ॲड. हर्षल प्रधान
प्रवक्ता आणि जनसंपर्कप्रमुख
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आणि उद्धव ठाकरे यांचे आजोबा. प्रबोधनकारांच्या पुढाकाराने दादर येथे साधारण १९२० च्या सुमारास मारुतीचं छोटं मंदिर उभारण्यात आलं. आज ते गोल देऊळ वा दादरचं मारुती मंदिर म्हणून ओळखलं जातं. ज्या भाजपला बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विषयावर राजकारण करता येऊ शकतं हे दाखवलं, देशातले हिंदू एकत्रितपणे हिंदुत्वासाठी मतदान करू शकतात, हे सिद्ध करून दाखवलं त्याच भाजपाने हिंदूंच्या भावना दुखावून राम मंदिराच्या दानपेटीला आणि हिंदूंच्या मंदिरांना लुटीचं साधन बनवल्याने हिंदूंच्या मनातील संताप संघटित करण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे करू पाहत आहेत आणि त्यासाठी त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांनी उभारलेल्या मारुती मंदिराचं स्थान निवडलं हे इतिहासाचं एक अनोखं वर्तुळ म्हणावं लागेल.

मुंबईतल्या दादर पश्चिमेला, आजच्या गजबजलेल्या बाजारपेठेच्या मध्यभागी उभं असलेलं ‘वडवृक्ष श्री मारुती मंदिर’ हे केवळ एक श्रद्धास्थान नाही, तर मुंबईच्या सामाजिक राजकीय इतिहासाचा एक सांधा आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दादर विभाग रेल्वेने जोडला गेला आणि हळूहळू तिथे बहुजन, सत्यशोधक आणि सामाजिक चळवळींशी बांधील मंडळी वस्तीला आली. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे त्या काळातल्या दादरच्या याच सामाजिक-सांस्कृतिक वर्तुळाचा केंद्रबिंदू होते. सेनापती बापट, आचार्य अत्रे, स. का. पाटील यांच्यासारख्या मंडळींसोबतच याच परिसरात राहणारे प्रबोधनकार हे पत्रकारितेतून समाजसुधारणेचा झेंडा घेऊन लढणारे झुंजार व्यक्तिमत्त्व होते. दादरमधल्या एका प्रशस्त वडाच्या झाडाखाली परिसरातल्या लोकांना विशेष पावित्र्य जाणवत असे. या स्थानाचं महत्त्व ओळखून प्रबोधनकारांच्या पुढाकाराने इथे साधारण १९२० च्या सुमारास मारुतीचं छोटं मंदिर उभारण्यात आलं. वडाच्या मुळाशी मारुतीची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आणि पुढे हळूहळू या जागेला मंदिराचं स्वरूप प्राप्त झालं. १९५२ साली या मंदिराचा विश्वस्त न्यास (ट्रस्ट) नोंदणीकृत झाला आणि तेव्हापासून हे मंदिर व्यवस्थितपणे चालवलं जात आहे. आज मंगळवार आणि शनिवारी इथे भाविकांची मोठी गर्दी असते आणि दादर पश्चिमेतून जाणाऱ्या बसमधूनही प्रवासी खिडकीतून मारुतीचं दर्शन घेतात, इतकं हे मंदिर परिसराच्या नित्य जीवनाचा भाग झालं आहे.

प्रबोधनकारांचं वैशिष्ट्य हे होतं की त्यांनी श्रद्धा आणि विवेक यांचा तोल कधीच ढळू दिला नाही. ‘देवळाचा धर्म की धर्माची देवळे’ असा प्रश्न तेच विचारू शकत होते, या नावाचं एक स्वतंत्र पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. ज्यात त्यांनी मंदिर संस्था आणि धर्म यांच्यातल्या नात्याची परखड चिकित्सा केली आहे. त्याच वेळी त्यांनी दादरमध्ये सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात करून महाराष्ट्रीय पद्धतीने देवीची स्थापना करण्याची परंपराही रुजवली. गुजराती गरबा आणि बंगाली दुर्गापूजा आधीपासून असले तरी मराठी नवरात्र सार्वजनिक स्वरूपात आणण्याचं श्रेय प्रबोधनकारांनाच जातं. मारुती मंदिराच्या उभारणीतही हीच भूमिका दिसते. धर्म हे बहुजनांना एकत्र आणणारं, सामाजिक अभिसरणाचं साधन असावं, पुरोहितशाहीच्या दावणीला बांधलेलं अवजार नसावं. योगायोगाने आता हेच मंदिर, त्यांचे नातू उद्धव ठाकरे यांच्या राजकीय लढ्याचा केंद्रबिंदू ठरलं आहे.

ठाकरेंनी भाजपला दाखवलेली वाट

वडील प्रबोधनकारांकडून वारशाने मिळालेली सामाजिक जाणीव आणि स्वतःची फटकळ, रोखठोक शैली एकत्र आणत बाळासाहेबांनी शिवसेनेला मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून हिंदुत्वाच्या व्यापक राजकारणाकडे नेलं. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा भारतीय जनता पक्ष केंद्रीय राजकारणात चाचपडत होता, दोन खासदारांच्या संख्येतून बाहेर पडण्यासाठी धडपडत होता, तेव्हा बाळासाहेबांनी हिंदुत्वाची भाषा राज्यभर घराघरांत पोहोचवली. ‘गर्वाने सांगा आम्ही हिंदू आहोत’ हा नारा शिवसेनेच्या व्यासपीठावरून घुमू लागला आणि त्याचा प्रभाव इतका होता की भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वालाही महाराष्ट्रात आपली हिंदुत्ववादी ओळख भक्कम करण्यासाठी शिवसेनेच्या याच आक्रमक भाषेचा आधार घ्यावा लागला. बाळासाहेबांचं हिंदुत्व हे भाजपच्या दिल्लीकेंद्री, संघटनात्मक आणि सैद्धांतिक हिंदुत्वापेक्षा वेगळं होतं. ते रस्त्यावरचं, तत्काळ प्रतिसाद देणारं आणि मराठी माणसाच्या रोजच्या जगण्याशी जोडलेलं होतं. त्यामुळेच त्या काळात भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेणं, मातोश्रीवर हजेरी लावणं हे राजकीयदृष्ट्या आवश्यक मानलं. राम मंदिर आंदोलनाच्या काळात हिंदुत्वाच्या राजकारणाला जी धार आली, तिला महाराष्ट्रात परजण्याचं काम शिवसेनेने केलं आणि या अर्थाने बाळासाहेबांनी भाजपच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावली होती.

बाबरी: बाळासाहेबांनी घेतलेली जबाबदारी

बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडली गेली आणि देशभर याचे राजकीय पडसाद उमटले. या घटनेनंतर भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वात मोठी अस्वस्थता पसरली. रामजन्मभूमी आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या अनेक बड्या नेत्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला, मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी, “बाबरी पाडण्यात जर आपले शिवसैनिक सामील असतील तर त्याचा अभिमान आहे आणि त्याची जबाबदारी आपण घेतो” अशी निर्भीड भूमिका जाहीरपणे मांडली. या एका वक्तव्याने राजकीय समीकरणं पालटली. जिथे भाजपचं केंद्रीय नेतृत्व सावधपणे अंतर राखत होतं, तिथे बाळासाहेबांनी कोणतीही लपवाछपवी न करता जबाबदारी स्वीकारली. यामुळे देशभरातल्या हिंदुत्ववादी संघटना, साधू-संत आणि कारसेवकांमध्ये बाळासाहेबांची प्रतिमा ‘हिंदुहृदयसम्राट’ अशी ठसली. ज्या क्षणी हिंदुत्वाच्या राजकारणाची सर्वाधिक जोखीम पत्करण्याची वेळ आली, त्या क्षणी शिवसेनेने पुढाकार घेतला आणि भाजपचे अनेक नेते मागे राहिले. आजच्या भाजपच्या नवशिक्या राजकारणी मंडळींना हा इतिहास सांगण्याची आवश्यकता एवढ्याचसाठी आहे कारण ते ठाकरे यांच्या हिंदुत्वावर अनेकदा शंका उपस्थित करतात आणि ठाकरेंना घराणेशाहीचं राजकारण करणारे नेते म्हणतात.

भाजपला कोंडीत पकडण्याचा डाव

तीन दशकांनंतर, हाच वारसा पुढे नेत उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतल्या राम मंदिर उभारणीसाठी कोट्यवधी भाविकांनी अर्पण केलेल्या देणगीत गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करत थेट रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला. मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हिंदुत्वाचा बुरखा पांघरून राम मंदिराचा पैसा राजकीय सौदेबाजीसाठी आमदार-खासदार फोडण्यासाठी वापरला जात असल्याचा आरोप केला आणि भाजपच्या हिंदुत्वाचा खरा चेहरा उघड करण्यासाठी दादरच्या मारुती मंदिरासमोर ‘रामरक्षा आंदोलन’ पुकारण्याची घोषणा केली.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या एका जुन्या विधानाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, एकेकाळी ‘आता हिंदू मार खाणार नाही’ असं म्हटलं गेलं होतं, पण आज राम मंदिराच्या पवित्र निधीवरच दरोडा घातला जात आहे. त्यामुळे ‘आता हिंदू माफ करणार नाही’. या संघर्षाची सुरुवात दादरच्या मारुती मंदिरापासून रामरक्षा स्तोत्राच्या पठणाने करण्यात येणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. या आंदोलनाचे व्यापक राजकीय परिणाम आहेत.

एकीकडे उद्धव ठाकरे भाजपच्या सत्तेच्या मुळाशीच हात घालत आहेत. कारसेवकांनी आणि शिवसैनिकांनी रक्त सांडून उभं केलेलं राम मंदिर आंदोलन हेच भाजपच्या आजच्या अफाट सत्तेचं मूळ आहे, अशी थेट टीका करत त्यांनी भाजपला आव्हान दिलं. दुसरीकडे, ‘ऑपरेशन लोटस’सारख्या पक्षफोडीच्या राजकारणावरही बोट ठेवलं. लोकशाहीचा खून करणाऱ्या अशा ऑपरेशन्ससाठी पैसा नेमका कुठून येतो? हा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राम मंदिर निधी आणि पक्षफोडीचं राजकारण यांना जोडणारी एक धारदार राजकीय मांडणी केली.

उद्धव ठाकरे कधीही सत्ताधारांच्या ताटाखालचं मांजर झाले नाहीत. उलट भाजपबरोबर सत्तेत असतानाही त्यांनी विरोधकांची जागा भरून काढली आणि त्या सरकारलाही जनतेच्या प्रश्नांवर धारेवर धरलं. २०१९ नंतर ते भाजपचे प्रमुख प्रतिस्पर्धी झाले आणि २०२२ च्या पक्षफुटीनंतर त्यांच्या भाषेतली धार अधिकच तीव्र झाली.

मारुती मंदिराची निवड प्रतीकात्मक

या आंदोलनासाठी दादरचं मारुती मंदिर निवडणं हा योगायोग नाही. हे मंदिर उद्धव ठाकरेंच्या आजोबांनी स्थापन केलं आहे आणि बाळासाहेबांनी उभारलेलं शिवसेना भवन याच परिसरात आहे. हा भाग ठाकरे कुटुंबाच्या तीन पिढ्यांच्या वैचारिक आणि राजकीय वारशाचा भौगोलिक केंद्रबिंदू आहे. अशा जागी आंदोलन उभं करून उद्धव ठाकरे एक स्पष्ट संदेश देऊ पाहत आहेत- हिंदुत्व हे भाजपने विकत घेतलेलं किंवा उसनं घेतलेलं तत्त्वज्ञान नाही तर ते ठाकरे घराण्याच्या तीन पिढ्यांच्या परिश्रमातून प्रबोधनकारांच्या समाजसुधारणेच्या चळवळीतून आणि बाळासाहेबांच्या रस्त्यावरच्या लढ्यातून घडलेलं आहे. मारुती हे बलाचं आणि निष्ठेचं प्रतीक आहे. त्याच मारुतीसमोर उभं राहून ‘रामाच्या नावाने होणाऱ्या भ्रष्टाचाराविरुद्ध’ आवाज उठवणं, हे प्रतीकात्मकदृष्ट्याही सुसंगत आहे.

कट्टर हिंदुत्व विरुद्ध स्वार्थी हिंदुत्व

ठाकरे घराण्याचं हिंदुत्व हे केवळ धार्मिक प्रतीकांपुरतं मर्यादित कधीच नव्हतं. प्रबोधनकारांनी भिक्षुकशाहीविरुद्ध बंड करून सामाजिक समतेचा पाया रचला, बाळासाहेबांनी हिंदुत्वाला रस्त्यावरच्या मराठी माणसाच्या स्वाभिमानाशी जोडलेली भाषा दिली आणि आता उद्धव ठाकरे रामाच्या नावाखाली होणाऱ्या आर्थिक आणि राजकीय अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहेत. या तिन्ही पिढ्यांमध्ये एक समान धागा आहे हिंदुत्व हे सामान्य माणसाच्या न्याय्य हक्कांशी जोडलेलं असावं, ते केवळ सत्तेचं साधन नसावं. म्हणूनच ‘हृदयात राम, हाताला काम आणि शेतमालाला दाम’ ही भूमिका ठाकरेंच्या हिंदुत्वाचं खरं सार मांडते. उद्धव ठाकरे भाजपचं हिंदुत्व स्वार्थी असल्याचा धडधडीत पुरावा देत आहेत, जिथे श्रद्धेचा वापर सत्तासंपादनासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी केला जातो, पण सामान्य भाविक-कष्टकरी माणसाचं हित मात्र दुर्लक्षित राहतं.

दादरच्या त्याच वडाखालच्या मारुतीने गेल्या शंभरहून अधिक वर्षांत मुंबईचा हा प्रवास पाहिला आहे. प्रबोधनकारांच्या समाजसुधारणेपासून ते उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनापर्यंत. हा इतिहास हेच सांगतो की ठाकरे घराण्यासाठी हिंदुत्व हे कधीही केवळ निवडणुकीचं गणित नव्हतं, तर ती एक सलग वैचारिक बांधिलकी आहे आणि तीच बांधिलकी आज पुन्हा एकदा त्याच मारुतीसमोर नव्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सज्ज झाली आहे.