scorecardresearch

सृष्टी-दृष्टी : काळाच्या ओघातील ‘नैसर्गिक निवड’

एकोणिसाव्या शतकातल्या अनेक वैज्ञानिकांना एक सत्य मनोमन उमगले होते. पूर्वीची जीवसृष्टी आणि त्यातल्या जीवांची ठेवण आजपेक्षा बरीच वेगळी होती.

सृष्टी-दृष्टी : काळाच्या ओघातील ‘नैसर्गिक निवड’

निवड म्हटले की मनाशी काही उद्देश धरून कोणी तरी निवडलेला पर्याय, असा अर्थभास होतो, ही कृत्रिम निवड. ज्या अर्थाने डार्विनने ‘नैसर्गिक निवड’ शब्द वापरला त्यात असा कोणी निवडकर्ता नाही. त्याचा काही उद्देशदेखील नाही.

प्रदीप रावत

एकोणिसाव्या शतकातल्या अनेक वैज्ञानिकांना एक सत्य मनोमन उमगले होते. पूर्वीची जीवसृष्टी आणि त्यातल्या जीवांची ठेवण आजपेक्षा बरीच वेगळी होती. बहुधा त्यात अधिक वैविध्यही होते. आज जी जीवसृष्टी आपण भोवताली पाहातो ती तिच्या इतिहासातला एका अर्थाने त्रोटक नमुना आहे. ‘वाहिले ते पाणी राहिले ते गंगाजळ’ असे तिचे वर्णन योग्य ठरेल! पण जीवसृष्टीतले वाहून गेलेले प्रपात कशामुळे नाहीसे झाले! आणि जे राहिले त्यांच्यात असे काय होते की त्यांना तगून राहता आले? या वाहून गेलेल्या वैविध्याचा निचरा कशाने झाला आणि आजघडीला जिवंत राहिलेल्या वैविध्याचे त्याच्याशी काय नाते होते, या कोडय़ाचा उलगडा करणारे एक उत्तर डार्विनने सूत्रबद्ध केले आहे, त्याचे नाव ‘नैसर्गिक निवड’! ही मोठी प्रभावी पण तरल कल्पना आहे. तिच्या नावाची ठेवण जरा निसरडी आहे.

जीवांचे गुणावगुण, त्यांच्या क्षमता मुख्यत: त्यांच्या जनुकांनी घडतात. जीवांना ज्या परिसरात जगायचे असते तो परिसर, ते पर्यावरण काही बाबतीत पोषक असते तर काही बाबतीत घातक. जीवांना आपल्या मर्जीने ना जनुके निवडता येतात ना भोवताल. त्यांची अन्य जीवांशी कधी मैत्री असते, तर कधी स्पर्धात्मक वैमनस्य असते. अशी जगण्याची कसरत करताना ते काही खटपट करून पर्यावरणाशी अनुकूलन साधण्याची क्षमता कमावतात. या क्षमतांमागे जनुकबदल असतात आणि जनुकाची जोड असेल तर त्यांच्या वंशजाकडे पण हे अनुकूलन येते. त्यांची प्रजा आणि वंशवेल फोफावत जाते. ज्यांना असे अनुकूलन लाभत नाही, ते तगू शकत नाहीत. त्यांच्या न तगण्याचे परिणाम त्यांच्या वंशवेलीतही दिसतात. कालांतराने त्या जीवांची शाखा अस्तंगत पावल्यागत ढासळते. त्यांच्या वंशजांची संख्या रोडावत जाते. उदाहरणार्थ-  फार प्राचीन काळी मॅमॉथ नावाचे हत्तीचे प्राचीन पूर्वज होते. त्यांच्या अंगावर फार केस नसायचे. पण त्यातल्या एका वंशफांदीमध्ये जनुकी बदल झाले आणि केसांचे प्रमाण वाढले. अतिथंड प्रदेशात जगण्या- तगण्यासाठी हे केसाळ आवरण कामी आले. अतिथंड प्रदेशात इतर मॅमॉथ टिकू शकले नाहीत. म्हणून ते अस्तंगत झाले. पण त्यांचे सुकेश भाऊबंध तगून राहिले. अशा सुकेश मॅमॉथचे संपूर्ण सांगाडे गोठलेल्या हिमात आढळले आहेत. सुकेश होणे हा परिस्थितीशी अनुकूलन घडविणारा, तगण्याची हमी देणारा घटक ठरला. ज्यांना हे सुकेशी कवच लाभले नाही त्यांचा त्या परिसरातून अस्त झाला.

आणखी एक उदाहरण पाहू. समुद्राकाठच्या भागात विशेष प्रकारची कासवे अंडी घालतात. ही अंडी त्यांनी वाळूत पुरून ठेवलेली असतात. त्यांचे थोटे कल्लेवजा पाय हे वाळू उपसण्यासाठीचे हत्यार असते. मात्र त्यांच्या पायांची ठेवण अशी असते की, पायांनी वाळू उपसणे कष्टप्रद ठरते आणि त्याची गतीही कमी राहते. ही वाळूची उपसाउपशी संपेपर्यंत वरचे घिरटय़ा घालणारे पक्षी काही अंडी फस्त करतात. त्यामुळे कासवांच्या पिल्लांची संख्या कमी होते. पुढच्या पिढीचा विस्तार खालावतो. कल्पना करा, की या कासवांच्या कल्लेवजा पायांत जनुकीय विकारभेद झाला आणि त्यांचा वाळू उपसा अधिक खोल आणि जलद झाला तर तगणाऱ्या कासवांची संख्या वाढेल.

मूळ जनुकीय ठेवण, परिसर आणि पर्यावरणाच्या ठेवणीतली पोषक आणि घातक क्षमता, अपघातांमुळे घडणारे जनुकीय विकारबदल या तिन्हींच्या घुसळणीतून जे जगतात, तगतात ते जणू निसर्गाकडून निवडले गेलेले ‘विजयीवीर’ ठरतात.

‘नैसर्गिक निवड’ या शब्दाचा हा विशिष्ट अर्थ आहे. इंग्रजीतील ‘नॅचरल सिलेक्शन’ हा शब्दप्रयोगदेखील जरा अवघडलेला आणि आडवळणाचा आहे. सिलेक्शन म्हटले की मनाशी काही उद्देश धरून कोणी तरी निवडलेला, असा अर्थभास त्यात असतो. पण ज्या अर्थाने डार्विनने हा शब्द वापरला त्यात असा कोणी निवडकर्ता नाही. त्याचा काही उद्देशदेखील नाही. निवडला किंवा वेचला जाणे ही निखळ अनेक घटकांनी साकारलेली प्रक्रिया आहे. हा शब्द वापरात आला तो कृत्रिम निवडीच्या विरुद्ध अर्थाने! कृत्रिम निवडीच्या मानवी क्षमता आणि उठाठेवींनी आपले जीवनमान गजबजलेले आहे. पाळीव प्राणी किंवा वनस्पती हेरणे, त्यांच्यामध्ये प्रयत्नपूर्वक ठरावीक गुणांची प्रजा पैदा व्हावी यासाठी खटाटोप करणे हा मानवी संस्कृतीचा कणा आहे. हजारो प्रकारच्या गवतांमधून मानवाने आपल्याला अनुकूल अशी तांदूळ, ज्वारी, गहू, असे शेलके गवत निवडले. त्याचे बी गोळा करून ते पुन:पुन्हा अधिकाधिक संख्येने पेरले. त्याच्याबरोबर स्पर्धा करणारे सभोवतालचे सर्व प्रकारचे गवत उपटून टाकले! ज्याचे दाणे पाहिजेत त्या गवताला धन म्हटले. उरलेल्या स्पर्धक गवतांना तण म्हटले. आज त्या स्पर्धा करणाऱ्या गवताची लोकसंख्या रोडावली. कारण आपण त्यांचा समूळ नायनाट करतो! असे कृत्रिम म्हणजे मानवी हस्तक्षेपाने साकारलेले गवतविश्व हे कृत्रिम निवडीने घडविले आहे. हा कृत्रिम निवडीचा खटाटोप म्हणजेच शेती. तांदूळ, ज्वारी, गहू, देणारे गवत हापूस, पायरी यांसारख्या आंब्याच्या जाती, विविध जातींचे इष्ट गुणांसाठी पैदासलेले संकरित कुत्रे, गाई, म्हशी, घोडे असे किती तरी कृत्रिम निवडीचे मासले आहेत. या अर्थाने कृत्रिम निवड हा शब्दप्रयोग प्रचलित होता. त्याच्या उलट अर्थाने नैसर्गिक निवड हा शब्द घ्यायचा आहे. या निवडीला कर्ता नाही. निवडीमागे कर्त्यांच्या हेतूचा मागमूसही नाही. जनुकबळ, जनुकबदल, पर्यावरणाचा प्रभाव, पुनरुत्पादनात येणारे भलेबुरे प्रसंग, त्यातील यशापयश, अशा अनेक दबावांनी घडलेल्या प्रक्रियेचे फलित ती ‘नैसर्गिक निवड’!

पण नैसर्गिक निवडीचा योग्य साक्षेपी अर्थ घेतला तरी वैविध्याचा पाया आणि अफाट स्वरूप त्यातून उलगडत नाही, असे वरपांगी वाटते! तगून राहण्याची क्षमता प्रत्येक जीव प्रकारात आहे. पण ती भिन्न आहे. निरनिराळय़ा दबावांना, प्रतिकूलतेला तोंड देत जगण्यातले तिचे यशापयश भिन्न आहे. पण एकाच कुळातली एक शाखा घवघवीतपणे वर्धिष्णू असणे आणि इतर नसणे असे का व्हावे? त्याच मातापित्यांच्या पठडीत उपजणारे निराळेपण कसे उलगडावे? बाह्य परिसर आणि पर्यावरण तसेच पण एका अपत्याचा बाज कशामुळे पालटतो? म्हटले तर काही साधम्र्य पण त्याच जोडीने वैधम्र्य का निर्माण होते? हे वैधम्र्य विविधतेची पताका असते का? अशा प्रश्नांचे उलगडे देण्याइतके जनुकीय विज्ञान डार्विनच्या हाती नव्हते. आनुवंशिक आणि त्यातली मातृपितृ वंशांची स्वाभाविक सरमिसळ ही उघड माहीत होती. मात्र नव्या गुणांची, पैलूंची उपज निखळ आनुवंशिक सरमिसळीमुळे उद्भवत नाही याचेही भान आले होते. हा उलगडा करण्यासाठी जनुके कशी हस्तांतरित होतात? त्यांच्यात होणाऱ्या सरमिसळीमुळे काय उपजते? कोणते गुण वरचढपणे प्रबळ राहतात, कोणते क्षीणपणे घसरत जातात? अशा प्रश्नांचा उलगडा करणारे एक संशोधन डार्विन जिवंत असताना ऑस्ट्रियामधील ग्रेगोर मांडेल याने प्रसिद्ध केले होते. त्यामुळे पिढीजात प्रवाहात होणारे गुण वैशिष्टय़ांतले बदल त्यांची परस्पर मिसळ याचे प्रमाण त्या जीवांतील पुनरुत्पादक घटकांमुळे ठरते. या पुनरुत्पादन घटकांना त्याने या बदलांचे श्रेय दिले. याच संशोधनाचे पुढचे पाऊल म्हणजे हे घटक सूत्र रूपात असतात हे उमजले. अखेरीस या सूत्रांची रासायनिक घडण आणि स्वयंसिद्ध छापखान्यागत आवृत्ती करण्याची ठेवण उमगली. त्याला आता आपण जनुक रचना, जनुक सूत्रे म्हणून ओळखतो.

पण जीवांचे पायाभूत रासायनिक इमले असणारी जनुके स्वत: पूर्ण अचल स्थिर वाहक असतात की त्यांच्यातच परिवर्तन होत असते? या आपसुखे आणि यदृच्छी परिवर्तनाला म्युटेशन ऊर्फ ‘विकार बदल’ म्हणतात. (त्याला उत्परिवर्तन हा अधिकृत पारिभाषिक शब्द आहे.) हा विकारी बदल कधी कुठे कशामुळे घडतो याचे ठाम गणित नाही. किती काळाने तो अवतरेल असे सांगण्यासारखे त्याचे येणेजाणे नाही. म्हणून त्याला यदृच्छी (इंग्रजीत रँडम) म्हणतात. जीवांमधले जनुक जाळे अगडबंब जंजाळ आणि लांबीचे असते. त्यात निरनिराळय़ा रूपांची, गुणांची जनुके असतात. त्यांच्या असंख्य गोफवजा साखळय़ांमध्ये कुठे असे विकार बदल घडतील? त्यांचे अन्य ठिकाणच्या अन्य जनुकात होणाऱ्या विकार बदलांशी काय नाते असते किंवा असेल याचे भरवशाचे गणित आणि अनुमान नसते. पण जीवमात्रांचे स्वरूप आणि गुण बदलण्यामध्ये या विकार बदलांचा हात असतो. सर्व बदल यशस्वी होतात, स्थिरावून पुढील पिढय़ांत उतरतात असेही नाही. फक्त काहीच अन्य रेटय़ांना तोंड देत, बदल  आत्मसात करत यशवंत होतात. परिणामी एकीकडे जनुकांचे पर्यावरण आणि बाह्य स्थिती स्थिर असली तरी विकारबदल त्यांच्या कसोटीला उतरतील किंवा न उतरतील ही अशाश्वताची तलवार राहतेच! एकाच वेळी फारशी यदृच्छी नसलेल्या चौकटीत यदृच्छी असलेल्या घटकांचा ‘गोफ विणू बाई गोफ विणू’ असा खेळ सुरू राहतो.

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या