डॉ. राजेन्द्र कांकरिया
प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासताना इ. स. पूर्व सहावे शतक लक्षात घ्यावेच लागते. या शतकात अनेक राजकीय, सामाजिक व धार्मिक स्थित्यंतरे घडून आली. त्याकाळी प्रचलित असणाऱ्या आचार विचारांना नवा मार्ग दाखविण्याचे काम याच शतकाने केले. या नवविचारांचे मार्गदर्शक होते – गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर. गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माच्या तर महावीरांनी जैन धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रचार, प्रसार व आचरण केले. या दोघांपैकी वर्धमान महावीर यांची आज २,६२५वीजयंती (माहावीरांचा जन्म- इ.स.पूर्व ५९९) आहे. त्या निमित्ताने जगाला अहिंसेचा दिव्य संदेश देणाऱ्या महावीराचे जीवन कार्य आणि त्यांनी भारतात जो धर्म लोकप्रिय केला त्या जैन धर्माचे तत्वज्ञान; सध्याची जागतिकयुद्धजन्य परिस्थिती व स्थानिक पूजा विधीचे क्रूर प्रारूप पाहता; समजून घेणे समयोचित आहे.
इ. स. पूर्व सहाव्या शतकात, वर्धमान महावीरांच्या काळात, जैनधर्माचा प्रसार वेगाने झाला. या धर्मामध्ये ऋषभदेव हे पहिले, पार्श्वनाथ हे तेवीसावे तर वर्धमान महावीर हे चोवीसावे तीर्थंकर मानले जातात. वर्धमान महावीरांना, वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी राजवैभवाचा सर्वस्वी त्याग करून, जैन धर्मालाही नवीन शिकवण देऊन, मानवी कल्याणासाठी का झोकून द्यावे लागले असावे याची पूर्वपिठिकाही समजून घ्यावी लागेल तरच आपणास महावीरांचे पुरोगामित्व अर्थात जैन धर्माचे तत्वज्ञान बऱ्यापैकी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे असल्याचे का जाणवते हे लक्षात येईल.
ऋगवेदकाळातील देवदेवतांचे स्वरूप व त्यांच्या प्रार्थना सुलभ होत्या. देवदेवतांची कृपा संपादन करण्यासाठी धार्मिक आचार सर्वसामान्य लोकांनाही सहज आत्मसात करता येत असत. पण हे सारे उत्तरवेदकाळात बदलले. यज्ञयागाला अधिक महत्व आले. माोक्ष प्राप्तीसाठी यज्ञ करणे आवश्यक मानले गेले. देवदेवतांची अर्थात परमेश्वराची कृपा मिळविणसाठी साधन म्हणून असलेला यज्ञच साध्य बनले आणि यज्ञालाच परमेश्वर मानण्यास सुरुवात झाली. यज्ञयागाचे मूलभूत तत्व नष्ट होऊन त्यास साचेबंद कर्मकांडाचे स्वरूप आले. एक दिवसाचे, दहा दिवसाचे आणि वर्षभराचे सुद्धा यज्ञकर्म सुरू झाले. पशुयज्ञामाध्ये शेतीला उपयुक्त प्राण्यांची आहुती देऊन माोठ्या प्रमाणात हिंसा सुरू झाली. पुरोहित वर्गाला भूदेव म्हणून गौरविण्यात येऊ लागले. ब्रह्मज्ञानप्राप्ती व मुक्ती हे ध्येय ठरू लागले. हे आत्मस्वरूपी ब्रह्म व परमानंदाचा लाभ हे सामान्यजनांच्या आवक्याबाहेरील होते. त्यामुळे तत्कालीन धार्मिक जीवनात अस्थिरता निर्माण झाली. परंपरेवरील विश्वासालाच तडा गेल्याने जनसामान्यांना मार्गदर्शनाची गरज भासू लागली. त्याची भरपाई जैन व बौद्ध धर्माने केली. या दोन्ही धर्मानी कर्मकांडांना बराचसा फाटा देऊन साधा, सहज व सुलभ मार्ग दाखविला. आर्यसंस्कृतीचा प्रभाव नसलेल्या मगधाच्या प्रदेशात (आताचा बिहार) या मार्गदर्शनास सुरुवात झाली.
इ. स. पूर्व सहाव्या शतकातच या श्रद्धा-अंधश्रद्धाच्या गर्तेत इ. स. पूर्व ५९९ मध्ये चैत्र शुद्ध त्रयोदशीस मगधराज्यातील क्षत्रीयकुंड नामक नगरित राजा सिद्धार्थाच्या दरबारी राणी त्रिशलाचे पोटी वर्धमान यांचा जन्म झाला. लक्ष्मी ज्याच्या घरी पाणी भरत होती, ऐश्वर्य ज्यांच्या पाायाशी लोळण घेत होते तो वर्धमान एक राजपूत्र म्हणून निश्चितच चमकला असता पण वर्धमानाला हे मान्य नसावे म्हणूनच वयाच्या २८व्या वर्षी गृहस्थाश्रमाचा त्याग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ‘कल्पनासूत्र’ नावाच्या ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार राजवैभवाची सर्व सुखे उपलब्ध असूनही वर्धमानांची प्रवृत्ती विरक्त होती. त्यांनी ही वैराग्याची भावना ज्येष्ठ बंधू नंदिवर्धन यांना कळविली. आधीच मातृपितृ वियोगाने दुःखी झालेले नंदिवर्धन चिंताग्रस्त झाले. विश्वाला ज्ञानाचा प्रकाश देऊ इच्छिणाऱ्या ज्योतीला एखाद्या कोनाड्यात ठेवण्यात काय अर्थ आहे, असेही त्यांना वाटले असावे म्हणून नंदिवर्धन यांनी दोन वर्षे थांबण्यास सांगून वर्धमानांना दीक्षा घेण्यास परवानगी दिली. श्वेतांबर पंथाच्या परंपरेनुसार वर्धमानाचा यशोदा नावाच्या राजकन्येशी विवाह झाला होता व त्यास प्रियदर्शना नामक एक कन्याही झालेली होती असे मानले जाते. या सर्वस्वाचा त्याग करून वर्धमान यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी अरण्याचा मार्ग धरला.
‘आचारांगसूत्र’ या ग्रंथात पुढील १२वर्षे वर्धमानांनी केलेल्या तपश्चर्येचे वर्णन आढळते. हालअपेष्टा, हेतूपूर्वक किंवा विनाहेतू दिलेला त्रास, लोकांनी केलेली शारीरिक इजा, अनेक अडचणी व प्रचंड त्रास सहन करून व स्वतःजवळ असलेल्या एकमेव वस्त्राचाही त्याग करून, प्रसंगी अन्नाचाही त्याग करून इंद्रियांवर त्यांनी ताबा मिळविला. त्यामुळेच ते ‘जितेंद्रिय’ किंवा ‘महावीर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. अखेर ऋजुपातिका नदीच्यातीरावर जृंभिक नावाच्या गावी श्मालवृक्षाखाली एका जुनाट देवळाशेजारी परमाोच्च (केवल) ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यात महावीर यशस्वी झाले. प्राप्त झालेल्या या केवलज्ञानावर काही काळ चिंतन करून महावीरांनी या केवलज्ञानाच्या आधारे जैन धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रसार करण्यास सुरुवात केली. वयाच्या ७२व्या वर्षापर्यंत अनेक ठिकाणी विहार करून जैनधर्माला महावीरांनी भारतात लोकप्रिय धर्म बनविले. इ. स. पूर्व ५२७मध्ये कार्तिक कृष्ण आमावस्येला तत्कालिन बिहार देशातील पावापूर येथे महावीरांचे महानिर्वाण झाले.
अंग व आगमग्रंथ यामध्ये जैन धर्माच्या तत्वज्ञानाची माहिती मिळते. पुरावा तेवढा विश्वास असे वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवितो. वस्तूनिष्ठ पुरावा नसल्यामुळे विज्ञानाला जसे ईश्वर व विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वर हे मान्य नाही तसेच जैन धर्माने विश्वनिर्माण करणारा व मानवी जीवनात सुखदुःखाची निर्मिती करणाऱ्या ईश्वराचे अस्तित्व अमान्य केले आहे. विश्वात ईश्वर असता तर त्याने भेदभाव का केला असता अन् ईश्वर भेदभाव करीत असेल तर तो ईश्वर कसा काय? जैन धर्माने तीर्थकारांनाही ईश्वर संबोधिलेले नाही तर इंद्रियावर नियंत्रण मिळविणारे ते महामानव आहेत. जैन धर्माने दैववादालाही विरोध केला आहे. ‘देरे हरी खाटल्यावरी’ असे असूच शकत नाही. प्रयत्नवाद, निष्ठा व निग्रहपूर्वक सदाचरण हीच जैन धर्माची शिकवण आहे. विज्ञानाने आत्मा मान्य केलेला नाही. पण जीवाच्या चैतन्यालाच जर तुम्ही आत्मा म्हणणार असाल तर ते विज्ञानाला मान्य आहे. आत्मा हा चैतन्यमय व शुद्ध असून शरीराच्या आधारे आत्म्याचा चैतन्य हा गुण व्यक्त होतो असे जैन धर्म मानतो.
विज्ञानाने एकदा सांगितले की तेच अंतिम सत्य, असे विज्ञानाला कधीही अभिप्रेत नसते. निरिक्षण, तर्क, प्रयोग व प्रचितीतील सातत्य यामुळे अनुमान अथवा निष्कर्ष बदलू शकतो. विज्ञानाचे सिद्धांत व्यक्तिनिष्ठ नव्हे तर वस्तुनिष्ठ असतात. जैन धर्मातील अनेकांतवादाचा दृष्टिकोन या वैज्ञानिक दृष्टिकोनाशी बराचसा मिळताजुळता आहे. कोणत्याही व्यक्तीने आपणास मिळालेले ज्ञान हेच पूर्ण ज्ञान आहे असा आग्रह धरू नये. याउलट आपणास प्राप्त झालेले ज्ञान जितके सत्य आहे तितकेच दुसऱ्याला प्राप्त झालेले ज्ञान सत्य असू शकते याची जाणीव असणे म्हणजे ‘अनेकांतवाद’ होय. या अनेकांतवादामुळे व्यक्ती-व्यक्ती, समाज-समाज, धर्म-धर्म यांमाधील संघर्ष नष्ट होऊ शकतो असे जैन धर्म सुचवितो. आपले ज्ञान हे हत्ती व सात आंधळे यांच कथेप्रमाणे सापेक्ष असते. म्हणूनच संसारी मनुष्याने आपले मत पूर्णपणे व सर्व बाजूंनी बरोबर आहे असा दूराग्रह धरू नेये असे जैन धर्माने मांडलेला ‘स्याद्वाद’ सांगतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातही दूराग्रहाला जागा नसते. तिथे तर हा सूर्य आणि हा जयद्रथ या न्यानेच पुढे पुढे जावे लागते.
महावीरापूर्वी जैन धर्मात अहिंसा, सत्य, अस्तेय (आसक्ती किंवा आपेक्षा नसणे) व अपरिग्रह (गरजेपेक्षा जास्त वस्तूंचा साठा न करणे) ही चार अनुव्रते मानली जात असत. महावीरांनी त्यामध्ये ब्रह्मचार्य (इंद्रियावर नियंत्रण) या आणखी एका अनुव्रताची भर घातली असे मानले जाते. परंतु संसारी माणसाला ही पंच अनुव्रते जैन धर्माने विश्लेषित केल्याप्रमाणे जशीच्या तशी पालन करता येणार नाहीत याचे भान ठेवून त्यांचे पालन करण्याच्या बाबतीत जैन धर्मानेच काही प्रमाणात सूट दिलेली दिसते. उदा. अहिंसेचे बाबतीत या धर्माने शारीरिक, वाचिक व मानसिक अशा तीन प्रकारे हिंसा होऊ शकते असे प्रामुख्याने मानले आहे. गृहस्थाश्रमात राहणाऱ्या सामान्यजनाला या प्रकारची सर्व हिंसा टाळणे शक्य नसले तरी त्याने त्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त प्रयत्न करणे जैन धर्माने आवश्यक मानले आहे. अहिंसा तत्वाच्या पालनासाठी रात्रीच्या भोजनाचा त्याग करावा, रात्री बाहेर जाणे टाळावे, बोलताना आपल्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या हवेमुळे सूक्ष्मजीव मरू नयेत म्हणून बोलताना तोंडासमाोर कापड (मुपत्ती) धरावे इ. आचारविषयक नियम सांगितले आहेत. कर्मधर्म संयोगाने का होईना पण कोरोनामुळे विषाणूने आपल्या शरीरात प्रवेश करू नये म्हणून सर्वांनी आपले तोंडावर मुखपट्टी (मास्क) लावणे किती गरजेचे झाले होते हे आपणास ज्ञातच आहे. एकंदरित जैन धर्माने अहिंसेबाबत तत्वाला व त्याच्या पालनाला विशेष महत्व दिल्याचे दिसून येते.
एकदा सत्य आणि अहिंसेचे तत्व अंगिकारले की मानवाची वाटचाल मानवतेकडे होऊ लागते. विज्ञानालाही हेच अपेक्षित असते म्हणून विज्ञान नेहमी मानवी कल्याणाकडे जाणारे संशोधन करित असते. जैनच नव्हे तर कोणत्याही धर्माचा किंवा त्याच्या निर्मितीचा मूळ उद्देश लक्षात घेतला तर असेच दिसून येईल की धर्म म्हणजे माणूस असण्याचे व माणुसकीचे प्रमुख लक्षण होय. पण अलिकडे आपण धर्माचा हा मूळ उद्देशच विसरत चाललो आहोत.
विज्ञान हे मानव कल्याणासाठीच असते पण एखाद्या निर्बुद्ध माणसाने त्याचा दुरुपोग केला तर ते अमानवी (हिरोशीमा-नागासाकी, युक्रेन-रशिया, अमेरिका-इराण-इस्रायल) ठरते. हीच बाब धर्माच्या बाबतीतही तितकीच खरी आहे. धर्म हे माणुसकी जोपासण्यासाठी निर्मिले गेले पण धर्मामध्ये कर्मकांडे घुसविली गेली, तथाकथित धर्ममार्तंडांनी धर्माप्रेमींचा बुद्धिभेद केला. काळा बरोबर पुढे जाताना गरज असेल तेव्हा धर्म चिकित्सा करण्यास विरोध केला. राज्यकर्त्यांनी सुद्धा गुण्यागोविंदाने राहणाऱ्या दोन भिन्न धर्मियांना राष्ट्रवादाची अफुची गोळी दिली आणि आपला स्वार्थ साधला. छद्म विज्ञानाचा वापर करून माणुसकी व वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारलेल्या धर्मालाही यांनी अधर्मी केले. धर्म तो जैन असो अथवा कोणताही, त्याचे पुरस्कर्ते वर्धमान महावीर असोत किंवा आणखी कोणीही धर्म आणि विज्ञान यांच्या बाबतीत वैज्ञानिक दृष्टी ठेवून विश्वाचे सर्व धर्म आणि विज्ञान यांची गुंफण झाली तरच महावीरांसारख्या महामानवांच्या जयंतीचे व त्यांच्या तत्वज्ञानाचे प्रयोजन सिद्ध होईल.
(लेखक शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलसचिव आणि सर्वधर्मसमभावाचे पुरस्कर्ते आहेत.)
rdkankariya@rediffmail.com
