डॉ. अविनाश कांदेकर
हिमनद्या पृथ्वीवरील एकंदर जीवसृष्टीसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत, परंतु हवामान बदलांमुळे त्यांचा वितळण्याचा वेग वाढला आहे. हिमनद्यांच्या वितळलेल्या पाण्यावर अवलंबून असलेल्या साधारण दोन अब्ज लोकांसाठी ही गंभीर समस्या आहे. हिमनद्या अशाच वितळत राहिल्या तर त्यामुळे होणारे हिमस्खलन, येणारे पूर, हिमतलावांचे बांध फुटणे (ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड) यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत राहील व भविष्यात याचे प्रमाण वाढू शकेल.
हिमनदी म्हणजे बर्फाची नदी. ती अतिप्रचंड असा बर्फाचा थर स्वतःच्या वजनाने उताराच्या दिशेने जाणवणार नाही इतक्या हळुवारपणे पर्वतावरून खाली घेऊन येत असते. हिमनदी सामान्य नदी/ ओहोळ यापेक्षा आतिशय कमी वेगाने, म्हणजे दिवसाला साधारण २५ सेंटीमीटर इतक्याच वेगाने वाहते. पृथ्वीवर हिमनद्या या हिमालय, हिंदूकुश, आल्प्स, अँडीज, रॉकीज, कॉकेशस इ. पर्वतरांगावर तयार होतात. याशिवाय ध्रुवीय प्रदेशांत हिमनद्या आहेत. त्यांचा विस्तार अन्य हिमनद्यांच्या तुलनेत अधिक असून तिथे त्या सपाट भागातही आढळतात. जगात दोन लाख ७५ हजारांहून अधिक हिमनद्या आहेत, ज्यांनी सुमारे सात लाख चौरस किमी म्हणजेच पृथ्वीचा १० टक्के भाग व्यापलेला आहे. पृथ्वीवरील गोड्या पाण्याच्या सुमारे ७० टक्क्यांपर्यंतचा साठा हिमनद्यांमध्ये आहे. हिमनद्या वितळण्यामुळे १९०० सालापासून समुद्राच्या पातळीत २० सेंटीमीटर इतकी वाढ झाल्याने गोड्या पाण्याचा साठा कमी होत आहे.
हिमनद्या वितळण्यामागचे कारण आपल्याला भूशास्त्रात मिळते. पृथ्वीच्या निर्मितीपासूनच भूपृष्ठ हा हिमयुग/ हिमानी काळ (ग्लेशियल पिरियड) व आंतरहिमानी काळ (इंटरग्लेशियल पिरियड) अनुभवतो आहे. हिमयुग म्हणजे हजारो वर्षांचा असा कालखंड ज्यामध्ये जागतिक तापमान इतके कमी होते की हिमनद्या उताराच्या दिशेला वाढत जातात (ग्लेशियल ॲडव्हान्समेंट) म्हणजेच त्यांची लांबी-रुंदी वाढते. आंतरहिमानी म्हणजे दोन हिमयुगांदरम्यानचा उष्ण हवामानाचा काळ, ज्यामध्ये हिमनद्या वितळतात, ज्यामुळे त्यांचे पात्र उगमाच्या दिशेने आक्रसते (ग्लेशियल रिट्रीट) आणि त्यामुळे समुद्राची पातळी वाढते. सध्या म्हणजे सुमारे ११ हजार ७०० वर्षांपूर्वीपासून पृथ्वी ही ‘होलोसीन’ या असामान्य व दीर्घ आंतरहिमानी युगात आहे. थोडक्यात पृथ्वीचा उत्पतीपासूनचा हवामान बदलाचा स्वतःचा असा वेग आहे, परंतु सध्याच्या मानवनिर्मित हवामान बदलामुळे (प्रामुख्याने जीवाश्म इंधनांच्या अतिवापरामुळे) आंतरहिमानी काळ पुढील काही हजार ते लाख वर्षांपर्यंत पुढे सुरू राहू शकतो, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. तापमानात कमालीची वृद्धी झाल्यामुळे हिमनद्या व उत्तर-दक्षिण गोलार्धातील हिमावरण दरवर्षी अधिक वेगाने वितळत आहेत. १९९५ पासून समुद्राची पातळी सरासरी ३.२ मिमी/ वर्ष आणि एकूण ७० मिमी (७ सेंमी) पेक्षा जास्त वाढली आहे.
हिमालयात उगम पावणाऱ्या हिमनद्यांचा शेवटचा भाग वेगाने वितळत आहे. इस्रोच्या प्रकल्प निधीतून पुणे विद्यापीठाच्या गटाने उपग्रह प्रतिमांच्या अभ्यासातून १९८८ ते २०२४ दरम्यानचे सिक्कीम परिसरातील हिमनद्यांविषयीचे काही उल्लेखनीय निष्कर्ष निघाले. या ३६ वर्षांत भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) निरीक्षणांनुसार सिक्कीम येथील तापमान १४.७० सेंटिग्रेड वरून १६.१० सेंटिग्रेड इतके वाढले आहे. या तापमानवाढीमुळे उत्तर व पश्चिम सिक्कीम परिसरातील हिमनद्या वितळत आहेत. गेल्या ३६ वर्षांत हिमनाद्यांनी व्यापलेले क्षेत्र ८३० वरून ७२० चौरस किमी एवढे कमी झाले आहे. त्याउलट हिमनद्या वितळून तयार झालेल्या तलावांचे क्षेत्रफळ मात्र वेगाने वाढले आहे. (आलेख पाहावा) या वेगाने जर हिमालयातील हिमनद्यांचे क्षेत्र कमी झाले तर पुढील काहीशे वा हजार वर्षांत हिमालयातील हिमनद्यापासून मिळणाऱ्या शुद्ध पाण्यावर अवलंबून असणाऱ्या अब्जावधी भारत, नेपाळ, चीन, बांगलादेश, भूतान, म्यानमार, अफगाणिस्तान व पाकिस्तानमधील लोकांना पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगांसाठी पाण्याचे दुर्भीक्ष भेडसावेल.

अशीच एक धोक्याची घंटा- ४ ऑक्टोबर २०२३ रोजी वाजली. मुसळधार पावसामुळे सिक्कीमच्या पश्चिम भागातील ‘दक्षिण ल्होनाक’ नावाच्या हिमनदी तलावाचा काठ फुटला. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे मध्यरात्री चुंगथांग गावातील तिस्ता-३ धरणाचा दरवाजा उघडण्यापूर्वीच पाण्याच्या अजस्र लोटाने काही मिनिटांत उद्ध्वस्त झाला. (छायाचित्र पाहावे.) तिस्ता नदीच्या खालच्या भागात पाण्याची पातळी २० फूट (६.१ मीटर) पर्यंत वाढली. या पुरामुळे अंदाजे ९२ लोकांचा मध्यरात्रीच अंत झाला, नदीवरील १५ पूल नष्ट झाले आणि सुमारे ८० हजार रहिवाशांचे प्रचंड नुकसान झाले. तापमान वाढ, हिमनदीचे वेगाने वितळणे आणि हिमोढचा (एन्ड मोरेन) खालील भाग फुटणे ही या विध्वंसाची प्रमुख कारणे होती, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

हवामान बदलावरील आंतरसरकारी समितीने (आयपीसीसी) हिमनद्यांचे वितळणे व हवामान बदलांचे परिणाम कमी करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. जीवाश्म इंधनांऐवजी अक्षय ऊर्जा स्रोतांचा वापर करावा. भारतात २०२४-२०२५ दरम्यान सुमारे ५०.५२ टक्के वीज कोळसा जाळून निर्माण करण्यात आली. त्यामुळे विजेचा कमीत कमी वापर करावा. गृहसंकुलात व घरात सौर ऊर्जा निर्मितीचा प्रयत्न करावा. जास्तीत जास्त वनीकरण करावे आणि ॲमेझॉन, पश्चिम घाट, हिमालयातील जंगलांचे संरक्षण करावे, कारण झाडे प्रकाशसंश्लेषण करताना कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि मातीत साठवून ठेवतात. पर्यावरणपुरक शेती करावी आणि अन्नाची नासाडी होऊ नये, यासाठी प्रयत्न करावेत. वाहनांचा वापर अत्यावश्यक असेल, तेव्हाच करावा. प्लास्टिकचा वापर बंद करावा. २०५० पर्यंत जागतिक कार्बन बजेटमध्ये प्लास्टिकची निर्मिती आणि विल्हेवाट लावण्याचा वाटा १७ टक्के इतका असेल.
मर्यादित वापर, पुनर्वापर, दुरुस्ती आणि पुनर्प्रक्रिया हे सूत्र कायम ध्यानी ठेवावे. पर्यावरणस्नेही इमारती उभाराव्यात. तापमान वाढ १.५० सेंपर्यंत मर्यादित करण्यासाठी आणि वातावरणातील विद्यमान कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण सुरक्षित पातळीपर्यंत आणण्यासाठी कार्बन डायऑक्साइड रिमूव्हल पद्धतींचा वापर करणे आवश्यक आहे. सरकारने गुंतवणूकदारांना व कारखानदारांना हवामान-संबंधित उपाय आणि तंत्रज्ञानामध्ये आर्थिक गुंतवणूक वाढविण्यासाठी विविध योजनांद्वारे प्रोत्साहित केले पाहिजे. सरकारने पर्यावरणपूरक सुसंवादी धोरणे तयार करणे, पर्यावरणीय नियम कडक करणे आणि सार्वजनिक व कॉर्पोरेट क्षेत्रात पर्यावरण जागरूकता वाढवणे आवश्यक आहे.
सध्याची कार्बन डायऑक्साइडची जागतिक पातळी सुमारे ४२५ पी.पी.एम. एवढी आहे, जी औद्योगिकीकरणापूर्वीच्या सुमारे २८० पी.पी.एम. पातळीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साइडच्या स्थिरतेसाठी सामान्यतः उल्लेखित सुरक्षित पातळी ३५० पी.पी.एम. आहे. सध्याची कार्बन डायऑक्साइडची उच्च पातळी हे जागतिक तापमान वाढीचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे हीच वेळ आहे, प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी जागरूक होऊन साधारण २ अब्ज लोकांच्या उपजीविकेला कारणीभूत असलेल्या हिमनद्यांची व परिणामी आपल्या पृथ्वीची न भरून येणारी हानी टाळण्याची आणि हा निसर्ग व पृथ्वी येणाऱ्या पिढ्यासाठी राखून ठेवण्याची!
(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भूगोल विभागात सहयोगी प्राध्यापक आणि गिर्यारोहक, गिरिप्रेमी आहेत.)
amkandekar@unipune.ac.in
