संजय केळकर
‘क्लस्टर’खेरीज पुनर्विकास अशक्य करणार्‍या अटी ठाण्यासारख्या शहरात घालायच्या; पण सामूहिक क्षेत्रफळाच्या अटीत न बसणार्‍या हाउसिंग सोसायट्यांना यातून वगळून- त्यांच्या स्वयं-पुनर्विकासाला सवलती न देता उलट एक-दीड कोटी रुपयांनी त्यांचे नुकसान करायचे, हे राज्याचे धोरण नाही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री असतानापासून ‘स्वयं-पुनर्विकासा’च्या केलेल्या पाठराखणीशीही ते सुसंगत नाही. त्यामुळे आता तरी नियमावर बोट ठेवून अडवणूक करण्यापेक्षा, नियमांत ठोस बदल हवा… महाराष्ट्र राज्याचे लघुरूप ठाणे आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (एमएमआरडीए) ठाणे शहर आणि जिल्ह्याचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. ठाणे महानगरीय तसेच शहरी, निमशहरी आणि ग्रामीण असे संमिश्र आहे. ठाण्यातील बहुतेक सर्व नागरी विषय, प्रश्न हे राज्याचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. यातील कळीचा मुद्दा पुनर्विकास आणि स्वयं-पुनर्विकास हा आहे.

ठाणे शहर आणि जिल्ह्यातील पुनर्विकास आणि स्वयं-पुनर्विकास लालफितीच्या कारभारातून सुटल्यास राज्यातील पुनर्विकास आणि स्वयं-पुनर्विकास यांची वाट विस्तारेल. ठाणे शहर वेगाने विस्तारत आहे. मेट्रो, रिंग रोड, कोस्टल रोड आणि इतर भव्य पायाभूत प्रकल्पांची कामे प्रगतिपथावर आहेत. शहराच्या भविष्यासाठी मोठे नियोजन केले जात असतानाच, दुसर्‍या बाजूला ठाण्यातील हजारो जुन्या आणि धोकादायक इमारती व वसाहती आजही पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणेकरांसमोर एक थेट आणि कळीचा प्रश्न निर्माण होतो. शहराचा बाह्य विकास इतक्या वेगाने होत असताना, जुन्या ठाण्याचा पुनर्विकास आणि स्वयं-पुनर्विकास अपेक्षित वेगाने का होत नाही? हा विकास नेमका कोण आणि कसा रोखत आहे? हा प्रश्न केवळ एखाद्या शहरातल्या सिमेंट-काँक्रीटच्या नव्या इमारतींचा नाही; तर तो नागरिकांच्या सुरक्षिततेचा, हक्काच्या मालमत्तेचा, मूलभूत नागरी सुविधांचा आणि प्रशासकीय उत्तरदायित्वाचा प्रश्न आहे.

‘मिनी क्लस्टर’चा पर्यायही हवा 

ठाणे महापालिकेने जुन्या इमारतींचा एकत्रित कायापालट करण्यासाठी क्लस्टर (समूह विकास) ही योजना पुढे आणली आहे. महापालिकेने एकंदर पन्नास नागरी पुनरुत्थान आराखडे (अर्बन रिन्यूअल प्लॅन- यूआरपी) तयार केले असून, सप्टेंबर २०२६ पर्यंत त्यापैकी १२ आराखड्यांना मान्यता मिळाली आहे. यामध्ये लोकमान्यनगर, कोपरी, किसननगर, राबोडी, चरई आणि ठाणे स्थानकालगतच्या परिसराचा समावेश आहे. 

परंतु ठाण्यातील प्रत्येक इमारतीसाठी क्लस्टर हा एकमेव उपाय ठरू शकत नाही. जुन्या ठाण्यात मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध नसल्याने, क्लस्टरसाठी आवश्यक असलेल्या क्षेत्रफळाची अट शिथिल करून ‘मिनी क्लस्टर’ संकल्पनेला परवानगी देणे गरजेचे आहे. यामुळे अनेक छोट्या सोसायट्या एकत्र येऊन स्वयं-पुनर्विकासाच्या माध्यमातून क्लस्टर योजनेचा लाभ घेऊ शकतील.

विद्यमान सरकारचे धोरण

स्वयं-पुनर्विकासाचे महत्त्व ओळखून देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमपासूनच या संकल्पनेला अतिशय भक्कम पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या भक्कम पाठिंब्यामुळेच आणि दूरदृष्टीमुळे १३ सप्टेंबर २०१९ रोजी स्वयं-पुनर्विकासाचा ऐतिहासिक शासन निर्णय (जीआर) लागू झाला. यामध्ये सोसायट्यांना १० टक्के अतिरिक्त मोफत एफएसआय (फ्लोअर स्पेस इंडेक्स), ‘टीडीआर’च्या (ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राइट्स) प्रीमियममध्ये ५० टक्के सवलत आणि परवानग्यांसाठी ‘एक खिडकी योजना’ असे अत्यंत दिलासादायक निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले. मात्र, प्रशासनातील काही आडमुठ्या अधिकार्‍यांमुळे आणि लालफीतशाहीमुळे या कल्याणकारी निर्णयाला केराची टोपली दाखवली जात आहे. नगरविकास विभागाचे अधिकारी केवळ तांत्रिक कारणे पुढे करत आहेत की, २०१९ च्या या ‘जीआर’चा ‘यूडीसीपीआर’मध्ये अधिकृतपणे समावेश झालेला नाही. वास्तविक ‘यूडीसीपीआर’ म्हणजे ‘युनिफाइड डेव्हलपमेंट कंट्रोल ॲण्ड प्रमोशन रेग्युलेशन्स’ अर्थात ‘एकत्रीकृत विकास नियंत्रण वा प्रोत्साहन नियमावली’च्या व्यापक हेतूचा विचार केल्यास स्वयं-पुनर्विकासाची या प्रकारे अडवणूक करणे योग्य ठरेल का? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेतृत्वाने स्वयं-पुनर्विकासाला भक्कम बळ देऊनही, नोकरशाहीच्या उदासीनतेमुळे हा शासन निर्णय अद्याप फायलींमध्ये अडकून पडला आहे. बिल्डरांच्या दावणीला न बांधता स्वत:च्या इमारतीचा स्वत: विकास करणे म्हणजेच ‘स्वयं-पुनर्विकास’. हा ठाण्यातील मध्यमवर्गीय सोसायट्यांसाठी सर्वाधिक सुरक्षित आणि स्वाभिमानाचा मार्ग आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी स्वयं-पुनर्विकासाचे महत्त्व ओळखून या संकल्पनेला अतिशय भक्कम पाठिंबा दिला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि पुढाकारामुळे १३ सप्टेंबर २०१९ रोजी स्वयं-पुनर्विकासाचा ऐतिहासिक शासन निर्णय (जीआर) लागू झाला. तेव्हापासून आजवर, १० टक्के अतिरिक्त मोफत प्रोत्साहनपर एफएसआय, टीडीआर प्रीमियममध्ये ५० टक्क्यांची भरघोस सवलत आणि परवानग्यांसाठी सहा महिन्यांची ‘एक खिडकी योजना’ आणि व्याज अनुदान स्वयं-पुनर्विकासासाठी लागू आहे. या क्रांतिकारी धोरणाचे आणि निर्णयांचे जितके स्वागत व कौतुक करावे तितके थोडेच आहे. परंतु राजकीय इच्छाशक्ती भक्कम असतानाही, दुर्दैवाने प्रशासकीय पातळीवर या धोरणाला केराची टोपली दाखवली जात आहे. विशेषत: नगरविकास विभाग आणि विशेषत: ठाण्यात स्थानिक महापालिकेतील नोकरशाहीने लालफीतशाहीची पकड अधिक घट्ट आवळली आहे.

अधिकार्‍यांचा तांत्रिक युक्तिवाद कागदोपत्री बिनचूक आहे. ‘यूडीसीपीआर’ २०२० पासून मंजूर झाला, त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या. क्लस्टर स्वयं-पुनर्विकास आणि ‘मिनी-क्लस्टर’ला या सवलती लागू करणे यांसाठी आवश्यक असणारी किरकोळ सुधारणा अधिसूचना (स्टॅच्युटरी नोटीस ऑफ मॉडिफिकेशन) वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवून नगरविकास खात्याच्या उदासीनतेमुळे स्वयं-पुनर्विकास रोखला जात आहे.

कोट्यवधींचा अवाजवी भुर्दंड

नोकरशाहीच्या या तांत्रिक पेचामुळे स्वयं-पुनर्विकास करू इच्छिणार्‍या सोसायट्यांना नाहक कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. उदाहरणार्थ, ठाणे-पाचपाखाडी भागातील गुरुकुल सहकारी गृहनिर्माण संस्थेवर २.१७ कोटी रुपयांपेक्षा जास्त अतिरिक्त भार, तर ठाणे विकास स.गृ.संस्था या सोसायटीचे २.१४ कोटी रुपये अतिरिक्त नुकसान; कळवा भागातील जीवनग्राम स.गृ.संस्थेचे २.७५ कोटी रुपये नुकसान; वागळे इस्टेट भागातील प्रसाद सहकारी गृहनिर्माण संस्थेला १.१६ कोटी रुपयांचा भुर्दंड; ठाणे पूर्व भागातील साई धाम आणि गंगा भास्कर सहकारी गृहनिर्माण संस्था या दोन्ही सोसायट्यांचे प्रत्येकी १ कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान!

उदाहरणादाखल येथे मांडलेल्या, या सहा सोसायट्यांमधील २४० मध्यमवर्गीय कुटुंबांना नोकरशाहीच्या अडेलतट्टूपणामुळे १०.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त अवाजवी भुर्दंड सहन करावा लागत आहे. या प्रशासकीय अडथळ्यांविरुद्ध विधिमंडळात विशेष लक्षवेधी सूचना आणून दोषी अधिकार्‍यांना जाब विचारला जाईल. तसेच नगरविकास विभागाने एमआरटीपी कायद्याच्या (महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६) कलम १५४ अंतर्गत सर्व महापालिकांना तात्काळ निर्देश द्यावेत, अशी ठाम मागणी आहे. यासोबतच ‘हाऊसिंग सोसायटीज असोसिएशन’मार्फत उच्च न्यायालयात रिट याचिकाही दाखल केली जात आहे. असे असतानाही, पाचपाखाडी येथील गुरुकुल सोसायटीने स्वयं-पुनर्विकासाचा लढा पुढे नेला असून, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेला त्यांचा भूमिपूजन सोहळा हा लालफितीविरुद्ध नागरिकांच्या विजयाचे प्रतीक ठरला आहे.

स्वयं-पुनर्विकासाचे लाभ का नाकारता?

अनेक बिल्डर आर्थिक क्षमता नसताना प्रकल्प हाती घेतात आणि ते अधांतरी सोडतात (ठाण्यातील एक उदाहरण म्हणजे, चरईतील सहजीवन सोसायटीचा २०१९ पासून रखडलेला प्रकल्प). त्यामुळे विकासकांवर विसंबून राहणे धोक्याचे ठरत आहे. याउलट, स्वयं-पुनर्विकासामुळे संस्थांना जमिनीची १०० टक्के मालकी, जास्तीत जास्त चटईक्षेत्र (कार्पेट एरिया) आणि विक्रीयोग्य सदनिकांमधून मिळणारा नफा मूळ सभासदांना मिळतो. तसेच ठाण्यात रिंग मेट्रो आणि कोस्टल रोडचे काम सुरू असताना (उदा. वसंत विहार, नाथ पै रोड परिसर), चुकीच्या नियोजनामुळे वृक्षतोड व रहिवाशांच्या समस्या वाढत आहेत. क्लस्टर किंवा खासगी पुनर्विकास असो, उंच इमारती उभ्या राहिल्यानंतर त्यांना लागणारा पाणीपुरवठा, ड्रेनेज, पार्किंग आणि रस्ते रुंदीकरण यावर ठोस धोरण आखणे गरजेचे आहे.

ठाणे शहराच्या संदर्भात, पण महाराष्ट्राच्या भल्यासाठी तातडीचा असा हा प्रश्न आहे हे ओळखून राज्याच्या नगरविकास विभागाने तातडीने परिपत्रक काढून २०१९ च्या स्वयं-पुनर्विकास धोरणातील ५० टक्के टीडीआर सवलत व १० टक्के एफएसआयचा समावेश ‘यूडीसीपीआर’मध्ये करावा. सोसायट्यांचे स्वयं-पुनर्विकास प्रस्ताव सहा महिन्यांच्या आत मंजूर करणारी डिजिटल आणि पारदर्शक प्रणाली कार्यान्वित करावी. महत्त्वाचे म्हणजे, ‘मिनी क्लस्टर’ या संकल्पनेला मान्यता देऊन (म्हणजेच क्लस्टरसाठी किमान १० हजार चौरस मीटरच्या क्षेत्रफळाची) अट शिथिल करून छोट्या सोसायट्यांना एकत्र येऊन स्वयं-पुनर्विकासाची संधी द्यावी.

ठाण्याचा अथवा कोणत्याही शहराचा विकास म्हणजे केवळ रिंग रोड किंवा उड्डाणपूल बांधणे नव्हे; तर ज्या घरात सामान्य ठाणेकर आयुष्यभराची पुंजी लावून राहतो, ते घर सुरक्षित करणे हाच खरा शहरविकास आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या धोरणाची नगरविकास खात्याने प्रामाणिक अंमलबजावणी केल्यास, क्लस्टर आणि स्वयं-पुनर्विकासामार्फत सामान्य ठाणेकराचे हक्काच्या घराचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल!  आमदार, ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ