हर्षवर्धन अशोक वानखेडे
आणखी एक बळी. पुण्यात एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या धाराशिवच्या प्रथमेश देशमुखने आत्महत्या केली. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना अलीकडच्या काळात वारंवार समोर येत आहेत. नीट परीक्षेतील पेपर फुटी आणि त्यानंतर निर्माण झालेल्या संस्थात्मक गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले. मागच्याच महिन्यात आयआयटी दिल्लीतील विद्यार्थी ऋषिकेश कुमार यानेही व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या केली. सरकारी आकडेवारीनुसार, २०१८ ते २०२३ च्या सुरुवातीपर्यंत आयआयटीमध्ये ३३, तर आयआयटी, एनआयटी आणि आयआयएम या संस्थांमध्ये मिळून ६१ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची नोंद झाली होती. आत्महत्या करणे किंवा स्वतःचा जीव घेण्यास भाग पडणे हा कोणत्याही व्यक्तीसाठी सहज निर्णय नसतो. पण मग असे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ विद्यार्थ्यांवर का येते? हा केवळ विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अपयशाचा किंवा मानसिक प्रश्न आहे का?
फ्रेंच विद्वान मिशेल फुकोच्या मते सत्ता केवळ राज्य, पोलीस किंवा एखाद्या शासकाच्या हातात केंद्रित नसते. ती शाळा, विद्यापीठ, कार्यालय, रुग्णालय, तुरुंग अशा संस्थांमधून नियम, वेळापत्रक, परीक्षा, निरीक्षण, नोंद, वर्गीकरण आणि मूल्यमापन यांच्या माध्यमातून शरीर आणि वर्तनावर कार्य करत असते. परीक्षा विद्यार्थ्याचे ज्ञान मोजते, परंतु त्याच वेळी विद्यार्थ्याला एका विशिष्ट पद्धतीने स्वतःला घडवण्यास भाग पाडते. किती तास अभ्यास केला, किती गुण मिळाले, कोणता क्रमांक आला, इतरांच्या तुलनेत आपण कुठे आहोत—या सततच्या मोजमापातून हळूहळू विद्यार्थी स्वतःचे निरीक्षण करू लागतो आणि सत्तेला स्वतःच्या आत आत्मसात करतो. परिणामी बाहेरून कोणी म्हणण्याची गरज राहत नाही की “अभ्यास कर”; व्यक्ती स्वतःवरच ती मागणी लादते. यूपीएससी, एमपीएससीची किंवा आयआयटी, AIIMS सारख्या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीत ही प्रक्रिया अधिक तीव्र दिसते. वेळापत्रक, टेस्ट सिरीज, मॉक परीक्षा, गुण, रँकिंग, कट-ऑफ, टॉपरशी तुलना आणि सोशल मीडियावरील यशाच्या कथा यांमधून विद्यार्थी सतत स्वतःचे मूल्यमापन करतो. त्याचे शरीर, वेळ, झोप, श्रम आणि दैनंदिन जीवन एका विशिष्ट शिस्तीमध्ये बांधले जाते. अशा प्रकारे सत्ता एखाद्या व्यक्तीला केवळ नियंत्रित करत नाही, तर विशिष्ट प्रकारचा “स्वयंशिस्तबद्ध उमेदवार” निर्माण करते आणि पुनरुत्पदित करत असते. अशा परिस्थितीत शिक्षण ज्ञानप्राप्तीचे साधन न राहता रोजगार, प्रतिष्ठा आणि सामाजिक उन्नतीसाठीची गुंतवणूक बनते. मनसे माणसांसाठी एक साधन बनून जातात. विद्यार्थी स्वतःच्या मानवी विकासासाठी नव्हे, तर रोजगार आणि परीक्षेतील यशासाठी स्वतःला ‘गुंतवणूक’ मानू लागतो. कारण ज्या सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रतिमानात आज अजाणतेपणी आपण आपल्याला ओढले आहे त्याचे प्रतिबिंब हेच आहे. कदाचित त्याचमुळे आत्महत्या किंवा रेप कल्चर ह्या देशात सामान्यकृत बनले आहे.
ज्यावेळी मुलाचे यश हे संपूर्ण कुटुंबाचे स्वप्न बनते. अशा परिस्थितीत अपयशाचे ओझे केवळ विद्यार्थ्यावर राहत नाही; त्यात कुटुंबाची गुंतवणूक, अपेक्षा आणि सामाजिक प्रतिष्ठा सामील होऊन जाते. वारंवार प्रयत्न करण्याची संस्कृती ही परिस्थिती आणखी तीव्र करते. यूपीएससी किंवा एमपीएससीमध्ये अपयश आले की विद्यार्थ्याला सांगितले जाते—“पुन्हा प्रयत्न कर.” आणखी एक वर्ष देणे वरकरणी योग्य वाटते. परंतु ते आणखी एक वर्ष बेरोजगारीचे असते; आणखी एक वर्ष घरभाडे, शिकवणी आणि खर्चाचे असते; आणखी एक वर्ष अनिश्चिततेचे असते. काही वर्षांनंतर व्यक्तीला असे वाटू लागते की, “मी आधीच तीन-चार वर्षे दिली आहेत; आता थांबायचे कसे?” अशा प्रकारे व्यक्ती आधी केलेल्या गुंतवणुकीच्या जाळ्यात अडकत जातो. परीक्षा हळूहळू करिअरचा एक पर्याय न राहता व्यक्तीची ओळख बनते. या प्रक्रियेतील सर्वात धोकादायक टप्पा म्हणजे पर्यायी भविष्यांचा नाश. समाज एखाद्या व्यक्तीला सांगतो की आयएएस, आयपीएस, डॉक्टर, अभियंता किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च पद हेच यशाचे सर्वोच्च रूप आहे. मग त्या पदापर्यंत पोहोचता आले नाही तर व्यक्तीला इतर सर्व शक्यता कमी दर्जाच्या वाटू लागतात. “मी परीक्षा उत्तीर्ण झालो नाही” हे हळूहळू “मी अपयशी आहे” मध्ये रूपांतरित होते. एका परीक्षेने व्यक्तीच्या संपूर्ण मानवी मूल्याचे मोजमाप करण्यास सुरुवात केली की संस्थात्मक मूल्यांकनाचे रूपांतर अस्तित्वाच्या मूल्यांकनात होते.
या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी वेगवेगळी असते, पण सत्ता, संस्था आणि रचना प्रत्येकाला एकाच साच्यात टाकून शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न सूक्ष्म आणि प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या करत असते. या विरोधाभासात संघर्ष होत राहतात. या संघर्षात बऱ्याच वेळा ‘संस्थात्मक हत्या’ हा शब्द वापरला जातो. हा आरोप म्हणून नव्हे किंवा एखाद्या संस्थेने अक्षरशः एखाद्या व्यक्तीची हत्या केली, असाही अर्थ न घेता एखादी संस्था किंवा व्यापक राजकीय, आर्थिक, सामाजिक रचना अशा परिस्थिती निर्माण कशी करते किंवा तीव्र कशी करते ज्यामुळे व्यक्तीची असुरक्षितता अत्यंत वाढते की त्याला आत्महत्या सारखेच एकमेव पर्याय उरल्या सारखे वाटते.
जोहान गाल्टुंगची ‘संरचनात्मक हिंसा’ (Structural Violence) ही संकल्पना या परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त ठरते. प्रत्यक्ष किंवा थेट हिंसेमध्ये हिंसक कर्ता स्पष्टपणे दिसतो. त्याउलट, संरचनात्मक हिंसेमध्ये हिंसा करणारा असा एखादा स्पष्ट कर्ता दिसत नाही. अनेकदा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय रचना अशा पद्धतीने कार्य करतात की काही लोकांच्या संधी, गरजा आणि जीवनाच्या शक्यता इतरांच्या तुलनेत मर्यादित होतात. समाजातील काही व्यक्ती किंवा समूहांना इतरांच्या तुलनेत अधिक वंचना, असुरक्षितता आणि नुकसान सहन करावे लागते. गरिबी, बेरोजगारी, आर्थिक विषमता, शिक्षणातील असमानता, सामाजिक बहिष्कार, अस्थिर रोजगार आणि सार्वजनिक संस्थांची अपुरी उपलब्धता या केवळ वैयक्तिक अडचणी नसून व्यक्तीच्या संधी आणि जीवनाच्या शक्यता मर्यादित करणाऱ्या संरचनात्मक परिस्थिती असतात. म्हणूनच, एखाद्या तरुणाला एका क्षणी कोणी थेट आत्महत्येकडे ढकलत नसते. मात्र, रोजगाराच्या मर्यादित संधी, वर्षानुवर्षे चालणारी स्पर्धा, महागडी तयारी, कुटुंबावर वाढणारा आर्थिक भार, शहरातील वाढता जीवनखर्च, परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील अनिश्चितता, प्रश्नपत्रिका फुटणे किंवा परीक्षा रद्द होणे, निकाल आणि नियुक्तीला होणारा विलंब अशा अनेक परिस्थिती एकत्रितपणे व्यक्तीच्या जीवनावर दबाव निर्माण करतात. या प्रत्येक घटनेकडे स्वतंत्रपणे पाहिल्यास ती केवळ प्रशासकीय किंवा वैयक्तिक समस्या वाटू शकते; परंतु त्या सातत्याने आणि परस्परांशी जोडलेल्या स्वरूपात अनुभवास आल्या, तर त्या व्यक्तीच्या जगण्याच्या शक्यतांवर परिणाम करणारी संरचनात्मक हिंसा ठरू शकतात. आत्महत्येसारख्या टोकाच्या परिणामाचे विश्लेषण केवळ व्यक्तीची मानसिक स्थिती, वैयक्तिक कमकुवतपणा किंवा ‘अपयश पचवता न येणे’ यापुरते मर्यादित करता येत नाही; त्यामागील सामाजिक आणि संस्थात्मक परिस्थितीही तपासावी लागते. म्हणून विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांकडे दोषारोपाऐवजी जबाबदारीची साखळी म्हणून पाहणे आवश्यक आहे.
मात्र, शिक्षणाचे वाढते बाजारीकरण व स्पर्धाकेंद्रीकरण, मर्यादित रोजगार, परीक्षांवरील वाढते अवलंबित्व, भरती प्रक्रियेतील अनिश्चितता, महागडी तयारी आणि यशाची मोजकीच सामाजिक प्रतिमाने विद्यार्थ्यांसमोरील पर्याय संकुचित करत आहेत. व्यक्तीला अशा परिस्थितीची जबाबदारी स्वतःवर घ्यावी लागते, ज्याची कारणे आणि परिणाम मोठ्या प्रमाणावर त्याच्या नियंत्रणाबाहेर असतात. याहून गंभीर बाब म्हणजे, व्यक्तीला या प्रक्रियेत अजाणतेपणी अशा साच्यात बांधले जाते की ज्या गोष्टी त्याच्या जगण्याचा आधार असायला हव्यात—त्याचे श्रम, वेळ, महत्त्वाकांक्षा, शिस्त आणि सततचा प्रयत्न—त्याच अखेरीस त्याच्याविरुद्ध कार्य करू लागतात. तो जितका अधिक गुंततो, तितके मागे फिरणे कठीण होते; जितका अधिक प्रयत्न करतो, तितके अपयश वैयक्तिक दोषासारखे वाटू लागते. अशा वेळी समस्या केवळ व्यक्तीच्या निर्णयात नसते, तर त्या निर्णयाला आकार देणाऱ्या सामाजिक आणि संस्थात्मक परिस्थितीतही असते. आत्महत्या म्हणजे केवळ एका व्यक्तीचे जीवन संपणे नाही; ती अनेकदा उत्तर न मिळालेल्या प्रश्नांची सुरुवात असते. जीवन संपते, पण प्रश्न राहून जातात.
जेएनयूमधील पी.एचडी. स्कॉलर
harshjnu8@gmail.com
