थायलंडमधील राजे आपल्या पदासाठीच्या स्पर्धकांना पवित्र समजले जाणारे दुर्मीळ पांढरे हत्ती भेट देत असत. पांढर्या हत्तींना पोसावे तर लागत असे पण त्यांच्याकडून काम करवून मात्र घेता येत नसल्याने स्पर्धकांना दिवाळखोर करून त्यांचा काटा काढला जात असे. सार्वजनिक पैशांनी बांधल्या जाणार्या, काडीचाही फायदा नसणार्या आणि नागरिकांना संकटात ढकलणार्या ठाण्याच्या खर्चीक रिंग रेल्वे प्रकल्पासाठी दुसरा समर्पक शब्दप्रयोग सापडणे अशक्य!
ठाण्याची वाढती लोकसंख्या, प्रवासी आणि खासगी वाहनांची संख्या हे तीन मुद्दे ठाणे रिंग मेट्रोचे समर्थन करण्यासाठी शासनाच्या अहवालात दिले आहेत. त्यासाठी ठाणे महानगराच्या भविष्यातील लोकसंख्यावाढीचे आणि प्रवासी संख्येचे गणित मांडून मेट्रोची योजना अत्यावश्यक असल्याचे सांगितले जात आहे. परंतु दिल्लीतील वाहतूकतज्ज्ञ लोकांनी ठाण्याचा भूगोल आणि विभागातील लोकसंख्येच्या विभागणीचा अभ्यास केलेला दिसत नाही.
नैसर्गिक खाडी आणि रेल्वेमार्गामुळे ठाणे महानगराचे ठाणे पूर्व (१ सेक्टर), ठाणे पश्चिम (एकूण ७ सेक्टर) आणि खाडीच्या पलीकडे पूर्वेला (३ सेक्टर) असे तीन भाग झालेले आहेत. सोबतच्या तक्त्यामध्ये ठाणे शहराच्या या तीन विभागांतील भविष्यातील अंदाजित लोकसंख्या दिली आहे. त्यापैकी ठाणे पश्चिमेची लोकसंख्या दहा वर्षांनी, (रिंग रेल्वेचे बांधकाम पूर्ण होईल) तेव्हा २०३६ साली १९.४६ लाख, तर २० वर्षांनी २४.३४ लाख असेल असा अंदाज आहे. हे प्रमाण शहराच्या एकूण लोकसंख्येच्या ५२ टक्के असेल. अधिक तपशिलात जाऊन बघितले तर पश्चिमेकडील सेक्टर २ हा ठाणे रेल्वे स्टेशनच्या जवळचा विभाग अतिशय दाटीवाटीचा आणि गजबजलेला आहे. तिथून चालत किंवा शेअर रिक्षाने १०-२० मिनिटांत स्टेशन गाठता येते. बाजार, शाळा, व्यावसायिक कार्यालये, कॉलेज, दवाखाने, एसटीचे तीन स्टॅण्ड, सिडकोचा बस स्टॅण्ड या सर्वांची सोय असल्याने येथील मालमत्तांना मागणी आहे. त्यातच शासनाने वाढीव चटई क्षेत्राची भेट दिल्याने इमारतींच्या पुनर्विकासाचे पेव फुटले आहे. ठिकठिकाणी बंगले, चाळी, दोन-तीन मजली इमारती पाडून सात-आठ मजली इमारती बांधल्या गेल्या आहेत. मोठ्या गृहसंकुलांच्या जागी २०-२५ मजल्यांची बांधकामे सुरू आहेत. २००८ ते २०२५ या १७ वर्षांमध्ये एक हजार ४५२ इमारतींना महापालिकेने बांधकाम परवाने दिले, त्यापैकी ८२० इमारती केवळ नौपाडा आणि पांचपाखाडी या भागातल्या आहेत. २०११ साली या विभागाची लोकसंख्या सुमारे २.२५ लाख होती ती वाढून २०३६ साली चार लाख झाली. २०४६ मध्ये ती ४.५० लाख होईल असा अंदाज आहे. त्यामुळेच ठाणे-मुलुंड दरम्यान मध्य रेल्वेने नवीन स्टेशन बांधण्याचे काम सुरू केले गेले आहे. उपनगरी रेल्वेप्रमाणेच मुंबई ग्रीन मेट्रो लाइन ४ ची सेवाही शास्त्री रस्ता आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर सुरू होणार आहे. तेथील स्थानके मध्यवर्ती ठाण्यातील नागरिकांना दहा-पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहेत. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो लाइन ५ सेवाही लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे सेक्टर २ आणि पलीकडील वागळे इस्टेट, पोखरण आणि घोडबंदरवरील नागरिकांना ठाणे रिंग मेट्रोची गरजच नसेल. कोपरी आणि खाडीपलीकडील विभाग तर मेट्रोपासून दूर आहेत.
रिंग मेट्रोसाठी दुसरे कारण दिले जाते ते वाढत्या वाहनसंख्येचे. ठाण्याच्या जुन्या कोलशेत, बाळकूम, वागळे इस्टेट, जेके संकुलातील मोठे उद्योग नाहीसे झाले आहेत. त्यांच्या जागी बलदंड विकासकांनी २५-३० मजली इमारतींची, मोठ्या आकारांच्या श्रीमंती संकुलांची, व्यापारी, कार्यालयीन इमारतींची बांधकामे सुरू केली आहेत. त्या मालमत्तांकडे श्रीमंत ग्राहक आकर्षित करण्यासाठी आणि विकासकांच्या फायद्यासाठी शासनाने रिंग मेट्रोचे बांधकाम तातडीने सुरू केले असावे अशी शंका येते.

त्याआधीची हिरानंदानी इस्टेट आणि पोखरण रस्त्यावरील उच्च तसेच मध्यम वर्गीयांची संकुले पूर्ण झालेली आहेत. त्यांच्या मोटारींसाठी उड्डाण पुलांची वेडीवाकडी कडबोळी बांधलेली आहेत. तरीही खासगी आणि जड वाहनांमुळे, बसेसमुळे पूर्व द्रुतगती मार्ग, घोडबंदर आणि भिवंडीकडे जाणारे रस्ते सतत कोंडलेले आणि अपघातग्रस्त असतात. त्यावर उपाय म्हणून तातडीने बसेसची सेवा सुरू करणे आणि राखीव बस मार्गिकांचा उपाय करता येऊ शकतो. त्याऐवजी खर्चीक आणि वेळखाऊ उड्डाणपूल, मुंबई बंदराला समांतर असणारा मुक्त मार्ग ठाण्यातील साकेत गृहसंकुलाशी उन्नत मार्गाने जोडला जात आहे. ठाणे- बोरिवलीसाठी येऊरच्या डोंगराखालून बोगदा खणला जात आहे. हे सर्व खासगी वाहनांना प्रोत्साहन देणारे प्रकल्प आहेत. शिवाय अवजड वाहनांसाठी सहा पदरी कोस्टलरोड बांधला जात आहे. ठाणे वाहतुकीच्या कोंडीवर उपाय म्हणून नव्या नव्या बांधकाम योजनांच्या घोषणा राज्य सरकार सातत्याने करते आहे. एका अंदाजानुसार आज ६० हजार कोटी रुपयांची शासकीय बांधकामे आणि खासगी इमारतींची बांधकामे सुरू असल्याने ठाणे बांधकामग्रस्त झाले आहे.

जोडीला प्रत्येक नव्या इमारतीमध्ये, घरांच्या संख्येनुसार किमान संख्येचे वाहनतळ बांधणे अनिवार्य करून इमारतींचे मजले आणि खर्चही वाढवले आहेत. ठाणे महापालिकेच्या बस सेवेला आवश्यक गुंतवणूक करायला मदत न देता राज्य सरकार अवास्तव खर्चाचे प्रकल्प ठाणेकरांच्या माथी मारण्याच्या धोरणामुळे ठाण्यातील वाहनसंख्या कमी न होता वाढतच राहणार आहे. त्यामुळे रिंग मेट्रो आल्यावर खासगी वाहनांना वेसण बसेल आणि नागरिक मेट्रोकडे वळतील ही अपेक्षाच निरर्थक आहे.
ठाणे रिंग मेट्रोबाबत लक्षात घेण्याचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यासाठी करावे लागणारे प्रचंड खर्चीक, वेळखाऊ बांधकाम. हा वळणावळणाचा लंबगोलाकार मार्ग असल्याने त्यात एकूण ८२ डावी-उजवी वळणे आहेत. याशिवाय मुंबई मेट्रोच्या ४ आणि ५ उन्नत मार्गांवरून, खाडी पुलावरून ठाणे रिंग मेट्रोला तीन-चार ठिकाणी चढाव बांधून उड्डाण करावे लागणार आहे. मॉडेला मिलजवळ असे उड्डाण करून मेट्रो नंतर नव्या ठाणे -मुलुंड रेल्वे स्टेशनकडे उतरत जमिनीखाली भुयारी होणार आहे. त्यासाठी मोठा खड्डा करून कट-कव्हर पद्धतीने भुयारी स्टेशन बांधले जाईल. त्यामधून २.५ कि.मी.लांबीचा भुयारी मेट्रो मार्ग खणणारी यंत्रे कार्यान्वित होतील. रेल्वेला समांतर भुयारी मार्ग नौपाडा भागातील इमारतींच्या पाया खालून जाणार आहे. दुसर्या टोकाला ठाणे स्टेशनच्या बाजूला भुयारी मेट्रो स्टेशन असेल. त्यासाठी सध्याचे एसटी स्थानक हटवावे लागेल. नंतर हा मार्ग बेडेकर कॉलेजच्या मागे जमिनीवर येऊन खांबांवर चढेल. त्यामुळे ठाणे रिंग मेट्रो प्रवास वळणावळणाचा, रोलर-कोस्टरप्रमाणे असेल!
इतके नियोजन करून आज होणारी रस्त्यावरील कोंडी, प्रवासी गर्दी कमी करण्यासाठी रिंग मेट्रोचा काडीचाही उपयोग नाही. पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याच्या इराद्याने बांधकाम सुरू झाले असले तरी त्यासाठी दहा वर्षे लागली तर आश्चर्य वाटायला नको. जागोजागी उखडलेले रस्ते, खोदलेले खड्डे आणि प्रकल्पाच्या बांधकामाच्या यंत्रांची दहशत आणि इतर त्रास पश्चिम ठाण्यातील अनेक विभागातील नागरिकांना आणि प्रवाशांना ५ ते १० वर्षे सहन करावे लागणार आहेत. त्यासाठी शहरातील हजारो वृक्षांची आणि खाडी किनार्यावरील तिवरांच्या झाडांची कत्तल होणार आहे. अनेक वस्त्यांमधील रहिवाशांची घरे आणि उद्योग नष्ट करावे लागणार आहेत. अपघाताच्या आणि पर्यावरणाच्या समस्या दूर न होता अधिकच वाढणार आहेत. वर्तमानातील वाहतूक समस्यांवर कोणतेही पर्याय न तपासता अंतर्गत गोलाकार मेट्रोचा शाप ठाणेकरांच्या माथी मारला जात आहे. सामान्य नागरिकांनाच नाही तर महापालिकेतील नगरसेवकांनाही विश्वासात न घेता, माहिती न देता, चर्चा न करता, पर्यावरण अहवाल तयारही न करता बांधकाम सुरू केले गेले आहे.
अवाजवी सांख्यिकी अंदाजावर बेतलेली, अंतर्गत वाहतुकीसाठी अजिबात आवश्यक नसलेली, १२ हजार कोटी रुपये खर्चाची रिंग मेट्रो म्हणजे अवाढव्य बांधकामाचा पांढरा हत्ती आहे. त्यातच अलीकडे वाहतूक मंत्र्यांनी ठाण्यामध्ये पॉड टॅक्सी प्रकल्प आणण्याची घोषणा केली आहे. मोठ्या पांढर्या हत्तीच्या पिल्लावळीचा प्रकल्पही बांधकांसाठी निमित्तच असेल. पांढर्या हत्तीच्या कुटुंबाची, ठाणेकरांना आणि शहराला दिवाळखोर करणारी ही भेट नाकारण्याचे धैर्य नगरसेवकांनी आणि नागरिकांनी दाखवणे आवश्यक आहे.
नगरनियोजन अभ्यासक
sulakshana.mahajan@gmail.com
