scorecardresearch

Premium

ताजमहाल पूर्वी शिवमंदिर होते काय?

ताजमहाल या जगप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूमधील २२ खोल्या उघडाव्यात आणि तिथे काय आहे याचे सर्वेक्षण करावे ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आणि ताजमहाल पुन्हा चर्चेत आला. तसे त्याबद्दलचे वाद नवे नाहीत.

taj mahal

डॉ. राजेंद्र डोळके

इतिहास नव्याने खोदण्याला प्राधान्य देण्याच्या सध्याच्या काळात ताजमहालाची चर्चा झाल्याशिवाय कशी राहील? अर्थात हे खोदकाम पूर्वीच कसे केले गेले आहे आणि त्यातून काय निष्पन्न झाले याचा धांडोळा..

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?

ताजमहाल या जगप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूमधील २२ खोल्या उघडाव्यात आणि तिथे काय आहे याचे सर्वेक्षण करावे ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आणि ताजमहाल पुन्हा चर्चेत आला. तसे त्याबद्दलचे वाद नवे नाहीत. अधूनमधून ते डोके वर काढतच असतात. ही अप्रतिम आणि नयनरम्य इमारत शहाजहान बादशहाने आपल्या प्रिय पत्नीच्या स्मृत्यर्थ सोळाव्या शतकात आग्ऱ्याला बांधली हे जगप्रसिद्ध आहे. लहानपणापासून शाळा-कॉलेजात तसेच शिकवले जाते. परंतु ते तसे नसून मुळात ते प्राचीन शिवमंदिर होते या मताचा पुरुषोत्तम नागेश ओक यांनी वारंवार पाठपुरावा केला. त्यांनी आपल्या मताच्या समर्थनार्थ काही पुरावे सादर केले व अनुमानेही केली. त्यांचे ‘ताजमहल : द ट्रू स्टोरी’ हे या विषयावरचे पुस्तक प्रसिद्ध असून ओकांचे म्हणणे मान्य असणारे लोक त्या पुस्तकाचा हवाला देत असतात. परंतु ओकांनी पुढे केलेल्या पुराव्याचे सप्रमाण व विस्तृत खंडन आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त शिलालेखतज्ज्ञ व इतिहास संशोधक डॉ. वा. वि. मिराशी यांनी केले, हे फारच थोडय़ा लोकांना माहीत असल्याचे दिसते. कारण आज टी.व्ही.वर, यू-टय़ूबवर या विषयावर जेवढय़ा चर्चा ऐकायला मिळतात त्यात मिराशींचा पुसटसा उल्लेखदेखील कुठे आढळत नाही. डॉ. मिराशींचे एवढे महत्त्वाचे संशोधन विस्मरणात चालले आहे की काय असे वाटते. ते तसे जाऊ नये व या चर्चेच्या संदर्भात दुसराही पक्ष लोकांना कळावा, म्हणूनच या लेखाचा प्रपंच.

डॉ. मिराशी व ओक यांचा वाद १९६७ मध्ये सुरू झाला. नागपूरच्या ‘तरुण-भारता’तून या विषयावर दोघांचीही उत्तरे-प्रत्युत्तरे झाली. ओकांचे या विषयावर नागपुरात व्याख्यानही झाले. तसेच मिराशींनी या विषयावर ‘नागपूर-टाइम्स’मधून इंग्रजीत लिखाण केले. हा वाद तेथे थांबला असे वाटत असतानाच ओक यांनी ‘धर्मभास्कर’ मासिकाच्या मार्च १९७५ च्या अंकात तोच वाद पुन्हा उकरून काढून प्रतिपक्षाची म्हणजे डॉ. मिराशींची यथेच्छ निंदा व हेटाळणी केली व ‘आपले मत सर्वास पसंत पडले’ अशी आत्मप्रौढी मारली. त्या लेखाला डॉ. मिराशींनी ‘ओकांच्या संशोधनातील दुराग्रह’ व ‘बटेश्वर शिलालेख आणि  ओकांची सत्यनिष्ठा’ या शीर्षकाचे दोन लेख लिहून प्रत्युत्तर दिले. या दोघांच्याही लेखांच्या आधारे दोन्ही पक्षांचे म्हणणे येथे सादर करतो.

बटेश्वर शिलालेख

 ओक यांनी ताजमहाल हे मूळचे हिंदु मंदिर आहे हे दाखविण्याकरिता प्रामुख्याने बटेश्वर शिलालेखाचा आधार घेतला. त्या शिलालेखात चंदेल राजा परमर्दी याच्या मंत्र्याने एक विष्णूचे व दुसरे शंकराचे अशी दोन मंदिरे बांधल्याचा उल्लेख आला आहे. शंकराचे मंदिर ‘स्फटिकावदात’ (स्फटिकाप्रमाणे शुभ्र) होते असे त्यात वर्णन आहे. झाले! ओकांना पाहिजे होता तसा हा पुरावा मिळाल्यामुळे त्यांनी ‘स्फटिकावदात’ म्हणजे ‘संगमरवरी’ असा अर्थ करून या वर्णनाचा ताजमहालाशी बादरायण संबंध जोडला आणि शिलालेखात उल्लेखिल्याप्रमाणे शंकराचे शुभ्र मंदिर म्हणजेच ताजमहाल अशी आरोळी ठोकली. वास्तविक त्या शिलालेखाचा ताजमहालाशी मुळीच संबंध नाही. कसे ते पुढील विवेचनावरून कळून येईल.

आग्रा आणि बटेश्वर यांचा संबंध

 बटेश्वर हे गाव आग्ऱ्याच्या आग्नेय दिशेस ३५ मैलांवर असून ते यात्रेचे ठिकाण आहे. कोणताही शिलालेख हा ज्या राजाशी अथवा स्थानाशी संबंधित असतो त्या राजाच्या राजधानीच्या अथवा आजूबाजूच्या परिसरातच सापडत असतो. ओकांना या लेखाचे ताजमहालाशी व पर्यायाने आग्ऱ्याशी अत्यंत जवळचा संबंध दाखविणे आवश्यक असल्यामुळे त्यांनी बटेश्वर हे गाव आग्ऱ्यापासून तीन मैलांवर आहे असे लिहिले. ओकांच्या विधानातील असत्यता दाखविण्यासाठी मिराशींनी त्या शिलालेखाच्या उपलब्धीचा इतिहासच आपल्या लेखात सांगितला. ते लिहितात, ‘‘.. तो (शिलालेख) आग्ऱ्यापासून ३५ मैलांवर बटेश्वर येथे किनगहॅमला सुमारे नव्वद वर्षांपूर्वी आढळला, असे म्हणतात. कीलहॉर्नने एपिग्राफिया इंडिका या कोरीव लेखांच्या प्रकाशनास वाहिलेल्या नियतकालिकाच्या पहिल्या पुस्तकात (प्रकाशकाल १८८८ ते १८९२) तो प्रसिद्ध केला आहे. यात वर्णिलेल्या मंदिरांचा ताजमहालाशी बादरायण संबंधही जोडणे शक्य नाही, हे आम्ही सात वर्षांपूर्वी ओकांच्या निदर्शनास आणले होते. तरीही ते आपल्या पूर्वीच्याच मताची री ओढत आहेत.’’ (‘संशोधनमुक्तावली’, सर ७, पृ. २१५) पुढे मिराशींनी ‘बटेश्वर हे आग्ऱ्यापासून चार मैलांवर आहे, ही ओकांची शुद्ध लोणकढी थाप आहे’ असे लिहिले आहे. (तत्रव, पृ. २१९)

 याला उत्तर देताना ओक लिहितात, ‘‘.. बटेश्वर नावाचे मंदिर आजही आग्ऱ्यात आहे. त्याच नावाचे दुसरे ३५ मैलांवरही असेल. अर्थात बुल्हर (पाश्चात्त्य संशोधक) यांनी तो शिलालेख त्यांना स्वत:ला ३५ मैलांवर मिळाला असे म्हटले असल्यास शंका घेण्याचे काहीच कारण नाही.’’ (तरुण भारत, दि. ३०/१२/१९६७) येथे त्यांनी बुल्हरचे म्हणणे मान्य केलेले दिसते. तरीपण शिलालेख आग्ऱ्याजवळच सापडला हे त्यांना सिद्ध करायचे असल्यामुळे त्यांनी आपल्या पूर्वीच्याच म्हणण्याचे निसरडे समर्थन केले आहे. ‘धर्मभास्कर’च्या मार्च १९७५ च्या अंकात ते म्हणतात, ‘‘आग्ऱ्याच्या काही रहिवाशांच्या मते ताजमहालपासून चार मैलांवर एक बटेश्वर असून तेथे दरवर्षी यात्रा असते.’’ ओकांच्या या म्हणण्याला मिराशींनी पुन्हा आव्हान दिले. ते लिहितात, ‘‘एखाद्या स्थळाचे अस्तित्व कोणाच्याही मतावर अवलंबून नसते. आग्ऱ्याच्या कोणत्या दिशेला चार मैलांवर हे बटेश्वर गाव आहे हे  ओकांनी निश्चितपणे सांगावे’’ (सं.मु. सर ७, पृ. २१९)

 ओकांना मिराशींचे हे आव्हान स्वीकारणे शक्य झाले नाही, हे सांगावयास नकोच. तरीपण शिलालेख आग्ऱ्याजवळ सापडला हे तर त्यांना दाखविणे भागच होते. कारण बटेश्वरचा आणि आग्ऱ्याचा निकटचा संबंध दाखविला नाही तर ज्या पायावर त्यांनी आपल्या कल्पनेची इमारत उभी केली तो पायाच उखडून पूर्ण इमारतच कोसळून पडणार. म्हणून त्यांनी ‘हा दगड कोणातरी (मुसलमानाने?) आग्ऱ्याहून तेथे नेऊन लपविला असावा’ अशी क्लृप्ती शोधून काढली. ते लिहितात, ‘‘.. मुस्लीम राज्यकर्त्यांनी  इकडचे दगड तिकडे नेऊन हिंदु महाल-मंदिरांच्या दगडांनीच आपल्या महा-मशिदी बांधल्या.’’ (त.भा., तत्रव)

 याप्रमाणे ओकांच्या प्रतिपादनातील अनेक चुका डॉ. मिराशींनी त्यांच्या लक्षात आणून दिल्या आहेत. शिलालेखातील अनेक अर्थ ओकांनी चुकीचे लावले आहेत. इतर अनेकांनी त्यांचे योग्य अर्थ दिले असताना कोणाचेही अर्थ न स्वीकारण्याचा हटवादीपणा त्यांनी केलेला आहे. शिलालेखाचा काळ, विष्णू, शंकर, प्रासाद, मंदिर इत्यादींचा त्यांनी लावलेला अर्थ चुकीचा आहे हे अनेकांनी लक्षात आणून दिल्यानंतर, त्या सर्वानाच ओकांनी चूक ठरविले आहे. त्याची प्रचीती येण्याकरिता दोन्ही पक्षांचे लेख मुळातूनच वाचणे आवश्यक आहे. लेखमर्यादेत ते देणे शक्य नाही.

शिलालेख बटेश्वरचा नव्हेच

 पुढे मिराशींनी या विषयाचे आणखी संशोधन केले व नवीन पुरावे समोर आणले. त्यांच्या विवेचनातील सारांश पुढे देतो. (सं.मु. सर ७, पृ. २२५ ते २३०) या लेखात बटेश्वरचा शिलालेख असे नाव चुकीचे पडले होते. कीलहॉर्नने तो याच शीर्षकाखाली एपिग्राफिया इंडिका, व्हॉ. १ (पृ. २०७-२१४) मध्ये संपादिला आहे, पण आपल्या प्रस्तावनेच्या आरंभी त्याने ‘हा शिलालेख बटेश्वर येथे सापडला काय’ याविषयी मला संशय आहे, असे म्हटले आहे. हा शिलालेख किनगहॅमला बघारी येथे एका तळय़ाच्या काठी दोन तुकडय़ांत सापडला. तेथून तो सुरक्षित राहण्यासाठी लखनौच्या म्युझियममध्ये नेण्यात आला असे दिसते. सध्या तो लखनौ म्युझियममध्ये आहे. या शिलालेखावर २४ ओळी संस्कृतमध्ये आहेत. यात चंदेला वंशातील मदनवर्मा, त्याचा पुत्र यशोवर्मा व नंतर त्याचा पुत्र परमर्दी यांचे वर्णन आले आहे. या लेखाचा उद्देश परमर्दीदेव राजाचा मंत्री सल्लक्षण याने एक विष्णूचे व दुसरे स्फटिकावदात (स्फटिकाप्रमाणे शुभ्र) असे शंकराचे अशी दोन मंदिरे बांधण्यास आरंभ केला होता. विष्णूचे मंदिर पूर्ण झाले, पण शंकराचे मंदिर त्याच्या हयातीत अपूर्ण होते. ते त्याचा पुत्र आणि चंदेल परमर्दीदेवचा मंत्री पुरुषोत्तम याने पूर्ण केले हे नमूद करण्याचा होता. लेखाच्या शेवटी विक्रम संवत १२५२ (११९५-९६) चा निर्देश आला आहे.

या प्रमाणांवरून प्रस्तुत शिलालेख ‘परमर्दीदेवाच्या काळातील बघारी शिलालेख’ असा आता ओळखला जात असून तो बटेश्वरचा नसून बघारीचा आहे हे आता सर्वमान्य झाले आहे. बघारी हे गाव हमीदपूर जिल्ह्यातील चंदेलांची राजधानी महोबा (महोत्सवपूर) हिच्याजवळ आहे. प्रस्तुत शिलालेख बघारी येथे सापडणे अगदी शक्य आहे. कारण परमर्दी राजा हा चंदेल वंशातीलच होता. तेथे चंदेलांचे मंत्री सल्लक्षण व पुरुषोत्तम यांनी भगवान विष्णू व शिव यांची मंदिरे उभारली असणे सुतराम शक्य आहे.

ओक शिलालेखातील ज्या शिवमंदिराचा उल्लेख करतात ते हे बघारी येथील शिवमंदिर आहे. आग्ऱ्याचा आणि ताजमहालाचा त्याचा अजिबात संबंध नाही. आणि म्हणून ‘हा शिलालेख मूळचा ताजमहालाच्या परिसरातील असून कोणीतरी बटेश्वर येथे नेऊन लपवून ठेवला होता, हे ओकांचे विधान पूर्णपणे असत्य ठरले आहे’, असे डॉ. मिराशी म्हणतात. (सं.मु. सर ७, पृ. २२६) ‘ताजमहाल हे प्राचीन भारतीय राजमंदिर आहे’ त्या तथाकथित बटेश्वर शिलालेखावरून सिद्ध करण्याचा ओक यांच्या खटाटोपाला ‘संशोधन क्षेत्रातील भ्रष्टाचार’ असेही मिराशींनी म्हटले आहे. (पृ. २३०, २३१)

समारोप

 अशा रीतीने आपल्या सिद्धांतावर ओक यांनी जो प्रमुख आधार घेतला आहे, त्या आधाराचा आणि त्या सिद्धांताचा यित्कचितही संबंध नाही हे मिराशींनी सिद्ध केलेले दिसते. ओकांच्या इतरही तर्काना आणि अनुमानांना त्यांनी उत्तर दिले आहे. ते सर्व या ठिकाणी देणे शक्य नाही. पण ओकांच्या या तर्कटाबद्दल (हा मिराशींचा शब्द) काही महत्त्वाची माहिती येथे देण्याचा मोह मात्र आवरत  नाही. मिराशी लिहितात-

‘‘.. ओक यांनी या विषयावर नागपुरात व्याख्यान दिले होते. त्यावेळी त्यांना येथे  विरोध झाला होता. अखिल भारतीय इतिहास परिषदेच्या एका अधिवेशनात ‘ताजमहाल हा राजपुतांचा राजवाडा आहे’, यावरील अभिनव संशोधनाचा लेख वाचण्यास त्यांना परवानगी मिळाली नव्हती. भारतीय इतिहासतज्ज्ञ त्यांच्या संशोधनाची अनुल्लेखाने उपेक्षा करीत. (पृ. २१३)..‘‘ ओक हे आपल्या पुस्तकात व लेखांत असे विधान ठासून करतात की शहाजहानने ताजमहाल बांधलाच नाही, हे त्यांचे विधान कसे असत्य आहे हे डॉ. आर. नाथ यांनी मुंबईच्या इलस्ट्रेटेड विकलीच्या ८ जून १९७५ च्या अंकात (पृ. ३२-३५) सप्रमाण दाखवून दिले आहे. त्यांनी शहाजहानच्या पाच फर्मानांचा उल्लेख करून त्यातील तीन फर्मानांची छायाचित्रेही दिली आहेत. त्यावरून ताजमहालाकरिता शहाजहानने जयपूरच्या मिर्झा राजा जयसिंगामार्फत १६३२ पासून पाच वर्षेपर्यंत मकदानहून संगमरवरी शिळा आणविल्या होत्या व कुशल कारागीरही बोलाविले होते असे स्पष्ट दिसते. तेव्हा याबाबतीतही ओकांचे विधान पूर्णपणे असत्य ठरले आहे. जिज्ञासूंनी हा लेख अवश्य वाचावा.’’ (पृ. २३०).

     rajendradolke@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shiva temple taj mahal history discussion world famous historical building ysh

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×