डॉ. मंदार चौधरी
जर आपण भारतातील किंवा जगातील कोणालाही प्रश्न विचारला की, ‘गेल्या दशकभरात भारताने जगाला दाखवून दिलेली सर्वांत मोठी गोष्ट कोणती?’ तर अनेकांचे उत्तर ‘यूपीआय’ असेल. चहाच्या टपरीपासून ते महागड्या स्टारबक्सपर्यंत, कणीस विकणाऱ्यांपासून ते मोठ्या युनिकॉर्न स्टार्टअप्सपर्यंत आणि खेड्यातल्या आंगणवाडीपासून ते चमचमत्या मुंबापुरीपर्यंत, क्यूआर कोडवर, काही सेकंदांत, कोणत्याही शुल्काविना, आपल्या खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात पैसे पाठवण्याची विश्वासार्ह व्यवस्था म्हणजे यूपीआय. डिजिटल अर्थक्रांती सुरू असताना, नेमक्या याच टप्प्यावर एनपीसीआयने १५ ऑक्टोबर २०२६ पासून दोन हजार रुपयांवरील व्यापारी (पी२एम) व्यवहारांवर ०.४ टक्के ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ (एमडीआर) लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. थोडक्यात आतापर्यंतच्या मोफत असलेल्या यूपीआय व्यवहारांवर यापुढे शुल्क लागणार. हा निर्णय धोरणात्मक दृष्ट्या चुकीचा आहे. याची पाच कारणे आहेत. यूपीआयवर एमडीआर लावण्याचा निर्णय हा तर्क, आकडेवारी आणि अनुभवानुसार कसा चुकीचा आहे याची पाच ठोस कारणे पाहू.

तोटा नेमका कुणाचा?

एमडीआरच्या समर्थनार्थ केला जाणारा युक्तिवाद आहे की, ‘व्यवस्था’ तोट्यात आहे, ती सावरायला हवी. पण आकडे तर वेगळेच सांगतात. एनपीसीआय (यूपीआय चालवते ती संस्था) स्वतः सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या नफ्यात आहे आणि अडीच हजार कोटींहून अधिक ‘रोख-प्रवाह सकारात्मक’ (ऑपरेटिंग कॅश फ्लो पॉझिटिव्ह) आहे. या साखळीत भारतातल्या सर्व बँकांचा नफाही गेल्या वर्षी सुमारे चार लाख कोटींच्या वर होता. मग प्रश्न साधा आहे हा तोटा नेमका कुणाचा आहे? ज्या संस्था आधीच नफ्यात आहेत त्यांचा की आणखी कोणाचा? या सगळ्या नफा कोणाचा नाही, पण तोटा सामान्यांचा नक्की आहे.

‘फक्त व्यापाऱ्यांवर शुल्क’ हा फसवा युक्तिवाद

सरकारचे म्हणणे आहे की एमडीआर सर्व व्यवहारांवर नाही; तो केवळ ठरावीक मोठ्या व्यापारी व्यवहारांवर लागू होईल. त्यामुळे सामान्य ग्राहक आणि छोट्या व्यापाऱ्यांवर फारसा परिणाम होणार नाही. पण हे अर्धसत्य आहे. फक्त गेल्या २०२६च्या सप्टेंबर महिन्यातच दोन हजार रुपयांवरील व्यवहारांचे मूल्य सुमारे सहा लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेचा एक प्रचंड मोठा भाग या एमडीआर शुल्काच्या कक्षेत येतो. आणि व्यवहारात भार कुणावरही अधिकृतपणे टाकला तरी तो शेवटी किमतीतूनच वसूल होतो. आजच अनेक ठिकाणी ‘यूपीआय व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत’ किंवा विशिष्ट रकमेपुढे ‘केवळ रोख’ असे बोर्ड दिसू लागले तर ते केवळ व्यापाऱ्याचा निर्णय राहणार नाही; तो धोरणाचाच पण धोरणातून अपेक्षित नसलेला परिणाम असेल. यूपीआयद्वारे पैसे स्वीकारण्यास व्यापारी तयार नसतील, तर आपण डिजिटल अर्थव्यवस्थेला पुढे नेत आहोत की पुन्हा रोख अर्थव्यवस्थेकडे ढकलत आहोत?

एमडीआर म्हणजे पैशाच्या वेगावरच ब्रेक

अर्थशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे ‘व्हेलॉसिटी ऑफ मनी’, एक रुपया अर्थव्यवस्थेत किती वेगाने फिरतो. समजा, तुमच्याकडचे १०० रुपये यूपीआयने चहावाल्याकडे गेले. त्याने तोच पैसा दूधवाल्याला दिला. दूधवाल्याने तो किराणा दुकानदाराला दिला. किराणा दुकानदाराने तो वाहतूकदाराला दिला. एका १०० रुपयांनी काही तासांत चार व्यवहार केले. आर्थिक वाढ केवळ पैशाच्या प्रमाणावर अवलंबून नसते; तो पैसा किती वेगाने अर्थव्यवस्थेत फिरतो हेही तितकेच महत्त्वाचे असते. यूपीआयने गेल्या दशकात नेमके हेच केले. पूर्वी एखादा व्यवहार पूर्ण व्हायला चेक क्लिअरन्सचे दिवस, एटीएममधून रोख काढण्याची रांग किंवा बँकेच्या वेळा सांभाळण्याची कसरत करावी लागे. यूपीआयने हे सर्व अडथळे संपवले. पण डिजिटल व्यवहाराला किंमत लावली तर व्यवहार करण्याच्या मानवी वर्तनात बदल होतो. हाच वर्तनअर्थशास्त्राचा मूलभूत मुद्दा आहे. व्यवहारासाठी शुल्क लागणार असेल तर ग्राहक आणि व्यापारी पर्याय शोधतात. काही व्यवहार रोखीत जातात, काही विभागले जातात, तर काही कमी होतात. म्हणजे एमडीआरचा प्रश्न फक्त ‘प्रति व्यवहार किती पैसे?’ असा राहत नाही; तर आता किती व्यवहार यूपीआयवर राहतील, हा आहे. डिजिटल इंडियाची सर्वांत मोठी विडंबना अशी असेल की सरकार क्यूआर कोड छापेल आणि व्यापारी त्याखाली ‘केवळ रोख’ लिहील.

याचा धोका किती खरा आहे, हे एका धक्कादायक आकडेवारीवरून स्पष्ट होते. देशातील आघाडीचे राज्य असलेल्या सबंध गुजरातचे एकूण यूपीआय व्यवहार हे एकट्या बंगळुरू शहराच्या व्यवहारांपेक्षाही कमी आहेत. एवढ्या मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्यातील यूपीआय वापर इतका मर्यादित असणे आणि एका शहराच्या तुलनेतही कमी भरणे हा निव्वळ योगायोग नाही तर उत्तम सूचक आहे. यूपीआयचा विस्तार अजूनही किती नाजूक आणि अर्धवट टप्प्यावर आहे, याचा हा स्पष्ट संकेत आहे. अशा स्थितीत घर्षण वाढवणारा कोणताही निर्णय हा पैशाच्या वेगाला आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेच्या गतीलाच लगाम घालणारा ठरतो.

ही पायाभूत सुविधा आहे, उत्पादन नव्हे

रस्ते, रेल्वे, वीजवाहिन्या यांसारखीच यूपीआय ही ‘डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा’ (डीपीआय) आहे. सरकारने ती जाणीवपूर्वक मोफत ठेवली, कारण तिचा खरा लाभ शुल्कातून नव्हे, तर तिच्यावर चालणाऱ्या अर्थव्यवस्थेतून मिळतो. रोख व्यवहारांसाठी नोटांची छपाई, वाहतूक, साठवणूक आणि सुरक्षा यावर होणारा खर्च, तसेच रोख अर्थव्यवस्थेमुळे वाढणाऱ्या अनौपचारिक व्यवहारांचा आणि काळ्या पैशाचा आर्थिक बोजा लक्षात घेतला, तर यूपीआयमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेने केलेली बचत आणि मिळवलेले फायदे एमडीआरमधून मिळणाऱ्या संभाव्य महसुलापेक्षा कितीतरी मोठे आहेत. यूपीआयचे यश हे ‘झीरो फ्रिक्शन’ या एकाच तत्त्वावर उभे आहे. त्या तत्त्वाला तडा गेला की यशाचा पायाच हलतो. सरकार हे नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारी संस्था असून यूपीआय सारख्या सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधेवर प्रत्येक व्यवहाराला करसदृश शुल्क लावणे हे सरकारच्या कल्याणकारी राज्याच्या भूमिकेशी सुसंगत नाही.

हेही वाचा

तात्त्विक आणि कायदेशीरदृष्ट्याही चुकीचा निर्णय

एमडीआरचा परिणाम करासारखा आहे. मग असा आर्थिक भार लावण्यासाठी स्पष्ट कायदेशीर चौकट असायला नको का? उदाहरणार्थ, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसआयटी) लागू करताना त्यासाठी स्पष्ट कायदेशीर तरतूद करण्यात आली. एमडीआर सुद्धा एसटीटी प्रमाणे संसदेत कायदा करून, चर्चेतून आणि पारदर्शकपणे आणणे गरजेचे आहे. एक परिपत्रकाद्वारे, कार्यकारी आदेशाने, करासमान भार जनतेवर लादणे हे लोकशाही प्रक्रियेला बगल देण्यासारखे आहे.

त्याउपर, तात्त्विकदृष्ट्याही हा निर्णय अधिक धोकादायक आहे कारण एकदा हे दार उघडले, की ते बंद होत नाही. आज ०.४ टक्के उद्या ०.८ टक्के, परवा त्याहून अधिक ही वाढ अपरिहार्य आहे, कारण अधिकार एकदा दिला की त्याचा विस्तार करण्याचा मोह सरकारला आवरता येत नाही. खेकड्याला उकळत्या पाण्यात थेट टाकले, तर तो ताबडतोब बाहेर उडी मारतो; पण त्याला थंड पाण्यात ठेवून हळूहळू ते पाणी तापवत नेले, तर त्याला धोका कळतच नाही आणि तो हळूहळू मरतो. यूपीआयवरचे शुल्कही असेच आहे आज ते इतके सूक्ष्म आहे की कुणाला विरोध करण्याचे कारणच वाटत नाही; पण हेच हळूहळू वाढत जाणारे पाणी उद्या संपूर्ण डिजिटल अर्थव्यवस्थेला उकळवून टाकू शकते.

पर्याय काय?

व्यवस्था चालवण्याचा खर्च कोणीतरी उचलावाच लागतो, हे नाकारता येणार नाही; पण तो खर्च व्यवहारावर लादण्याआधी उपलब्ध साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर झाला पाहिजे. शुल्क अपरिहार्य वाटलेच तर ते व्यवहाराच्या रकमेऐवजी व्यापाऱ्याच्या वार्षिक उलाढालीशी जोडणे असे पर्याय आजही खुले आहेत.

यूपीआयचा विस्तार अजूनही तळागाळाकडे सुरू आहे. ही प्रक्रिया अर्धवट असताना, आणि साखळीतील प्रमुख संस्था स्वतः नफ्यात असताना, शुल्काचा भार टाकणे म्हणजे फळे पक्व होण्याआधीच तोडण्यासारखे आहे.

हेही वाचा

१५ ऑक्टोबर जवळ येत आहे आणि सरता प्रत्येक दिवस डिजिटल इंडियाच्या पायाखालची वीट ढिली करणारा आहे. सरकारने एमडीआरचा बचाव करण्यापेक्षा तो मागे घ्यावा आणि यूपीआयला कायमस्वरूपी झीरो-एमडीआर पब्लिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून घोषित करावे. यूपीआयचा खर्च हा महसूल मिळवण्याचा स्रोत न मानता भारताच्या आर्थिक उत्पादकतेवरील गुंतवणूक म्हणून पाहिला पाहिजे. यूपीआयवर एमडीआर हटवणे ही व्यापाऱ्यांची मागणी नाही; ती भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेची गरज आहे. कधी कधी सरकारने काही न करणेच श्रेयस्कर असते. सरकारने यूपीआयच्या माध्यमातून दहा वर्षांत जे कमावले ते आकडे नाहीत तो विश्वास आहे. एमडीआरमधून मिळणारा महसूल मोजता येईल; पण गमावलेला विश्वास कोणत्याही ताळेबंदात परत मिळवता येणार नाही. भारताची अर्थव्यव्यस्था ही नोटबंदीसारखी आपल्या मूर्खपणाची प्रयोगशाळा असू शकत नाही.

(लेखक सहाय्यक प्राध्यापक आहेत.)