देवेंद्र शा. बागकर

मुंबईच्या चेंबूर भागात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसामुळे झाड कोसळून एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे झाड शाळेच्या बसवर पडले होते, त्या बसमधील काही मुले जखमी झाली होती पण ११ वर्षांचा एक मुलगा मरण पावला. मुंबईत दरवर्षी पावसाळा सुरू झाला की वृक्षपतनाच्या घटना चर्चेचा विषय बनतात. मुसळधार पाऊस, वेगवान वारे आणि अधूनमधून होणारी अतिवृष्टी यामुळे अनेक झाडे कोसळतात.

रस्ते बंद होतात, वीजपुरवठा खंडित होतो, वाहनांचे नुकसान होते आणि काही दुर्दैवी प्रसंगी मानवी जीवितहानीदेखील घडते. जबाबदार व्यक्तीदेखील ‘झाड कोसळणे ही नैसर्गिक दुर्घटना’ यासारख्या प्रतिक्रिया देतात. परिरणामी समाजामध्ये “झाडे धोकादायक आहेत” अशी भावना निर्माण होते. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. झाडे धोकादायक नसतात; धोकादायक असते ते त्यांचे अयोग्य व्यवस्थापन, दीर्घकाळ दुर्लक्षित आरोग्य आणि शहरी विकासाच्या नावाखाली त्यांच्या मुळांवर झालेला आघात.

मुंबई हे देशातील सर्वाधिक घनदाट वसाहतीचे महानगर आहे. वाढते काँक्रीटीकरण, उष्णतेच्या लाटा, वाढते वायुप्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वृक्षांचे महत्त्व अधिक वाढले आहे. झाडे केवळ सौंदर्यवर्धन करणारा घटक नाहीत, तर ती शहराची पर्यावरणीय सुरक्षा व्यवस्था आहेत. ती कार्बन शोषून घेतात, तापमान कमी करतात, ध्वनी प्रदूषण कमी करतात, पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत करतात आणि जैवविविधतेला आधार देतात.

मुळांवरच घाव

मात्र, शहरीकरणाच्या प्रक्रियेत झाडांच्या आरोग्याकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नाही. रस्ते रुंदीकरण, मेट्रो प्रकल्प, भूमिगत केबल्स, जलवाहिन्या आणि इतर पायाभूत सुविधा उभारताना अनेकदा वृक्षांच्या मुळांना मोठ्या प्रमाणात इजा पोहोचते. मुळे ही झाडाची पायाभरणी असतात. ती जमिनीतील अन्नद्रव्ये आणि पाणी शोषून घेण्याबरोबरच झाडाला स्थैर्य प्रदान करतात. मुळांचा समतोल बिघडला की झाडाची उभी राहण्याची क्षमता कमी होते आणि पावसाळ्यात ते कोसळण्याची शक्यता वाढते.

मुंबईतील आणखी एक गंभीर समस्या म्हणजे झाडांच्या बुंध्याभोवती करण्यात येणारे सिमेंटीकरण. अनेक ठिकाणी झाडाभोवती संपूर्ण फरशी किंवा काँक्रीट टाकलेले दिसते. त्यामुळे हवा, पाणी आणि सेंद्रिय घटक मुळांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. कालांतराने झाडांची वाढ खुंटते, मुळे उथळी राहतात आणि झाडे कमकुवत बनतात.

झाडांच्या अयोग्य छाटणीमुळेही वृक्षपतनाच्या घटना वाढतात. अनेकदा शास्त्रीय पद्धतीने छाटणी न करता झाडांच्या फांद्या एका बाजूने मोठ्या प्रमाणात कापल्या जातात. त्यामुळे झाडाचा नैसर्गिक समतोल बिघडतो. असंतुलित छत्री असलेले झाड जोरदार वाऱ्यांचा सामना करू शकत नाही. काही वेळा खोडाच्या आतील भागात कुज, बुरशी किंवा वाळवीचा प्रादुर्भाव असतो. बाहेरून हिरवेगार दिसणारे झाड आतून पोकळ झालेले असू शकते. अशा झाडांचे नियमित आरोग्य-परीक्षण अत्यंत आवश्यक आहे.

आज विकसित देशांमध्ये ‘वृक्ष व्यवस्थापन’ ही स्वतंत्र शास्त्रीय शाखा म्हणून विकसित झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने झाडांच्या आरोग्याचे परीक्षण केले जाते. ध्वनी परीक्षण, प्रतिरोध चाचण्या, मुळांच्या स्थैर्याचे मूल्यांकन आणि जोखीम विश्लेषणाद्वारे धोकादायक वृक्षांची पूर्वकल्पना घेतली जाते. आपल्या शहरांमध्येही अशा प्रणालींचा अवलंब करण्याची गरज आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांनी पावसाळ्यापूर्वी वृक्षांचे सर्वेक्षण, डिजिटल नोंदणी आणि जोखीम वर्गीकरण करण्याची यंत्रणा उभारली पाहिजे. मोठ्या व जुन्या वृक्षांचे वेळोवेळी आरोग्य परीक्षण केले पाहिजे. प्रत्येक प्रभागात प्रशिक्षित वृक्षतज्ज्ञ, उद्यानतज्ज्ञ आणि वृक्षवैद्य यांची नियुक्ती केली गेल्यास अनेक अपघात टाळता येऊ शकतात.

नागरिकांचीही यात महत्त्वाची भूमिका आहे. झाडांच्या मुळांभोवती सिमेंट टाकणे, बांधकाम साहित्य साठवणे किंवा खिळे ठोकणे टाळले पाहिजे. कललेली, वाळलेली किंवा असामान्य लक्षणे दिसणारी झाडे त्वरित प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावीत. गृहनिर्माण संस्था, शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांनी वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती मोहीम राबवावी.

हवामान बदलामुळे भविष्यात अतिवृष्टी, वादळी वारे आणि अनिश्चित हवामानाच्या घटना वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत वृक्षसंवर्धनाकडे केवळ सौंदर्यदृष्टीने पाहून चालणार नाही. त्याकडे शहरी पायाभूत सुविधांचा अविभाज्य भाग म्हणून पाहणे आवश्यक आहे.

झाडे तोडून शहर सुरक्षित होणार नाही; उलट उष्णता, प्रदूषण आणि पर्यावरणीय असंतुलन अधिक वाढेल. झाडे वाचवणे आणि नागरिकांचे प्राण सुरक्षित ठेवणे ही परस्परविरोधी नव्हे तर परस्परपूरक उद्दिष्टे आहेत. यासाठी शास्त्रीय वृक्ष व्यवस्थापन, सक्षम प्रशासन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि जागरूक नागरिकांचा सहभाग हीच पुढील काळातील खरी दिशा ठरावी.

आज आवश्यक आहे ती ‘झाडे पडली की चर्चा’ नव्हे (झाड पडल्यावर राजकीय रोखाने चर्चा तर नव्हेच नव्हे), तर ‘झाडे पडूच नयेत’ यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची. कारण निरोगी वृक्ष हेच सुरक्षित, सुंदर आणि शाश्वत मुंबईचे आधारस्तंभ आहेत. लेखक उद्यानविद्या (हॉर्टिकल्चर) पदवीधर असून त्यांना शहरी वने, उद्याने या क्षेत्रातील ३० वर्षांचा अनुभव आहे.

devendrabagkar@gmail.com