सोमनाथ… हा शब्द उच्चारताच आपल्या मनात आणि हृदयात अभिमानाची भावना जागृत होते. हे भारताच्या आत्म्याचे शाश्वत प्रकटीकरण आहे. हे भव्य मंदिर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गुजरात राज्यातील ‘प्रभास पाटण’ येथे स्थित आहे. ‘द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रा’मध्ये भारतातील १२ ज्योतिर्लिंगांचा उल्लेख आहे. या स्तोत्राची सुरुवातच “सौराष्ट्रे सोमनाथं च..”ने होते, जे पहिल्या ज्योतिर्लिंगाच्या रूपात सोमनाथचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करते.

असेही म्हटले जाते की,

सोमलिङ्गं नरो दृष्ट्वा सर्वपापैः प्रमुच्यते।

लभते फलं मनोवाञ्छितं मृतः स्वर्गं समाश्रयेत्॥

याचा अर्थ हा आहे की, केवळ सोमनाथ शिवलिंगाच्या दर्शनाने मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो, त्याला मनोवांछित फळ प्राप्त होते आणि मृत्यूनंतर तो स्वर्गात स्थान मिळवतो.

दुर्दैवाने, ज्या सोमनाथावर कोट्यवधी लोकांची श्रद्धा होती आणि ज्याची ते प्रार्थना करत असत, त्याच मंदिरावर परकीय आक्रमकांनी हल्ले केले; ज्यांचा हेतू भक्ती नसून विध्वंस हाच होता.

सोमनाथ मंदिरासाठी २०२६ हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. या महान तीर्थक्षेत्रावर झालेल्या पहिल्या हल्ल्याला आता १,००० वर्षे पूर्ण होत आहेत. जानेवारी १०२६मध्येच महमूद गझनवीने या मंदिरावर हल्ला केला होता. एका हिंसक आणि रानटी आक्रमणाद्वारे श्रद्धा आणि नागरी संस्कृतीचे हे महान प्रतीक नष्ट करण्याचा त्याचा प्रयत्न होता.

तरीही, एक हजार वर्षांनंतरही हे मंदिर आजही तितक्याच वैभवात उभे आहे, कारण सोमनाथच्या वैभवाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी असंख्य प्रयत्न केले गेले. अशाच एका महत्त्वपूर्ण टप्प्याला २०२६ मध्ये ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. ११ मे १९५१ रोजी या जीर्णोद्धार झालेल्या मंदिराचे दरवाजे भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या उपस्थितीत एका सोहळ्याद्वारे भक्तांसाठी उघडण्यात आली होती.

एक हजार वर्षांपूर्वी १०२६ मध्ये सोमनाथवर झालेले पहिले आक्रमण, त्यावेळच्या नगरवासीयांवर ओढवलेल्या क्रौर्याचे आणि मंदिराची झालेली प्रचंड नासधूस यांचे वर्णन विविध ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये सविस्तरपणे आले आहे. जेव्हा आपण ते वाचतो, तेव्हा हृदय हेलावून जाते. प्रत्येक ओळ दुःख, क्रौर्य आणि काळाच्या ओघातही न पुसल्या जाणाऱ्या वेदनांनी भरलेली आहे.

हे मंदिर समुद्रकिनाऱ्यावर असल्याने आर्थिकदृष्ट्या प्रबळ असलेल्या समाजाला ते बळ देत असे, ज्यांचे समुद्रमार्गाने व्यापार करणारे व्यापारी आणि दर्यावर्दी या मंदिराच्या वैभवाच्या गाथा दूरदूरपर्यंत कथन करत असत.

तरीही, मी आज पूर्ण अभिमानाने आणि निःसंदिग्धपणे हे सांगू इच्छितो की, सोमनाथवर पहिल्यांदा झालेल्या आक्रमणाला एक हजार वर्षे उलटून गेल्यानंतरही आजचा इतिहास त्या विनाशासाठी ओळखला जात नाही, तर हा इतिहास भारतमातेच्या कोट्यवधी पुत्रांच्या अभेद्य साहसासाठी आणि धैर्यासाठी ओळखला जातो.

ज्या ज्या वेळी या मंदिरावर हल्ले झाले, त्या त्या वेळी त्याचे रक्षण करण्यासाठी महान स्त्री-पुरुष उभे ठाकले आणि प्रसंगी त्यांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदानही दिले. पिढ्यानपिढ्या आपल्या महान संस्कृतीतील लोकांनी स्वतःला सावरले आणि प्रत्येकवेळी या मंदिराची पुनर्बांधणी करून त्याचा जीर्णोद्धारही केला. भाविकांना सोमनाथमध्ये पुन्हा प्रार्थना करता यावी, यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी अतिशय उदात्त भावनेने प्रयत्न केले होते. १८९०च्या दशकात स्वामी विवेकानंद यांनी सोमनाथला भेट दिली होती, या भेटीतील अनुभवाने त्यांना अंतर्मुख केले होते. १८९७मध्ये ते जेव्हा चेन्नईत एका व्याख्यानासाठी गेले होते, त्यावेळी त्यांनी या भेटीबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

मुन्शीजींच्या पुस्तकाचे शीर्षक अत्यंत समर्पक आहे. आपल्या संस्कृतीत आत्म्याचे आणि चिरंतन विचारांचे अमरत्व मान्य केले आहे. जे चिरंतन आहे, त्याचा नाश होऊ शकत नाही अशी आपली ठाम मान्यता आहे. गीतेत म्हटलेच आहे, “नैनं छिन्दन्ति शस्त्राणि…”. सोमनाथ मंदिर काळाशी व अनेक संकटांशी झुंज देऊन आज तेजस्वीपणे तळपत उभे आहे. आपल्या संस्कृतीच्या अविनाशी आत्म्याचे, चैतन्याचे सोमनाथ मंदिराहून समर्पक दुसरे कोणते उदाहरण असू शकते?

शतकांपूर्वी, आदरणीय जैन भिक्षु कलिकाल सर्वज्ञ हेमचंद्राचार्य हे सोमनाथ येथे आले होते. असे सांगितले जाते की तेथे प्रार्थना केल्यानंतर त्यांनी पुढील श्लोकाचे पठण केले —“भवबीजाङ्कुरजनना रागाद्याः क्षयमुपगता यस्य ।”. याचा अर्थ असा की परमात्म्याला नमस्कार, ज्याच्यामध्ये सांसारिक अस्तित्वाची बीजे लोप पावली आहेत, ज्याच्यामध्ये वासना आणि सर्व दुःखाचे मूळ नष्ट झाले आहे. आजही, सोमनाथला मन आणि आत्मा यांच्या आत गहन जागृती करण्याची क्षमता आहे.

हजारो वर्षांपूर्वी सोमनाथ मंदिरावर आक्रमण झाले आणि सातत्याने हल्ले होऊनही सोमनाथ मंदिर पुन्हा उभे राहू शकत असेल तर आपणही आपल्या महान राष्ट्राला आक्रमणांपूर्वी असलेल्या हजारो वर्षांपूर्वीच्या वैभवापर्यंत निश्चितच पुन्हा पोहोचवू शकतो. श्री सोमनाथ महादेवांच्या आशीर्वादाने, एक विकसित भारत घडवण्याच्या नव्या संकल्पाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत, जिथे आपले सांस्कृतिक शहाणीव संपूर्ण जगाच्या कल्याण्यासाठी कार्य करण्याचे मार्गदर्शन मिळेल.

जय सोमनाथ!

(नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत आणि श्री सोमनाथ ट्रस्टचे अध्यक्ष देखील आहेत)