दुष्यंत दवे

शांती भूषण यांना प्रेमाने शांतीजी म्हटले जात असे. न्यायिक जीवनात नेहमीच प्रामाणिकपणाचे समर्थन करत त्यांनी नैतिक पातळीवर एक उंची गाठली होती. ते नुसतेच बोलत नसत तर कृतीही करत. ते सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराविरुद्ध धाडसाने लढले. इंदिरा गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, अगदी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सरन्यायाधीशांचाही त्यांनी पर्दाफाश केला.

raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: आम्हीही तेव्हाच ‘व्हेटो’विरोधात होतो..
sonam wangchuk china march
सोनम वांगचुक यांचा मोठा दावा; म्हणाले, “चीननं भारताचा मोठा भूभाग…”
arvind kejriwal
लालकिल्ला: सहानुभूतीच्या लाटेवर केजरीवाल?

एक उत्कृष्ट आणि अत्यंत यशस्वी वकील, उत्तर प्रदेश या राज्याचे एक आदरणीय महाधिवक्ता, सक्रिय कायदामंत्री, अत्यंत महत्त्वाच्या सार्वजनिक समस्यांवर लढा देणारे कार्यकर्ते असे शांतीजी अत्यंत आनंदी जीवन जगले. वकील म्हणून ते पूर्णपणे स्वयंभू होते. अलाहाबादमध्ये प्रॅक्टिस सुरू करून त्यांनी अल्पावधीतच मानाचे नाव कमावले आणि १९८० नंतर सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर ते तिथले आघाडीचे वकील ठरले. विविध विषयांचा प्रचंड अभ्यास, सराव करून त्यात त्यांनी प्रभुत्व मिळवले. सर्वात जास्त फी घेणारे वकील म्हणूनही ते ओळखले जात.

त्याचबरोबर ते सर्वात मेहनती वकिलांपैकी एक होते. त्यांच्या वकीलपत्राचे प्रत्येक पान काळजीपूर्वक वाचले जात असे. पूर्ण तयारीशिवाय ते कधीही न्यायालयात गेले नाहीत. न्यायालयाबाहेर अत्यंत मृदू बोलणारे, ते न्यायालयात मात्र दणदणीत आणि प्रभावी आवाजात बोलत. त्यांच्या निर्भेळ उपस्थितीचा न्यायाधीश, वकील आणि याचिकाकर्ते अशा सर्वांवर परिणाम होत असे. ते कधी कधी न्यायाधीशांसमोरही कठोरपणे बोलत, पण विरुद्ध बाजूच्या वकिलांशी ते नेहमीच विनम्र आणि शांतपणे वागत असत.

न्यायालयाबाहेर ते अत्यंत आनंदी, खेळकर असत. मजेदार विनोद करत आणि न्यायालयातील गमतीजमतींचे किस्से आनंदाने सांगत. न्यायालयाबाहेर ते इतके वेगळे असत की हेच ते शांती भूषण होते यावर विश्वास बसू शकत नसे. न्यायव्यवस्थेवर त्यांचे प्रेम होते आणि या व्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. न्यायसंस्थेतील भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला त्यांचा या प्रेमापोटीच विरोध होता.

प्रामाणिक आणि बुद्धिमान न्यायाधीशांचे ते सर्वात उत्कृष्ट प्रशंसक होते आणि भ्रष्ट आणि अकार्यक्षम लोकांचे सर्वात भयंकर टीकाकार होते. अवमानाच्या संभाव्य कारवाईला सामोरे जात असताना, शांतीजी सर्वोच्च न्यायालयाला म्हणाले, “भारतातील लोकांना प्रामाणिक आणि स्वच्छ न्यायव्यवस्था मिळवून देण्यासाठी तुरुंगात वेळ घालवणे ही अर्जदारासाठी मोठी सन्मानाची गोष्ट असेल.”

त्यांना जगण्यातील अनेक गोष्टींमध्ये स्वारस्य होते. ते एक उत्कृष्ट वाचक होते, क्रिकेटवेडे होते आणि गोल्फर होते. सार्वजनिक व्यासपीठांवर त्यांनी भारतातील लोकशाही, तिची आव्हाने आणि तोटे याविषयी सतत चर्चा केली आणि त्यासाठी देशभर प्रवास केला. ते तरुण भारतीयांचे, विशेषत: वकिलांचे निरंतर शिक्षक होते, त्यांना योग्य आणि धाडसी मार्ग अवलंबण्यासाठी सतत प्रेरणा देत असत.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सिन्हा यांच्यासमोर शांती भूषण यांनी इंदिरा गांधी विरुद्ध राज नारायण यांच्या निवडणुकीच्या खटल्यात यशस्वी युक्तिवाद केला. सुनावणी दरम्यान, त्यांनी प्रसिद्ध केशवानंद भारती खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर तत्कालीन ॲटर्नी जनरलच्या भूमिकेवर जोरदार टीका केली होती. त्यात त्यांनी असे म्हटले होते की संसद shantसंविधानाच्या मूलभूत रचनेत सुधारणा करू शकत नाही. शांती भूषण यांनी असा युक्तिवाद केला की, “माझ्या विद्वान मित्राच्या संदर्भात मी असे म्हणू शकतो की, सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निकालाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन त्यांच्या पदासाठी अयोग्य होता.”

१९७५ मध्ये शांती भूषण यांनी उच्चारलेले हे शब्द आजही तेवढ्याच ताकदीने निनादत आहेत.

“एखादा देश माणसांची नव्हे तर तत्त्वांची पूजा करतो तेव्हा तो महान असतो”. असे शांतीजींना वाटत असे. “इतर क्षुल्लक विचारांपेक्षा तत्त्वांवर आधारित असण्यातच न्यायाचे वैभव आहे” अशी त्यांची भूमिका होती.

साहिर लुधियानवी त्यांच्या “जिन्हे नाज है हिंद पर वो कहां हैं, कहाँ हैं, कहाँ हैं” या प्रसिद्ध गाण्यात ज्याला शोधत होते, असे शांती भूषण एक सच्चे भारतीय होते. त्यांचे जीवन हे आनंद, मेहनत, धैर्य, उत्कटता, विनोद आणि यशाचा एक मोठा प्रवास होता. भारतीय संविधान आणि त्याअंतर्गत निर्माण झालेल्या संस्थांचे रक्षण करण्यासाठी ते उभे राहिले, ही त्यांच्या जीवनाबाबतची सर्वात महत्त्वाची, अधोरेखित करून सांगण्यासारखी गोष्ट आहे.

(लेखक ज्येष्ठ वकील आणि सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत)