रघुनंदन भागवत
तमिळनाडू हे राज्य भाजपसाठी एक अवघड कोडे बनून राहिले आहे. हे कोडे सोडवण्यासाठी भाजप अहोरात्र मेहनत करत आहे आणि त्यातूनच त्यांना गवसले होते ‘अन्नामलई’ नामक उत्तर.

हे अण्णामलई गेल्या काही दिवसात प्रकाशझोतात आले आहेत ते त्यांनी भाजपला ‘रामराम’ करायचे ठरवले आहे म्हणून. त्यांनी आपला राजीनामा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबी यांना सादर केला असल्याची बातमी आहे. त्यांनी अमित शाह यांचीही भेट घेतली आहे असे समजते. शहांनी त्यांना थोडा संयम पाळण्याचे आवाहन केले आहे आणि अण्णामलईने घाईत कुठलाही निर्णय घेऊ नये असे सुचवले आहे. अण्णामलई मात्र फार काळ थांबणार नाहीत आणि आपल्या वाढदिवशी म्हणजे ४ जूनला आपला निर्णय जाहीर करतील व बहुतेक नवा पक्ष स्थापन करतील अशी दाट शक्यता आहे.

सध्याच्या काळात भाजपमध्ये कोणी नव्याने प्रवेश केला तर ती बातमी नसते पण भाजप पक्षातून कोणी बाहेर पडत असेल तर त्या घटनेची ‘बातमी’ होते कारण भाजपमधून कोणी बाहेर पडणे ही विरळात विरळ घटना समजली जाते. अन्नामलई यांचा राजीनामा ही म्हणूनच ‘राष्ट्रीय हेडलाईन’ झाली आहे.

अण्णामलई हे ४२ वर्षाचे आहेत. ते मेकॅनिकल इंजिनीअर असून २०११ च्या तुकडीचे आय. पी. एस. अधिकारी आहेत. २०१९ पर्यंत त्यांनी कर्नाटक राज्यात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि राजकारणात प्रवेश करण्यासाठी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.

२०२० मध्ये अण्णामलई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि थोड्याच दिवसात ते तमिळनाडूमधील भाजपचा चेहरा बनले. २०२१ मध्ये त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. प्रदेशाध्यक्ष झाल्यावर त्यांनी पदयात्रा काढून पूर्ण तमिळनाडू पिंजून काढला. या पदयात्रेत त्यांना जनतेचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. तामिळ जनतेचे एक वैशिष्टय आहे. तामिळ नागरिक नेहमी एका ‘आयकॉन’च्या शोधात असतात.

१९६७ मध्ये तमिळनाडूत काँग्रेसची सत्ता लयाला जाऊन अण्णादुराई यांचा द्रविड मुनेत्र कलघम पक्ष सत्तेवर आला. त्यानंतर तमिळी राजकारण व्यक्तीनिष्ठ झाले. अण्णादुराई हे तमिळ चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध चित्रपटकथा लेखक होते आणि ते प्रचंड लोकप्रिय होते. त्यांच्यानंतर के. करुणानिधी हे द्रमुकचे सर्वेसर्वा बनले. करुणानिधी हे सुद्धा अव्वल पटकथा लेखक होते. १९८० च्या दशकात एम.जी. रामचंद्रन (एमजीआर ) हे तामिळ चित्रपट सृष्टीतील अफाट लोकप्रिय असलेले ‘नट’ द्रमुक मधून बाहेर पडले आणि त्यांनी आपला स्वतंत्र पक्ष ‘ऑल इंडिया अण्णा डीएमके’ या नावाने स्थापन केला. त्यानंतर तमिळनाडूत द्रमुक व अण्णा द्रमुक यांच्यात सत्तेसाठी संगीत खुर्चीचा खेळ सुरू झाला.

दर पाच वर्षांनी सत्तापालट होत असे. एमजीआर यांच्या निधनानंतर काही काळ त्यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन या मुख्यमंत्री झाल्या होत्या. पण नंतर एआयएडीएमके पक्षात फूट पडली व एमजीआर यांच्या शिष्या जयललिता यांनी पक्षावर कब्जा केला. जयललिता या सुद्धा तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांच्यात आणि करुणानिधीमधून विस्तव जात नसे. दर पाच वर्षांनी सत्ताबदल होण्याचे चक्र त्यानंतरही चालू राहिले. जयललिता या जन्माने कानडी ब्राह्मण होत्या पण त्या ब्राह्मण द्वेषावर आधारित द्रविडी राजकारणात आश्चर्यकारकरित्या पाय रोवून उभ्या राहिल्या. त्यांचे २०१६ मध्ये निधन झाल्यावर एआयडीएमके पक्ष अक्षरशः पोरका व निर्नायकी झाला. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेले पलानी स्वामी यांचे व्यक्तिमत्व जायलालितांसारखे वलयांकित नव्हते.

२०२१ मध्ये अण्णा द्रमुक पक्षाची सत्ता जाऊन द्रमुक परत सत्तेत आला. करुणानिधी हे तोपर्यंत वयोमानामुळे राजकारणातून निवृत्त झाले होते आणि त्यांचा मुलगा स्टॅलिन मुख्यमंत्री झाला. स्टॅलिन लोकप्रिय होते पण करुणानिधी यांच्या तुलनेत ते फिके ठरले. तमिळ जनता त्यामुळेच एखाद्या वलयांकित ‘नेतृत्वाच्या ‘ शोधात होती.

अशा महत्वाच्या वेळी तामिळनाडूत ‘अण्णामलई’ यांचा उदय झाला. त्यांनी जनतेशी यशस्वीरित्या नाळ जोडली. त्यांच्या सभांना अलोट जनसमुदाय लोटत असे. भाजपने ही गोष्ट हेरून त्यांच्याकडे तमिळनाडूची धुरा सोपवली. अण्णामलई यांनी एआयडीएमकेच्या विरोधात भूमिका घेतली. (वास्तविक एआयडीएमके हा भाजपच्या एनडीए मधील महत्वाचा घटक पक्ष होता.) एआयडीएमके पक्षाने म्हणूनच एनडीएशी काडीमोड घेतला. भाजपने २०२४ ची लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली. भाजपचा मत टक्का ११ टक्क्यांपर्यंत वाढला पण लोकसभेची एकही जागा भाजपला मिळू शकली नाही.

भाजप व अण्णाद्र मुक यांच्यात द्रमुक विरोधी मतांची विभागणी होऊन सर्वच्या सर्व ३९ जागा स्टॅलिनच्या आघाडीने जिंकल्या. या अनुभवातून शहाणे होऊन भाजपने २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत एआयएडीएमके पक्षाशी युती करण्याचा निर्णय घेतला. युती करताना पलांनीस्वामीनी अण्णामलाई यांना दूर करायची अट घातली. भाजपने मान तुकवली व अण्णामलाई यांना प्रदेश अध्यक्ष पदावरून दूर केले. अण्णामलाई यांना प्रचारापासूनही दूर ठेवले. एवढे करून सुद्धा विधानसभेत भाजपला फक्त एक जागा मिळाली. विजय जोसेफ नामक पडद्यावरील हिरोने नवीन पक्ष स्थापन करून पहिल्याच प्रयत्नात सत्तेला गवसणी घातली.

अण्णामलाई यांनी विजयच्या यशापासून बोध घेतला आणि भाजपमध्ये राहून आपल्याला भवितव्य नाही या निष्कर्षांपर्यंत ते आले. भाजपमध्ये कोणा एका व्यक्तीला पक्षापेक्षा मोठा होऊ दिले जात नाही हे कटू सत्य अण्णामलाई यांच्या लक्षात आले. आता तमिळ राजकारणात विरोधी पक्षात पोकळी निर्माण झाली आहे आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी ते पुढे सरसावले आहेत. थोडक्यात यापुढील राजकारण विजय विरुद्ध अण्णामलाई यांच्यात रंगण्याची शक्यता आहे. पुढील निवडणुकीत विजयला पर्याय म्हणून आपण पुढे येऊ शकतो याची खूणगाठ बांधूनच अण्णामलाई यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे असे दिसते. काँग्रेस, भाजप या राष्ट्रीय पक्षांबरोबरच द्रविडी पक्षानाही भविष्यात काही भवितव्य नाही हे नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीतून अधोरेखित झाले आहे.

अण्णामलई यांनी आपण राष्ट्रीय हिताची भूमिका घेणार असल्याचे सुतोवाच केले आहे. कदाचित यापुढे भाजप हा अण्णामलाई यांचा दुय्यम भागीदार बनून तमिळनाडूमधील राजकारण करेल असे वाटते.

तमिळनाडूमधील राजकारण एका नव्या वळणावर उभे असून जर अण्णामलई वैयक्तिक करिष्म्याच्या जोरावर यशस्वी ठरले तर तमिळनाडूचे राजकारण कूस बदलून प्रादेशिक अस्मितेऐवजी राष्ट्रीय मुद्दयांवर आधारित राहील अशी आशा बाळगणे अस्थानी ठरू नये.

raghunandan.bhagwat@gmail.com