कोणताही माणूस सदासर्वकाळ भूतकाळ जगू शकत नाही. हे जसे खरे आहे तसेच कोणत्याही माणसाला इतिहासापासून पळूनही जाता येत नसते. अशावेळी माणसे एका चमत्कारिक स्थितीत अडकत असतात. यातून त्यांना बाहेर पडण्याचा एकच मार्ग असतो. तो म्हणजे भूतकाळाचे सम्यक आकलन करून घेणे, आणि त्यावर स्वार होऊन त्या आधारे वर्तमानकाळ व्यवस्थित समजावून घेणे, त्यासाठी भूतकाळाचा एखाद्या गुरुकिल्लीसारखा उपयोग करणे. असे झाले नाही तर भूतकाळच माणसांची शिकार करण्याची शक्यताच अधिक असते.

मानवी विकासक्रमात प्रत्येक समाजाचे प्रश्न कालानुक्रमे बदलत गेलेले असतात. जुन्या प्रश्नांची जागा नवे प्रश्न घेत असतात आणि त्यांच्या सोडवणुकीचे प्रकारही नवेच असतात. प्रत्येक व्यक्ती, मग ती सामान्य असो की असामान्य; प्रत्येक समाज, मग तो मागासलेला असो की सुधारलेला; ते सर्व इतिहासाची अपत्ये असतात आणि आपल्या वर्तमानातील परिस्थितीत ते आपल्या विवेकाच्या सहाय्याने हस्तक्षेप करून नवा इतिहास घडवीत असतात. परंतु त्यासाठी इतिहासात रमणे किंवा त्याचा अधिक्षेप करणे फारसे फलदायी ठरत नसते. त्यासाठी आपल्या स्वतःच्या आणि समाजाच्या कर्तृत्वावर, त्याच्यातील सर्जनक्षमतेवर अतूट विश्वास असावा लागतो किंवा तो तसा निर्माण करावा लागतो. या विश्वास आणि भरवशामुळेच अनेक मागासलेले समूह कालौघात प्रभावशाली बनलेले जगाने पाहिले आहेत आणि त्यांनी पुढील पिढ्यांना आदर्श ठरावा असा इतिहास घडवलेलाही जगाने पाहिला आहे. त्यासाठी विवेकशक्तीची जागृती आणि तिच्याद्वारे इतिहासाचे सम्यक आकलन या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात.

या पार्श्वभूमीवर, इतिहासाचे पुनर्वाचन केवळ धृवीकरणाच्या राजकारणासाठी होऊ नये, ही अपेक्षा रास्त. सोमनाथ मंदिरावर पहिला हल्ला झाल्याच्या घटनेला एक हजार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या लेखाच्या वाचकांनाही ती लागू होते. पण या लेखाच्या वाचकांनी ४ जानेवारी १९५० च्या ‘ऑर्गनायझर’ या रा. स्व. संघाचे मुखपत्र समजले जाणाऱ्या नियतकालिकात पृष्ठ क्रमांक १२ ते १५ वर तत्कालीन सरसंघचालक एम. एस. गोळवलकर यांनी लिहिलेला लेख वाचला तर, मोदींनी सोमनाथची आठवण काढून काय साधले असा प्रश्न पडेल. त्या लेखात गोळवलकर गुरुजी लिहितात, ‘‘हजार वर्षांपूर्वी आपल्याच लोकांनी (म्हणजे हिंदुंनी) परकीय आक्रमकांना (म्हणजे मुस्लिम) हिंदुस्थानवर आक्रमण करण्याचे आमंत्रण दिले हे ऐतिहासिक सत्य आहे.

सोमनाथचे मंदिर कोणी कसे उद्ध्वस्त केले? सोमनाथचे वैभव आणि तेथील संपत्तीचा झगमगाट या विषयी गजनीच्या महंमुदला माहिती होती. त्या संपत्तीच्या लोभाने प्रेरित होऊन तो खैबरखिंड पार करून हिंदुस्थानवर चालून आला. सोमनाथवर हल्ला करण्यासाठी राजस्थानच्या वाळवंटातून जात असताना त्याच्यावर आणि त्याच्या सैन्यावर पिण्याच्या पाण्याअभावी तहानेने व्याकूळ होऊन तडफडायची वेळ आली होती. वाळवंटातून जाताना तापलेल्या वाळूचे चटके आणि उन्हाच्या झळांमुळे तो आणि त्याचे सैन्य तडफडून मेले असते. पण तसे झाले नाही. कारण महंमुदने तेथील स्थानिक राजांना फितविण्यात यश मिळविले. सौराष्ट्रातील काही राजे सोमनाथवर हल्ला करण्याचा विचार करीत असल्याची त्याने अफवा पसरविली व मी तुम्हास मदत द्यायला तयार आहे असे अमिष दाखविले. हिंद राजे महंमुदच्या अमिषाला बळी पडले आणि ते सर्वजण महंमुदला जाऊन मिळाले. महंमुदने सोमनाथवर हल्ला केला, त्यावेळी आघाडीच्या फळीवर हिंदच होते. आपल्याच हाडामांसाचे आणि आपल्याच रक्ताचे ते हिंदुच होते. सोमनाथच्या मंदिराचा विध्वंस हिंदुंच्या कृतिशील सहभागानेच झाला आहे. हे इतिहासाच्या पानावर ठळकपणे लिहिले गेलेले एक विदारक सत्य आहे.”

भारतावर आक्रमण केलेल्या मुस्लिम आक्रमकांनी हिंदुंची देवळे लुटली, मूर्तीची विटंबना केली, देवळातील अगणित संपत्तीची लूट केली ही ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. या त्यांच्या कृत्यांकडे पूर्वग्रहरहित दृष्टीने पाहिले तर असे म्हणता येईल की जगभर सर्वत्रच धर्मांध आक्रमकांनी त्यांची धर्ममते न मानणाऱ्या व त्यांची सत्ता न मानणाऱ्या लोकांवर अनन्वित जुलूम, अत्याचार, देवळे, प्रार्थना स्थळे यांचा विध्वंस, संपत्तीची लुटमार केल्याच्या घटनांनी साऱ्या जगाचा इतिहास भरलेला आहे. हिंदुस्थानातही हिंदू राजांनी जैन आणि बौद्धांवर अनन्वीत अत्याचार केल्याची आणि त्यांची मंदिरे, विहार उध्वस्त करून त्यांच्या देवदेवतांच्या मूर्तीची विटंबना केल्याच्या अनेक घटनांची इतिहासात नोंद आहे.

कोणत्याही आक्रमकाचे उद्दिष्ट ज्यांच्यावर धाड घालायची तेथील सत्ताधीश आणि त्याची प्रजा यांच्यावर दहशत बसवून त्यांची सत्ता आणि संपत्तीची केंद्रे नष्ट करणे हा असतो. मंदिरे ही त्याकाळातील हिंदुंच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची महत्वाची केंद्रे होती. शिवाय मंदिरात सोन्या-चांदीच्या मूर्ती तर असतच शिवाय जड-जवाहिरे, हिरे माणके, सुवर्णमुद्रा इ. स्वरूपात अफाट संपत्ती साठविलेली असे. त्या काळातील मंदिरे ही गुप्त सल्लामसलती आणि कटकारस्थानाची केंद्रेही होती. त्यामुळे स्वाभाविकच धर्मांध मुस्लिम आक्रमकांची मंदिरे लक्ष्य ठरली. असे असले तरी धार्मिक श्रद्धास्थाने मंदिरे, प्रार्थनागृहे, चर्चेस मशिदी इ. उध्वस्त करणे हे केव्हाही धार्मिक असहिष्णुतेचेच लक्षण मानले पाहिजे. त्यामुळे अशा कृत्यांचे कोणीही समर्थन करता कामा नये. अशा कृत्यांचा नेहमी निषेधच केला पाहिजे. म्हणूनच एका कालखंडात हिंदुंची देवळे उध्वस्त करणाऱ्या मुस्लिम आक्रमकांचा निषेध करताना हिंद राजांनी अनेक जैन मंदिरे उध्वस्त केली, बौद्ध विहार नष्ट केले याचाही निषेधच केला पाहिजे.

हिंदुराजांनी बौद्ध आणि जैनांवर इतके दारुण अत्याचार केले की जैन आणि बौद्ध धर्म हिंदुस्थानातून जवळपास लुप्त झाले. पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या जागी पूर्वी बौद्ध मंदिरे होती. त्या मंदिरांचे आणि तशाच इतर अनेक बौद्ध मंदिरांचे नंतरच्या काळात हिंदूकरण करण्यात आले आहे असे स्वामी विवेकानंदानीच म्हटले आहे. (दी सेजेस ऑफ इंडिया- समग्र विवेकानंद, अद्वैत आश्रम कलकत्ता पृष्ठ २६४). बंकिमचंद्रांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीतही बौद्ध मठांचे हिंदूकरण करण्यात आल्याचा उल्लेख आहे. ‘चतुरंग दल सिद्ध करून मी बौद्ध धर्माचा उच्छेद करीन.’ अशी प्रतिज्ञा करून मोहिमेवरून परत आल्यावर ‘पाटलीपुत्रपासून (पाटणा) पुष्पपूर (पेशावर) पर्यंतचे सर्व बौद्ध विहार मी उद्ध्वस्त केले’ असे अभिमानाने सांगणाऱ्या हिंदू सम्राट पुष्यमित्राचाही निषेधच झाला पाहिजे. ‘यो मे श्रमणं शिरम् दास्यति, तस्याहं दीनार शतं ददामि’ म्हणजे एका बौद्ध भिक्षूचे मस्तक आणून देणाऱ्याला शंभर सुवर्ण मुद्रा देणाऱ्या पुष्यमित्राला काय हिंदुधर्माच्या सहिष्णुतेचा आदर्श मानायचे? ‘शंकर दिग्विजय’ या आद्य शंकराचार्याचे चरित्रग्रंथात सुधन्ना या हिंदु राजाने शंकराचार्यांच्या इच्छेनुसार बौद्धांचा संहार करण्यासाठी आपल्या काही खास माणसांची नियुक्ति केली होती, असा उल्लेख आहे. रामेश्वर पासून हिमालयापर्यंतच्या भागात लहान-मोठ्या बौद्धांची नाव निशाणीही दिसता कामा नये असा राजा सुधन्नावाने हुकूम दिला होता.

लंकेचा (सिंहद्वीप) राजा जयसिंह याने लंकेतील बौद्धांचा अनन्वित छळ करून बौद्धांचा निप्पात केला. शिवाय हिंद राजांनी हिंदूची देवळे, श्रद्धास्थाने उद्ध्वस्त करून तेथील संपत्तीची लूट केल्याचे अनेक पुरावे इतिहासात उपलब्ध आहेत. काश्मिरचा प्रसिद्ध कवी कल्हणने काश्मिरच्या हिंद राजांनी काश्मिर मधील हिंदूंची असंख्य देवळे उद्ध्वस्त करून त्यातील मूर्तीची विटंबना करून संपत्तीची लूट केल्याची सविस्तर माहिती त्याच्या ‘राजतरंगिणी’ या ग्रंथात दिली आहे.

या इतिहासावरून आपल्या लक्षात येईल की, मंदिरांच्या विध्वंसमागे नुसता धर्मद्वेष नव्हता तर आर्थिक संबंधसुद्धा तेवढेच महत्त्वाचे होते. म्हणून एखाद्या जनसमुदायाच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे हाच आपला कायदेशीर हक्क प्रस्थापित करण्याचा अत्युत्तम मार्ग आहे, असे दुसऱ्या एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे असे मला वाटते. कारण धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नसतात, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. तसे सोडवायचा प्रयत्न केला तर देशातील विविध धर्मातील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतकंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते हे आपल्या केव्हा लक्षात येईल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लेखात ‘११ मे १९५१ रोजी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत झाला,’ असे म्हटले आहे. म्हणजे केंद्र सरकारने या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला होता का? पण वास्तव मात्र वेगळेच आहे. भारतीय स्वातंत्र्य दृष्टीच्या टप्प्यात आल्यावर के. एम. मुन्शी यांच्या सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या मोहिमेला वेग आला होता. इतकेच नव्हे तर देश स्वतंत्र झाल्यावर भारत सरकार मंदिरांच्या जीर्णोद्धाराची जबाबदारी स्वीकारेल अशी हवा निर्माण करण्याचाही प्रयत्न झाला. त्यावेळी म. गांधींनी या विषयी भारत सरकारची भूमिका काय असावी या विषयी २८ नोव्हेंबर १९४७च्या प्रार्थना सभेत निःसंधिग्धपणे सांगितले की, “सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सरकारच्या तिजोरितून खर्च करावा काय, असा प्रश्न एकाने मला पत्र पाठवून विचारला आहे. यावर माझे उत्तर असे आहे की, आपले सरकार धर्मनिरपेक्ष आहे. म्हणजे हे सरकार सर्वांचे आहे. कोणा एका धर्माचे नाही. त्यामुळे धार्मिक आधारे ते कोणा एकाच धर्माच्यासाठी सरकारच्या तिजोरीतला पैसा खर्च करून शकत नाही.

आपण सर्व भारतीय आहोत. पण प्रत्येकजण आपआपल्या धर्मानुसार आचरण करू शकतो.” यानंतर सरदार पटेलांची आणि म. गांधींची भेट झाली. त्यावेळी गांधींनी सरदारांजवळ सोमनाथ मंदिराच्या संदर्भात “मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सरकारी तिजोरीतून पैसा खर्च करणार अशी बातमी कानावर येत आहे, ती खरी आहे काय?” असा प्रश्न विचारला. यावर ‘सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सरकारी तिजोरीतून एक पैसाही खर्च केला जाणार नाही. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी हिंदुंनीच पैसे गोळा केले पाहिजे. मंदिरासाठी ते रकम गोळा करू शकत नसतील, म्हणजे ते जर इतके कंजुष असतील तर मंदिर सध्या ज्या स्थितीत आहे, तसेच राहील. आतापर्यंत दीड लाख रूपये जमा झाले आहेत आणि जुनागडच्या जामसाहेबांनी स्वतःचे एक लाख रूपये दिले आहेत. शिवाय ते स्वतः पैसे गोळा करण्यात गुंतले आहेत.” असे पटेल म्हणाले (समग्र गांधी खंड ९० पृ. १२७, ‘धर्म और राजनीति’ मधु लिमये पृ. ७६-७७) या उताऱ्यावरून हे स्पष्ट होते की केंद्र सरकारचा सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराशी काहीही संबंध नव्हता.

jetjagdish@gmail.com