गणेश पोकळे
पंतप्रधान होता होता ती संधी हुकली असा ज्यांचा इतिहास आहे त्या राष्ट्रीय जनता दल आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादवही यावेळी मुख्यमंत्री होता होता राहिले. असं का झालं?, तर या प्रश्नाचं उत्तर पूर्णतः इतिहासात आहे. इतिहास इतिहास असला तरी वर्तमानाच्या अनेक गोष्टींच्या यश अपयशात इतिहास भूमिका निभावतो हे या बिहार निवडणुकीत फार प्रकर्षाने जाणवलं.

मी आठ दहा दिवस बिहारमध्येच होतो निवडणूक कव्हर करण्यासाठी. फक्त निवडणूक कव्हर करायची असल्याने दिवसभरात अनेक गाव तालुके आणि जिल्हेसुद्धा मी फिरत होतो. १० दिवसांचा वेळ असल्याने अनेक ठिकाणी जाता आलं आणि थेट मतदारांशी बोलता आलं. मी पंचर काढणारा, रिक्षा चालवणारा, घरकाम करणारी महिला, नोकरदार महिला, शिकणारे विद्यार्थी, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, ॲप आधारित बाईक किंवा कारवाला आणि चौकाचौकात बसलेली ज्येष्ठ मंडळी या सगळ्यांशी बोललो. या बोलण्यात नितीश कुमार, भाजप, काँग्रेस, आणि आरजेडी हे विषय असले तरी लोकांचा भर होता लालू प्रसाद यांच्या १९९५ ते २००५ या कार्यकाळावर. लोक काँग्रेस आणि भाजपवरही काही गांभीर्याने बोलले नाहीत. आपण प्रश्न त्यासंबंधी विचारला तरी लोक नितीश कुमारांवर येऊन थांबायचे.

जितक्या घटकांचा मी वर उल्लेख केलाय त्या सगळ्यांचा एकच सूर होता, आम्हाला पून्हा जंगलराज नको. आम्हाला नितीश सरकार पाहिजे, इथं एक महत्वाचा मुद्दा कुणीही आम्हाला भाजप किंवा काँग्रेस सरकार पाहिजे असं म्हणत नव्हतं तर फक्त नितीश सरकार पाहिजे इतकाच त्यांचा विषय होता. मग विद्यार्थी असो, महिला असो, रोजगार असो वा बेरोजगार आणि शिक्षित असो वा अडाणी, नारा एकच नितीश सरकार. याच कारण काय ? ते कारण म्हणजे एखादी खोटी घटनाही तुम्हाला शंभरवेळा सांगत राहील तर त्याच रूपानंतर खऱ्यात होत, आणि हेच होत आलंय आणि होतंय आरजेडीबद्दल. आता लालू प्रसाद यांचा काळ खरच गुंडाराज किंवा जंगलराज होता का? की फक्त प्रोपागंडा तयार केलाय ? आणि त्यावेळी ते होतं तर आजही आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं ? तर प्रत्यक्ष व्यवहारात लालूंचं जंगलराज किंवा गुंडाराज नसलं तरी लोकांच्या मनात ते आजही घर करून आहे आणि त्याच लोकांचं बोट कधीही लालटेन (कंदील) या चिन्हाकडे मतदान करण्यासाठी वळत नाही हे तिथलं सत्य आहे.

अनेकांशी या कार्यकाळाविषयी बोललो. त्यांतला एक जण म्हणाला, आता मी ॲपआधारित असली तरी माझी कार चालवतोय, आणि रात्री मला १२ किंवा १ वाजता एखाद भाडं भेटलं तर कुठल्यातरी एका टप्प्यावर आरजेडीचे कार्यकर्ते मला अडवणार, मला धमकावणार किंवा मला मारहाण करणार आणि माझी गाडी घेऊन निघून जाणार. हे नाही जमलं तर माझ्याकडील पैसे इतर सामान घेऊन जाणार… हे सगळं तो सांगत होता लालूंच्या कार्यकाळातील वास्तव.

आता त्यावेळी तुम्ही होतात का आणि ॲप आधारित कार सेवा होती का असं विचारलं तर म्हणाला, त्यावेळी अशा घटना घडायच्या आणि आता तेजस्वी यांचं सरकार आलं तर माझ्याबाबत पुन्हा असं घडेल असं मला वाटतंय. त्याला मी हेही विचारलं की तेजस्वी असं करेल असं कसं म्हणता तुम्ही? तर तो म्हणाला तेजस्वी यांच्याबद्दल काहीच तक्रार नाही. तो खूप चांगला माणूस आहे. पण तेजस्वी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या ज्या समर्थक लोकांना बळ मिळत ना, ते असं करतात ही खरी अडचण आहे.

हे सगळं ऐकल्यावर नितीश कुमार यांची बाजू समजून घेतली. अनेक लोकांशी बोललो. तेव्हा नितीश कुमार यांच्याविषयी बोलताना लोकांना त्यांचं कौतुक जास्त आहे, तक्रारी नाहीतच. लोकांना काय वाटते आहे पहा. तुम्हाला पुन्हा नितीश असावेत असं का वाटत यावर ते म्हणाले, ते उच्चशिक्षित आहेत, शांत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ते सोडता त्यांच्या कुटुंबातीलच नाही तर नात्यातीलही कुणी राजकारणात नाही. आणि त्या माणसाला कसलाच वैयक्तिक घर संसार नाही. बिहार राज्य हेच त्यांचे घर संसार आहे असं लोक सांगत होते. त्याउलट लालूंबद्दल विचारलं तर अनेकांना त्यांच्या सामाजिक लढ्याची आणि योगदानाची किंमत आहे. मात्र, आज २० ते २५ वर्षे इतिहासात जाऊन त्यांचं मोठं कुटुंब, यादव राजकारण, चारा घोटाळा जो १९९६ ला समोर आला. १९९६ मध्ये राज्याचे वित्त सचिव व्ही. एस. दुबे यांनी याविरुद्ध कठोर पावले उचलली आणि सर्व जिल्ह्यांमध्ये तपासणीचे आदेश दिले. पुढे लालूंनाही त्यामध्ये शिक्षा झाली. तेव्हापासून चारा चोर हा शब्द फक्त लालूंना नाही तर त्यांच्या कुटुंबाला चिकटला तो आजही हटलेला नाही.

दुसरा शब्द जंगलराज. १९९५ मध्ये लालू यांचं बिहारमध्ये सरकार आलं. पुढच्या काळात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न समोर आले. तत्कालीन भाजपचे नेते सुशील मोदी ते आता हयात नाहीत. त्यांनी यावरून मोठं रान उठवलं होत. त्याचवेळी पाटण्यातील विकासकामांचा मुद्दा उपस्थित करीत सामाजिक कार्यकर्ते कृष्ण सहाय यांनी सरकारविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायमूर्ती व्ही. पी. सिंग आणि न्यायमूर्ती धरमपाल सिन्हा यांच्या खंडपीठाने राज्यात जंगलराजपेक्षाही वाईट परिस्थिती आली असून, न्यायालयाच्या आदेशांचा आणि लोकहिताचा कोणताही विचार केला जात नाही. असं म्हटलं आणि तो एक शब्द लालू प्रसाद यांच्या कुटुंबाला चिकटला तोही आणखी हटलेला नाही.

या शब्दावरून त्यावेळीही भाजपची आणि इतर विरोधी मंडळी लालूंना जेरीस आणत होते. त्यावर पलटवार करताना लालू एकदा म्हणाले होते, राष्ट्रीय जनता दलाच्या सरकारमध्ये राज्यातील गरीब आणि शोषित वर्गातील लोक सन्मानाने जीवन जगत आहेत. विरोधकांना ही गोष्ट सहन होत नाही आणि त्यांना उच्चवर्णीयांचे राज्य हवे आहे. त्यामुळेच ते या शब्दाचा वापर करून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. जंगलराज संपवण्याचा अर्थ गरिबांचे राज्य संपवणे, असा आहे. लालूंचा हा युक्तिवाद भावनात्मक आणि सामाजिक पातळीवर प्रभावी ठरला आणि त्याचवर्षी झालेल्या निवडणुकीत ‘राजद’ हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला आणि राबडी देवी यांनी मुख्यमंत्री म्हणून २००५ पर्यंतचा कार्यकाळ पूर्ण केला.

मुद्दा इतकाच की भाजप, नितीशकुमार आणि तेजस्वी अशी निवडणूक आपल्याला दिसत असली तरी ही निवडणूक अशी ना मागे झाली ना आजही होते. ही निवडणूक आजही नितीश विरुद्ध लालू अशीच होते. तुम्ही कितीही शिक्षणाचे मुद्दे मांडा, रोजगाराचे मुद्दे मांडा, पलायन रोखण्याचे मुद्दे मांडा, कंपनी, कारखाने उभारायचे मुद्दे मांडा तरी या सगळ्या मुद्यांवर विरोधकांकडून म्हणजे भाजप -नितीश यांच्याकडून दोनच शब्द येणार, ते म्हणजे गुंडाराज आणि जंगलराज. संपलं!.. या शब्दांबद्दल लोकांच्या मनात जी भीती आहे ती कधीच कमी होऊ द्यायची नाही इतकी काळजी कायम नितीश आणि भाजप यांनी घेतलेली आहे. भलेही यांच्या काळात दुप्पट जंगलराज किंवा गुंडाराज असलं तरी मात्र कायम आरजेडीच्या आणि लालूंच्या कार्यकाळाची आठवण करून देत राहायची हे समांतर धोरण नितीश आणि भाजप यांनी गेली अनेक दिवसांपासून आखलेल आहे. आणि हीच एकमेव गोष्ट आरजेडी आणि प्रामुख्याने तेजस्वी यांना हरवत आहे.

तेजस्वी हे फार अल्पकाळ सत्तेत राहिलेले आहेत. ते सलग पाच वर्ष सत्तेत राहतील तेव्हा त्यांचा काळ लोकांच्या लक्षात येईल. मात्र, त्यांना ते यश गाठायचं असेल, मुख्यमंत्री व्हायचं असेल तर सर्वात मोठी लढाई म्हणजे गुंडाराज आणि जंगलराज या दोन शब्दांबद्दल लोकांच्या मनात जी भीती आहे ती दूर करण्यासाठी जंग जंग पछाडून काम करावं लागेल आणि विरोधकांनी या दोन शब्दांचा जो मोठा आधार घेऊन प्रोपोगंडा निर्माण केलाय तो मोडून काढावा लागेल, त्यांच्या ऐतिहासिक आरोपाला वर्तमानात ताकतीचा प्रतिवाद करून तो लोकांच्या मनात उतरवावा लागेल. हे सगळं अशक्य आहे.

इतक्या टोकाला ही लढाई गेलेली असतानाही संयमाने तेजस्वी यांनी यावर मात केली तर लालू विरुद्ध नितीश किंवा लालू विरुद्ध भाजप ही लढाई संपून नितीश विरुद्ध तेजस्वी किंवा भाजप विरुद्ध तेजस्वी अशी जेव्हा लढाई होईल तेव्हा तेजस्वी यांना निर्विवाद मोठं यश आलेलं असेल. ते आज का येत नाही कारण, आजपर्यंत भाजप विरुद्ध तेजस्वी किंवा नितीश विरुद्ध तेजस्वी ही लढाई झालीच नाही, ती कायम लालू सक्रिय असताना लालूंविरुद्ध आणि आज ते सक्रिय नसताना त्यांच्या कार्यकाळाविरुद्ध झालेली आहे बस इतकंच !

ganeshpokale95@gmail.com