मी हायस्कूलमध्ये असताना ‘सत्यकथा’ मासिक आणि ‘मौज’ साप्ताहिक मला नेहमी वाचायला मिळत असे. तेव्हा मी सांगलीला आरवाडे हायस्कूलला शिकत होतो. ५० ते ५४ या काळात. तिथं माझे मामा विश्वनाथ जोशी हे उत्तम पुस्तकं वाचणारे गृहस्थ मला सापडले. ते अनेक पुस्तकं, मासिकं वगैरे स्वत: विकत घेऊन वाचत. त्यामुळे इथली चार वर्षं मला उत्तमोत्तम पुस्तकं वाचायला मिळाली. लहानपणापासून मी कविताही करीत असे. त्यावेळी ‘सत्यकथा’ आणि ‘मौजे’त येणार्‍या कविता मी वाचत होतो. इतरत्रच्याही कविता वाचत होतो. परंतु सत्यकथा-मौजेतल्या कविता याच खर्‍या कविता आहेतसं तेव्हाही मला वाटे. इतरत्र येणार्‍या कविता मला कविता म्हणून तितक्याशा भावत नव्हत्या. सत्यकथा-मौजेतल्यासारख्या कविता आपण लिहाव्यात, आणि त्या लिहिण्यातून आणि प्रत्यक्षातदेखील तिथपर्यंत पोहोचावं असं मला नेहमी वाटे.

मॅनेजर, मॅनेजिंग डायरेक्टरही वाचक…

मी मॅट्रिकनंतर सरळ कॉलेजमध्ये गेलोच नाही. ५४ साली अकरावी झाल्यावर मी काही किरकोळ उद्योग करू लागलो. मी साइन बोर्ड पेंटिंग करत असे. गणपती संस्थान प्रेसमध्ये कम्पोझिंगही शिकत होतो. अशी बरीच कामं करीत होतो. तिथून नंतर मी ओगले ग्लास वर्क्सला आलो. ओगलेवाडी हे माझ्या आईचं माहेर. तिथं माझ्या मामांचा मुलगा गोपाळ हा ओगले ग्लास वर्क्समध्ये होता. त्यानं माझं अक्षर पाहिलं आणि मला म्हणाला, ‘तू ओगले ग्लास वर्क्सचे मॅनेजर प्रभाकर पाध्ये यांना पत्र पाठव. तुझं अक्षर बघितल्यावर ते लगेच तुला बोलावतील.’ प्रभाकर पाध्ये तिथं बिझनेस मॅनेजर होते. पुढे ते किर्लोस्करला गेले. मोठा रसिक, वाचणारा माणूस. इंग्रजी, मराठी पुस्तकं. गंगाधर गाडगीळ ओगलेवाडीला आल्यावर पाध्यांकडेच उतरत. त्यांनी दुसर्‍या दिवशी माझी सहा महिन्यांची ऑर्डर काढली आणि मग पर्मनंटची! त्याकाळी ओगलेवाडीला सांस्कृतिक गोष्टी खूप होत्या. आमचे व्यंकटराव ओगले हे स्वत: चांगले चित्रकार होते. त्यांच्यामुळे माधवराव सातवळेकरांपासून अनेक चित्रकार मंडळी तिथं येत. असं सगळं वातावरण होतं. ओगलेचे मॅनेजिंग डायरेक्टर शंकरराव ओगले हेही मोठे ग्रंथप्रेमी होते. ते सतत पुस्तकांतच असत. ते सकाळी ऑफिसला आल्यावर मला बोलावून घेत. ‘आज मी एवढं एवढं वाचलं… तू नवं काय वाचलंस?’ असं विचारीत.

परंतु क्वचितच असं असे, की मी जे वाचलंय ते शंकररावांनी वाचलेलं नसे. एकदा मी त्यांना म्हटलं, काल मी एक खूप चांगलं पुस्तक वाचलं. पॅटरसनचं ‘मॅनईटर्स ऑफ साओ.’ आफ्रिकेत ब्रिटिशांनी रेल्वेचे रूळ घालायचं काम सुरू केलं तेव्हाची ही गोष्ट. रेल्वेच्या वाघिणींत कामगार वगैरे बसलेले असत. खालून उडी मारून सिंह त्यांच्यावर हल्ला करीत आणि त्यांना मारून खात. असा तो सगळा भीषण व अद्भुत अनुभव त्यात कथन केलेला होता. शंकरराव मला म्हणाले, माझ्या वाचनात हे पुस्तक आलेलं नाही. तुम्ही मला ते आणून द्याल का? मी ते विलिंग्डन कॉलेजमधून आणलं होतं. त्यांना मी ते आणून दिलं. त्यांनी एका रात्रीत ते दोन-अडीचशे पानांचं पुस्तक वाचून काढलं. म्हणाले, उत्तम पुस्तक आहे. तुम्ही सांगितलं नसतंत तर माझं ते वाचायचं राहून गेलं असतं. पुढे त्यांनी माझं ‘डोह’ हे पुस्तकही असंच एका रात्रीत वाचून काढलं आणि दुसर्‍या दिवशी मला बोलावून घेतलं. आणि आपल्या कुत्र्यांच्या खिशातले सगळे पैसे त्यांनी मला काढून दिले. मी त्यांना म्हटलं, ‘भाऊ, मी हे पुस्तक तुम्हाला भेट दिलेलं होतं.’ तर म्हणाले, ‘मीही तुम्हाला ही भेटच देतोय. मी काही तुम्हाला पुस्तकाची किंमत देत नाहीए.’ पुढे मग त्यांनी ओगले आणि ओगलेंचे सर्व डिस्ट्रिब्युटर्स यांना बोलावून माझा सत्कारही केला या पुस्तकाबद्दल.

पडक्या घराकडे श्रीपुंची शेव्हरलेट!

मौजेत माझा पहिला लेख १९६० साली प्रसिद्ध झाला- ‘मनातल्या उन्हात.’ तोपर्यंत मी मौजेकडे माझ्या कविता पाठवीत असे. त्यावेळेला मला कुणा-कुणाकडून भागवतांचा त्यावरचा अभिप्राय कळत असे, की ‘कविता मिळाल्या. अक्षर चांगलं आहे!’ अर्थात पुढे त्यांनी माझ्या पुष्कळ कविता छापल्या. पाडगावकरांचा आमचा परिचय होता. प्रल्हाद वडेर हे माझे मित्र. त्याकाळी श्रीपुंबद्दल मी सगळीकडनं ऐकत होतो. शांताराम शिंदे आमचे मित्र. ते इथं एजीएम कॉलेजला होते. ‘शांताराम रामचंद्र’ नावानं सत्यकथेत त्यांच्या कविता येत. त्यांची पुढं पुस्तकंही आली. मोठा माणूस होता तो. त्यावेळी आणखीही वाङ्मयप्रेमी मंडळी इथं होती. त्यात बी. के. पाटील नावाचे एक काव्यप्रेमी होते. हा दांडगाच्या दांडगा, मिशाबिशा असलेला असा माणूस! पुढं ते आष्टा कॉलेजला प्रिन्सिपॉल झाले. ते आम्हाला बोदलेयर वगैरे शिकवीत. आणि ‘कळ्ळलं का?’ म्हणून पाठीत गुद्दा मारून मला विचारीत. मी म्हणे, ‘अहो, हुकबिक भरेल ना ब्राह्मणाच्या पाठीत. तुम्ही असं मारू नका.’

श्रीपुंची माझी पहिली गाठ पडली ती माझ्या लेखनामुळेच. कविता पाठविण्याच्या निमित्तानं त्यांच्याशी पत्रव्यवहार सुरू झाला होता. ‘मनातल्या उन्हात’नंतर त्यांचं मला लहानसं पत्र आलं- ‘नवं काय लिहिताय?’ आणि दुसरा लेख जेव्हा प्रसिद्ध झाला ऑक्टोबर ६१ मध्ये- ‘आम्ही वानरांच्या फौजा’- त्यावेळी त्यांचं मला फार चांगलं पत्र आलं. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, इथं हे खूप लोकांना आवडतंय. उदाहरणार्थ इरावती कर्वे, माधव आचवल, दिल्लीच्या मीना मराठे, पाडगांवकर वगैरेंना तुमचा लेख खूप आवडलाय. इरावतीबाई तर त्यांना म्हणाल्या की, या लेखकाकडे लक्ष द्या. पुढच्या काळात इरावतीबाईंशी माझी गाठभेटही झाली. यानंतर श्रीपुंशी माझा पत्रव्यवहार सुरू झाला.

आणि असे दोन-तीन-चार लेख झाल्यानंतर एके दिवशी श्रीपु स्वत: गाडी घेऊन कराडला आले. त्यांची मोठ्ठी शेव्हरलेट गाडी होती. त्यांच्या सोबत विमलाबाई- त्यांच्या पत्नी, मुलगा अशोक आणि विमलाबाईंच्या आई असे चौघंजण होते. आमचं तेव्हा सोमवारात पडकं, घुशीनं पोखरलेलं घर होतं. आम्हाला अगदी लाजल्यासारखं झालं. एवढा मोठा माणूस आपल्या घरी आलाय आणि… पण श्रीपुंनी सगळं निभावून नेलं. माझे चार लेख प्रसिद्ध झाले होते त्यावेळेला. आम्ही सगळे जेवत होतो. विमलाबाई म्हणाल्या, ‘भागवतांना सांजेच्या पोळ्या आवडतात हे कुणी सांगितलं का तुम्हाला?’ तेव्हा माझी आई म्हणाली, ‘नाही. कुणीतरी चांगलं माणूस आलं तर काहीतरी चांगलं बनवायचं म्हणून बनवल्यायत.’ तेव्हा श्रीपु मला म्हणाले, ‘हे तुम्ही लिहिताय त्याचं पुस्तक काढायचं नं?’ मी काही बोललो नाही. माझ्या आईला ते म्हणाले, ‘बघा- आम्ही त्यांना पुस्तक काढायचं का विचारतोय, तर लेखक
त्यावर काहीच बोलत नाहीए.’ मी मग म्हटलं भागवतांना, की ‘फक्त चारच लेख झालेयत. त्यात पुस्तक कसं होणार?’ तर म्हणाले, ‘होईल.’

भागवतांनी ‘डोह’ काढायचं ठरवलं १९६५ साली. तेव्हा त्यांनी मला मुंबईला बोलावलं. म्हणाले, चार दिवस इथं माझ्या घरीच राहायला या. चार दिवस लेख वाचून, त्यावर चर्चा करून असं ते पुस्तक झालं. लेखनावर संस्कार असे काही करायचे नव्हते. राम पटवर्धन मौजेतून निवृत्त झाल्यावर त्यांची दूरदर्शनवर एक मुलाखत झाली होती. तीत त्यांनी सांगितलं होतं की, शरश्चंद्र चिरमुले आणि श्रीनिवास कुलकर्णी यांच्या लेखनावर आम्हाला कधीही संस्कार करावे लागले नाहीत. बाकीच्यांच्या बाबतीत आम्ही काही ना काही सुचवत असू. लेखकाला ते पटलं तर ते करायचे/ करायचे नाहीत- असं होई.

नकारानंतरचा होकार…

राम पटवर्धन मौजेतून निवृत्त झाले तेव्हा श्रीपुंनी मला फोन केला. ‘मुंबईला निघून या,’ म्हणाले. तत्पूर्वी ‘डोह’ पुस्तक काढण्याची ऑफर द्यायला जेव्हा ते कराडला आले होते, तेव्हाही त्यांनी मला ‘तुम्ही मौजेत येता का?’ असं विचारलं होतं. त्यावेळेला मी म्हटलं की, ‘मी मुंबईत कुठं राहणार?’ म्हणाले, ‘आमच्याकडे एक ब्लॉक आहे, तो तुम्हाला आम्ही देऊ.’ सरोजिनीबाई (वैद्य) त्यावरती म्हणाल्या- ‘यांना घरसुद्धा बांधून देतील भागवत मुंबईत!’ पण मी तेव्हा त्यांना म्हणालो, ‘मला ना भागवत, बरं वाटतं… इथंच कराडात. शांत.’ त्यावर ते म्हणाले, ‘मलासुद्धा मुंबई आवडत नाही, परंतु आम्ही आता तिथं रुतलोत. त्यामुळे तिथंच राहणं प्राप्त आहे. पण तुम्ही निर्णय घेतलाय तर ठीक आहे.’

दुसर्‍यांदा जेव्हा मला श्रीपुंनी संपादक म्हणून बोलावलं, तेव्हा मी त्यांना म्हटलं, ‘अहो भागवत, मी काही संपादक नव्हे. मी लिहिणारा आहे. मला इतकं सगळं जमणार नाही.’ त्यावर ते म्हणाले, ‘तुमच्या पत्रांतून तुमचं संपादकत्व लक्षात आलेलं आहे. तुमच्यामध्ये एक चांगला क्रिटिक आहे. तुम्ही कुठच्याही लेखकाचं योग्य ते मूल्यमापन करू शकता. आणि मुख्य म्हणजे तुमची माझी वेव्हलेंग्थ, विचार जुळणारे आहेत. तेव्हा तुम्ही इथं या. मला मदत करा.’ मी म्हटलं, ‘पण मी मुंबईत राहणार कुठं?’ म्हणाले, ‘भागवतांच्या घरी राहायचं.’ म्हटलं, ‘कायमचं इथं राहणं मला जमणार नाही. मी पंधरा दिवस राहीन, पंधरा दिवस कराडला जाईन.’ म्हणाले, ‘बरं.’ त्यांनी मला अशोकची- त्यांच्या मुलाची (तो तेव्हा अमेरिकेला गेला होता) स्वतंत्र एसी रूम मला राहायला दिली. म्हणाले, ‘इथं आपल्या प्रेसची गाडी आहे, तिनं ऑफिसला ये-जा करा. दुसरीकडे मुंबईच्या धावपळीत जायची काही एक गरज नाही.’ असा तो सगळा त्यांच्या निव्र्याज प्रेमाचा मामला होता. मौजेत जॉइन होण्याआधी वीसेक वर्षं तरी माझा भागवतांचा संपर्क होता. त्या काळात ते मला निरनिराळ्या लेखकांच्या ्क्रिरप्ट्स पाठवीत. त्या वाचून मी त्यांना त्यावरचा माझा अभिप्राय देत असे. ते त्याचं मला मानधन देत. चांगलं मानधन देत. अधिक माझा पत्रव्यवहार! असं सगळं धरून त्यांनी मला हे काम जमेल असं गृहीत धरलं. मी मौजेत साहाय्यक संपादक म्हणून जॉइन झालो. ८५ साली. नंतर कार्यकारी संपादक झालो आणि पुढं संपादक. २००७ मध्ये ‘मौज’ सोडलं. तोपर्यंत काम तेच होतं- जे मी पूर्वी कराडात राहून, ्क्रिरप्ट्स वाचून करीत असे! पुस्तक किंवा लेखांच्या निवडीच्या बाबतीत श्रीपुंनी मला कधी काही सांगितलं नाही. मी निवडलेल्या पुस्तकांतही श्रीपुंनी कधी हस्तक्षेप केला नाही. क्वचित त्यांना पसंत पडलं नाही, तरीही! त्याबाबतीत संपादकाचा अधिकार ते अंतिम मानत. त्यामुळे आमचे कधी मतभेद झाले नाहीत.

विज्ञानवादी आणि ‘अतिंद्रिय’

श्रीपु लेखकाचा शब्द अंतिम मानत. एखादं पुस्तक त्यांना आवडलं नाही तर ते काढीत नसत. परंतु त्या पुस्तकात गुणवत्ता नाही, असं मात्र ते म्हणत नसत. माझी निवड ही व्यक्तिगत निवड आहे, त्यात चूक होऊ शकते, असं त्यांचं यावर म्हणणं असे. माझ्या काही लेखांमध्ये अतिंद्रिय म्हणावेत असे अनुभव आलेले आहेत. तरीही मौजेनं त्यांचं पुस्तक काढलं. श्रीपुंना ते मान्य नव्हते. याबद्दल तेंडुलकरांनीही त्यांना प्रश्न विचारला होता. तेव्हा ते म्हणाले होते की, ‘यातल्या अनुभवांशी मी सहमत नाही. मी विज्ञानवादी आहे. परंतु असे काही अनुभव कुणाला येत असतील, आणि त्यानं ते कलात्मकरीत्या लेखनातून व्यक्त केले, तर ते प्रसिद्ध करण्यात मला काही गैर वाटत नाही.’

नदीकाठचा लेखक!

एक लेख मला सुचला, की त्यात एखादा संदर्भ जो असेल, त्यातून मला दुसरा लेख सुचायचा. उदाहरणार्थ, ‘घंटीवाला’ म्हणून एक लेख आहे. त्यात एक हुप्प्या आहे. तो लेकाचा नदीला जाऊन वाकून पाणी पीत असे. तर मी त्यात म्हटलंय की, ‘सुसरीनं याला नेऊ नये.’, कारण सुसरी न्यायच्या कुत्रीबित्री औदुंबरला आमच्या. पण वानरंही सहसा याप्रकारे पाणी पीत नसत तिथं… आणि मग असंही मनात आलं की, सुसरीवरही लिहिता येईल. मग सुसरीवर लिहिलं. सुसरीवरचा लेख वाचून व्यंकटेश माडगूळकरांनी मला सांगितलं की, ‘अण्णा (म्हणजे गदिमा) मला म्हणाले की, हा नदीकाठचा लेखक आहे. याच्यावर लक्ष ठेव.’

(मुकुंद संगोराम आणि रवीन्द्र पाथरे यांनी ‘लोकसत्ता दिवाळी अंक- २०१२’ साठी घेतलेल्या मुलाखतीवर आधारित)