मनीषा नित्सुरे

इंटरनेट सर्वासाठी सुरक्षित असावे आणि ते जबाबदारीने वापरले जायला हवे याविषयी फारशी जागरूकता नसताना १० वर्षांपूर्वी सोनाली यांनी आपल्या ‘अहान फाऊंडेशन’च्या अंतर्गत ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ची निर्मिती केली. त्याअंतर्गत आत्तापर्यंत पंधरा लाख मुलांना, पालकांना ‘सायबर सुरक्षितता’विषयी जागरूक करण्यात आले असून ऑनलाइन फसवणुकीला बळी ठरलेल्या शेकडो मुलांना-स्त्रियांना प्रत्यक्ष मदतीचा हात दिलेला आहे. त्यांच्याच प्रयत्नाने देशातील पहिले ‘सायबर वेलनेस केंद्र’ गोव्यात सुरू झाले असून भारताला सायबर सुरक्षित बनवण्याचे ध्येयवेड घेतलेल्या सोनाली पाटणकर आहेत यंदाच्या लोकसत्ता दुर्गा.

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
Three major announcements for RBI customers investors
रिझर्व्ह बँकेच्या ग्राहक, गुंतवणूकदारांसाठी तीन प्रमुख घोषणा
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

सायबर स्पेसमध्ये मुले आणि स्त्रिया, विशेषत: तरुणी फसवणुकीच्या जाळय़ात अडकत असल्याच्या बातम्या आपण रोजच वाचत असतो. कुठे गेमिंग प्लॅटफॉर्म किंवा सोशल मीडियाद्वारे अल्पवयीन मुलांच्या बाबतीत घडणाऱ्या घटना तर कुठे मुलींच्या फोटोंचे मॉर्फिग करून, अयोग्य लैंगिक कंटेंट टाकून त्यांना बदनाम करून ऑनलाइन फसवणुकीच्या जाळय़ात अडकवल्याची बातमी! सायबर गुन्ह्यांची शिकार ठरलेल्यांना मदतीचा हात देणारी महाराष्ट्रातील अग्रणी संस्था म्हणजे ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’आणि त्याच्या प्रमुख आहेत सोनाली पाटणकर!

महाविद्यालयात शिकणाऱ्या एका मुलीची तिच्याच मित्राने सोशल मीडियावर केलेली भयंकर बदनामी, विवाहेच्छू मुलीची फेसबुकवरून झालेली घोर फसवणूक, गेमिंगच्या नादात मुलाने आई-वडिलांच्या नकळत गमावलेली रक्कम, कुठे इंटरनेटच्या व्यसनाच्या आहारी गेलेली पौगंडावस्थेतील अस्वस्थ मुले तर कुठे मैत्रिणीच्या फोटोंचे मॉर्फिग करून ते ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर टाकणारा मित्र, अयोग्य लैंगिक कंटेंट, वाईट भाषा वापरून मुलींचा केला जाणारा मानसिक छळ. अशी एक ना अनेक प्रकरणे आणि प्रचंड मानसिक त्रास! अशा प्रकरणांमध्ये बहुतेक वेळा मुलींनाच दोष दिला जातो आणि बाहेर वाच्यता नको म्हणून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केला जातो. इंटरनेटवरील दुर्लक्षित बेजबाबदार वर्तन आणि सायबर सुरक्षेबद्दल असलेले अज्ञान यामुळे या घटना घडतात हे खरे असले तरी अशा दुर्दैवी प्रसंगात कुठे जायचे, कुणाला सांगायचे, कुठे तक्रार करायची, आपली तक्रार दाखल होईल का, सोशल मीडियावर झालेली बदनामी पुसता येईल का, यातून बाहेर कसे पडायचे – असे एक ना अनेक प्रश्न पीडित व्यक्तीला आणि त्या कुटुंबाला किती भेडसावत असतील याची आपण केवळ कल्पना करू शकतो. पण हे प्रश्न सोडवायला हवेत, पीडितांना मदत मिळायला हवी, त्यांना सगळय़ात आधी मानसिक आधार मिळायला हवा आणि त्याही पलीकडे जाऊन अशा घटना घडूच नयेत यासाठी ‘सायबर सुरक्षा-जागरूकता’ हा विषय समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवायला हवा, असा विचार दहा-बारा वर्षांपूर्वी केला तो ‘अहान फाऊंडेशन’च्या अध्यक्षा सोनाली पाटणकर यांनी. गेल्या दहा वर्षांत त्यांनी ऑनलाइन फसवणुकीला बळी ठरलेल्या शेकडो मुलांना-स्त्रियांना मदतीचा हात दिलेला आहे.

सोनाली पाटणकर ‘अहान फाऊंडेशन’च्या अध्यक्षा आहेत. २०१२ मध्ये नोंदणीकृत झालेल्या या संस्थेने ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ची निर्मिती केली. मुलांच्या तसेच प्रौढांच्या ऑनलाइन हक्कांच्या संरक्षणासाठी ‘सायबर वेलनेस’ कार्यक्रमाची निर्मिती करणारा आणि जबाबदार ऑनलाइन वर्तनाला प्रोत्साहन देणारा त्यांचा ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ हा राज्यातील पहिला आणि एकमेव ना-नफा उपक्रम आहे.

सोनाली यांनी त्यांच्या मोजक्या सहकाऱ्यांच्या साथीने हे काम सुरू केले तेव्हा, ‘मुलांची आणि स्त्रियांची सायबर सिक्युरिटी’ हा विषयच नवीन होता. सोनाली आणि त्यांच्या टीमने या उपक्रमातून आत्तापर्यंत जवळपास पंधरा लाख मुलांना, पालकांना ‘सायबर सुरक्षिता’ या विषयात जागरूक केले आहे. शालेय मुला-मुलींमध्ये इंटरनेटचे वाढणारे व्यसन आणि त्यातून उद्भवणाऱ्या पौगंडावस्थेतील मुलांच्या समस्या यावरही त्या काम करत असून एकेका शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन त्या हा विषय मांडताहेत. इंटरनेटची व्यसनाधीनता, इंटरनेटवरून होणाऱ्या छळवणुकीच्या अनेक तक्रारी त्यांच्या संस्थेकडे रोज येत असतात. गुन्हा घडला असेल तिथे तक्रारदारांना मार्गदर्शन करणे, त्यांना पोलीस यंत्रणेपर्यंत पोहोचण्यास मदत, सहकार्य करणे हे काम अविरतपणे चालू आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर आता मध्य प्रदेश आणि गोवा येथेही त्यांचे काम चालू झाले आहे.

सोनाली पाटणकर यांनी ‘निर्मला निकेतन महाविद्यालया’तून सोशलवर्कची पदवी आणि एसएनडीटी महिला विद्यापीठातून ‘स्कूल कॉऊन्सेलिंग’चा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. त्यांचा या क्षेत्रातील व्यावसायिक अनुभव २५ वर्षांपेक्षा अधिक असून त्यांनी ‘चाइल्ड राइट्स अ‍ॅण्ड यू (CRY), ‘पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स अ‍ॅण्ड ट्रस्ट’(PCGT),  IL&FS एज्युकेशन, ‘सलाम बॉम्बे फाऊंडेशन’ आणि मुंबई पोलीस यांसारख्या प्रख्यात संस्थांसोबत अनेक वर्षे काम केले आहे. नुकतीच, सोनाली यांची ‘राष्ट्रीय महिला आयोगा’च्या सल्लागार मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्थापन केलेल्या स्त्रियांसाठीच्या ऑनलाइन सुरक्षा समितीच्या माननीय सदस्या म्हणूनही त्या कार्यरत आहेत.  SCPCR  आणि  NCPCR द्वारे ऑनलाइन सुरक्षा प्रशिक्षणक्रमातील त्या नामांकित वक्त्या आहेत. याखेरीज सायबर सेफ्टीवरील राष्ट्रीय आघाडी ‘आय सेफ’ (iSafe) च्या त्या कोअर कमिटी सदस्य आहेत. सोनाली  MSCERT शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक आणि सामग्रीच्या निर्मात्यादेखील आहेत. ‘इंटरनेट व्यसन निवारण’ या विषयातील त्यांच्या कार्यासाठी व्यसनमुक्ती निवारणाच्या राष्ट्रीय वैज्ञानिक समितीच्या सन्माननीय सदस्या म्हणूनही त्यांची निवड झाली आहे. सोनाली यांना दोन वर्षे  Unltd India द्वारे प्रशिक्षण मिळाले असून  Unltd India Mentorship Program अंतर्गत नेतृत्व कौशल्यासाठी त्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.

   इंटरनेटवरून होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये आपल्याला आधार देणारी एक संस्था आज समर्थपणे आपल्या पाठीशी उभी आहे, हा विश्वास आज संस्थेविषयी निर्माण झाला आहे. केवळ हेल्पलाइन किंवा ऑनलाइन मदत देऊन चालणार नाही तर जेव्हा असे गुन्हे घडतात तेव्हा पीडितांना प्रत्यक्ष आधार देण्यासाठी, गुन्ह्याला वाचा फोडण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ मिळावं या उद्देशाने सोनाली आणि त्यांच्या टीमने ‘सायबर वेलनेस सेंटर’ची संकल्पना आखली आणि ती प्रत्यक्षात आणली. गोव्यात देशातील पहिले ‘सायबर वेलनेस केंद्र’ सुरू झाले असून इतर ठिकाणीही लवकरच सुरू होणार आहे. याशिवाय त्यांच्या संस्थेतर्फे दरवर्षी ‘सायबर सायकॉलॉजी परिषद’ घेतली जाते. प्रशिक्षण, संशोधन आणि सायबर सुरक्षित हक्कांसाठी लढा देणे ही या प्रकल्पाची त्रिसूत्री आहे. यासाठी त्यांच्या संस्थेमार्फत हेल्पलाइन आणि ‘सायबर वेलनेस केंद्र’ उभारली गेली. भारताला सायबर सुरक्षित बनवणे या ध्येयाने सोनाली पाटणकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबरीने हे काम सुरू केले, जे आता देशपातळीवर विस्तारले आहे.

  इंटरनेट आता आपल्या जगण्याचाच एक भाग बनले आहे पण ते सुरक्षित असावे, ते जबाबदारीने वापरले जावे या एका वेगळय़ाच आणि अतिशय आव्हानात्मक अशा ध्येयाने काम करणाऱ्या सोनाली पाटणकर यांच्या कामाला खूप शुभेच्छा!

manisha.nitsure@gmail.com