नितीन बाळासाहेब घाटगे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सोसायटी ऑफ कम्युनिटी हेल्थ ओरिएंटेड ऑपरेशनल लिंक्स’ अर्थात ‘स्कूल’मध्ये काम करण्याची संधी मिळाली तेव्हा एवढेच माहीत होते की वृद्धांसोबत काम करायचे आहे. वृद्धांना कोणी ‘पिकलेले पान’ म्हणते, कोणी म्हणते, ‘त्यांचे आयुष्य जगून झाले आहे, आता आणखी जगून ते काय करणार?’, ‘त्यांच्या अडचणी तरी काय असणार? खाऊनपिऊन सुखी आहेत, त्यांना दोन वेळचे जेवण मिळाले तरी पुरेसे आहे.’ परंतु वृद्धांच्या संपर्कात येऊ लागल्यावर त्यांच्या अडचणी, त्यांच्यापुढची आव्हाने समजू लागली.

साधारण ६०-६५ वर्षे वयापुढचा काळ हा वृद्धावस्था म्हणून गणला जातो. शरीराची कार्यक्षमता आणि इजा किंवा झीज भरून काढण्याची क्षमता कमी होऊ लागते तेव्हा जरण सुरू होते आणि वाढत्या वयाची लक्षणे दिसू लागतात. भारतातील वाढत्या लोकसंख्येनुसार वृद्धांची संख्या लक्षात घेता २००१ साली सुमारे १०२ कोटी ८८ लाख लोकसंख्येपैकी ७ कोटी १० लाख व्यक्ती वृद्धावस्थेत होत्या, तर २०५० सालाच्या सुमारास हीच संख्या ३२ कोटी, म्हणजे त्या वेळच्या अपेक्षित लोकसंख्येच्या (१५३ कोटी) जवळजवळ २१ टक्के असेल. कुटुंबनियोजन, आरोग्यविषयक सुधारणा आणि दीर्घकालीन रोगांवर नियंत्रण यामुळे अपेक्षित आयुर्मान जसे उंचावेल, तसे एकूण वृद्धांचे प्रमाण वाढतच जाईल.

वृद्धावस्थेकडे सामाजिकदृष्ट्या तसेच वैद्यकीयदृष्ट्या निराळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. वयाची साठी ओलांडली की, आरोग्याचे प्रश्न तुलनेने कमी होतात, पण निवृत्तीनंतर कौटुंबिक, आर्थिक प्रश्न उभे ठाकतात. साधारण सत्तरीपुढील वयात उमेद कमी होऊ लागते, शारीरिक प्रश्न वाढू लागतात, व्याधी वाढून कदाचित संपूर्ण परावलंबित्व आलेले असू शकते. या सर्व वयोगटांमध्ये स्वभावातील बदल, एकटेपण व त्यामुळे मानसिक आणि भावनिक प्रश्नही डोके वर काढू लागतात.

ज्येष्ठांसोबत काम सुरू केले तेव्हा या उपक्रमाचे नाव काय ठेवावे, यावर बरीच चर्चा झाली. त्यांच्यामध्ये काम करताना लक्षात आले की, वृद्धांना आमच्यात एक मित्र सापडतो. तिथून ‘वृद्धमित्र’ ही संकल्पना पुढे आली. पुण्यातील दोन वस्त्यांपासून वृद्धमित्रांचे काम सुरू झाले. त्यानंतर पुणे महानगरपालिकेसमोर, या प्रकल्पासंदर्भातील सादरीकरण करण्यात आले. महानगरपालिकेने महत्त्वाची भूमिका बजावली. कोविडकाळात वृद्धमित्रांचे काम पुण्यातील इतर वस्त्यांमध्येही सुरू करण्यासंदर्भात महानगरपालिकेने पत्र काढले आणि परवानगी दिली. दळवी रुग्णालय आणि सोनवणे रुग्णालयात ‘जेरियाट्रिक युनिट’ सुरू करण्यासाठी जागा दिली. आता या दोन्ही रुग्णालयांत वृद्धांना विनामूल्य फिजिओथेरपी दिली जाते. समाजाकडून, कुटुंबाकडून दुर्लक्षित वृद्धांच्या शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक गरजा ओळखून त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारणे, हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. काही वृद्ध घरी एकटेच राहतात. त्यांच्याशी बोलायला कोणीच नसते. त्यांना बाहेर फिरून यावेसे वाटले, तरी सोबत कोणीही नसल्यामुळे ते एकटे बाहेर पडू शकत नाहीत. अशा परिस्थितीत वृद्धमित्र अपेक्षित सर्व मदत करतात, आधार देतात. त्यांना एकटेपणा वाटणार नाही याची काळजी घेतात. बाहेर फिरवून आणणे, त्यांच्याशी त्यांना आवडेल अशा विषयावर गप्पा मारणे असे शक्य ते सर्व प्रयत्न करतात.

वृद्धमित्र वैद्यकीय सेवा आणि सुविधा पुरवणाऱ्या सामाजिक संस्थांशी, वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालये तसेच विविध देणगीदारांशी संपर्कात असतात. याव्यतिरिक्त विविध शासकीय विभागांशी समन्वयाने काम करून विविध योजनांचा लाभ मिळवून देतात. बहुतांश वृद्ध व्यक्तींकडे उत्पन्नाचे साधन नसते. निवृत्तिवेतनही मिळत नसल्याने, तसेच आरोग्य विमा नसल्याने शासकीय योजनांचा त्यांना आधार मिळू शकतो. वृद्धांना काठी, वॉकर, डायपर, श्रवणयंत्र, औषधे आणि उदरनिर्वाहासाठी रेशन धान्य घरपोच पुरविले जाते. वस्तीपातळीवर विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. यामध्ये मोतीबिंदू तपासणी, नेत्र तपासणी, अस्थिरोग तपासणी, कर्करोग तपासणी, मानसिक आरोग्य तपासणी, पेन्शन शिबिरे आयोजित केली जातात. वस्त्यांमधील जास्तीत जास्त आजी- आजोबांना त्यांचा लाभ मिळवून दिला जातो. रक्तदाब, रक्तशर्करा आणि हाडांची दुखणी यांवर लागणारी औषधे, जीवनसत्त्वे, सप्लीमेंट्स, मानसिक आजारांसाठी समुपदेशन, शस्त्रक्रिया या व अशा सेवा ‘स्कूल’ ही संस्था वस्त्यांमध्ये पोहोचवते.

वृद्धमित्र कार्यक्रमांतर्गत वृद्धांसोबत काम सुरू करताना त्यांच्या प्राथमिक गरजा आणि राहणीमान समजून घेताना काही माहिती गोळा केली असता आतापर्यंत पुणे, मुंबई, भोपाळ आणि ग्वाल्हेर या भागांतील १० हजार वृद्धांबद्दल घेण्यात आलेल्या माहितीनुसार, ६३ टक्के महिला आणि ३७ टक्के पुरुष आहेत. यापैकी जवळपास निम्मे म्हणजेच ४५ टक्के वृद्ध सहचराशिवाय जीवन जगत आहेत, तर १२ टक्के वृद्धांना सांभाळणारे कोणीच नाही. ६८ टक्के वृद्धांना परिवारातून कोणत्याही प्रकारचा आधार मिळत नाही. या १० वस्त्यांमधील ८६ टक्के वृद्ध असे आहेत की ज्यांना निवृत्तिवेतन नाही. ९६ टक्के वृद्धांकडे कोणत्याही प्रकारची विमा योजना नाही. सुमारे एकतृतीयांश वृद्ध दारिद्र्यरेषेखाली आहेत.

वृद्धांमधील शारीरिक व्याधींचा विचार करता, ४९ टक्के रक्तदाब, २३ टक्के मधुमेहाने त्रस्त आहेत. ६ टक्के अस्थमा, ४टक्के पॅरालिसिस, तर ४ टक्के वृद्ध हे मानसिक आजार आणि नैराश्याने ग्रस्त आहेत. अशा सर्व आजारांमध्ये नियमित औषधे घेणे खूपच गरजेचे असते. परंतु हे सर्व आजार औषधांअभावी, कौटुंबिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ताणामुळे बळावलेले दिसून येतात.

६० टक्के वृद्धांना दृष्टिविकारांनी ग्रासले आहे. ३१ टक्के वृद्धांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, तर ४ टक्के वृद्धांना पूर्णपणे अंधत्व आलेले आहे. १६ टक्के वृद्धांना ऐकू येत नाही आणि २ टक्के वृद्धांना बोलण्यात अडचण येते.

एकूण वृद्धांपैकी ७१ टक्के शारीरिक वेदना, ४१ टक्के अशक्तपणा, १८ टक्के वृद्धांना झोपेची समस्या, ९% वृद्धांना बद्धकोष्ठता असे त्रास नोंदवले गेले. यापैकी गुडघेदुखी सर्वांत जास्त म्हणजेच ६५ टक्के , त्याखालोखाल ३४ टक्के पाठदुखी, २४ टक्के मानेचा त्रास, १६ टक्के खांदेदुखी, १८ टक्के पिंढरीचे दुखणे, या सर्व शारीरिक व्याधी बळावत जाऊन तीन टक्के वृद्ध हे अंथरुणाला खिळलेले आहेत.

ही परिस्थिती लक्षात घेता शासनाच्या शहरी योजनांतून आणि इतर सरकारी योजनांतून वृद्धांसाठी आधार रचना कार्यक्रम आखण्याची गरज आहे. ‘वृद्धमित्र’ कार्यक्रमाद्वारे स्कूलने पुण्यात वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या सामाजिक संस्था, विविध सीएसआर, सरकारी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये, मानसिक समुपदेशन करणाऱ्या संस्था, वृद्धांचे आयुष्य सुधारण्यासाठी त्यांच्या बेरोजगार मुलांना अथवा स्वत: वृद्धांना रोजगार मिळवून देणाऱ्या संस्था, जे स्वत: स्वयंपाक करण्यास असमर्थ आहेत किंवा ज्यांच्याकडे रेशनसाठीही पैसे नाहीत अशा लोकांसाठी दोन वेळेचे जेवण वा धान्य पुरविणाऱ्या संस्था व दानशूर व्यक्ती यांना एकत्र आणले आहे. ‘वृद्धमित्र’ कार्यक्रम सुरू राहिल्यास आणि त्याचा प्रसार झाल्यास वृद्धांच्या समस्यांची तीव्रता कमी करणे शक्य होईल. 

लेखक ‘स्कूल’ या संस्थेमार्फत सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

nitin@vriddhamitra.org

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The number of elder people is increasing society off community health oriented operational links school work elder people life ysh
First published on: 29-11-2022 at 10:13 IST