शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात असला तरी प्रत्यक्षात हा हक्क मिळवण्यासाठी अनेकांना प्रचंड धडपड करावी लागते. काही जणांना तर आपल्याला असा काही हक्क आहे, याची जाणीवही नसते. अशा विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित व्हावे यासाठी मुंबईतील ‘टच’ ही संस्था गेली तीन दशके अथक प्रयत्न करत आहे. पदपथावर राहणार्या मुलांसाठी ‘ब्रिज स्कूल’, ‘बालग्राम’ हे शैक्षणिक निवासी पुनर्वसन केंद्र, अनाथ मुलांना निवारा देणारे ‘आशा सदन’, उच्च शिक्षण घेणार्यांना पुस्तके उपलब्ध करून देणारी ‘पुस्तक पेढी’, कचराभूमीवर काम करणार्या मुलांसाठी ‘बालविकास केंद्र’ असे विविध उपक्रम संस्थेच्या वतीने राबवण्यात येतात.
गण्यासाठी सर्वांनाच संघर्ष करावा लागत असला तरीही समाजातील काही घटकांना या संघर्षांची झळ अधिक सोसावी लागते. यातील एक घटक म्हणजे गरजू विद्यार्थी. जीवनात खूप काही गमावलेल्या या मुलांच्या डोळ्यांत भविष्याविषयी प्रश्नचिन्ह असते. मुंबईतील ‘टच – टर्निंग ऑपॉच्र्युनिटीज फॉर अपलिफ्टमेंट अँड चाइल्ड हेल्प’ ही संस्था अशा मुलांचा खंबीर आधार ठरली आहे. अनाथ, गरजू किंवा ज्यांना शिक्षणाची संधी मिळत नाही अशांची वाट सोपी व्हावी, विद्यार्थ्यांना आपल्या पायावर उभे राहता यावे म्हणून गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ही संस्था अविश्रांत प्रयत्न करत आहे. सध्या संस्थेच्या विविध उपक्रमांचा लाभ सुमारे सहा हजारांहून अधिक विद्यार्थी घेत आहेत. मात्र, अनेक कल्पना, प्रयोगशील उपक्रम प्रत्यक्षात राबविण्यासाठी संस्थेला आर्थिक पाठबळ गरजेचे आहे.
जागतिकीकरणानंतर उच्च शिक्षण घेऊन माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रात कारकीर्द घडविण्याकडे अनेकांचा कल होता. याच काळात काही समविचारी तरुण आणि काही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मुंबईत ‘टच’ संस्थेची स्थापना केली. पुढे संस्थेचे कार्य ग्रामीण भागांतही विस्तारले. समाजातील अनेक कुटुंबांसाठी दैनंदिन गरजा पूर्ण करणे हेच मोठे आव्हान असते. अशा कुटुंबात मुलांवर लहान वयातच अनेक जबाबदार्या पडतात आणि मुले शिक्षणापासून दुरावतात. अशा मुलांवर चांगले संस्कार घडावेत, आपण आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण व्हावा यासाठी ‘टच’ संस्था प्रयत्न करते. शैक्षणिक दत्तक पालकत्व, पदपथावर राहणार्या आणि सिग्नलवर काम करणार्या मुलांसाठी ‘ब्रिज स्कूल’, ‘बालग्राम’ हे शैक्षणिक निवासी पुनर्वसन केंद्र, अनाथ मुलांना निवारा देणारे ‘आशा सदन’, उच्च शिक्षण घेणार्यांना पुस्तके उपलब्ध करून देणारी ‘पुस्तक पेढी’, कचराभूमीवर काम करणार्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘बालविकास केंद्र’ असे विविध उपक्रम संस्थेच्या वतीने राबवण्यात येतात. वंचित मुलांना आणि त्यांचे पालक असल्यास त्यांनाही शिक्षणाचे महत्व पटवून देणे सोपे नसते. मुलांचा शिक्षणातील रस टिकवून ठेवण्यासाठी संस्थेला विशेष प्रयत्न करावे लागतात.
सजग पिढ्या घडवण्यासाठी…
‘शैक्षणिक दत्तक पालकत्व’ या उपक्रमात गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेतले जाते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वर्षभर लागणारे शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येते. त्याचबरोबर विविध शिबिरे, स्पर्धा, व्यवसाय मार्गदर्शन, सहली यांचे आयोजन संस्थेकडून केले जाते. प्रत्येक विद्याथ्र्यामागे एक पालक अशी ही योजना असून अनेक सुजाण नागरिक या योजनेशी जोडले गेले आहेत. या उपक्रमात सहभागी मुले प्रामुख्याने दुर्गम भाग, आश्रमशाळा तसेच ग्रामीण भागांतील असतात. सध्या महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि राजस्थानातील ३१ ठिकाणी चार हजार ५४३ विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. संस्थेचा दुसरा उपक्रम हा पदपथावरील मुलांसाठी आहे. मुंबईत पदपथावर राहणार्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी संस्थेकडून ‘ब्रिज स्कूल’ चालविले जाते. यासाठी ‘स्कूल ऑन व्हील’ म्हणजेच बसचे रूपांतर वर्गात केले असून पदपथावरील मुलांना त्यात अनौपचारिक शिक्षण दिले जाते. वर्षभर मुलांना यात सहभागी करून त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण केली जाते आणि नंतर त्यांना जवळच्या शाळेत दाखल केले जाते किंवा संस्थेच्या ‘बालग्राम’ या निवासी प्रकल्पात सामावून घेतले जाते. सध्या ब्रिज स्कूलमध्ये एक हजार ९५४ विद्यार्थी आहेत.
‘बालग्राम’ : निवासी शैक्षणिक प्रकल्प संस्थेने वंचित मुलांसाठी २०१६ साली ‘टच बालग्राम’ हा निवासी शैक्षणिक प्रकल्प ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधील विहिगाव येथे सुरू केला. यात मुख्यत्वे ‘ब्रिज स्कूल’ उपक्रमातील विद्यार्थी औपचारिक शिक्षण घेतात. मुलांना भविष्यासाठी तयार करण्यासाठी त्यांच्यातील शिक्षणाची आस टिकवून ठेवणे गरजेचे असते. मुलांवर संस्कार करणे, विविध सांस्कृतिक उपक्रम राबविणे आणि मुलांचा सर्वांगीण विकास करणे या उद्देशाने बालग्राम पुनर्वसन केंद्र स्थापन करण्यात आले. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे इथे वसतिगृहाची इमारत नसून विद्यार्थ्यांना राहण्यासाठी लहान घरे बांधण्यात आली आहेत. विभिन्न वयोगटांतील मुले तिथे एकोप्याने राहतात. तसेच विविध कलागुण आत्मसात करतात. संस्थेतील ७०हून अधिक विद्यार्थी शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेत आहेत. सध्या या प्रकल्पात राहणार्या विद्यार्थ्यांची संख्या ५४ आहे. यात विद्यार्थिनीही शिक्षण घेण्यास पुढे येतात आणि त्यांचे पालकही आश्वस्त होतात, असे संस्थेने सांगितले. विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी किंवा ज्यांना समाजकार्याची आवड आहे अशांनी मुलांना आपला अमूल्य वेळ द्यावा तसेच त्यांच्यासाठी एखादा उपक्रम घ्यावा, त्यांच्याशी संवाद साधावा जेणेकडून संस्थेतील मुलांना नव्या गोष्टींची ओळख होईल, त्यांना नव्या क्षेत्रांची माहिती मिळेल, अशी संस्थेची अपेक्षा आहे. बालग्राम उपक्रमाबरोबरच ‘आशा सदन’ हा संस्थेचा आणखी एक निवासी उपक्रम आहे जो १८ वर्षांवरील अनाथ मुलांसाठी बोरिवली पश्चिमेतील गोराई येथे राबवला जातो. मुलांना पुढील शिक्षण देणे, व्यासावसायिक कौशल्ये शिकविणे आणि स्वावलंबी करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे.
महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना अनेकदा आर्थिक कारणांमुळे आवश्यक पुस्तके खरेदी करता येत नाहीत. अशा वेळी ‘टच’ संस्थेच्या ‘पुस्तक पेढी’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांकडून काही रक्कम अनामत घेण्यात येते आणि वर्षभरासाठी पाठ्यपुस्तके दिली जातात. विद्यार्थ्यांनी पुस्तके परत केल्यानंतर अनामत रक्कम त्यांना परत केली जाते. १६ वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून बोरिवली, चिपळूण, गोंदिया आणि कसारा येथील संस्थेच्या केंद्रांतून आतापर्यंत आठ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. कचराभूमीवर अनेकदा आपल्या पालकांबरोबर मुलेही कचरा वेचण्याचे काम करतात. अशा मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मुंबईत गोवंडी येथे ‘बालविकास केंद्र, बैंगणवाडी’च्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. यात शैक्षणिक उपक्रम, सहल, आरोग्य तपासणी, शैक्षणिक साहित्य पुरविणे अशा गोष्टींचा समावेश आहे. करोना काळातही संस्थेने गरजूंपर्यंत पोहोचत कार्य सुरू ठेवले होते. या काळात संस्थेने मुंबईत गरजूंना धान्याचे वाटप केले. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी टपालाने त्यांच्यापर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचवले.
संस्थेपर्यंत कसे जाल?
बोरिवली पश्चिमेच्या वझिरा नाका परिसरातील आनंदराव पवार शाळेच्या तळमजल्यावर संस्थेचे केंद्र आहे. ‘टच संस्था’ या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ८० जी करसवलत पात्र आहे.
ऑनलाइन देणगीसाठी तपशील
- बँकेचे नाव : कॉसमॉस बँक, शाखा बोरिवली पूर्व
- चालू खाते क्रमांक : १२२१००१०४६६४
- आयएफएससी : सीओएसबी ००००१२२
संस्थेसाठी जागेची निकड
सध्या संस्थेकडे मुंबईत स्वत:च्या मालकीच्या जागा नाहीत. बोरिवली पश्चिम येथे भाडेतत्त्वावरील जागेतूनच काम केले जााते. मात्र, संस्थेचा व्याप पाहता ही जागा अपुरी असल्याने अनेक उपक्रम राबविण्यात सध्या अडचणी येत आहेत. तसेच अनेकदा विद्यार्थ्यांची तात्पुरती राहण्याची सोय करता येत नाही. अशावेळी मुलांना नकार देणे कठीण होते. संस्थेचे दैनंदिन कामकाजही याच जागेतून चालते. त्यामुळे संस्थेला मोठ्या जागेची निकड आहे.
संस्थेचे कार्य हे समाजातील व्यक्तींच्या दातृत्वावर अवलंबून आहे. अनेक व्यक्ती आणि संस्थांनी यात सहभाग नोंदविला आहे. असे असले, तरी नवे उपक्रम, अधिकाधिक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि सुरू असणार्या उपक्रमांची व्याप्ती वाढवण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. आर्थिक पाठबळ मिळाल्यास समाजातील अधिकाधिक वंचित विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित व्हावे म्हणून संस्था प्रभावी कार्य करू शकेल.
धनादेश येथे पाठवा…
एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणार्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.
- मुंबई कार्यालय लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०
- महापे कार्यालय संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
- पुणे कार्यालय संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस,प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५
- ठाणे कार्यालय संपादकीय विभाग, फ्लॅट नं.५, तिसरा मजला, होशबानो मॅन्शन, तनिष्क शोरूमच्या वर, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प.) ४००६०२. ०२२-२५३८५१३२
- नागपूर कार्यालय संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, ॲडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१
- दिल्ली कार्यालय संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००
