सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील चिकमहुद आणि कटफळ ही एकमेकांपासून सात किलोमीटरवर असलेली गावे. पण त्यांच्यातील समृद्धीचे अंतर मात्र आता दरीएवढे झाले आहे. ऊस आणि भाजीपाला लागवडीकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देणारे उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे.
‘पाणी उसासाठी की ज्वारी बाजरी, डाळी अशा ‘पिकांसाठी’ हा वाद महाराष्ट्रात अनेक दशके सुरू आहे. या पिकांच्या दहा पट पाणी उसाला लागते. उसाचे वाढते क्षेत्र आणि घटणारी भूजल पातळी याचा परस्पर संबंध असणे, सातत्याने ऊस घेतल्याने जमिनी खराब होणे हासुद्धा नेहमीच्या चर्चेचा विषय. त्यासंदर्भात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चिकमहुद आणि कटफळ या दोन गावांच्या प्रातिनिधिक कहाण्या व्यापक सत्याकडे बोट दाखवतात.
ही दोन्ही गावे एकमेकांपासून सात किलोमीटर अंतरावर. त्यापैकी चिकमहुदमध्ये उसाखालील क्षेत्र फार मोठे. त्याचे मुख्य कारण त्या गावाला कॅनॉलद्वारे सिंचनाची झालेली सोय. कटफळ मात्र मजुरांचे गाव म्हणून परिचित. तिथे ज्वारी बाजरीसारख्या पिकांची फक्त हंगामीच शेती होत असे. म्हणजे कोरडवाहू गाव. इतर गावांमध्ये मजुरी करणे हा गावातील भूमिहीनांचाच नाही तर शेतकऱ्यांचाही मुख्य व्यवसाय.
एक दशकापूर्वी दसऱ्यानंतर कटफळ गाव ओस पडलेले दिसले असते. तेव्हा अनेकजण ऊस तोडणी कामगार म्हणून सांगली कोल्हापूर भागात जात, तर काहीजण मेंढपाळ म्हणून भटकंती करत. वसई-विरार भागात बांधकाम मजूर म्हणून जाणाऱ्या लोकांची संख्याही खूप मोठी. पण आज कटफळ गावातून कोणीच बाहेर कामासाठी जात नाही. उलट हे गाव रोजगार देण्यासाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले आहे. या गावात शेतीतील कामासाठी शेजारपाजारच्या गावांतून लोक येत आहेत. गावात आलेली समृद्धी नजरेत भरणारी आहे. घरोघरी दुचाकी आहेत. २०० पेक्षा जास्त चारचाकी वाहने आहेत. याचे कारण या गावात झालेली सिंचनाची सोय.
पण सिंचनाची सोय तर चिकमहुद गावातही आहे. तिथे तर पाणी देणारा कॅनॉल आला. आणि उसाची लागवड सुरू झाली. तिथे का नाही इतका मोठा रोजगार निर्माण झाला? तिथे का नाही अशी समृद्धी दिसत? चिकमहुदला जसा सिंचन देणारा कॅनॉल आला तसा कॅनॉल कटफळला आला असता आणि तिथले शेतकरी उसाकडे वळले असते तर गावात एवढा रोजगार उपलब्ध झाला असता का ? समृद्धी दिसली असती का, याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. कटफळचे लोक उसाकडे वळणे सहज शक्य होते. ऊस लागवडीचे तंत्रज्ञान प्रचलित आहे. उसाचे बाजारभाव स्थिर असतात. कारखाना ऊस तोडून घेऊन जातो. उत्पन्नाची हमी असते. पण शेतकरी उसाकडे वळले नाहीत. ते वळू शकले नाहीत. कारण कटफळला सिंचन देणारा कॅनॉल नाही मिळाला. त्यांना पाणी मिळाले ते जलसंधारणातून. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवून.
कटफळच्या जवळ ब्रिटिश काळातील राजेवाडी तलाव आहे. ज्या वर्षी पाऊसमान चांगले त्या वर्षी तो भरत असे. त्या तलावातून गावाच्या ओढ्याला पाणी सोडले जात असे. परंतु हे सर्व पावसावर अवलंबून होते त्यामुळे बागायती शेती करणे मोठे जोखमीचे आणि काही वेळा अशक्यही. अशात आठ-दहा वर्षांतील दोन-तीन वर्षे हमखास कमी पावसाची किंवा दुष्काळाची. हे चित्र बदलले ते जलसंधारणाची कामे सुरू झाल्यावर. ओढ्याची रुंदी आणि खोली वाढवली गेली. ओढ्यावर आणि इतरत्र बंधारे बांधले गेले. पावसाचे पाणी साठू आणि जिरू लागले. विहीर आणि बोअरच्या पाण्याची पातळी वाढली. आणि गावाच्या कधी काळी वाहणाऱ्या जुन्या कासाळगंगा ओढ्याचे नामकरण आता कासाळगंगा नदी असे झाले. गावातील शेतकरी भाजीपाल्याकडे वळले. मुख्य पीक म्हणजे ढोबळी मिरची. शेतकरी म्हणतात गावात समृद्धी आली ती या मिरचीमुळे.
आज तीन हजार लोकवस्तीच्या या गावामध्ये ३०० एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर ढोबळी मिरची पिकवली जाते. वर्षभरातील ढोबळी मिरचीचे हंगाम लक्षात घेतले तर हे क्षेत्र खूप मोठे वाढले आहे असेही लक्षात येते. अगदी पूर्वी केवळ नावावर शेती आहे म्हणून शेतकरी म्हटल्या जाणाऱ्या शेतमजुरापासून ते डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनी हे पीक स्वीकारले आहे. चिकमहुद या शेजारच्या गावामध्ये ऊस शेती बहरलेली असताना हे शेतकरी मात्र ढोबळी मिरचीकडे का वळले असावेत हा कोणत्याही अभ्यासकाला प्रश्न पडू शकतो. ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेणे हे फारच महत्त्वाचे ठरते.
चिकमहुद या गावाला कॅनॉल सिंचन असल्यामुळे त्या ठिकाणी उसाची शेती आणि त्या अनुषंगाने एक परिसंस्था तयार झाली. परंतु कटफळमध्ये वर्षभर पुरेल एवढे पाणी उपलब्ध होण्याची शक्यताच मुळात कमी त्यामुळे ऊस शेती शक्य नाही हे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्याचबरोबर ज्वारी, बाजरी पिकवून समृद्धी मिळणार नाही हा अनुभव गाठीशी असल्याने कटफळच्या शेतकऱ्यांनी उसापेक्षा खूप कमी पाणी लागणारे आणि चार- पाच महिन्यांत येणारे ढोबळी मिरची हे पीक स्वीकारले. शेतकरी ढोबळी मिरचीची लागवड पावसाळ्यात सुरू करतात जेणेकरून पाऊस आणि भूगर्भातील पाणी या दोन्ही माध्यमातून पिकाची पाण्याची गरज भागविता येते. हाच निर्णय त्यांच्या समृद्धीसाठी कारण ठरला.
ढोबळी मिरची हे पीक त्यांच्यासाठी एवढे महत्त्वाचे का? एक : चार-पाच महिन्यांत एकरी ३५- ४० टन उत्पादन देऊ शकते. दोन : उसाच्या तुलनेत पाण्याची गरज कमी. तीन : विक्रमी उत्पादनवाढीसाठीचे तंत्रज्ञान उपलब्ध. चार : पाण्याच्या उपलब्धतेनुसार हंगामाचे नियोजन करणे शक्य असते. म्हणजे वर्षभरात केव्हाही हे पीक घेता येते. आणखी महत्त्वाचे म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी ते पीक स्वीकारल्यामुळे आकाराला आलेली ‘परिसंस्था’. गावात ढोबळीसाठी कीटकनाशके, खते विकणारी दुकाने आली. एवढ्या मालाचे उत्पादन होणार म्हटल्यावर व्यापारी गावापर्यंत यायला लागले. लोकांनी ढोबळी वाहून नेण्यासाठी टेम्पो विकत घेतले. हे सगळे या ‘परिसंस्थे’चे घटक. अगदी मागील पाच-सात वर्षांपूर्वीपर्यंत ज्या गावातील भूमिहीन आणि शेती असणारे ज्या गावात मजुरीसाठी जात, त्यात ऊसशेती असलेल्या चिकमहुद या गावाचाही समावेश होतो. पण आज चिकमहुद या गावातूनही हंगामात दररोज ४०-५० मजूर या गावात मजुरीसाठी येतात. हे घडते कारण ढोबळी मिरचीचे उत्पादन श्रमसघन (लेबर इंटेन्सिव्ह ) आहे. एक एकर ढोबळी मिरचीमध्ये साधारण २०० पेक्षा जास्त मजूर दिवस (मॅन डेज) काम उपलब्ध होते. तीन हजार लोकसंख्या असलेल्या कटफळ गावात ढोबळीखाली असलेले किमान ३०० एकर आणि त्यासाठी लागणारे एकरी २०० मजूर दिवस असा हिशोब केला तर हे एक पीक किती लोकांना रोजगार उपलब्ध करून देते याचा अंदाज येतो. त्याचबरोबर कटफळ गावात ढोबळीची रोपे विकणाऱ्या दोन नर्सरी आहेत. नर्सरी व्यवसायही श्रमसघन व्यवसाय आहे. त्यातही रोजगार उपलब्ध झाला आहे.
ढोबळी मिरची आणि त्या अनुषंगाने वाहनांची संख्या असा विचार केला तर आज कटफळमध्ये माल वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनांची संख्या २० पेक्षा जास्त आहे जी पूर्वी केवळ दोन होती. २०० पेक्षा जास्त लोक वसई-विरार येथे बांधकाम मजूर म्हणून जात होते त्यांची संख्या आज केवळ ३०-४० एवढीच आहे. आज गाव ओस पडत नाही तर तिथे गजबजाट आहे. ढोबळी मिरची पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादनासाठी आवश्यक तंत्रज्ञानाची ओळख झाल्यामुळे त्यांना अशाच प्रकारची पिके घेणे व्यवहार्य वाटते. त्यामुळे कलिंगड, खरबूज, काकडी यासारख्या हंगामी परंतु विक्रमी उत्पादनाची आणि त्यामुळे मोठ्या उत्पन्नाची शक्यता असणाऱ्या पिकाखालील क्षेत्रात तुलनेत मोठी वाढ होत आहे.
पूर्वीच्या पारंपरिक ज्वारी, बाजरीसारख्या पिकाच्या उत्पन्नाची तुलना ढोबळीतून मिळालेल्या उत्पन्नाशी कशी कराल असे विचारता शेतकऱ्यांनी हसणे आम्हाला अपेक्षित होते. पण उसापासून मिळणारे आणि ढोबळीपासून मिळणारे उत्पन्न यांची तुलना शेतकऱ्यांना हास्यास्पदच वाटते हेसुद्धा विशेष. ही बाब पाणी उसासाठी की इतर पिकांसाठी, या वादाला एक वेगळे परिमाण देते.
पाण्याचा प्रत्येक थेंब फक्त जास्त समृद्धी निर्माण करणाऱ्या पिकासाठीच नाही तर त्या समृद्धीचे वाटप रोजगार निर्मितीद्वारे जास्त लोकांमध्ये करणाऱ्या पिकासाठी वापरला गेला पाहिजे, हेच आपले धोरण हवे. भाजीपाला उत्पादनात ही क्षमता आहे. कटफळ हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशी अनेक गावे आपल्याला दिसतील. पण अशा समृद्धीची क्षमता असणारी पण चुकीच्या धोरणामुळे तिच्यापासून वंचित राहिलेली हजारो गावे आपल्याला दिसणार नाहीत. ती दिसायला हवीत.
चिकमहुदमधील ऊस शेतीमध्ये भावातील स्थैर्यामुळे कमी जोखीम, कमी समृद्धी आणि कमी रोजगारनिर्मिती असा विकास दिसतो. याउलट कटफळ गावात जास्त जोखीम आणि समृद्धीही किती तरी जास्त आणि तिचे वाटपही कितीतरी जास्त लोकांमध्ये अशी विकास प्रक्रिया दिसते. महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाची दिशा कटफळकडे जाणारी नको का ? आणि त्यासाठी पाणी उसासाठी की जास्त समृद्धी आणि तिचे जास्त वाटप करणाऱ्या पिकांसाठी असा प्रश्न उपस्थित व्हायला नको का ?
शेतीविषयाचे अभ्यासक
milind.murugkar@gmail.com
satishkarande_78@rediffmail.com
