत ते बरेचसे काळे होते. पूर्ण पिकले नव्हते.) किमोच्या सातव्या दिवशी अचानक एक कार्यक्रम आला. ‘‘बिनधास्त घे’’ त्या म्हणाल्या आणि कार्यक्रम अगदी खणखणीत करून दाखवला. असे कित्येक कार्यक्रम त्यांनी केले. प्रेक्षकातल्या कोणाला संशयही आला नाही. दोन वर्षाच्या आत त्या पूर्ण बर्‍या झाल्या. असं फार क्वचित होतं. पुढे महिंद्र एक्सलन्स इन थिएटर ॲवार्ड्स या दिल्लीत भरणार्‍या नाटकांच्या स्पर्धेत देशभरातल्या ४०० नाटकांमधून ‘लावणी के रंग’ची पहिल्या दहात निवड झाली. शकुबाईंना तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

दोन महिन्यांनी आमचा रशियाचा दौरा ठरला. आणि तेव्हाच नेमकं त्यांना दुसर्‍यांदा कॅन्सरने गाठलं. यावेळेस हल्ला झाला तो त्यांच्या डाव्या डोळ्यावर. नजर जवळपास गेली. ‘‘काही हरकत नाही, एका डोळ्यानं चांगलं दिसतंय. काढ तू तिकीट माझं’’ त्या म्हणाल्या. रशियाला आल्या, दणदणीत कार्यक्रम केले, आमच्याबरोबर सगळीकडे भर थंडीत फिरल्या, गाणी गायल्या आणि घरच्या लोकांसाठी भरपूर खरेदी करून परतल्या. लगेच किमो सुरू झाली. यावेळेस मात्र केस गेले. त्यामुळे कार्यक्रम करताना टोप बसवणं सुरू झालं. आता त्यांना मेकअपशिवाय पाहणार्‍या लोकांना त्यांचा आजार जाणवू लागला. हे होतं २०२३ साल. पण यातूनही त्या दीड वर्षात सहीसलामत सुटल्या. नजर अंधुकच होती. ‘‘पण पाय आणि गळा चालतोय, तोवर मी कसली थांबतेय?’’ हा त्यांचा सवाल.

दौर्‍यांच्या वेळी त्या विशेष उत्साहात असायच्या. वयाने सगळ्यात मोठ्या आणि कॅन्सरच्या रुग्ण. पण ऊर्जा आणि उत्साहाचा अखंड झरा. ठरल्या ठिकाणी पोहोचल्या पोहोचल्या बाजारात जायची त्यांची सवय कधीच सुटली नाही. ‘‘नवीन जागी येऊन झोपा कसल्या काढताय? चला, फिरूया’’ असं त्यांनी म्हटलं की आम्हालाही तरतरी यायची.

दररोज संध्याकाळी, डॉक्टरच्या परवानगीने, ‘बसण्याचा’ कार्यक्रम व्हायचा. जुन्या आठवणी निघायच्या तशा कार्यक्रमात सुधारणा कशा करता येतील यावर चर्चाही चालायच्या. भरपूर गप्पा, हशा, चेष्टा, नकला आणि कधी कधी जुन्या, कटू आठवणींनी भिजणारे त्यांचे डोळे. किती माणसांनी धोका दिला – जवळचे, दूरचे, नात्यातले, परके. शकुबाई सगळ्यांना पुरून उरल्या असल्या तरी त्या जखमांचे ओरखडे अजूनही ओलेच होते. ‘माणसं अशी का वागतात?’ या प्रश्नाबरोबरच ‘मीही अशी वागते का रे?’ हा प्रश्नही त्यांना पडायचा. आणि मीही परखडपणे ‘हो, कधी कधी, काही जणांच्या बाबतीत’ असं ‘उदाहरणासहित’ उत्तर द्यायचो. माझ्या किंवा कुणाच्याही वागण्यातल्या चुका दाखवून द्यायला त्या कधीच मागेपुढे पाहत नव्हत्या. याच सवयीमुळे त्यांच्या जवळची, दूरची माणसं दुखावलीही जायची. ‘‘पण म्हणून मी माझा धर्म बदलणार नाही. इतके घाव सोसलेत, आत्ता कुठं या मूर्तीला इतका सुंदर आकार आलाय. आता थोडाही बदल झाला तर सगळं विद्रूप होऊन जाईल,’’ त्या डोळा मारायच्या आणि म्हणायच्या, ‘‘आणि मीच विद्रूप झाले तर मग आपल्या कार्यक्रमाला कोण येईल? आपलं हे फिरणं, खाणं-पिणं, शॉपिंग करणं बंद होऊन जाईल ना!’’.

असे मजेमजेत दिवस पुढे सरकत होते, कलेत प्रगती होत होती. कार्यक्रमात त्या त्यांचे मोलाचे सल्ले देत होत्या. एका संपूर्ण नवीन कार्यक्रमाची संकल्पना त्यांच्या डोक्यात घोळत होती. ‘लव्ह अँड लावणी’. ‘‘लावणी के रंग सुरू करूनही आता पाच वर्षं होऊन गेली. खूप कौतुक झालं, होतंय. सगळं मान्य पण आता काहीतरी वेगळं, भव्यदिव्य असं करूया की त्यामुळं लावणी सगळ्या कलांची महाराणी झाली पाहिजे. त्यासाठी एक मस्त कुठंतरी दौरा काढ. मग निवांत बसून विचार करता येईल,’’ त्यांच्या कल्पनेच्या भरार्‍या सुरूच होत्या. खरं तर मी त्यांच्या मुलाच्या वयाचा. पण आमच्यातलं नातं नेहमीच बरोबरीचं, मैत्रीचं राहिलं. ‘‘दुनियेत कधी कुणाकडं मन मोकळं केलं नसेल इतकी मी तुझ्याशी बोलते. कारण आपण फ्रेंड्स आहोत.’’ असं त्या नेहमी बोलून दाखवायच्या.

फेब्रुवारी २०२५. रोगाने शेवटचा घाला घातला. पुन्हा उपचार. पुन्हा किमो. रेडिएशन. यावेळेस मात्र त्यांची शक्ती कमी कमी होत चालली. चालतानाही दुसर्‍या व्यक्तीचा आधार लागू लागला. पण स्टेजवर त्या निभावून नेत होत्या. संपूर्ण कार्यक्रमात आता त्यांच्या फक्त दोन लावण्या ठेवल्या. एकदा तर कार्यक्रमाच्या दिवशीच सकाळी प्रचंड पाठदुखी सुरू झाली. उभं राहणंही मुश्कील होतं. पण आम्ही नको नको म्हणत असतानाही त्यांनी कार्यक्रम केला. मेकअप लावल्यावर नेहमीप्रमाणे त्यांच्यात वेगळीच जान आली आणि कार्यक्रम त्यांनी नेहमीप्रमाणे जान ओतून केला. १९ एप्रिल २०२५ रोजीचा ‘लावणी के रंग’ हा शकुबाईंचा शेवटचा कार्यक्रम! त्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये एका मोठ्या हिंदी सिनेमासाठी एका नामवंत अभिनेत्रीची आम्ही तीन दिवसांची कार्यशाळा घेतली. हे त्यांचं शेवटचं काम.

कॅन्सरमुळे एकच गोष्ट चांगली झाली ती म्हणजे त्यांची तंबाखू सुटली. ‘‘कसलीच सवय लावून घ्यायची नाही. दारू नाही की काही नाही. कधीतरी मजा म्हणून घेणं ठीक आहे पण रोज रोज नाही. आपण कुणाचे गुलाम व्हायचं नाही. आयुष्यात मी व्यसनं दोनच केली- लावणी आणि तंबाखू. पण मी कधी ना कधी तंबाखू सोडणार,’’ त्या नेहमी सांगायच्या. आणि तशी त्यांनी तंबाखू सोडलीही. लावणी मात्र शेवटपर्यंत खेळत राहिल्या. शेवटच्या वर्षात नाचणं थांबलं तरी आम्ही भेटायला गेलो की बसल्या जागी गाणं, अदाकारी, थट्टा मस्करी सुरूच असे.

‘‘लावणी माझा श्वास आहे’’ असं म्हणणार्‍या शकुबाईंना कारकीर्दीच्या सुरुवातीला लावणी अजिबात आवडत नव्हती. १९७२ साली त्यांचं संगीत बारीच्या क्षेत्रात पदार्पण झालं तेव्हा सुरुवातीला त्यांना फक्त हिंदी गाण्यांचाच छंद होता. वसंतराव घाडगे, गोविंदराव निकम यांच्याकडून नृत्याचे थोडेफार धडे गिरवले आणि इथल्या पद्धतीनुसार आई, मावश्या, इतर मोठ्या कलाकार यांचं बघून बघून त्यांनी कला आत्मसात केली. इकडे स्टेजवर आणि बैठकांमध्ये समोरचे लोक जी फर्माईश करतील तीच गाणी घ्यावी लागतात. १९५० नंतर जसजसं हिंदी सिनेमाच्या संगीताने समाजमनावर गारुड केलं तसतसं पारंपरिक लावण्या, छकडी, लोकगीतं, कव्वाल्या, गझला, नाट्यपदं आणि भावगीतांच्या जोडीला हिंदी आणि मराठी फिल्मी गाणी आणि फिल्मी लावण्यांची मागणी वाढू लागली. ‘‘ख्वाजा की दिवानी’’ ही शकुबाईंची हुकमी कव्वाली होती. त्यांच्या पहाडी आवाजात ती ऐकायला दूरदूरहून लोक यायचे.

१९८० नंतर पारंपरिक लावण्यांची मागणी इतकी कमी झाली होती की तिला पुन्हा एकदा उर्जितावस्था आणण्यासाठी १९९२ साली अकलूजच्या मोहिते पाटील यांनी राज्यस्तरीय स्पर्धा सुरू केली. तेव्हा मज्जूशेठ तांबे यांनी आर्यभूषण थिएटरची ग्रुप पार्टी तयार केली. त्यात चंदाबाई, मोहनाबाई, पुतळाबाई यांच्यासह शकुबाईही होत्या. त्यावेळेस पहिल्यांदा शकुबाई रस घेऊन लावणी शिकल्या. अनेक दिवस भान विसरून तालमी केल्या. त्याला फळही मिळालं. नंबर आला, कौतुक झालं आणि तेव्हा त्यांना लावणीची लज्जत समजली. जुन्या जुन्या लावण्या त्या कष्ट घेऊन मिळवू लागल्या. पुढे १९९७ साली मधु कांबीकर यांनी ‘सखी माझी लावणी’ हा कार्यक्रम काढला तेव्हापासून खरोखरीच लावणी शकुबाईंची जीवनभराची सखी बनून गेली.

केशवराव बडगे या राष्ट्रीय पातळीवरच्या कलाकाराचा त्यांच्या कारकीर्दीत मोठा हात आहे. त्यांच्यासोबत शकुबाईंनी अनेक कार्यक्रम केले. त्यांना २००८ साली राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला. २०१४ साली माझ्या ‘संगीत बारी’ पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि त्याच नावाने आम्ही पारंपरिक कलाकारांसह जे कार्यक्रम सुरू केले तेव्हापासून हळूहळू या क्षेत्रात, दर्दी लोकांच्या वर्तुळात त्यांची चर्चा सुरू झाली. उमेश कुलकर्णीच्या ‘हायवे’मध्ये त्यांना भूमिका मिळालेलीच होती, आता ‘ढोलकीच्या तालावर’च्या परीक्षणाची संधी मिळाली. पुढेही अनेक चित्रपटांच्या चर्चा झाल्या पण प्रत्यक्ष काम ‘मी वसंतराव’ या निपुण धर्माधिकारीच्या सिनेमात मिळालं. ‘पुनव रातीचा’ या एका गाण्यात, मुद्दाम तेलकट केला गेलेला चेहरा आणि जीर्ण साडीवर त्यांनी एका टेकमध्येच जी कमाल केलीये ती पाहून त्या प्रत्यक्ष बैठकीत काय धमाल उडवत असतील याची झलक मिळते.

‘‘मला सगळे चौरंगी चिरा म्हणायचे,’’ त्या अभिमानाने सांगत. ‘‘नृत्य, गायन, अदाकारी आणि रूप या चारही बाबतीत मी वरचढ होते.’’ त्यांच्या लावणीचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे काही सेकंदातच त्या समोरच्याशी जोडल्या जायच्या. याचं कारण कुणाल विजयकर म्हणतो तसं त्या जाणूनबुजून दाखवत असलेली स्वत:ची खरीखुरी अदाकारी. मग ती विरहाने तळमळणारी नायिका असो, पोरींना डोळे मारणारा गंगेकाठचा ब्राह्मण असो की सख्याला ऑर्डर सोडणारी खमकी नायिका. पण हे सगळं स्टेजवर. बाहेरच्या आयुष्यात त्यांच्या नजरेत, अगदी लहान वयापासून एक प्रकारचा, समोरच्याला गारद करणारा भाव होता. ‘‘त्यामुळं ऐन जवानीतही माणसं माझ्याशी बोलायला घाबरायची.’’ अर्थात या गोष्टीची त्यांना खंत कमी आणि अभिमान जास्त आहे.

‘‘आज खरंच खूश आहे मी,’’ त्या बोलून दाखवायच्या, ‘‘लावणीचं नाव रोशन होतंय. इज्जत मिळतेय. पैसा मिळतोय. नवीन नवीन काहीतरी करायला मिळतंय, फिरायला मिळतंय. हे सगळं माझ्या जवानीत झालं असतं तर?’’ हे ऐकताच मी त्यांना कवी अनिलांची ‘उशिरा आलेला पाऊस’ ही कविता वाचून दाखवली होती आणि त्यांना ती खूप आवडलीही होती. वाईट याचंच वाटतं की हा उशिरा आलेला पाऊस खूप लवकर संपूनही गेला. बैठक नुकती सुरू झाली होती तोच दैवाने भैरवी आळवायला घेतली.

अलविदा शकुबाई! तुमच्यासारखा कलाकार होणे नाही!

bhushank23@gmail.com