राजा कांदळकर
ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा एखादा त्यागी योद्धा जसा व्यवस्थेशी लढेल तसे लढले. स्वातंत्र्याच्या काळातले भारावलेपण पुढे संपले, पण पन्नालाल भाई निराश झाले नाहीत. अखंड कार्यरत राहणे हाच त्यांचा आशावाद होता. त्यांच्या निधनाने एका समर्पित जीवनाचा अंत झाला आहे. राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष, समाजवादी विचारवंत नेते ही पन्नालाल सुराणा यांची ओळख होती. त्यांचे नाव घेतले की डोळ्यांसमोर येते ते उंचेपुरे धिप्पाड व्यक्तिमत्त्व. खादीचा झब्बा, पायजमा हा त्यांचा खास ड्रेस.
सतत पायाला भिंगरी लावून देशभर संचार करणारा कार्यकर्ता; सातत्याने कार्यकर्त्यांसाठी पत्रे, वर्तमानपत्रांसाठी लेख किंवा चळवळीसाठी पुस्तिका लिहिणारे लेखक; कोणत्याही शिबिरात साध्या सोप्या विषयांची मांडणी करणारे अभ्यासक; स्वत: साधेपणा आणि काटकसरी वृत्ती आचरणारे व इतरांना त्यासाठी प्रोत्साहित करणारे गांधीवादाचे भाष्यकार; वेळेचे नियोजन काटेकोरपणे करणारे नेते; वेळा पाळाव्यात आणि प्रत्येक मिनिट कामासाठी कारणी लावावा असा आग्रह धरणारे प्रेरणादायी गुरू असे अनेकानेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. जवळपास ७५ वर्षे ते विविध क्षेत्रांत कार्यरत होते. त्यांना भाऊ असे संबोधले जात असे.
देशभरातील समाजवादी चळवळीत त्यांचे योगदान मोठे आहे. समाजवादासाठी त्यांनी अथक संघर्ष केला. एक त्यागी योद्धा जसा लढेल तसे ते व्यवस्थेशी लढले. ‘पायपीट एका समाजवादासाठी’ हे त्यांचे आत्मकथन. ते वाचताना एक पूर्णवेळ कार्यकर्ता आयुष्यात किती प्रयोग करतो, व्यवस्था बदलासाठी कसा झिजतो हे कळत जाते. आज साधेपणाने जगणारा बावळा वाटतो. राजकारणात आयुष्यभर एका विचारसरणीला चिकटून किंवा एका पक्षात राहणारा भोळसट वाटतो. विचारसरणी विद्याुत वेगाने, चपळाईने सोडणारा, दुसऱ्या पक्षात जाणारा दलबदलू म्हणजे चाणक्य असे समजण्याचा आजचा काळ आहे. लबाडी आणि निगरगट्टपणा असणे म्हणजे खरा वीर पुरुष आणि वीरांगना. अशा विचारांना परमप्रतिष्ठा असणाऱ्या काळात पन्नालाल भाऊ जगत होते. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा प्रचार करत होते. समाजप्रबोधन संस्थेचे सचिव तसेच समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणून त्यांनी मोलाचे काम केले. अनेक पुरोगामी संघटनांच्या उभारणीत त्यांनी सक्रिय भूमिका निभावली.
ते साधे राहत. दूध आणि बाजरीची, ज्वारीची भाकरी एकत्र चुरून आवडीने खात. बसने फिरत. बहुतांश प्रवास लाल परी एसटीने करत. कारने प्रवास करावा या लालसेत ते कधी पडले नाहीत. माझ्याकडे मोठी कार आहे याचा दिखावा करत फिरावे, कुणाला रुबाब दाखवावा हे त्यांना मनोरुण असल्याचे लक्षण वाटे. सामान्य लोक जसे जगतात, फिरतात, राहतात तसा मी राहीन हा त्यांचा जीवनमंत्र होता. आपल्या गरजा कमी असतील तर माणूस भ्रष्ट व्हायच्या संधी कमी असतात असे ते मानत. लाल परी एसटी, पोस्टाचा लाल डबा आणि समाजवादी पार्टीचा लाल झेंडा यावर निष्ठा असणारा माणूस म्हणजे पन्नालाल भाऊ. देशभरच्या कार्यकर्त्यांना ते सतत पोस्ट कार्ड पाठवत. विविध विषयांवर तासनतास बोलू शकत. समाजवाद म्हणजे काय हे ते अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगत. मराठी, इंग्रजी, हिंदी या तीनही भाषा त्यांना प्रभावी बोलता येत असत. ‘आपण सर्वांनी हे करायला पायजेलेलेल’ असं ते खास सोलापुरी शैलीत बोलत. त्यांच्या तोंडून ते कानाला भलतेच गोड वाटे.
लोकशाही समाजवाद, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन अशा विषयांवरील साध्या, सोप्या आणि प्रवाही भाषेतील त्यांची बौद्धिके हे कार्यकर्त्यांचा वैचारिक दृष्टिकोन हळुवारपणे विकसित करणारी असत. फायद्यात शेती कशी करावी, शेतमालाला चांगला, परवडणारा भाव कसा मिळेल, पाण्याच्या वाटपाच्या क्षेत्रात समाजवाद कसा येईल, पर्यावरणपूरक विकास कसा करायचा, या प्रश्नांवर त्यांनी अर्थराजकीय मांडणी केली. या बाबतीतले त्यांचे योगदान अमूल्य होते.
बार्शीत शिक्षण घेताना ते राष्ट्र सेवा दलाशी जोडले गेले. तरुण वयात बिहारमधील सोखादेवरा येथील जयप्रकाश नारायण यांच्या सर्वोदय आश्रमात त्यांना राहता आले. तिथून त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात झाली. पत्नी डॉ. वीणा यांच्यासह ते बराच काळ बिहारमध्येच राहिले होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला. पुढे ते समाजवादी पक्षात सक्रिय झाले. जनता पक्षाचे नेते म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली. जयप्रकाश नारायण यांच्या टीमच्या देखरेखीखाली बिहारमधील भूदान चळवळीत जमिनीच्या फेरवाटपाचे त्यांनी काम केले. बिहारमधील हजारो गरीब, भूमिहीनांना त्यांच्या माध्यमातून जमिनीचा वाटा मिळाला होता. त्या कामाची बिहारमध्ये आजही आठवण काढली जाते. कामगार आणि शेतकऱ्यांच्या चळवळीतही त्यांनी सतत काम केले.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी आमदारकीची तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. बार्शीच्या माजी आमदार प्रभाताई झाडबुके यांच्याविरुद्ध त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला होता. निवडणुकीनंतर राजकारणात मोठ्या संधी असतानाही केवळ जनतेने आपल्याला नाकारले म्हणत त्यांनी मंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. पुढे राज्यपाल व्हायलाही त्यांनी नकार दिला होता.
दैनिक ‘मराठवाडा’चे ते माजी संपादक. ‘मराठवाडा’ त्यांनी निष्ठेने चालवले. पत्रकारितेत त्यांनी अनेकांना लिहिते केले. शिक्षण, आरोग्य, शेती, बेरोजगारी, सामाजिक असमानता अशा विविध विषयांवर त्यांनी लेखन केले. ते राहिले जयप्रकाशांच्या सहवासात पण आयुष्यभर लोहियावादी विचारांची कास त्यांनी धरली. फुले- शाहू- आंबेडकर, वंचित बहुजन चळवळीविषयी सतत आस्था जोपासली. देशभर फिरून ते विद्यार्थी आणि सामान्यांना समजेल अशा भाषेत अभ्यास शिबिरात व्याख्याने देत. देशातील तरुणाईसमोरची आव्हाने अधिक गंभीर आहेत असे सांगताना तरुणाईने समाजवादाचा विचार पुढे नेताना पर्यावरणाच्या प्रश्नांची त्याला जोड दिली पाहिजे. यापुढे समाजवादाचा विकास पर्यावरणाच्या, भाषेच्या प्रश्नांना जोडून करावा लागणार आहे, यावर त्यांचा भर असे.
बाबरी मशिदीच्या पतनानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पन्नालाल आणि भाई वैद्या यांच्या पुढाकाराने अयोध्या संवाद यात्रा आयोजित केली गेली होती. अशा वेगवेगळ्या उपक्रमांत पन्नालाल यांची सर्जनशीलता दिसून येत असे. त्यांच्या जीवनाला संघर्षाबरोबरच रचनात्मकतेचीही जोड होती. किल्लारी भूकंपानंतर राष्ट्र सेवा दलाने नळदुर्ग येथे अनाथ मुलांसाठी ‘आपले घर’ सुरू केले. या अनाथालयासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले होते. ‘अपना घर’ हे असंख्य तरुण-तरुणींच्या आयुष्याला नवी दिशा देणारे आश्रयस्थान ठरले. त्यातल्या सर्वांना भाऊंनी वडीलकीच्या मायेने सांभाळले. पर्यावरणपूरक आदर्श गावाची कल्पना त्यांनी परांडाजवळच्या ‘आसू’ या छोट्या गावात राबवली होती. गावांमध्ये दारूबंदी, झाडे तोडणी बंदी, चराई बंदी, कुऱ्हाडबंदी, प्लास्टिक बंदी व्हावी असा त्यांचा आग्रह होता. सर्व गावे आदर्श गावे झाली तर त्यातून अनियंत्रित विकासामुळे निर्माण झालेले अनेक प्रश्न सुटतील, पर्यावरणपूरक भारत घडेल असा त्यांना विश्वास होता.
पन्नालाल भाऊंनी ‘कथा वीणाची’ (पत्नी वीणा पुरंदरे-सुराणा यांचे चरित्र), ‘कारगिल आणि भारताची संरक्षणसिद्धता’, ‘गांधीजींची ओळख’, ‘ग्यानबाचं अर्थकारण’, ‘जागतिकीकरणाने केलेली फसवणूक’ (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक अमित भादुरी), ‘बुलंद आवाज बाईचा’ (प्रमिला दंडवते यांचे चरित्र), ‘महात्मा गांधी आणि दलित समस्या’, ‘शहा आयोग – शोध आणि बोध’, ‘शाळा म्हणजे घर, घर म्हणजे शाळा’ ही पुस्तके लिहिली. एकाच जीवनात ते अनेक आयुष्ये जगले. लेखक, संपादक, नेता, भाष्यकार, चर्चक, पूर्णवेळ कार्यकर्ता, पर्यावरणप्रेमी, जल अभ्यासक, चळवळीचा संघटक अशा विविध भूमिका ९३ वर्षांत न थकता पार पाडून ते आपल्यातून गेले. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पुढे जाणे हीच त्यांना आदरांजली!
राजा कांदळकर
राज्य अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र
rajak2008@gmail.com
