हर्षवर्धन वानखेडे
‘आणीबाणी’ ची सुरुवात नेहमीच नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांच्या औपचारिक निलंबनाने होते असे नाही. राज्यसत्ता जेव्हा असहमती दडपण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा आधार घेते, शांततापूर्ण आंदोलने आणि जमावाने एकत्र येण्याच्या जागा बंद करते आणि अटक, स्थानबद्धता व दीर्घकालीन न्यायालयीन खटल्यांची भीती नागरिकांच्या राजकीय सहभागाला आळा घालू लागते, तेव्हा प्रश्न फक्त नागरिकांना आंदोलन करण्याची परवानगी आहे की नाही, एवढाच राहात नाही. ते आपल्या असहमतीची अभिव्यक्ती प्रत्यक्षात आणि निर्भयपणे करू शकतात का, हा मूलभूत प्रश्न बनतो.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात राज्य आणि नागरिक यांच्यातील संबंधांचे स्वरूप बदलण्याचे आश्वासन होते. बाहेरून लादलेल्या परकीय सत्तेऐवजी नागरिकांना उत्तरदायी असलेली लोकशाही राज्यव्यवस्था अस्तित्वात येईल, ही त्यामागील अपेक्षा होती. मात्र, स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी निर्माण झालेल्या संस्था जेव्हा स्वातंत्र्यावरच मर्यादा आणण्याची साधने बनतात, शांततापूर्ण आंदोलने धोकादायक ठरवली जातात आणि उत्तरदायित्वाची मागणी केल्याबद्दल फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागते, तेव्हा या स्वातंत्र्याच्या आश्वासनाचे काय होते? १० ऑक्टोबर २०२६ रोजी दिल्ली येथे कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) आयोजित केलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे प्रश्न अधिकच महत्त्वाचे ठरतात.
असहमतीचे गुन्हेगारीकरण, दडपशाहीचे सामान्यीकरण!
राष्ट्रीय राजधानीत नेमके काय घडत आहे? दिल्लीचे जणू किल्लेबंद शहरात रूपांतर झाले आहे. १० ऑक्टोबर रोजी ५७ मेट्रो स्थानके बंद ठेवणे, ४० हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचाऱ्यांची तैनाती, जंतर-मंतर परिसरात बहुस्तरीय बॅरिकेडिंग आणि नाकेबंदी, २४० हून अधिक रेल्वेगाड्या रद्द करणे, शाळा-महाविद्यालये आणि मध्य दिल्लीतील बाजारपेठा बंद ठेवणे, इंटरनेटवर निर्बंध आणि सार्वजनिक सभांवर बंदी—या सर्व उपाययोजनांतून राजधानीतील जनजीवनच जणू वेठीस धरले गेले. आंदोलनाला आळा घालण्यासाठी उभारलेल्या या सुरक्षा व्यवस्थेचे परिणाम सामान्य नागरिक आणि आंदोलकांना चुकवावे लागले.
प्रत्येक ठिकाणी बॅरिकेडिंगसह सुमारे २५ ते ३० पोलीस कर्मचारी तैनात असल्याचे आढळले. त्यामध्ये काही पोलिस कर्मचाऱ्यांकडे ओळख दर्शवणारी नामपट्टी नसल्याचे सुद्धा आढळून आले, तर काही सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे सब-मशीन गन असल्याचे दिसून आले. पोलिस कर्मचाऱ्यांकडून आक्रमक आणि उद्धट वर्तन केल्याच आरोप काही महिलांनी केला, त्याचबरोबर त्यांच्या खासगी अवयवांवर स्पर्श केल्याचे, मोबाइल फोन आणि बॅग हिसकावून घेण्याचे आरोप पोलिसांवर करण्यात आले. तसेच, कॅनॉट प्लेस जवळ एक गट, ज्याचा कथित भाजप आणि विश्व हिंदू परिषदेशी संबंध असल्याचे म्हटले गेले, ज्यांना ‘भाडोत्री संघ’ असेही म्हटले गेले. हा समूह दावा करत होता की ते पोलिसांची सुरक्षा करीत आहेत! या गटातील व्यक्तींनी मुलींसह आंदोलनकर्त्यांवर क्रूरपणे हल्ले केले. या घटनांदरम्यान, हल्ले रोखण्यासाठी आणि आंदोलनकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी हस्तक्षेप करण्याऐवजी पोलीस निष्क्रिय राहिल्याचे किंवा हस्तक्षेप करण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून आले. यावरून पोलिसांच्या पक्षपाती वर्तनाबाबत आणि त्यांच्या उत्तरदायित्वाबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात.
हजारो आंदोलनकर्त्यांना आणि सामान्य नागरिकांना प्रतिबंधात्मकरीत्या ताब्यात घेण्याच्या या कारवाईला ‘मास डिटेन्शन’ किंवा मोठ्या प्रमाणावरील सामूहिक स्थानबद्धता असे म्हणता येईल. ‘कायदा आणि सुव्यवस्था’ राखण्याच्या नावाखाली सरकारने विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ, नागरी समाजाचे प्रतिनिधी, कामगार, चार माजी मुख्यमंत्री तसेच विविध विद्यार्थी, राजकीय व सामाजिक संघटना आणि दबावगटांच्या सदस्यांना ताब्यात घेतले. मात्र, या कारवायांमधून देशाच्या राजधानीत सुव्यवस्था प्रस्थापित होण्याऐवजी अव्यवस्था आणि अराजकसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले.
या संकटाचे काही परस्परांशी निगडित पैलू आहेत. असहमतीचा आवाज दडपण्यासाठी ‘कायदा आणि सुव्यवस्थे’ चा राजकीय साधन म्हणून केला जाणारा वापर; परिणामी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याच्या व राजकीय असहमती व्यक्त करण्याच्या अधिकारांचा वापर केल्याबद्दल नागरिकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणे. अशा कारभारामुळे लोकशाहीत अधिकारांचे संरक्षण करण्याऐवजी त्यांच्यावरच निर्बंध लादले जातात आणि लोकशाही सहभागालाच गुन्हेगारी स्वरूप देण्याची प्रक्रिया बळावते.
पहिली समस्या म्हणजे शांततापूर्ण आंदोलनाला परवानगी नाकारण्यासाठी ‘कायदा आणि सुव्यवस्थे’ चा सरसकट आधार घेणे. सुरक्षितता, वाहतूक, पूर्वानुभव किंवा संभाव्य धोके यांसारखी कारणे पुढे करून ‘जंतर मंतर’ सारख्या सर्वज्ञात आंदोलनस्थळाची नाकेबंदी करणे आणि अनेक स्तरांवर बॅरिकेड्स उभारणे, ही बाब मुळातच भारतासारख्या घटनात्मक लोकशाहीत गंभीर प्रश्न उपस्थित करते. शांततापूर्ण विरोधाचा अधिकार मान्य असताना, संभाव्य धोक्यांच्या आधारे आंदोलनाच्या शक्यताच नष्ट करणे हे लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत आहे.
दुसरी समस्या म्हणजे भारतीय न्याय संहितेतील (बीएनएस) तरतुदींच्या निवडक अंमलबजावणीतून निर्माण होणारी कायदेशीर अडवणूक आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याचाच दडपशाहीचे साधन म्हणून वापर होण्याची शक्यता. अशा परिस्थितीत कायद्याची अंमलबजावणी केवळ सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यापुरती मर्यादित राहत नाही, तर असहमती व्यक्त करणाऱ्या नागरिकांच्या लोकशाही सहभागावरही निर्बंध आणते. परिणामी, नागरिकांना संरक्षण देण्यासाठी असलेली कायदेशीर यंत्रणाच त्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याला आणि लोकशाही अधिकारांना मर्यादित करणारे माध्यम ठरू शकते.
तिसरी समस्या म्हणजे आंदोलनाच्या मूळ मुद्द्यापासून सार्वजनिक चर्चेचे लक्ष विचलित करणे. इथे देशाच्या सर्वोच्च निवडणूक आयोगाच्या संबंधित कथित निवडणूक अनियमितता आणि त्याबाबत उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी हा आंदोलनाचा केंद्रबिंदू असताना सरकारने चर्चेचा रोख अन्य मुद्द्यांकडे वळवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. या संदर्भात हे लक्षात घ्यावे लागेल की, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाशर्ती आणि पदावधी) अधिनियम, २०२३ नुसार विद्यमान तसेच माजी मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांना दिवाणी व फौजदारी कार्यवाहीपासून संरक्षण दिले जाते. हे संरक्षण पदावरून निवृत्त झाल्यानंतरही लागू राहाते. कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांना व्यापक कायदेशीर संरक्षण मिळणे असे दर्शवते की अशा प्रकारच्या अनियमिततांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने ही तरतूद पूर्वनियोजितच होती की काय? मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेत करण्यात आलेले बदलही घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेचा आणि त्यांच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न ऐरणीवर आणतात. या संस्थांच्या कामकाजावर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी आणि त्यांना उत्तरदायी बनवण्यासाठी पुरेशा घटनात्मक व संस्थात्मक यंत्रणा उपलब्ध आहेत का, हा लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे.
चौथा पैलू म्हणजे संबंधित संस्थांकडून परिस्थिती सामान्य असल्याचे भासवण्याचा प्रयत्न. शहराची मोठ्या प्रमाणावर नाकेबंदी करणे, सार्वजनिक वाहतूक विस्कळीत करणे, शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेणे आणि नागरिकांना सर्वव्यापी, सर्वशक्तिमान राज्यसत्तेच्या अस्तित्वाची जाणीव करून देणे—या गोष्टी हळूहळू ‘नवीन सामान्य’ म्हणून रूढ केल्या जात आहेत. खरे संकट केवळ भारतातील कायदा-सुव्यवस्था यंत्रणांच्या क्रौर्यात नाही, तर अशा दडपशाहीचे आपल्या दैनंदिन जीवनातील सामान्य वास्तवात रूपांतर होण्यात आहे. हॅना अरेन्ट यांनी मांडलेल्या ‘दुष्टतेच्या सामान्यीकरणा’च्या (Banality of Evil) संकल्पनेच्या संदर्भात पाहता, दडपशाहीचे भयावह स्वरूप केवळ तिच्या तीव्रतेत नसते; तर अन्यायकारक कृतींना रोजच्या प्रशासकीय व्यवहाराचा स्वाभाविक भाग मानण्याच्या प्रक्रियेतही असते. जेव्हा अपसामान्य दडपशाहीला सामान्य मानले जाऊ लागते, तेव्हा तिच्याविरोधात प्रश्न विचारण्याची आणि प्रतिकार करण्याची सामाजिक संवेदनशीलताही क्षीण होऊ शकते.
या प्रक्रियेतील आणखी एक गंभीर पैलू म्हणजे नागरिकांच्या घटनात्मक आणि लोकशाही अधिकारांचा वापर केल्याबद्दल त्यांना दंडित करणे. याची अनेक रूपे आहेत. आंदोलनकर्त्यांना ‘देशविरोधी’, ‘दिमागी नक्षल’ अशा संज्ञांनी हिणवून त्यांच्या मागण्यांचे गांभीर्य कमी केले जाते. त्यांच्या मागण्यांच्या आशयाऐवजी त्यांच्या देशनिष्ठेवर आणि चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. त्याच वेळी, सार्वजनिक चर्चेत जाणीवपूर्वक गोंधळ आणि विसंवाद निर्माण करून या अराजकतेचाच राजकीय हत्यार म्हणून वापर केला जातो. त्यांच्याविरोधातील कारवाईला सामाजिक मान्यता मिळवून देण्याची शक्यता निर्माण केली जाते. या प्रक्रियेतून निर्माण होणारी भीती केवळ आंदोलनकर्त्यांपुरती मर्यादित राहत नाही; ती व्यापक समाजाच्या मानसिकतेत रुजवली जाते. परिणामी, नागरिकांमध्ये दडपशाहीची शक्यता आणि त्याचे परिणाम यांविषयी भीती निर्माण होते, ज्यामुळे लोकशाही सहभागावर आणि असहमती व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्यावर अप्रत्यक्षपणे मर्यादा येऊ शकतात.
जेव्हा दडपशाही ही नियमित प्रशासकीय पद्धत बनते, असहमतीला गुन्हेगारीचे स्वरूप दिले जाते आणि घटनात्मक स्वातंत्र्यांचा वापर दिवसेंदिवस कठीण होत जातो, तेव्हा अघोषित आणीबाणी आकार घेते. सत्तेला जाब विचारणाऱ्या नागरिकांनाच कायदा व सुव्यवस्थेसाठी धोका ठरवणे आणि त्याच वेळी संस्थांना सार्वजनिक परीक्षणापासून संरक्षण देणे, हा लोकशाहीपुढील गंभीर धोका आहे. असहमतीचा अधिकार संविधानात मान्य असला, तरी त्याचा वापर केल्याबद्दल नागरिकांना धमकी, स्थानबद्धता किंवा खटल्यांना सामोरे जावे लागत असेल, तर लोकशाही औपचारिकरीत्या निलंबित झालेली नसली, तरी तिचा गाभा हळूहळू पोखरला जात असतो.
लेखक दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर पोलिटिकल स्टडीज’मध्ये पीएच.डी.साठी संशोधन करत आहेत. harshjnu8@gmail.com
