महाराष्ट्राची राज्यभाषा असलेल्या मराठीचा स्वत:च्या राज्यातच अस्तित्वाचा संघर्ष सुरू आहे. या अटीतटीच्या काळातच मराठी भाषेचं व्याकरण, शुद्धलेखन, मराठीचं भाषाशास्त्रीय सौंदर्य यावर आयुष्यभर काम करणार्या डॉ. प्रा. यास्मिन शेख यांचं निधन झालं. भाषेचा सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे याचं सातत्याने भान देणार्या या व्रतस्थ भाषाप्रेमी विदुषीला आदरांजली.
मुंबईमध्ये एका चर्चासत्रानिमित्ताने माझी प्रा. यास्मिन शेख यांच्याशी ओळख झाली. चर्चासत्रातला त्यांचा सहभाग लक्षात राहिला होता. येताना मुंबई-पुणे प्रवासात त्यांच्याशी छान गप्पा झाल्या. भाषेचे नियम काटेकोरपणे जपणार्या यास्मिनताई या भाषेमुळे जुळणारे भावबंधही जपणार्या आहेत, याचा प्रत्यय आल्यामुळे त्यांच्याविषयी विशेष कुतूहल वाटले. पुढे पुण्यामध्ये विशेषत: मराठी अभ्यास परिषद या संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये त्यांची भेट होत राहिली. त्या मुंबईच्या एस. आय. ई. एस. महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक होत्या. श्री. पु. भागवत यांच्या सहकारी प्राध्यापक होत्या. भाषाशास्त्र आणि व्याकरण यांचा त्यांचा उत्तम अभ्यास आहे… वगैरे माहिती मिळत गेली. व्याकरणाच्या प्राध्यापकाच्या सांकेतिक प्रतिमेत त्या बसत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्याविषयीचे कुतूहल वाढतच गेले.
२००७ साली यास्मिनताईंचा ‘मराठी शब्दलेखन कोश’ प्रकाशित झाला. मराठी अभ्यास परिषदेचा भाषाविषयक लेखन पुरस्कार त्या कोशाला समारंभपूर्वक देण्यात आला. त्यावेळी मी परिषदेची कार्यवाह होते. त्यामुळे त्यांच्या संशोधनकार्याचे मोल मला जाणून घेता आले. खरंतर, याआधीच त्यांनी मराठी लेखन मार्गदर्शिका हे पुस्तक राज्य मराठी विकास संस्थेतर्फे लिहिले होते. सर्वसामान्यांना मराठीत लेखन करताना उपयोगी पडणारे असे ते पुस्तक होते. ते पुस्तक वाचताना यास्मिनताईंमधील जातिवंत शिक्षकाचे दर्शन घडते. त्यांनी त्यात नियमांची जंत्री दिली नाही.
लेखनविषयक नियम सोप्या भाषेत उकलून सांगितले आहेत. भरपूर उदाहरणे दिली आहेत. तक्ते दिले आहेत. अपवाद नोंदवले आहेत. ‘मुळात ज्याअर्थी एखाद्याला भाषा बोलता येते, त्याअर्थी त्याने भाषेचे व्याकरण आत्मसात केलेले असतेच!’ अशा भूमिकेतून त्यांनी वाचक आणि भाषक यांचा आत्मविश्वास वाढवला आहे, हे फार महत्त्वाचे आहे. १९७२ मध्ये ‘मराठी साहित्य महामंडळ’ या समितीने तयार केलेले १८ लेखनविषयक नियम रूढ व्हायला या पुस्तकाचा नक्कीच उपयोग झाला. भाषेतील काना-मात्रा-वेलांटीतील सूक्ष्मता त्यातून उलगडली गेली.
व्याकरण हा विषय आवडीने अभ्यासण्याकडे यास्मिनताईंचा कल लहानपणापासूनच होता. स. प. महाविद्यालयात शिकत असताना व्याकरणाच्या तासाला वर्गात दामले यांचा व्याकरणाचा ग्रंथ जवळ बाळगणार्या त्या एकमेव होत्या. त्यांना मराठी भाषा व व्याकरण शिकवणार्या श्री. म. माटे सरांविषयी खूप आदर होता आणि आत्मीयताही होती. त्यांनी ‘अंतर्नाद’ (मार्च २००८) मासिकात श्री. म. माटेसरांविषयी लिहिले आहे, ते असे, ‘स्त्रियांवर होणार्या अन्यायाने ते व्यथित होत, संतापत ते म्हणत, ‘मला खात्री आहे. पुरुषांइतक्याच स्त्रियाही बुद्धिमान आहेत. तेव्हा मुलींनो, धीटपणे पुढे या आणि काहीतरी करून दाखवा.’ विषय शिकवताना हे वेगळ्या अर्थाने विषयांतर असेलही. पण विषयाच्या अनुषंगाने आम्हा मुलींची अस्मिता जागृत करण्याचा, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असे; तो आम्हांला फार मोलाचा वाटे.
अशा साहित्यविषयक आणि जीवनविषयक प्रगल्भ जाणिवा तरुणपणीच जाग्या झालेल्या यास्मिनताई यांनी आयुष्यभर स्वत:ला कामात अक्षरश: झोकून दिले. बालभारतीमध्ये मराठी पाठ्यपुस्तकांचे संपादन करणे, कार्यात्मक व्याकरणासाठी पुस्तकनिर्मितीत सहभाग घेणे, अशी भाषाशिक्षणाचा पाया मजबूत करणारी कामे त्यांनी मोठ्या प्रमाणावर केली. त्यांचे मराठी भाषेवर प्रेम होते. मात्र फक्त प्रेम असून पुरत नाही, भाषेचा शास्त्रशुद्ध अभ्यास, तोही सतत करणे, भाषेसाठी क्रियाशील राहून सर्वसामान्यांशी संवाद साधणे, त्यांचे शंकासमाधान करणे अशी अनेकपदरी कामे त्या करीत राहिल्या.
अंतर्नाद मासिकाच्या व्याकरणविषयक सल्लागार म्हणून काम पाहात राहिल्या. २०२२ मध्ये वाचकांसाठी ‘लोकसत्ता’ मधून वर्षभर ‘भाषासूत्र’ हे सदर लिहीत राहिल्या. आपले शतकभराचे आयुष्य ध्यास मराठीचा, श्वास मराठीसाठी अशा व्रतस्थ वृत्तीने जगत राहिल्या. मान मोडून काम करत राहिल्या. प्रमाणभाषेचा आग्रह करताना त्यांची दृष्टी भाषेची सार्वकालिक आवाहन करण्याची क्षमता टिकावी ही होती. ही दृष्टी जितकी शास्त्रीय तितकीच व्यापकही होती. त्याच वेळी प्रसंगी भाषेची उलटतपासणी करण्याची गरज लक्षात आणून देणारे प्रसंगही त्यांनी प्रांजळपणे सांगितले आहेत. ‘मूर्तिमंत मराठीप्रेम’ या भानू काळे आणि दिलीप फलटणकर यांनी संपादित केलेल्या त्यांच्यावरच्या पुस्तकात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू प्रकट झाले आहेत. त्यातला एक अनुभव बोलका आहे. तो असा :
अन्य भाषक विद्यार्थ्यांना मराठी शिकवताना त्यांनी ‘सुरेश नवा सदरा घालतो.’ हे वाक्य भूतकाळी करायला सांगितले. तेव्हा एकाने सांगितले, ‘सुरेशने नवा सदरा घालला.’ तेव्हा ‘घाल’ या धातूचे वर्तमानकाळी क्रियापदाचं रूप घालतो, असे होतं. पण भूतकाळी ‘घालला’, असे न होता ‘घातला’ असे होते. माझ्या भाषेबद्दलचं माझं अज्ञान एकदा उघडं पडलं, असं त्या प्रांजळपणे मान्य करतात. विद्यार्थ्यांच्या चुका या केवळ लाल रेषा मारून विसरून जायच्या नसतात. आपली भाषा तर्काच्या पकडीतून कधी कधी कशी निसटते, त्या जागा त्यांच्या चुकांमधून समोर येत असतात. ही शिक्षकाची मोकळी दृष्टी त्यांच्या या उद्गारातून दिसते. यामुळेच त्या ‘लोकशिक्षक’ पदापर्यंत पोहोचल्या.
आपल्या ‘मराठी शब्दलेखन कोशांची’ दुसरी आवृत्ती काढताना यास्मिनताईंनी कोश सुधारित -अधिकाधिक परिपूर्ण होण्यासाठी श्रम घेतले आहेत. त्यात परिशिष्टांची भर घातली आहे. मराठीत रूढ झालेल्या इंग्लिश शब्दांचे लेखनही त्यात समाविष्ट केले आहे. भाषा कालानुरूप बदलणार, हे तत्त्व त्यांनी गृहीत धरले होते, मात्र भाषेचा आदर राखण्यासाठी मराठीचे प्रामाण्य (प्रतिष्ठा, मान्यता) लेखनात टिकले पाहिजे तरच ती ज्ञानभाषा होऊ शकणार; ही त्यांची भूमिका होती.
ज्ञानभाषेत अपेक्षित असलेले ‘तंतोतंत’ अर्थ व्यक्त करण्याची क्षमता नियमांच्या पालनामुळे येते. यासाठीच तर त्या आपली लेखणी झिजवत राहिल्या! ‘स्वर्गीय’ आणि ‘स्वर्गवासी’ अशा वरवर सारख्या दिसणार्या शब्दांमधले अर्थदृष्ट्या असलेले अंतर लक्षात आणून देत राहिल्या. त्याच वेळी आपल्या क्षेत्रात नव्याने भर टाकणार्या अभ्यासकांचे स्वागतही करत राहिल्या. त्यांच्या ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ या पुस्तकानंतर सलील वाघमारे यांनी ‘मराठी भाषा: लेखन – मार्गदर्शन’ हे पुस्तक काही वर्षांपूर्वी लिहिले. तेव्हा त्या पुस्तकाचे स्वागत करताना त्यांनी लिहिले आहे, ‘या पुस्तकातील विशेष उल्लेख करावा असा लेख म्हणजे अक्षरांतील, शब्दांतील, विरामचिन्हांतील अंतर (स्पेस) हा लेख… संगणकीय लेखनासाठी हा लेख अत्यंत उपयुक्त आहे.’ अशा कालानुरूप बदलणार्या भाषेच्या गरजा त्यांनी अचूक पारखल्या होत्या. यास्मिनताईंना त्यांच्या कार्यासाठी पुरस्कार मिळाले. मानसन्मान मिळाले. त्यांची मूळची ओळख ‘जेरुषा रुबेन’, विवाहानंतरची ओळख होती ‘यास्मिन शेख.’
मराठीच्या पारंपरिक संस्कृतीत न बसणारी ही ओळख त्यांना कधीकधी कटू अनुभवही देत राहिली. मात्र त्या स्वत: अशा संकुचित रिंगणांच्या पलीकडे, मनाने पोहोचल्या होत्या. २१ जूनला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करताना त्यांच्या जन्मदिनी त्यांची आठवण ‘भाषायोगिनी’ अशीच मनात येते. आपल्या मातृभाषेवर प्रेम करा, असा संदेश पुस्तकावर देणार्या नि नांदी साहित्य संमेलनात सर्वांना भरभरून शुभेच्छा देणार्या यास्मिनताई जणू मराठी भाषेतल्या अक्षरांच्या लपेटीत प्रतिमा बनून चिरंतन राहतील, असे वाटत राहते.
