डॉ. महादेव आ. रिठे
समाजमाध्यमांपासून ते गल्ली-बोळांतील दुकानांपर्यंत सगळीकडे, फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाल्यापासून एकच चर्चा असते ती म्हणजे ‘व्हॅलेंटाईन वीक’ची. एकेकाळी केवळ पाश्चात्त्य जगापुरता मर्यादित असलेला हा उत्सव आता आपल्याही तरुणांच्या संस्कृतीचा आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग बनला आहे. ‘रोझ डे’ म्हणून साजरा होणाऱ्या ७ फेब्रुवारीपासून सुरू झालेली ही प्रेमाची वारी १४ फेब्रुवारीच्या ‘व्हॅलेंटाईन डे’पर्यंत जेव्हा पोहोचते, तेव्हा भारताच्या तिजोरीत काही हजार कोटींची उलाढाल झालेली असते. आज हा केवळ एक आठवडा राहिलेला नसून, तो भारतीय किरकोळ व्यापार, ई-कॉमर्स आणि कृषी क्षेत्रासाठी ‘बूस्टर डोस’ ठरत आहे.

‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ आणि विविध रीटेल विश्लेषकांच्या मते, २०२४ मध्ये या आठवड्यात भारताने सुमारे २५,००० कोटी रुपयांची उलाढाल पाहिली होती. मात्र, २०२५ आणि २०२६ च्या सुरुवातीच्या कलानुसार, हा आकडा २८,५०० कोटी ते ३०,००० कोटी रुपयांच्या घरात जाण्याची दाट शक्यता आहे. जागतिक मंदीचे सावट आणि महागाईची चर्चा सुरू असतानाही भारतीय ग्राहकांची क्रयशक्ती या उत्सवाच्या निमित्ताने उसळी मारताना दिसत आहे. दिवाळीसारख्या सणाच्या वेळी किरकोळ भेटवस्तू बाजार ६.०५ लाख कोटी रुपयांवर गेला, त्याच्याशी व्हॅलेंटाइन डे निमित्त होणाऱ्या खरेदीच्या आकड्यांची तुलनाच नाही, हा युक्तिवाद बिनचूक असला तरी दिवाळीपेक्षा ही खरेदी निश्चितपणे निराळी आहे. हे केवळ बाजारीकरण नसून, एका नव्या ग्राहक-संस्कृतीचा उदय आहे.

क्विक कॉमर्स’ची वाढ आणि बदलती बाजारपेठ यांचा संबंध जगभरच दिसून येतो. यावर्षीच्या व्हॅलेंटाइन अर्थकारणात सर्वात मोठा वाटा ‘क्विक कॉमर्स’चा (झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी इन्स्टामार्ट आदी) आहे. ‘रेडसीअर’ च्या अहवालानुसार, गेल्या काही वर्षांत ग्राहकांची मानसिकता बदलली आहे. आता ग्राहक आठवडाभर आधी भेटवस्तू घेऊन ठेवण्याऐवजी ‘लास्ट मिनिट’ खरेदीला पसंती देत आहेत. रोझ डे च्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत या प्लॅटफॉर्म्सनी प्रति मिनिट ६०० हून अधिक गुलाबांच्या ऑर्डर्स पूर्ण केल्या. प्रेम अवघ्या १० मिनिटांत व्यक्त करण्याची ही सोय केवळ तंत्रज्ञानाचे यश नसून ती अब्जावधी रुपयांची ‘इन्स्टंट इकॉनॉमी’ निर्माण करत आहे. कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार व्हॅलेंटाईन वीकचा सर्वात मोठा फायदा भारतीय शेतकऱ्यांना, विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होतो.

पुणे जिल्ह्यातील तळेगाव, चाकण आणि मावळ या पट्ट्यातील नर्सरी वा हरितगृहांमधून कोट्यवधी गुलाब जगभरात रवाना होतात. पुण्यातील मार्केट यार्ड हे या काळात आशियातील एक प्रमुख केंद्र बनते. आकडेवारीनुसार, भारतातून या काळात सुमारे २५ ते ३० कोटी रुपयांचे गुलाब निर्यात केले जातात. युरोप आणि आखाती देशांमध्ये भारतीय गुलाबांना मोठी मागणी असते. जेव्हा एखादा तरुण ५० रुपयांना गुलाब खरेदी करतो, तेव्हा त्यातील मोठा हिस्सा ग्रामीण भागातील मजूर, वाहतूकदार आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचतो. हा ‘ट्रिकल डाऊन इफेक्ट’ अर्थशास्त्रातल्या ‘झिरपा सिद्धांता’नुसारच अर्थव्यवस्थेच्या तळापर्यंत पैसा पोहोचवण्याचे काम करतो.

केवळ वस्तूंची विक्रीच नाही, तर सेवा क्षेत्रातही या आठवड्यात मोठी भरभराट पाहायला मिळते. हॉटेलिंग आणि पर्यटन क्षेत्रासाठी हा हंगाम दिवाळीपेक्षा कमी नसतो. ‘कॅन्डल लाइट डिनर’पासून ते ‘स्टेकेशन’पर्यंतच्या सुविधांसाठी पंचतारांकित हॉटेलांनी ३०-४० टक्क्यांनी दर वाढवूनही ‘बुकिंग फुल’ असल्याचे चित्र असते. ‘नील्सन’च्या सर्वेक्षणाप्रमाणे, २०२५ मध्ये हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील उलाढाल गेल्या वर्षाच्या तुलनेत १८ टक्क्यांनी वाढली आहे.

या अर्थकारणाचा एक नवा पैलू म्हणजे ‘सेल्फ-लव्ह’. अलीकडच्या काळात जे तरुण रिलेशनशिपमध्ये नाहीत, ते स्वतःसाठी पैसे खर्च करताना दिसत आहेत. याला अर्थशास्त्राच्या भाषेत ‘सोलो इकॉनॉमी’ म्हणतात. सौंदर्य प्रसाधने, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स आणि पुस्तके यांच्या विक्रीत स्वतःसाठी खरेदी करणाऱ्यांचा वाटा आता १२ ते १५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. ब्रँड्सनी देखील आता ‘स्वतःवर प्रेम करा’ अशी जाहिरातबाजी सुरू केल्याने बाजारपेठेचा परीघ अधिक विस्तारला आहे.

या आठवड्यात होणारी हजारो कोटींची उलाढाल केवळ मोठ्या कंपन्यांपुरती मर्यादित नाही. या काळात ‘इन्फ्लुएंसर मार्केटिंग’वर प्रचंड खर्च केला जातो. यंदा- २०२६ पर्यंत केवळ व्हॅलेंटाईन डेनिमित्त होणारा डिजिटल जाहिरात खर्च ७५ कोटी रुपयांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. याशिवाय, डिलिव्हरी बॉयपासून ते गिफ्ट पॅकिंग करणाऱ्यांपर्यंत हजारो हातांना तात्पुरता पण चांगल्या पगाराचा रोजगार मिळतो. ही ‘गिग इकॉनॉमी’ हे आज भारतीय तरुणाईला आर्थिक स्वातंत्र्य देण्यास मदत करणारे एक साधन ठरले आहे.

‘व्हॅलेंटाईन वीक’ला पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण म्हणून नाकारणे सोपे आहे, पण त्यामागील अर्थशास्त्र दुर्लक्षित करून चालणार नाही. भारतासारख्या विकसनशील देशासाठी, जिथे देशांतर्गत मागणी (डोमेस्टिक डिमांड) हा जीडीपीचा मोठा आधार आहे, तिथे असे उत्सव अर्थव्यवस्थेला गती देतात. जेव्हा पैसा खेळता राहतो, तेव्हाच विकास होतो. या सात दिवसांच्या उत्सवाने भारतीय बाजारपेठेत जी चैतन्यमय ऊर्जा निर्माण केली आहे, ती पाहता ‘प्रेम’ हे केवळ भावनिक राहिले नसून ते अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वाचे चाक झाले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

‘प्रेमाची फुटली पेठ, लुटू या प्रेमाचा बाजार’ हे तत्कालीन फिल्मी प्रेमाला कमअस्सल समजणारे, प्रेमभावना व्यक्त करण्यात संकोचच अधिक चांगला असे सुचवणारे गाणे १९३९ सालचे! आज तो संकोच राहिलेला नाहीच, फिल्मी प्रेमदृश्येही जुनी झाली आहेत. पण प्रेमभावना कायम आहे आणि ती बाजाराला फुलवते आहे!

rithemahesh@gmail.com