अनेक उपाययोजना करूनही कॉपीची समस्या सुटलेली नाही. शिक्षकांच्या अखत्यारीतील बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित आली, मात्र समस्येची तीव्रता कायम आहे. परीक्षा ऑनलाईन घ्या किंवा ऑफलाईन विद्यार्थ्यांनी त्यात अनेक पळवाटा शोधून काढल्या आहेत. कॉपीची ही वाळवी हळूहळू संपूर्ण समाजजीवन पोखरेल याचीच भीती वाटत आहे. अनेक शैक्षणिक संस्थांत परीक्षा योग्य पद्धतीने घेतल्या जातात म्हणून मूल्यमापन शब्द अजूनही अस्तित्वात आहे. सगळेच काही भ्रष्ट परीक्षेतून श्रेष्ठ झाले नाहीत. अभ्यासाने, परीक्षेने अनेक जण मोठे यश प्राप्त करू शकले व यशस्वी जीवन जगले. कॉपी न केलेले अनेक जण आपल्या ज्ञानाच्या आधारे जीवनातले अनेक प्रश्न सहजपणे सोडवतात. आज अध्ययन-अध्यापन यापेक्षाही गंभीर प्रश्न परीक्षा व मूल्यमापनासंदर्भात निर्माण होत आहेत.
मूल्यमापनाची विश्वासर्हता कमी होत चालली आहे. त्यासाठी नवीन आराखडा तयार करावा लागेल. फेरमूल्यांकनाची मागणी वाढतेच आहे. कागदावरच्या अध्यापनाची परीक्षा कागदावरच होत आहे. पण कौशल्ये कागदावर पडताळून पाहता येत नाहीत. लिहून दिलेल्या नोट्स नीट परीक्षेत लिहिल्या जात आहेत. मापन म्हणजे एखाद्या गोष्टीचे संख्यात्मक प्रमाण ठरविणे होय. व्यक्तीच्या संदर्भात मूल्यनिर्धारण व प्रकल्प कार्यक्रम किंवा अभ्यासक्रमासंदर्भात मूल्यमापन या संज्ञा वापरल्या जातात. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा समावेश होणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण हे मानवाने संपादन केलेले एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रकारचे बदल घडवून आणता येतात, हे बदल अपेक्षित दिशेने आणि किती झाले आहेत ते मूल्य निर्धारण मूळे कळते. मूल्यमापन किंवा मूल्यनिर्धारण हे साधन आहे साध्य नव्हे. मूल्यनिर्धारण हे केवळ संपादनाशी संबंधित नाही, तर सुधारणेशीही निगडित आहे. मूल्यनिर्धारणात निर्णयाची गुणात्मक चिकित्साही असते. मापनात केवळ मोजमाप येते. मूल्यनिर्धारणात प्रक्रियेचे परिणाम तपासले जातात पुरावे गोळा करून त्याचा अर्थ लावला जातो.
सतत होणाऱ्या परीक्षा व त्यांची संख्या, त्यांचा निकाल लावणे ही व्यवस्थापनाच्या दृष्टीने समस्या ठरत आहे. करोनाच्या दोन वर्षांत शिक्षण, अध्यापन, संवाद, कौशल्य प्रक्रिया याला एक प्रकारचा सेटबॅक मिळाला. शारीरिक हालचाली सीमित झाल्या. अनेक गोष्टी विस्मरणात गेल्या. ते मूळ पदावर आणणे गरजेचे आहे. आज पूर्वीपेक्षा परीक्षांची संख्या वाढली आहे. सत्र परीक्षा काही विद्यापीठांत यशस्वी झाली नाही किंवा वारंवार परीक्षेमुळे काही ठिकाणी ती योग्य प्रकारे हाताळता आली नाही. आपली पारंपारिक परीक्षा पद्धतीही विषयाच्या माहितीवरच अधिक भर देते. त्यामुळे अनेकांना कौशल्यअपंगत्व आले आहे. अलीकडे प्रश्नपत्रिकाच काय पाठ्यपुस्तकांतही सदोष असतात. मूल्यमापन लेखी परीक्षा पुरतेच मर्यादित असते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासाच्या विविध पैलूंचे मूल्यमापन परीक्षा पद्धतीत होत नाही, परिणामी परीक्षा विश्वसनीय राहिलेल्या नाहीत. विद्यार्थ्याच्या उणिवांची चिकित्सा करून त्या दूर करण्याचे प्रयत्न वाढीला लावणे ही गोष्ट परीक्षा पद्धतीतून होऊ शकत नाही. शाळेत सुप्त गुण ओळखून त्यांना विकसित करणारी यंत्रणाच नाही. शाळेला फाटा देऊन अशा अनेकांनी आपले सुप्त गुण विकसित केले आहेत.
अजून एटीकेटीची मलमपट्टी वापरली जाते आहेच. परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थी कसे उत्तीर्ण होतील व त्यांना ग्रेस मार्क देऊन उतीर्ण कसे करता येईल यावरच लक्ष केंद्रीत झालेले असते. कॉपी करून उत्तर लिहिलेले आहे हे परीक्षकाला समजत असूनही कोणताच पुरावा नसल्यामुळे गुण देऊन मोकळे होण्याशिवाय पर्याय नसतो. परीक्षेच्या काळात कॉपी पुरवणारी एक जमात सज्ज असते. शाळेच्या कंपाउंड वॉलवरून, खिडकीवर चढून ही टोळी युद्धपातळीवर काम करते. भरारी पथक येते व पोत्यांनी कॉपीच्या चिठ्ठ्या गोळा करते पण तरीही कॉपी विद्यार्थ्यांकडे असतेच. परीक्षा केंद्रांच्या स्वच्छतागृहात एक पर्यवेक्षक नेमण्याइतपत विद्यार्थ्यांची कॉपी करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. अध्यापनच झाले नाही तरी पेपरफुटीच्या जोरावर अनेक जण स्वतः शर्यतीत पुढे जातात. सामान्य विद्यार्थी हिरमुसला होऊन तोही त्या कळपात सामील होतो.
विद्यापीठ अनुदान आयोगाने १९७३ मध्ये पदवी परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी कृती योजना प्रसिद्ध केली होती, त्यात विद्यार्थ्याला अभ्यासाच्या योग्य सवयी लावून घेण्यास उत्तेजना मिळण्यासाठी अंतर्गत मूल्य निर्धारण होते. या पद्धतीमुळे अन्य कौशल्य व उद्दिष्टे यांची तपासणी करता येते. सांख्यिकी विश्लेषणातून असे आढळून आले की जेव्हा परीक्षक उत्तरपत्रिका तपासतो तेव्हा गुणदान करतांना पाच टक्क्यांपेक्षा अधिक गुण देण्याची शक्यता ५० टक्के एवढी असते. विद्यार्थ्याला त्याची परीक्षा कशी घेतली जाणार आहे हे कळले पाहिजे, त्यासाठी प्रश्नपेढी आवश्यक आहे. प्रश्न रचनेची समस्या व्यवस्थित विकसित केलेल्या प्रश्नपेढी मुळे सुटू शकेल. चांगली शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या ज्ञानात्मक, भावनात्मक व क्रियात्मक बाजूवर सारखेच भर देत असते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक मूल्यमापनाची संकल्पना स्वीकारणे गरजेचे आहे. अभ्यासाबरोबरच जीवनाच्या अनेक क्षेत्रांत सहभागी होण्यासाठीची काळजी सहशालेय कार्यक्रमातून घ्यायला हवी विशिष्ट ज्ञान क्षेत्रे व त्यातील ज्ञानाचा काही अंश केवळ पाठ्यपुस्तक या पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षणात विचारात घेतला जातो.
जे जे परीक्षेला येणार त्याचाच अभ्यास करण्याची वृत्ती सध्या दिसते आहे. प्रश्नपत्रिका, प्रश्न चुकीचे असतील तर ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील कशा? ५० टक्के प्रश्न उपयोजनावर हवेत, तसे प्रयत्न काही विद्यापीठांनी सुरू केले आहेत. केवळ अभ्यासक्रम सर्वसमावेशक असून चालणार नाही परीक्षेतील प्रश्न ही सर्वसमावेशक असावेत. मागच्या प्रश्नांची पुनरावृत्ती किती दिवस करणार? परीक्षेतील त्रुटी या शिक्षण पद्धतीच्या त्रुटी आहेत. परीक्षा म्हणजे केवळ घोका व ओका यापुढे जाऊन पहा व लिहा या अवस्थेत आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा यंत्रणेला गुंडाळून ठेवले आहे. कॉपी नियंत्रणासाठी काही ठोस निर्णय दरवर्षी जाहीर होतात पण ते पुरेसे नाहीत.
कॉपी करताच नाही आली किंवा कॉपी करता येत नाही अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होईल तेव्हाच विद्यार्थी अभ्यासाकडे वळतील. विद्यार्थी व पालकांचे मेळावे, उद्बोधन व्हायला हवे. विद्यार्थी निवड, शिक्षक निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम व अंमलबजावणी याचा संबंध कॉपी प्रकरणात कुठे आहे याचा शोध घ्यायला हवा. कृती पत्रिकेचा वापर, स्वमत, अभिव्यक्ति, उपयोजनावर भर देणारे प्रश्न असावेत. पेपर काढणारे व तपासणारे यांच्या क्षमतेचा व निकषांचा विचार व्हायला हवा.
परिक्षकांना ‘मॅनेज’ करणे आता कमी झाले असले तरीही व्हिडीओ शूटिंग, शाळेची मान्यता रद्द करणे याही गोष्टी राबविल्या जात आहेत, तरीही कॉपीची समस्या राहणारच असेल तर कुठेतरी शिक्षणातले मूल्य हरवले आहे याचा गांभीर्याने विचार करायला हवा. सारे काही आहे, पण मूल्यशिक्षण नाही ही आजच्या समाजाची शोकांतिका आहे. काही लढे आपापल्यापरीनेच लढावे लागतात त्यापैकीच शिक्षण आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची शारीरिक तपासणी करून कॉपी आहेत की नाही पाहण्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल. शिक्षकावर तपासण्याची जबाबदारी असल्यामुळे त्यांच्या अस्तित्वावरही टांगती तलवार असतेच. फोटोकॉपीची दुकाने बंद करणे वगैरे तात्पुरत्या मलमपट्टीच्या योजना आहेत आणि त्या अजिबात परिणामकारक नाहीत. विद्यार्थी फक्त परीक्षेला सामोरे जातात, परीक्षा झाल्यावर माझ्यातील कौशल्याचा कस लागला पाहिजे हे त्यांच्या गावीही नसते. केवळ परीक्षा नव्हे तर वर्ग प्रकल्पांतूनच त्यांचे मूल्यनिर्धारण होऊ शकते आणि व्यक्तिमत्व विकास साधला जाऊ शकतो.
anilKulkarni666@gmail.com

