– सी. ए. डॉ. विनायक म. गोविलकर 

मॅकडोनाल्ड्सने आयर्लंडमध्ये आपला ‘मॅक’ हा ट्रेडमार्क अंशतः गमावला आहे. त्याला कारण ठरला आहे ‘सुपरमॅक’ने केलेला दावा. आंतरराष्ट्रीय फास्ट उपाहारगृह साखळी असलेल्या ‘मॅकडोनाल्ड्स’ मार्फत जगभरात ‘बिग मॅक’ या नावाने हॅम्बर्गर विकले जातात. डबल मॅक, मेगा मॅक, बिग बिग मॅक, डेनाली मॅक, महाराजा मॅक, लिट्ल मॅक, ग्रँड बिग मॅक असे त्याचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. थोडक्यात मॅकडोनाल्ड्सचा ‘मॅक’ हा ब्रँड/ ट्रेडमार्क जगभरात प्रसिद्ध आहे. पण आयर्लंडच्या ‘सुपरमॅक’ने दाखल केलेल्या दाव्यावर निर्णय देताना युरोपियन युनियनच्या न्यायालयाने मॅकडोनाल्ड्सचे मॅक हा शब्द वापरण्याचे ट्रेडमार्क अधिकार रद्द केले आहेत. ५ जून २०२४ रोजी हा निकाल देण्यात आला.

Loksatta editorial Horrific Murder In Vasai Boyfriend Stabs Girlfriend To Death With Iron Spanner
अग्रलेख: लक्षणाची लक्तरे..
elections, Britain, London,
ब्रिटनमधल्या निवडणुकांचा माहोल… लंडनमधून!
lal killa India alliance responsibility in parliamentary work after lok sabha election results 2024
लालकिल्ला : सुंभ जळाला तरी पीळ कसा जाईल?
loksatta editorial on israeli supreme court decisions says ultra orthodox jews must serve in military
अग्रलेख : बीबींचा ‘शहाबानो क्षण’!
loksatta editorial about indira gandhi declared emergency in 1975
अग्रलेख : असणे, नसणे आणि भासणे!
patna high court
अग्रलेख : ‘आबादी…’ आबाद?
loksatta editorial on intention of centre to levy gst on petrol diesel
अग्रलेख : अवघा अपंगत्वी आनंद!  
Prakash Ambedkar, Buddhist-Dalits,
बौद्ध-दलित ‘शहाणे’ आहेतच, हे श्रेय प्रकाश आंबेडकरांनीही मान्य करावे!

या निकालाअन्वये मॅकडोनाल्ड्स आता आयर्लंडमध्ये काही विशिष्ट उत्पादने, पेये आणि रेस्टॉरंट सेवांसाठी ‘मॅक’ हा शब्द वापरू शकत नाही, मात्र चिकन नगेट्स, मांस, मासे, डुकराचे मांस आणि चिकन सँडविचसह सँडविच उत्पादनांसाठी ‘मॅक’ ट्रेडमार्क वारण्याचे हक्क कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मॅकडोनाल्ड्सने आपला मॅक हा ट्रेडमार्क अंशतः का होईना गमावला आहे.

हेही वाचा – तैवानने मोदींचे अभिनंदन केले, चीनचे काय बिघडले?

ट्रेड मार्कचे एवढे महत्व का?

ग्राहकांना वस्तू खरेदी करताना दर्जाची खात्री अपेक्षित असते, तर दुसरीकडे स्पर्धेच्या बाजारपेठेत उत्पादक आणि वितरकांनाही आपला माल इतरांपेक्षा वेगळ्या दर्जाचा व गुणवत्तेचा आहे याची ओळख ग्राहकांना पटवून द्यायची असते. ग्राहकांच्या व उत्पादक आणि वितरकांच्या या गरजेवरचा उपाय आहे ‘ट्रेडमार्क’. आपण बाजारातील अनेक वस्तूंवर एखादे विशिष्ट अक्षर, चिन्ह, खूण, शब्द, आकडा पाहतो आणि त्यावर ‘टीएम’ अशी इंग्रजी अक्षरे लिहिलेली असतात. त्यालाच ट्रेडमार्क म्हणतात. झपाट्याने विस्तारलेल्या प्रसिद्धी माध्यमांद्वारे ट्रेडमार्क सतत ग्राहकांसमोर ठेवणे स्पर्धेच्या बाजारपेठेत आवश्यक झाले. ट्रेडमार्कशी वस्तूच्या विशिष्ट दर्जाची खात्री व उत्पादकाची ख्याती जोडलेली असते. कंपनीला ग्राहक मिळवणे व टिकवणे ट्रेडमार्कमुळे सुलभ होते.

ट्रेडमार्क ही बौद्धिक संपदा आहे व तिला कायद्याचे संरक्षण आहे. ट्रेडमार्क कायद्यानुसार ट्रेडमार्कची नोंदणी केली जाते. नोंदणी करणाऱ्यास तो ट्रेडमार्क वापरण्याचा एकाधिकार मिळतो. त्याची परवानगी न घेता जसाच्या तसा किंवा त्याच्याशी साधर्म्य असलेला ट्रेडमार्क मुद्दाम किंवा ग्राहकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने अन्य कोणी वापरला तर ट्रेडमार्क एकाधिकाराचे उल्लंघन होते व ट्रेडमार्कधारक त्यासाठी न्यायालयात जाऊन मनाई आदेश आणू शकतो आणि भरपाईसुद्धा मागू शकतो. थोडक्यात ट्रेडमार्क ही व्यवसाय व नफा वाढवण्यासाठी मदत करणारी कायदेशीर बौद्धिक संपदा आहे.

मॅकडोनाल्ड्स आणि मॅक हा ट्रेडमार्क

१९४० साली अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे मॅकडोनाल्ड्सने व्यवसाय सुरू केला. १९९६ मध्ये कंपनीने ‘बिग मॅक’ असे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन घेतले. सध्या त्यांची १२० देशांत ३७ हजार ८५५ फास्ट फूड रेस्टॉरंट्स आहेत. कंपनी दररोज ६९ दशलक्ष ग्राहकांना सेवा देते. कंपनीची वार्षिक विक्री सुमारे २५ अब्ज डॉलर्स असून नक्त नफा सुमारे सहा अब्ज डॉलर्स आहे. मॅकडोनाल्ड्सचे जागतिक ब्रँड मूल्यांकन सहाव्या क्रमांकाचे आहे. अशा या महाकाय आणि प्रचंड ब्रँड व्हल्यू असलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीने आपला ट्रेडमार्क संरक्षित ठेवण्यासाठी बरेच काही केले. त्यातील एक उदाहरण म्हणजे बंगळुरूस्थित सॅनिटरीवेअर डीलर पीसी मल्लाप्पा अँड कंपनी यांच्या विरोधात मॅकडोनाल्ड्स कंपनीने कर्नाटकातील न्यायालयात १९९४ मध्ये केलेला दावा. मल्लाप्पा अँड कंपनीने ‘गोल्डन एम’ लोगोचे उल्लंघन केल्याचा दावा मॅकडोनाल्ड्सने केला होता. पूर्णपणे भिन्न व्यवसाय क्षेत्रात असूनही, पीसी मल्लाप्पा अँड कंपनीला आपला लोगो सोडावा लागला.

सुपरमॅकचा यशस्वी कायदेशीर लढा

या पार्श्वभूमीवर तुलनेने लहान असलेल्या सुपरमॅकने बलाढ्य मॅकडोनाल्ड्सशी कायदेशीर लढा देत मॅकडोनाल्ड्सचा मॅक ट्रेडमार्क अधिकार अंशतः रद्द केला. आयर्लंडमधील १०० हून अधिक फास्ट फूड रेस्टॉरंट्सच्या मालकीच्या ‘सुपरमॅक’ने व्यवसाय विस्तार योजनेअंतर्गत युरोपियन युनियन बौद्धिक संपदा कार्यालयाकडे आपल्या कंपनीचे नाव नोंदविण्यासाठी अर्ज केला. त्याला मॅकडोनाल्ड्सने हरकत घेतली. ‘बिग मॅक’ हा आपला नोंदविलेला ट्रेडमार्क आहे आणि ‘सुपरमॅक’ या नावाने ग्राहकांचा गोंधळ होईल असे म्हटले. सुपरमॅक आणि बिग मॅक या नावातील समानतेबद्दल मॅकडोनाल्ड्सने २०१७ मध्ये लढाई अंशतः जिंकली होती आणि सुपरमॅक खटला अंशतः हरले होते. निकाल असा होता की ते त्यांच्या रेस्टॉरंटचे नाव सुपरमॅक ठेवू शकतात, परंतु त्यांच्या मेनूवरील आयटमची विक्री करण्यासाठी मॅक लेबल वापरू शकत नाही.

त्याविरोधात सुपरमॅकने अपील केले. मॅकडोनाल्ड्सने असा युक्तिवाद केला होता की मॅक हा आमचा कायदेशीर ट्रेडमार्क आहे आणि त्या शब्दाचा दीर्घ आणि सतत वापर केल्यामुळे, ग्राहकांना तो माहीत आहे. परंतु सुपरमॅकचा असा युक्तिवाद होता की मॅक हा ‘आयर्लंड, युनायटेड किंगडम आणि इतरत्र संपूर्ण युरोपियन युनियनमध्ये आडनावांसाठी एक सामान्य उपसर्ग आहे’. आडनावाचा भाग म्हणून मॅक हा उपसर्ग असलेल्या पब, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थांची मोठी संख्या आहे. आयरिश फर्मने असा दावा केला की मॅकडोनाल्ड्सने मॅक हा उपसर्ग स्वतंत्र अर्थाने कधीही वापरला नाही, शिवाय युरोपियन युनियनच्या कायद्यानुसार ट्रेडमार्कचा वापर सतत पाच वर्षे केलेला असला पाहिजे. सुपरमॅकने मॅकडोनाल्डची बिग मॅक ट्रेडमार्क नोंदणी रद्द करण्यासाठी युरोपीयन युनियनच्या बौद्धिक संपदा कार्यालयाकडे २०१७ मध्ये विनंती केली. युरोपीयन युनियन बौद्धिक संपदा कार्यालयाने सुरुवातीला सुपरमॅकचा अर्ज मंजूर केला, परंतु नंतर मॅकडोनाल्डच्या अपीलावर निकाल देताना मॅकडोनाल्डच्या बिग मॅक हॅम्बर्गर्ससाठी ट्रेडमार्कला संरक्षण दिले. यावर सुपरमॅकने न्यायालयात धाव घेतली. त्याचा निकाल ५ जुन २०२४ रोजी लागला. सुपरमॅकने कोर्टाला सांगितले की मॅकडोनाल्ड्स त्याच्या चिकन बर्गरसाठी, ड्राईव्ह थ्रू आणि टेक अवे सेवांसाठी त्यांचा बिग मॅक ट्रेडमार्क वापरत नाही. हे युरोपीयन युनियनच्या ट्रेडमार्क कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे. कारण कायद्यात सतत पाच वर्षे ट्रेडमार्क वापरण्याची अट आहे. तसे न केल्यास, न वापरलेला ट्रेडमार्क रद्द होऊ शकतो.

युरोपात मांस आणि पोल्ट्री हे भिन्न घटक

जगभरात मांस आणि पोल्ट्री हे वेगवेगळे घटक मानले जातात. या प्रकरणात सुपरमॅक कंपनीने असा दावा केला की बिग मॅकमध्ये मूलत: १०० टक्के बीफ मीट पॅटी आहे आणि मॅकडोनाल्ड्सनेही आपल्या उत्पादनाची जगभर ओळख तशीच करून दिली आहे. उदा. भारतात गोमांस खाणे हा विषय संवेदनशील असल्याने मॅकडोनाल्ड्सने भारतात आपली पॅटी चिकन किंवा मटण या सारख्या इतर मांसापुरती मर्यादित ठेवली आणि त्याला ‘बिग मॅक’ न म्हणता ‘महाराजा मॅक’ असे नाव देऊन त्याची विक्री केली जाते. इतर देशांतही चिकन पॅटीसाठी मॅकडोनाल्ड्सने आपल्या मेन्यू कार्डमध्ये बिग मॅक या ट्रेडमार्कचा पुरेसा वापर केलेला नाही. सुपरमॅकचा हा युक्तिवाद खोडून काढण्यासाठी मॅकडोनाल्ड्स पुरावा देऊ शकला नाही. मॅकडोनाल्ड्सने युरोपियन युनियनमधील मेनूमध्ये चिकन बिग मॅकवर पुरेसा भर दिला असला तरी, ते कधी केले हे दर्शविणारा पुरावा त्यांच्याकडे नव्हता, कारण मेनूमध्ये तारखा नसतात. ट्रेडमार्कने मॅकडोनाल्ड्सची चिकन बर्गरची विक्री कशी वाढवली हे दाखविण्यात ते अपयशी ठरले.

हेही वाचा – कथा संविधान-बदल आणि इतर खऱ्या-खोट्या कथानकांची…  

थोडक्यात मॅकडोनाल्ड्सने चिकन पॅटी या आपल्या उत्पादनविक्रीमध्ये ‘बिग मॅक’ या ट्रेड मार्कचा पुरेसा वापर केला नाही आणि तो ट्रेडमार्क वापरून चिकन पॅटीची विक्री वाढली हे ते सिद्ध करू शकले नाहीत. सबब ट्रेडमार्क कायद्यातील तरतुदींची पूर्तता न झाल्याने मॅकडोनाल्ड्सला चिकन पॅटी साठी ‘बिग मॅक’ हा ट्रेड मार्क अंशतः गमावावा लागला.

निकालाचा बोध

सुपरमॅक या तुलनेने छोट्या कंपनीने मॅकडोनाल्ड्स या महाकाय बहुराष्ट्रीय कंपनीवर दावा करून अंशतः का होईना कायदेशीर मार्गाने ट्रेडमार्क रद्द करवला. या निकालाने २००९ सालच्या एका निकालाची आठवण होणे स्वाभाविक आहे. तो खटला मॅकडोनाल्ड्सने मलेशियातील ‘मॅक करी’ या एका भारतीयाच्या मालकीच्या अगदी छोट्या आणि एकमेव रेस्टॉरंटविरोधात भरला होता. ‘मॅक’ हा उपसर्ग मॅककरीने लाऊ नये, कारण ‘मॅक’लावण्याचा अधिकार आमचा आहे असा दावा मॅकडोनाल्ड्सने मलेशियाच्या न्यायालयात केला होता. मॅक शब्द हे मलेशियन चिकनचे संक्षिप्त रूप आहे असा मुद्दा मॅक करीने मांडला. शिवाय मॅकडोनाल्ड्सचा ट्रेडमार्क केवळ ‘एम’आहे ‘एमसी’ नाही हा तर्क आणि भिन्न पदार्थांचा व्यापार या तीन आधारांवर मॅककरीने मॅकडोनाल्ड्सच्या दाव्याला कसून विरोध केला. २००१ साली मॅकडोनाल्ड्सने केलेल्या दाव्याचा निकाल २००६ साली मॅकडोनाल्ड्सच्या बाजूने लागला आणि मॅककरीला ‘मॅक’ ही अक्षरे वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्यावर मॅककरीने अपील केले. एप्रिल २००९ मध्ये कोर्ट ऑफ अपीलने २००६ चा निकाल रद्द केला आणि पूर्वस्थिती कायम केली. यावर मॅकडोनाल्ड्स सर्वोच्च न्यायालयात गेले. तीन सदस्यांच्या खंडपीठाने ८ सप्टेंबर २००९ रोजी एकमुखाने निर्णय दिला की मॅकडोनाल्ड्सच्या दाव्यात कोणतेही तथ्य नाही. मॅक या अक्षरांवर मॅकडोनाल्ड्सचा एकाधिकार असू शकत नाही. अन्य कोणीही मॅकडोनाल्ड्सपेक्षा भिन्न खाद्यपदार्थ पुरविण्याचा धंदा करत असेल तर त्याला मॅक ही अक्षरे वापरण्यास प्रतिबंध करता येणार नाही.

ट्रेडमार्क, पेटंट्स असे बौद्धिक संपदा अधिकार मिळवून बाजारात एकाधिकारशाही मिळवायची आणि त्या जोरावर छोट्या स्पर्धकांना बाजारात प्रवेश करू द्यायचा नाही या वृत्तीला ‘सुपरमॅक’ काय किंवा ‘मॅक करी’ काय यांनी चाप लावला. ही कायदेशीर लढाई पैसा, कायदेशीर ज्ञान व तज्ज्ञता, वेळेची उपलब्धता अशा सर्वच बाबतींत विषम होती. परंतु मॅकडोनाल्ड्सचा दावा अवाजवी होता. ट्रेडमार्कमुळे मिळणाऱ्या एकाधिकाराचा, तो वापरण्याच्या गैरहेतूचा विचार या खटल्यात झाला. त्यातून मॅकडोनाल्ड्ससारख्या कंपन्यांना योग्य संदेश मिळेल आणि आणि लहान उद्योगांना प्रोत्साहन मिळेल अशी अशा करू या…

vgovilkar@rediffmail.com