दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेला पक्ष. भ्रष्टाचारमुक्त, निधर्मवादी, लोकांचे प्रश्न सोडविणारे सरकार, असे आश्वासन देत तरुणाईला घातलेली साद. राज्यभर केलेल्या दौर्‍यांना लोकांचा भरभरून प्रतिसाद. एका सभेत गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ४० लोकांच्या मृत्यूने विरोधात गेलेले वातावरण. समोर द्रमुक व अण्णा द्रमुक हे दोन प्रस्थापित प्रादेशिक पक्ष अशा पार्श्वभूमीवर आव्हानांवर मात करत चित्रपट अभिनेता जोसेफ विजय यांच्या टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम या पक्षाने राज्याची सत्ता हस्तगत करीत सार्‍यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तमिळनाडूच्या राजकारणावर तसाही चित्रपटसृष्टीचा चांगलाच पगडा. अण्णा दुराई, एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी, जयललिता, विजयन हे सारे चित्रपट क्षेत्रातून राजकारणात स्थिरावलेले. आता ‘थलपती’ विजय यांनी ही जागा घेतली आहे. पहिल्याच निवडणुकीत विजय यांनी मिळविलेल्या अभूतपूर्व यशाने तमिळनाडूच्या राजकारणात नवीन नेतृत्व उदयाला आले आहे.

विजय यांनी विशेषत: तरुणाईला जवळ केले. तसेच राज्याच्या शहरी भागात विजय यांना चांगला पाठिंबा मिळाला आहे. राजधानी चेन्नईमधील ३६ पैकी ३४ जागा टीव्हीके पक्षाने जिंकल्या आहेत. चेन्नईतील द्रमुकचे पारंपरिक वर्चस्व विजय यांनी मोडून काढले. शहरी भाग, युवक, महिला, अल्पसंख्याक, दलित मतदारांचा विजय यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला आहे. काही तरी वेगळे करण्याची भावना युवकांसमोर मांडली. महिलांच्या सुरक्षेला विजय यांनी प्राधान्य देण्याचे आश्वासन प्रत्येक सभेत दिले होते. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत असे, पण त्याचे मतांमध्ये कितपत रूपांतर होईल याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. या गर्दीनेच विजय यांना हात दिला आहे. टीव्हीकेच्या शिट्टी या निवडणूक चिन्हाचा आवाज सर्वत्रच घुमला आहे.

तमिळनाडूत १९६७पासून द्रमुक व अण्णा द्रमुक हे दोनच प्रादेशिक पक्ष कायम सत्तेत राहिले आहेत. अनेक प्रादेशिक पक्ष स्थापन झाले पण काळाच्या पडद्याआड गेले. दोन प्रस्थापित वगळता कोणताही प्रादेशिक पक्ष तग धरू शकला नाही. मध्यंतरी सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी राजकारणात सक्रिय होण्याची तयारी केली होती पण त्यांनीही ही कल्पना नंतर सोडून दिली. अभिनेते कॅप्टन विजयन यांच्या पक्षाला एकाच निवडणुकीत मर्यादित यश मिळाले. या तुलनेत तमिळ चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते जोसेफ विजय यांनी चमत्कार केला.

तमिळनाडूच्या राजकारणात द्रमुक व अण्णा द्रमुक या दोन द्रविडी पक्षांचा वरचष्मा होता. सुमारे सहा दशकांनंतर मतदारांनी तिसरा पर्याय निवडला आहे. जयललिता यांच्या पश्चात अण्णा द्रमुकमध्ये नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला. तसेच भाजपशी युती करण्यावरून पक्षात मतभेद होते. २०२१च्या निवडणुकीत भाजपबरोबर युती केल्याने अल्पसंख्याक मतदार दूर गेले होते. यामुळेच लोकसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकने भाजपला दूर केले. विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपबरोबर युती केली.

२०२१ मध्ये ६६ जागा जिंकलेल्या अण्णा द्रमुकचे संख्याबळ ४५ पर्यंत घटले आहे. लागोपाठ दोन निवडणुकांमधील पराभवांमुळे अण्णा द्रमुकसमोर आता अस्तित्वाची लढाई असेल. द्रमुक व अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षांचे पारंपरिक मतदार विजय यांच्या पक्षाकडे वळल्याचे निकालातून स्पष्ट झाले. विशेषत: चेन्नईतील द्रमुकच्या पारंपरिक मतदारांनी टीव्हीकेला कौल दिला. चेन्नई शहराची झालेली दुरवस्था, पुरामुळे शहराचे झालेले नुकसान, वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता होती. यातूनच विजय यांच्या पक्षाला राजधानीत घवघवीत यश मिळाले आहे.

विजय यांच्या पक्षाला बहुमताचा ११८चा आकडा गाठता आलेला नाही. त्यासाठी ११ आमदारांची गरज आहे. काँग्रेस, पीएमके किंवा अन्य छोट्या पक्षांच्या मदतीने बहुमताचे संख्याबळ जमू शकेल. भाजपला तमिळनाडूत मित्र पक्षाची गरज आहेच. भाजप विजय यांना भविष्यात जवळ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तमिळनाडूत अनेक प्रयोग करूनही लागोपाठ दुसर्‍या निवडणुकीत भाजपला यश मिळू शकलेले नाही. हिंदी सक्ती किंवा अन्य धोरणांमुळे भाजपला जनाधार मिळू शकलेला नाही.

मुख्यमंत्र्यांचाच पराभव

जयललिता यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदावर असताना निवडणुकीत पराभूत झालेले एम.के. स्टॅलिन हे दुसरे मुख्यमंत्री. द्रमुक पुन्हा सत्तेत येईल, असा अंदाज वर्तविला जात होता. पण सरकारच्या विरोधातील नाराजी दूर करण्यात स्टॅलिन यांना यश आले नाही. द्रमुकला कधीच लागोपाठ दुसर्‍यांदा सत्ता मिळालेली नाही. ही परंपरा यंदाही कायम राहिली. २०१९ व २०२४ लोकसभा निवडणूक आणि २०२१च्या विधानसभा निवडणुकांमध्ये द्रमुक आघाडीचा वरचष्मा राहिला होता. पण या निवडणुकीत द्रमुकचा सूर्य मावळला (उगवता सूर्य हे पक्षाचे चिन्ह) आहे.  

santosh.pradhan@expressindia.com