scorecardresearch

Premium

सन्मानाने जगण्यासाठी..

कुटुंबाचे प्रेम, घर यापासून दुरावलेल्या तृतीयपंथींना समाजाने अजूनही स्वीकारलेले नाही. उपेक्षित आयुष्य जगणाऱ्या या समाजघटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुंबईच्या मालाडमधील ‘त्रिवेणी समाज विकास केंद्र’ ही संस्था कार्यरत आहे. तृतीयपंथींच्या वेदनांवर फुंकर घालण्याचे काम ती गेल्या दीड दशकाहून अधिक काळापासून करीत आहे.

vishesh lekh transgender life

इंद्रायणी नार्वेकर

तृतीयपंथी. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेला हा समाजघटक. या उपेक्षित, दुर्लक्षित समाजघटकासाठी गेल्या १७ वर्षांपासून मालाडच्या मालवणी परिसरात ‘त्रिवेणी समाज विकास केंद्र’ ही संस्था काम करत आहे. पण, तीही या समाजाप्रमाणेच उपेक्षित. ‘हम इन्सान है..इन्सान जैसा जिना चाहते है’..हे ब्रीदवाक्य असलेली ही संस्था प्रसिद्धीची कोणतीही आस न बाळगता नेटाने काम करते आहे.

pune manache ganpati
गणरायाच्या विसर्जनाचे वेध… जाणून घ्या मानाच्या गणपती मंडळांची तयारी
youth attempts suicide outside of deputy cm office
मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर शासकीय कर्मचाऱ्यांची निदर्शने; संरक्षण देणारी तरतूद रद्द
youth rapes a widow woman in nagpur, rape case , nagpur rape case
नागपूर: लग्नाचे आमिष देऊन विधवा महिलेवर अभियंता तरुणाचा बलात्कार
dv kashmir jawan attack reaction
लष्करी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गर्दी; पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची मागणी

चाँदनी शेख या संस्थेच्या प्रोजेक्ट संचालक आहेत. २००६ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेला महाराष्ट्र जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीनेही मान्यता दिली आहे. सरकारी योजना तृतीयपंथीयांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही संस्था काम करते. पण, तृतीयपंथीयांच्या समस्या, त्यांच्या रोजच्या जगण्याची धडपड, यापुढे या सगळय़ा सरकारी योजनाही किती तोकडय़ा आहेत, हे चाँदनी शेख यांच्याशी बोलताना प्रकर्षांने जाणवते. तृतीयपंथी समाजघटकाला सामाजिक मान्यताही नाही आणि समाज सरकारदरबारी दखलपात्रही नाही. अगदी जन्मापासून ही उपेक्षा सुरू होते. तृतीयपंथीयांना त्यांचे कुटुंबच सर्वात आधी अव्हेरते. आपल्या वेगळेपणाची जाणीव होईपर्यंत त्यांना अनेक प्रकारच्या अवहेलनेला सामोरे जावे लागते. त्यानंतरचे आयुष्यही सोपे नसतेच. भीक मागून जगणे हाच काय तो जगण्याचा मार्ग उरतो.

तृतीयपंथी आहोत, याची जाणीव झाल्यानंतर घरातून पळून आलेले, समाजाने वाळीत टाकलेले, परराज्यातून आलेले असे अनेक किन्नर मुंबईत समूहाने राहतात. त्यांचा किन्नर समाज एकमेकांच्या आधाराने जगण्याची धडपड करत असतो. किन्नर समाज हा गुरू आणि शिष्य या पद्धतीने राहत असतो. त्यामुळे एखादा नवीन तृतीयपंथी एखाद्या गुरूमार्फत ‘त्रिवेणी समाज विकास केंद्र’ या संस्थेकडे आला की, त्याची या संस्थेकडे नोंद होते. गोरेगाव ते पालघर या पट्टय़ातील अनेक तृतीयपंथींसाठी त्रिवेणी समाज केंद्र हे आधार ठरले आहे. मुंबईत साधारण पावणेदोन लाख तृतीयपंथी आहेत़. संस्थेकडे साधारण एक हजार किन्नरांची नोंद आहे.

संस्थेकडे नव्याने आलेल्या एखाद्या तृतीयपंथीयाला शिकण्याची इच्छा असली तरी त्याला शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवणे अवघड जाते. प्रवेश मिळाला तरी नंतर इतर मुले, मुली त्यांना सामावून घेण्याची शक्यता धूसर असते. त्यामुळे अनेकांना मध्येच शिक्षण सोडावे लागते. मात्र, गेल्या काही वर्षांत मुक्त विद्यापीठामार्फत शिक्षण घेण्याची सोय होऊ शकली असल्याचे या संस्थेतील तृतीयपंथीयांनी सांगितले. समूहात असतानासुद्धा अनेकदा रस्त्यावरचे गुंड, रिक्षावाले तृतीयपंथीयांना त्रास देतात, त्यांना चिडवणे, धमकावण्याचे प्रकार घडतात. काही वेळा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतात. अशा प्रकरणात पोलीस ठाण्यात जाऊन वाद सोडवण्याचे कामही संस्था करत असते.

शिक्षण, कुटुंबाचे प्रेम, घर यापासून दुरावलेल्या या तृतीयपंथींना अजूनही समाजाने स्वीकारलेले नाही. स्वत:ची कोणतीही चूक नसताना हे असे उपेक्षित आयुष्य जगणाऱ्या या तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी हा समाज नाकारत आला आहे. कोणीही नोकरी देत नसल्यामुळे सकाळपासून सिग्नलवर उभे राहून भीक मागायची आणि पैसे जमवायचे याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नसतो. सिग्नलवर उभे राहून किंवा ट्रेनमध्ये भीक मागणे आणि लग्न किंवा अन्य समारंभांत बिदागी मिळवण्याशिवाय या समाजाकडे पर्याय नसतो. काही जण देहविक्रीच्या व्यवसायातही ढकलले जातात. उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे ते कुठेतरी दाटीवाटीच्या झोपडपट्टीत राहतात़  अनेकदा टीबी, एचआयव्ही यांसारख्या आजारांची शिकार होतात.  अशा सगळय़ा दुष्टचक्रात हा समाज वर्षांनुवर्षे अडकलेला आहे.

या अशा उपेक्षित समाजासाठी ‘त्रिवेणी समाज विकास केंद्र’ ही संस्था मालवणीमध्ये २००६ मध्ये सुरू करण्यात आली. एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने किन्नरांचे प्रश्न सोडवण्यासाठी या केंद्राची सुरुवात झाली. हळूहळू या संस्थेने आपली ओळख तयार केली. मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेने (एमडॅक) २०१० मध्ये या केंद्राला मान्यता दिली असून, तेव्हापासून या दोन संस्था एकत्रपणे मालवणी येथील जागेत काम करीत आहेत. या संस्थेमार्फत किन्नरांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड तयार करणे, त्यांची बँक खाती तयार करणे ही कामे केली जातात. आतापर्यंत ६०० जणांचे मतदार ओळखपत्र तयार करण्यात आले आहे. तसेच टीबी, एचआयव्हीची लागण झालेली असल्यास त्यांना मोफत औषधोपचार देणे, नियमित आरोग्य तपासणी, कान, नाक, घसा, डोळे तपासणी अशा सुविधा दिल्या जातात. ही संस्था बीएमजीएफच्या आस्था प्रकल्पांतर्गत काम करते. विविध सामाजिक संस्था आणि केंद्र व राज्य सरकारचे आरोग्यविषयक प्रकल्प यांच्याशी ही संस्था आता जोडली गेली आहे.

तृतीयपंथीयांसाठी निवारा हा संस्थेपुढे सर्वात मोठा प्रश्न आहे. मुंबईतील घरांचे, झोपडय़ांचे भाडे खूप जास्त असल्यामुळे ते किन्नरांना परवडत नाही. सध्या झोपडय़ांमध्येही महिन्याला ८ ते १० हजार रुपये भाडे मागितले जाते. परंतु, भीक मागून किती उत्पन्न मिळणार? त्यामुळे हे भाडे परवडत नाही. घर भाडय़ाने मिळाले तरी मग आजूबाजूचे लोक, मालकाचा त्रास असह्य होतो. किन्नरांचे मृत्यू झाले की मृतदेह घरी आणण्यास मज्जाव केला जातो. मग मृतदेह रुग्णवाहिकेतून न्यावा लागतो. साधारणपणे घर भाडय़ाने घेऊन एका लहानशा खोलीत दहा-पंधराजण दाटीवाटीने राहतात. त्यामुळे त्यांना पदोपदी तडजोडीस सामोरे जावे लागते.

अशा प्रतिकूल स्थितीत त्रिवेणी संस्था हाच किन्नरांसाठी एक मोठा दिलासा ठरला आहे. संस्थेमार्फत तृतीयपंथी सदस्यांमध्ये आरोग्यविषयी जागृती निर्माण करणे, त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे ही कामे केली जातात. विशेषत: व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. वेगवेगळय़ा प्रकारची प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात. तसेच सरकारी कार्यालये, सरकारी यंत्रणा यांच्याशी समन्वय साधण्याचे कामही संस्था करते. साधा सर्दी, खोकला, डेंगू, मलेरिया असे आजार आणि मधुमेह, कर्करोग यांसारखे दीर्घकालीन आजारांवर उपचार मिळवण्यासाठीही संस्था प्रयत्न करते.

राहायला जागा नसणे ही त्यांच्यापुढची गंभीर समस्या आहे. त्यामुळे एखाद्या आजारी किन्नराला कुठे ठेवायचे हा प्रश्न असतो. त्यामुळे निवाऱ्याचा प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे. भारतातील काही राज्यांत तृतीयपंथीयांसाठी निवारा उपलब्ध करून दिला जातो. तसा तो महाराष्ट्रातही करून द्यावा, अशी संस्थेची मागणी आहे. आतापर्यंत अनेक लोकप्रतिनिधींकडे त्यांनी ही मागणी पोहोचवली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी नगरसेवक विनोद शेलार यांनाही संस्थेने निवेदन दिले आहे. त्यांची ही मागणी आतापर्यंत पूर्ण झालेली नाही. मात्र, संस्थेने आशा सोडलेली नाही.

संस्थेने करोनाकाळात किन्नरांसाठी लसीकरण शिबिरेही घेतली होती. काही संस्थांच्या मदतीने धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही केले. परिसरातल्या एकटय़ादुकटय़ा गरजू महिलांनाही त्यांनी धान्यवाटप केले. आपण केवळ मागणारे नाही, तर वेळप्रसंगी देणारेही आहोत, असे संस्थेने वेळोवेळी दाखवून दिले आहे. आता सरकारने आम्हाला निवारा आणि निवृत्ती वेतन द्यावे, अशी आमची मागणी आहे, असे संस्थेच्या पदाधिकारी सांगतात. तृतीयपंथींची उपेक्षा थांबवायची आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे तर त्यांना आत्मनिर्भर करणे आवश्यक आहे. त्रिवेणी संस्था आपल्या परीने हे काम करत आहे. संस्थेच्या कामाला बळ देऊन आता समाजानेही आपला वाटा उचलायला हवा.

तृतीयपंथीयांसाठी संस्थेकडून अनेक उपक्रम राबविले जातात़  पण, प्रश्नांचा गुंता कायम आहे. रोजगाराबरोबरच निवाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. सरकार आणि समाजाने त्यात लक्ष घालण्याची गरज आह़े  –चाँदनी शेख, प्रकल्प संचालक, त्रिवेणी समाज विकास केंद्र

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: To live with dignity transgenders are still not accepted by the society ysh

First published on: 27-09-2023 at 02:30 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×