पृथ्वीतलावर असलेल्या प्रत्येक सजीव प्राण्याला जसा जगण्याचा हक्क आहे तसा भूक भागवण्याचा सुद्धा! निसर्ग रचनेनुसार प्रत्येक सजीवाचे भक्ष्य वा खाद्या निश्चित आहे. ते त्याला विनासायास वा प्रयत्नपूर्वक मिळेल अशीच या साखळीची रचना. त्याचा आधार घेत प्रत्येक सजीव आपापल्या परीने जगत असतो. बुद्धी व वाणीचे वरदान लाभलेला यातला सर्वांत हुशार मानव. त्यामुळे त्याने स्वत:च्या पोटाची सोय बघण्यासोबतच इतर लहान सजीवांच्या भुकेकडे लक्ष देणे या साखळीला अभिप्रेत. प्रत्यक्षात तो त्याची जबाबदारी खरोखर पार पाडतो का हा कळीचा प्रश्न. तो उपस्थित झाला आहे, भारतीय वन्यजीव संस्थेच्या एका अहवालातून. देशात मोठ्या संख्येने वाढत असलेल्या वाघांना पोट भरण्यासाठी भक्ष्यांची कमतरता जाणवू लागल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

एकूणच वाघ, त्यांचे भक्ष्य, त्यांची कमतरता, यातून वाढत चाललेला वाघ व मानव संघर्ष याची आकडेवारी तपासली तर भविष्यात येऊ घातलेल्या एका भयावह संकटाची चाहूल लागते. मुळात वाघांची संख्या वाढवणे हे मानवाने ठरवलेले उद्दिष्ट. निसर्गचक्रातील महत्त्वाचा घटक असलेला हा देखणा प्राणी योग्य संख्येत असेल, तरच या चक्राचे संतुलन नीट राखले जाईल, हे संशोधनातून सिद्ध झाले. त्यातून या उद्दिष्टाची निर्मिती झाली. यात गैर काहीही नव्हते व नाही. मात्र वाघांची संख्या वाढवताना त्याच्या पोटाची काळजी घेण्याची जबाबदारी या उद्दिष्टातून कधी हद्दपार झाली ते कुणाच्या लक्षातच आले नाही. याचे एकमेव कारण म्हणजे निसर्ग संतुलनासाठी वाघ हवेत हा या उद्दिष्टामागचा हेतू मागे पडला व सर्वांना व्याघ्र पर्यटनाची भुरळ पडली. यातून अमाप महसूल गोळा करता येतो हे सरकारच्या लक्षात येताच तेही मूळ हेतू विसरले. त्याचा मोठा फटका आता सहन करावा लागणार याचा अंदाज या अहवालातून येतो.

देशात २०१४ मध्ये दोन हजार २२६ वाघ होते. ही संख्या २०१८मध्ये दोन हजार ९६७ झाली. तर २०२२ ला तीन हजार ६८२. म्हणजे या आठ वर्षांत तब्बल दीड हजार वाघ देशात वाढले. याच काळात देशभरात ८२५ वाघांचा मृत्यू झाला. त्यातले शिकारीमुळे किती मेले, वृद्धत्वामुळे किती, रस्ते अपघातात किती याची आकडेवारी राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरण देत नसले तरी अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार यात वृद्धत्वामुळे मरणाऱ्या वाघांची संख्या फार नाही. वाघाला नैसर्गिक मृत्यू येणे यात काहीही गैर नाही. मात्र भक्ष्याच्या शोधात रानोमाळ भटकणारा वाघ शिकाऱ्यांच्या तावडीत सापडणे, एखाद्या वाहनाखाली येणे वा संतप्त जमावाकडून ठार मारला जाणे हे सहज टाळता येणारे मृत्यू. सरकार अथवा एकूण मानवजातीचे लक्ष नेमके याकडे नाही. संकटाला सुरुवात होते ती नेमकी इथून. याच्या मुळाशी गेले की वाघांना जाणवणारी भक्ष्याची कमतरता हे वास्तव समोर येते. याच अहवालानुसार वाघांना पोट भरण्यासाठी आवडणारे म्हणजेच खूर असलेले प्राणी भारतीय जंगलातून दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. चितळ, सांबर व रानगवा हा वाघांचा आवडता आहार. तेच जंगलातून हळूहळू नामशेष होत आहेत. २०१४ ते २२ या काळात चितळ २८ टक्क्यांनी, सांबर २७ तर गवे २८ टक्क्यांनी कमी झाले. त्यांची पैदास वाढावी यासाठी वन खात्याने प्रयत्नच केले नाहीत असे नाही, पण जे केले ते अपुरे ठरले हेच वास्तव या अहवालातून दिसून येते.

अधिवास सोडण्याची भीती

व्याघ्र प्राधिकरणाने जी मृत वाघांची आकडेवारी दिली आहे त्यात झुंजीत मारले गेलेले वाघही आहेत. ते नेमके किती हे त्यात नमूद नसले तरी अलीकडे वाघांची परस्परांवरील आक्रमणे वाढली आहेत. इतर प्राण्यांपेक्षा वाघ जरी सर्वशक्तिमान असला तरी अलीकडे त्यालाही शिकार करणे सोपे राहिलेले नाही. त्यांना आवडणारा खूर असणारा प्राणी पकडायचा असेल तर आठ आठ दिवस प्रयत्न करावे लागतात. हा खूप दमवणारा प्रकार असतो. यामागे मोठे कष्ट असतात असे वन खात्यातील अधिकारीच सांगतात. अर्थात यामागे एकमेव कारण आहे ते म्हणजे त्यांच्यासाठी असलेल्या अन्नाचा तुटवडा. हे लक्षात घेतले तर सध्या अस्तित्वात असलेले वाघ अन्नदुष्काळाचा सामना करत आहेत असेच म्हणावे लागते. भविष्यात याची तीव्रता वाढत जाणार असे संकेत हा अहवाल देतो. अशा स्थितीत वाघ भक्ष्याच्या शोधात अधिवास सोडून बाहेर पडतो. मानवी वस्तीत शिरतो. त्याला पाळीव खूरप्राणी म्हणजे गाय, बैल, बकरी खुणावत असतात. नेमका येथून मानव-वाघ संघर्ष सुरू होतो.

याच प्राधिकरणाने दिलेली आकडेवारी तपासली तर २०१४ ते २४ या दहा वर्षांच्या काळात देशभरात ६२१ व्यक्ती वाघांच्या हल्ल्यात ठार झाल्या. त्यातले सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात नोंदले गेले. त्यानंतर उत्तर प्रदेश मग पश्चिम बंगाल. देशात सर्वाधिक वाघ असलेल्या मध्य प्रदेशात वाघांच्या मृत्यूंची संख्या सर्वात कमी आहे, तर वाघांचे अस्तित्व असूनही आंध्र प्रदेश, अरुणाचल, झारखंड व मिझोराममध्ये वाघांच्या मृत्यूची नोंद नाही. ही आकडेवारी एक सल ढळढळीतपणे समोर आणते. ती म्हणजे जिथे गवताळ कुरणे भरपूर आहेत तिथे मानव- वाघ संघर्ष नाही व मृत्यूही नाही. वाघाला माणूस मारायचाच नसतो. तो कधीही त्याचे भक्ष्य नसतो. त्याला त्याच्या आवडीचे सावज हवे असते. त्याच्याआड माणूस आला की वाघ त्याचा बळी घेतो. असे एकापेक्षा अधिक बळी वाघाने घेतले की त्याला ‘नरभक्षक’ ठरवून कैद केले जाते.

मुळात ही पद्धतच चूक. तो असे का करतो, याचा सारासार विचारच सरकारकडून केला जात नाही. त्याच्या पोटाची भूक कायम दुर्लक्षिली जाते. वाघाने माणसाचा बळी घेतला तरी त्याचे मांस तो खात नाही. ते त्याचे आवडते खाद्या नाही, ही बाब कुणी लक्षातच घ्यायला तयार नाही. यात चूक मानवाचीही नाही. जंगलाशेजारी अनेक गावे, शेती आहे. त्यांना तिथून हलविणे हाही यावरचा उपाय नाही. संख्या वाढल्याने अधिवास अपुरा पडू लागला, अन्न मिळेनासे झाले की वाघ बाहेर पडणारच. अशा स्थितीत त्यांच्या संख्येचे योग्य नियोजन करणे, स्थलांतराचे प्रयोग यशस्वी करणे व भक्ष्यांची निर्मिती करणे हेच गरजेचे. नेमके त्याकडे सरकारचे दुर्लक्ष झालेले. मध्यंतरी जितेंद्र रामगावकर नावाच्या अधिकाऱ्यांनी ताडोबात गवताळ कुरणनिर्मितीचा प्रयोग यशस्वी केला. पेंचमध्येही प्रयत्न झाले पण इतर ठिकाणी नाही. माझ्या पोटाचे काय, असा प्रश्न हा देखणा प्राणी विचारू शकत नाही. नेमका त्याचाच फायदा घेत सरकार संख्या वाढली म्हणून पाठ थोपटून घेते.

हे असेच सुरू राहिले तर वाढलेले वाघ भूक भागवण्यासाठी वाट मिळेल तिकडे जातील व अराजक माजेल. असे झाले, तर मूळ प्रश्नाला बगल देत वाघालाच दोष देऊन त्यांचा ‘बंदोबस्त’ केला जाईल. हे घडायला नको असेल तर त्याच्या पोटाची काळजी आतापासूनच घेणे इष्ट.

खूर असलेल्या प्राण्यांची कमतरता

खूर असलेल्या प्राण्यांची संख्या वाढवण्यासाठी गवताळ कुरणांची निर्मिती आवश्यक असते. प्रत्येक जंगलात अशी कुरणे तयार करावीत. जिथे कुरण निर्मितीसाठी योग्य वातावरण नसेल तिथे बाहेरच्या व्याघ्र प्रकल्पातून हे प्राणी आणून सोडावेत अशा योजना व्याघ्र प्राधिकरणाने आखल्या. त्यांची अंमलबजावणीही होते. कान्हा व्याघ्र प्रकल्पातून नियमितपणे असे भक्ष्य इतर प्रकल्पांत वितरित करण्यात येते. मात्र हे प्रयत्न कमी पडतील अशी स्थिती अनेक प्रकल्पांत निर्माण झाली आहे. त्याचे एकमेव कारण आहे ते वाघांच्या वाढलेल्या संख्येत. त्यामुळे निर्मिती, पुरवठा व वाघांची संख्या यांच्यातले प्रमाण दिवसेंदिवस व्यस्त होत गेले. त्याचा मोठा फटका वाघांना बसू लागला आहे. देशाची लोकसंख्या वाढली की सर्वांना पुरेल एवढ्या अन्नाची तरतूद करण्याची जबाबदारी सरकार घेते. तरीही सामाजिक विषमतेमुळे अनेक घटकांपर्यंत ते पोहचत नाही. अशा वेळी भुकेसाठी काम करणे, चोरी करणे असे अनेक पर्याय मानवासमोर उपलब्ध असतात. बिचाऱ्या वाघांना भूक लागली आहे हे सांगण्याचीही सोय नाही. त्यासाठी ते भटकत असतात. अशा वेळी त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची सरकारची जबाबदारी वाढते. यंत्रणा नेमकी कमी पडते ती इथे. सावज कमी व सावजाच्या शोधात असलेले वाघ अधिक अशी स्थिती जंगलात निर्माण झाल्याने वयपरत्वे शक्तिहीन ठरलेले वाघ आपसूकच शिकारीच्या स्पर्धेतून बाहेर फेकले जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

devendra.gawande@expressindia.com