विजय प्र.दिवाण
सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला ११ मे रोजी ७५ वर्षे झाली. या भव्य सोहळ्यातील राजकीय वक्तव्यात स्वामी केवलानंद सरस्वती, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व वाईच्या प्राज्ञपाठशाळेचे योगदान व त्यांचे धर्मसुधारणेचे कार्य दुर्लक्षिले गेले. इतकेच नव्हे तर, दैनिक लोकसत्तेतील मुख्यमंत्र्यांच्या लेखात त्यांनी या संदर्भात साधी नोंदही घेतली नाही.
मंदिर अस्पृश्यांसह सर्व हिंदूंना व अन्य धर्मीयांना खुले राहील असा निर्णय मंदिराच्या विश्वस्तांनी घेतल्याने मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायला भारतातील सनातनी ब्राह्मणांनी नकार दिला. अशावेळी प्राणप्रतिष्ठेचे कार्य संपन्न करायला स्वामी केवलानंद सरस्वती पुढे सरसावले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक ज्याप्रमाणे गागाभट्टांनी (गागाभट्ट यांचे मूळ पुरुष पैठणचे) संपन्न केला, त्याच तोडीचे सोमनाथ प्राणप्रतिष्ठेचे कार्य स्वामी केवलानंदांनी केले !प्राणप्रतिष्ठेचे प्रधानाचार्य म्हणून स्वामी केवलानंद सरस्वती यांची नेमणूक सोमनाथ मंदिराच्या विश्वस्तांनी केली. तसेच प्रमुख ऋद्विजाचार्याची धुरा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी सोपवण्यात आली.
११ मे १९५१ रोजी प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त होता. १५ एप्रिल १९५१ रोजी प्राणप्रतिष्ठेची जवाबदारी स्वामी केवलानंदांवर. सोपवण्यात आली. स्वामींच्या हाती अवघे २६ दिवस होते. सनातनी ब्राह्मणांनी बहिष्कार टाकल्याने १७५ पुरोगामी वेदसंपन्न ब्राह्मण शोधणे भाग होते. पुन्हा त्यांच्याकडून पूर्वतयारी करून घ्यायची होती. तसेच सोमनाथला जाऊन कुंडमंडपादि बांधकाम शास्त्रशुद्ध रीतीने करून घ्यायचे होते. स्वामी केवलानंद सरस्वती व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी हे सारे कार्य अवघ्या २६ दिवसात मोठ्या झपाट्याने केले.
प्राणप्रतिष्ठेचा हा भव्य सोहळा यशस्वीपणे पार पडल्यावर, सोमनाथ मंदिराच्या विश्वस्तांनी स्वामी केवलानंदांना मंदिराचे मुख्य मार्गदर्शक अधिपती अर्थात गंड बृहस्पती म्हणून नियुक्त केले. या सोहळ्यामुळे महाराष्ट्र, वाई, प्रज्ञा पाठशाळा व धर्म निर्णय मंडळ यांचा नावलौकिक भारतभर झाला. स्वामी केवलानंद (पूर्वाश्रमीचे नारायणशास्त्री मराठे) यांनी वाई (सातारा) येथे १९१६ साली प्राज्ञपाठशाळा स्थापना केली. १९१७ साली म.गांधीच्या कोचरब आश्रमातून विनोबा स्वास्थ, स्वाध्याय व सेवा हा त्रिसूत्री कार्यक्रम घेऊन वाईत आले व स्वामी केवलानंदांकडे त्यांनी वेदांताचा अभ्यास केला. विनोबांमुळे स्वामी केवलानंदांचे नाव व महत्ता म.गांधीजींपर्यंत पोहोचली. ६ नोव्हेंबर १९२० रोजी गांधीजी स्वतः केवलानंदांच्या भेटीसाठी वाईला आले!
स्वामी केवलानंदांच्या भेटीला वाईला आलेल्या व्यक्तींची नुसती नावे जरी आपण वाचली तर त्यांच्या विद्वत्तेची व थोरवीची आपल्याला कल्पना येऊ शकेल. लो.टिळक, म.गांधी, जमनालाल बजाज, महादेवभाई देसाई, प्यारेलाल, पं.मदनमोहन मालवीय, सयाजीराव गायकवाड महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, संत तुकडोजी महाराज, महर्षी कर्वे, ज्ञानकोश कारकेतकर, न.र.फाटक, बाळासाहेब खेर इ. इत्यादी अनेक महापुरुष केवलानंदांच्या भेटीसाठी वाईसारख्या आडमार्गी गावी येत होते.
रावबहाद्दूर सिताराम विश्वनाथ पटवर्धन (क्रांतिकारक अच्युतराव पटवर्धन यांचे वडील) यांनी, वाई येथील आपला राहता वाडा स्वामी केवलानंदांच्या प्रापाठशाळेस दान केला! स्वामी केवलानंदांचे दोन शिष्य, महामहोपाध्याय पां.वा.काणे व विनोबा यांना भारतरत्न व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना पद्मविभूषण मिळाले.
अशा वेदसंपन्न स्वामी केवलानंद सरस्वतींनी आपले शिष्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व १७५ पुरोगामी वेदसंपन्न ब्राह्मणांना घेऊन सोमनाथाची प्राणप्रतिष्ठा केली! १७५ पैकी १४२ ब्राह्मण हे महाराष्ट्रातील होते व त्यापैकी ६६ पुरोगामी ब्राह्मण वाई गावातील होते.
हिंदू समाजात आज जी अस्पृश्यता प्रचलित आहे याला धर्मशास्त्रात आधार नाही व नसावा असे गांधीजींना वाटत होते. यासंदर्भात धर्मशास्त्रज्ञ पंडितांमार्फत एक जाहीरनामा व निवेदन काढावे या दृष्टीने गांधीजींनी २३ डिसेंबर १९३२ रोजी येरवडा तुरुंगात, स्वामी केवलानंद, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, के.ल. दप्तरी इत्यादींना निमंत्रित केले. उपस्थित विद्वानांनी जाहीरनामाची जबाबदारी केवलानंदांकडे सोपवली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी अस्पृश्यता निवारणाची सिद्धांतपद्धती मांडून मसुदा तयार केला. केवलानंदांनी मसुदा मान्य केल्यावर स्वामी केवलानंद, लक्ष्मणशास्त्री जोशी, केशव लक्ष्मण दप्तरी, पी.एच. पुरंदरे, भगवानदास इत्यादींच्या स्वाक्षरी केल्या. हा जाहीरनामा गांधीजींनी ११ फेब्रुवारी १९३३च्या हरिजन या इंग्रजी पत्रिकेत या विद्वानांच्या नावासह प्रसिद्ध केला. पुढे हा मूळ हिंदी जाहीरनामा गुजराती मराठी अनुवाद करून अन्य पत्रिकेतही प्रसिद्ध झाला.
केवलानंद ज्या वाईत राहत होते ते वाई गाव कर्मठ सनातनी ब्राह्मणांचा बालेकिल्ला होता. वेद, स्मृती हे अपौरुषेय आहेत. त्यात बदल करता येणार नाही. एवढेच नव्हे तर त्यातील वचनांचा वेगळा अर्थही लावता येणार नाही. धर्मग्रंथांचा सुसंगत अर्थ लावणे एवढेच मानवी बुद्धीचे कर्तव्य आहे; असा त्या काळच्या वाईतीलच नव्हे तर एकूण भारतातील अपरिवर्तनवादी पुरस्कार करणाऱ्या सनातन्यांचा आग्रह होता.
या पार्श्वभूमीवर स्वामी केवलानंदांनी मीमांसा पद्धती न स्वीकारता इतिहास पद्धती स्वीकारली व वेद, स्मृती हे माणसांनीच, फक्त थोर आणि पवित्र अशा माणसांनी, लिहिलेले आहेत व ते पौरुषेयच आहेत असा दृष्टिकोन मांडला. पूर्वधर्मग्रंथातील तत्त्वांकडे त्यांनी लक्ष वेधले. धर्मशास्त्रांचा विचार करून वेळोवेळी झालेला आचारातील अनेक परिवर्तने दाखवून दिले. धर्म हा समाजासाठी आहे; समाज हा धर्मासाठी नाही, हा परिवर्तनवादी पक्ष केवलानंदांनी सिद्ध करून दाखविला. एवढेच नव्हे तर सनातनांवर मात केली.
पुढे महाराष्ट्रातील वेद पारंगत चिंतनशील मंडळींनी स्वामी केवलानंद यांच्या मार्गदर्शनाखाली १९३७ साली ‘धर्म निर्णय मंडळा’ची स्थापना केली. या धर्म निर्णय मंडळात महामहोपाध्याय पां.वा.काणे, समाजातचिंतक ना.गो.चाफेकर, के.ल.दप्तरी, पुण्याच्या लॉ कॉलेजचे संस्थापक ज.र. घारपुरे इ. विद्वान मंडळी सहभागी होती.
धर्म निर्णय मंडळाचे कार्य रचनात्मक व विधायक होते. आचारधर्मसुधारणांवर मंडळाने भर दिला. धर्म निर्णय मंडळाने वेद अपौरुषेय आहे असा क्रांतिकारक निर्णय घेतला. स्त्रियांना धार्मिक व सामाजिक अधिकार पुरुषांच्या बरोबरीचे आहेत; स्त्रीला पुनर्विवाहाचा अधिकार आहे, विधवांना मंगल धार्मिक कृत्यात सहभागी होण्याचा अधिकार आहे, प्रत्येक हिंदूला द्विजत्वाचा अर्थात उपनयन संस्काराचा अधिकार आहे, मुलींचेही उपनयन व दत्तक विधान होऊ शकते इ. क्रांतीकारक निर्णय, केवलानंदांच्या मार्गदर्शनाने धर्म निर्णय मंडळाने घेतले.
धार्मिक बाबतीतच नव्हे तर राष्ट्रबांधणीच्या बाबतीतही धर्म निर्णय मंडळाने ठराव पारित केले. देश लोकशाहीवादी व सरकार धर्मातीत राहील व संपत्तीचे स्वामित्व राष्ट्राकडे राहील या नेहरूंच्या विचाराला धर्म निर्णय मंडळाने पाठिंबा दिला. हिंदूमधील सर्व जाती, धार्मिक व सामाजिक दृष्ट्या समान आहेत असे सांगितले. ग्रंथांचे शब्दप्रामाण्य दूर सारून, बुद्धीची व तर्काची प्रतिष्ठा नव्याने प्रसृत केली. केवलानंदांनी विद्वान ‘कर्त्याशिष्यां’ची मोठी परंपरा निर्माण केली.
सोमनाथ मंदिराचा प्राणप्रतिष्ठेच्या वेळी सनातनी ब्राह्मणांकडून जेव्हा समाजसुधारणेचा रथ रोखला जात होता, त्यावेळी केवलानंदांनी रथाची वाट मोकळी करून दिली व समाज-सुधारकांना व धर्म-सुधारकांना जय प्राप्त करून दिला!
स्वामी केवलानंद सरस्वती व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासह महाराष्ट्रातील १४२ धर्मसुधारक पुरोगामी ब्राह्मणांनी सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यात सहभाग घेतला. एवढेच नव्हे तर प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते होत असताना यजमानपदी त्यावेळेसचे सौराष्ट्र रीजनल कमिशनर द. वि. रेगे व व त्यांच्या पत्नी कमलाबाई रेगे हे होते. प्राणप्रतिष्ठेत सहभागी झालेले, स्वामी केवलानंदाचे शिष्य गौतम बुवा पाठक यांनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर पुस्तक लिहिले. या सोहळ्यावर लिहिलेले हे एक मात्र पुस्तक आहे.
सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला ७५ वर्ष होत असताना या कार्यातील महाराष्ट्राचे योगदान; तसेच स्वामी केवलानंद सरस्वती, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व वाईच्या प्राज्ञपाठशाळामंडळाचे महाराष्ट्रालाच विस्मरण व्हावे हे खेदजनक आहे!
( लेखक सर्वोदयाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते आहेत.)
diwan.sarvodaya@gmail.com
