प्रकाश अकोलकर

उद्धव यांच्यासाठी ही लढाई सोपी बिलकूलच नव्हती. पक्ष, चिन्ह त्यांच्या हातातून गेले होते. घराघरांत ‘मशाल’ ही निशाणी पोहोचवण्यापासून त्यांच्यापुढले आव्हान हे सुरू होणार होते. पण ते लढले, नुसतेच लढले नाहीत, तर महाविकास आघाडीचा चेहरा बनले. ‘ठोकशाही’चा बाज बदलूनही यश मिळू शकते, हे उद्धव यांनी या निवडणुकीत दाखवून दिले…

सरदारकीच्या मोहात पडून साम्राज्य गमावल्याच्या कहाण्या मराठी माणसाला नव्या नाहीत. मराठेशाहीच्या आणि पेशवाईच्या इतिहासात अशा अनेक कहाण्या पानापानांवर बखरकारांनी रंगवल्या आहेत. त्या वाचताना मन विदीर्ण होऊन जातं. मात्र, या एकविसाव्या शतकातही तशाच कहाण्या प्रत्यक्ष घडताना बघायला मिळतात आणि महाराष्ट्राची खालावलेली इभ्रत मनाला डसत राहते.

शिवसेनेत मोठी फूट पाडून एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि मुख्यमंत्रीपदाची सरदारकी त्यांना खूश करून गेली. मात्र, ही आपली सत्त्वपरीक्षा आहे, याचं जराही भान त्यांना उरलं नव्हतं. उलट, त्यांच्याच भाषेत सांगायचं तर देशातील एक महाशक्ती आपल्या पाठीशी असल्याचं ते तारस्वरात सांगत होते. थोडक्यात, शिंदे महोदयांचा रथ जमिनीपासून चार अंगुळे वरूनच चालू लागला होता! त्यानंतर अल्पावधीतच अजित पवार यांनाही ही तथाकथित ‘महाशक्ती’ आपल्याही पाठीशी उभी राहावी, असं वाटू लागलं आणि तेही सरदारकीच्या मोहात सापडले. शिंदे काय किंवा अजित पवार काय, या दोघांनाही या ‘महाशक्ती’ची खरी ताकद लक्षात आणून देण्याचं काम यंदाच्या लोकसभा निवडणुकांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार ‘नकली सेना’ म्हणून हिणवलेल्या आणि ‘शिल्लक सेना’ म्हणून भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी गेली दोन वर्षं टर उडवलेल्या उद्धव ठाकरे यांनी केवळ मुंबईतलाच नव्हे तर राज्यभरातील मराठी माणूस आपल्या पाठीशी आहे, हे दाखवून दिलं आहे. शिवाय, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने या ‘असली’ तसेच ‘नकली’ शिवसेनेच्या वादासंदर्भात दिलेल्या निकालाच्या थेट विरोधी निर्णय देणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचंही पितळ उघडं पडलं आहे. ‘या न्यायालयाच्या बाहेरही एक न्यायालय आहे…’ या लोकमान्य टिळकांच्या ऐतिहासिक उद्गाराचं स्मरण त्यामुळेच या वेळी अनुचित ठरत नाही.

हेही वाचा >>>पवार फिरले… निकालही फिरला!

मराठी माणसाची साथ

अर्थात, उद्धव यांच्यासाठी ही लढाई सोपी बिलकूलच नव्हती. ‘धनुष्य-बाण’ या निशाणीच्या रूपात उद्धव यांच्या हाती असलेलं ‘ब्रह्मास्त्र’ निवडणूक आयोगानं शिंदे यांच्या गटाच्या खांद्यावर दिलं होतं. तर शिवसेनेसाठी गेली किमान दोन-अडीच दशकं जिवाची बाजी लावणारे चाळीसहून अधिक शिलेदार एकनाथ शिंदे यांनी महाशक्तीची करामत आणि सरकारी चौकशी यंत्रणांची साथ यांच्या जोरावर पळवून नेले होते. शस्त्रही नाही आणि सैन्यही नाही, अशा अवस्थेत उद्धव लढले आणि त्यांना खऱ्या अर्थानं साथ दिली, ती या फोडाफोडीच्या अनैतिक राजकारणाला विटलेल्या मराठी माणसानं. त्यातही मुंबईत उद्धव यांच्या ‘नकली सेने’लाच अभूतपूर्व म्हणता येईल असा पाठिंबा केवळ मराठीच नव्हे तर अन्य भाषकांबरोबरच दलित आणि मुस्लीम यांनीही दिला. यामुळेच मुंबईत लढवलेल्या चारपैकी तीन जागा तर ते जिंकू शकले. त्यापैकी दोन मतदारसंघांत तर त्यांनी शिंदे यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि तिसऱ्यात शिंदे-सेनेची पार दमछाक झाली.

उद्धव यांच्यासाठी ही लढाई आणखी एका कारणानं अवघड करून सोडण्यात आली होती. शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या पक्षांतरानंतर आजवर कधीही न केलेला दावा या फुटीर गटाने केला होता आणि तो ‘आमचाच पक्ष हा मूळ पक्ष आहे!’ असा अभूतपूर्व होता. निवडणूक आयोगानंही त्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. निशाणी हातातून गेलीच होती. मात्र, जनतेची सहानुभूती त्यांच्या बाजूने होती. एका अर्थानं ही ‘सिम्बॉल व्हर्सेस सिम्पथी’ अशी लढाई होती. बाळासाहेब आणि उद्धव यांची शिवसेना म्हणजेच ‘धनुष्य-बाण’ अशी घट्ट प्रतिमा मराठी माणसाच्या मनावर कोरली गेली होती. त्यामुळे या निवडणुकीत उद्धव आणि त्यांचे सहकारी ‘गद्दार, खोके’ अशी भाषा सातत्याने जरूर करत होते. मात्र, त्यांच्यापुढे खरे आव्हान हे घराघरांत ‘मशाल’ ही निशाणी पोहोचवण्याचेच होते. निवडणुकीतील मुद्दे, जनतेचे प्रश्न, नरेंद्र मोदी सरकारची तथाकथित ‘गॅरण्टी’ची भाषा आदी साऱ्या बाबी त्याच्यासाठी गौण होत्या आणि हे काम ‘निष्ठावान शिवसैनिकां’नी अगदी ‘अरे, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!’ हे गीत मनातल्या मनात गुणगुणत अगदी ध्येयाने केले. त्यामुळेच हे यश त्यांच्याकडे चालून आलं आहे.

ठाणे मात्र गमावले…

कोकणात सिंधुदुर्ग- रत्नागिरी- रायगड इथला प्रभाव उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लोकसभेपुरता गमावला आहे. त्याहीपेक्षा, मुंबईनजीकचे ठाणे आणि कल्याण हे दोन इलाखे मात्र उद्धव यांना जिंकता आले नाहीत. बाळासाहेब ठाकरे ‘शिवसेनेचं ठाणं’ असा कौतुकानं उल्लेख करत असलेला हा गड उद्धव यांना गमवावा लागला आहे. शिंदे यांच्यासाठी ही फार मोठी दिलासा देणारी बाब आहे. अन्यत्र मोठा पराभव पदरी येत असताना, ठाणेही गमवावे लागले असते तर त्यानंतर या तथाकथित ‘महाशक्ती’ने महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर उभ्या केलेल्या नव्या नेपथ्याला मोठेच भगदाड तर पडले असतेच; शिवाय, त्यांचा या नव्या रंगमंचावरील दबदबाही पुरता विरून गेला असता. त्यामुळेच ‘शिवसेनेचे ठाणे’ गमावल्याचे हे शल्य आता उद्धव यांच्या मनात कायमचे राहणार, यात शंकाच नाही. त्यापलीकडची आणखी एक बाब अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे या अटीतटीच्या लढाईत उद्धव हे महाराष्ट्रात ‘महाविकास आघाडी’चा चेहरा बनले.

बाळासाहेब ठाकरे यांनी ‘हिंदुत्वाची भगवी शाल’ १९८०च्या दशकाच्या उत्तरार्धात खांद्यावर घेतली आणि ‘मराठी बाणा’ हा शिवसेनेची केवळ एक पताका म्हणून शिल्लक राहिली. बाळासाहेबांचा हा ‘बाणा’ उद्धव यांनी आरपार बदलून टाकला. मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढच्याच महिन्यात नागपूर येथे झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यांनी ‘राजकारणाची धर्माशी घातलेली सांगड आम्हाला महागात पडली आणि त्याचे फटकेही बसले!’ असा जाहीर कबुलीजबाब दिला होता. एका अर्थाने बाळासाहेबांच्या भूमिकेशी त्यांनी पंगाच घेतला होता.

पक्षाचा बदलता बाज…

या पार्श्वभूमीवर ते नव्या बाजाची शिवसेना उभी करू पाहत होते. तो बाज सोबत घेऊन आणि शिवाय ‘मातोश्रीच्या अंगणात खेळणारा मुख्यमंत्री’ असे टोमणे रोजच्या रोज ऐकून घ्यावे लागत असलेला हा नेता अनपेक्षितपणे या निवडणुकीत पायाला भिंगरी लावून राज्यभर फिरत. या आघाडीचे नेते अर्थातच शरद पवार होते. मात्र, वय आणि प्रकृतिअस्वास्थ्य यामुळे त्यांच्या प्रचारावर मर्यादा आल्या होत्या. तरीही त्यांचा संचार राज्यभर होताच. पण या महाविकास आघाडीचा या निवडणुकीत खऱ्या अर्थाने चेहरा उद्धवच होता. या यशामुळे त्यांना आता राष्ट्रीय राजकारणातही मोठे वजन प्राप्त होणार, हे सांगायचीही गरज नाही.

अर्थात उर्वरित महाराष्ट्रात ‘नकली शिवसेना’ म्हणून हिणवल्या गेलेल्या या शिवसेनेच्या ‘असली’ रूपाला जनता जनार्दनाने जो काही कौल दिला आहे, त्यात या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांनी आपापली मतपेढी ‘ट्रान्सफर’ करून मोठाच वाटा उचलला आहे. त्यामुळे यापुढे राजकारण करताना, पूर्वीप्रमाणे आपलेच घोडे दामटून काम करता येणार नाही, हे त्यांच्या ध्यानात आलेच असणार. शिवसेना हा पक्ष हादेखील काही खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी पक्ष कधीच नव्हता आणि बाळासाहेब तर थेट जाहीरपणे ‘ठोकशाही’चा पुरस्कार करत असत. हा बाज बदलूनही यश मिळू शकते, हे उद्धव यांनी या निवडणुकीत दाखवून दिले आहे. त्यामुळे यापुढेही त्यांना त्याच मार्गावरून चालावे लागणार आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मिळालेले मोठे यश हे नरेंद्र मोदी – अमित शहा यांच्या ‘एकाधिकारशाही’च्या विरोधातील लढ्याला मिळालेले यश आहे. त्यामुळे एका अर्थाने हा ‘महाराष्ट्र धर्मा’चाच विजय आहे. मात्र, या यशस्वी पुराणाची फलश्रुती ही केवळ मोजकेच नेते आणि त्यांचे सोबती यांच्यापुरती मर्यादित राहता कामा नये. त्या फलश्रुतीचे फळ सर्वसामान्य जनतेच्या पदरात पडायला हवे. अन्यथा, आज उत्स्फूर्तपणे साथ देणारी ही जनता कधीही विरोधात जाऊ शकते, हे उद्धव वा त्यांचे सहकारी यांच्या लक्षात असेलच!

लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.

akolkar. prakash@gmail.com