उदय तारा नायर

अली ‘स्क्रीन’मध्ये नेमके कोणत्या वर्षी रुजू झाले, हे काही आता आठवत नाही, मात्र १९७५च्या आसपासचा काळ असावा. चित्रपट दिग्दर्शक के. अब्बास यांचं शिफारसपत्र घेऊन ते ‘स्क्रीन’चे त्या वेळचे संपादक एस. एस. पिल्लाई यांना भेटायला आले होते. पिल्लाई यांनी त्यांची तिथल्या तिथे परीक्षा घेतली. अभिनेते साधू मेहेर तेव्हा पिल्लाईंना भेटायला ऑफिसमध्ये आले होते. पिल्लाईंनी अली यांना साधू मेहेर यांची मुलाखत घ्यायला सांगितलं. साधू यांना त्यांच्या ‘अंकुर’मधल्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं आणि ‘निशांत’मधल्या त्यांच्या अभिनयाचं बरंच कौतुक झालं होतं. अली यांना मुलाखत लिहिण्यासाठी टाइपराइटर दिला होता, तरीही त्यांनी हातानेच कॉपी लिहिली. त्यांना टायपिंग येत नव्हतं, पण मुलाखत छान लिहिली असावी, कारण पिल्लाईसाहेबांनी त्यांना दुसऱ्या दिवशी येऊन एचआरला भेटायला सांगितलं. अलींना नोकरी मिळाली होती. पगार मिळू लागला की टायपिंग शिकून घेईन, असं वचन त्यांनी पिल्लाईसाहेबांना दिलं होतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते ऑफिसला आले, तेव्हा आम्ही सगळेच थक्क झालो. अलींनी केस नीट कापले होते. अस्ताव्यस्त वाढलेल्या दाढीला आकार दिला होता आणि नीटनेटके कपडे घातले होते. काही क्षण तर आम्ही त्यांना ओळखलंच नाही.

त्यांच्या नावाविषयी मात्र आम्हाला कुतूहल वाटलं. हळूहळू त्यांच्याशी मैत्री झाली आणि ते ‘स्क्रीन’ परिवाराचा भाग होऊन गेले, तेव्हा कळलं की त्यांचे वडील मुस्लीम होते आणि आई ख्रिश्चन. अली त्यांचं आडनाव होतं. त्यांचा जन्म २९ जूनला म्हणजेच ‘सेंट पीटर्स डे’ला झाला होता. त्यामुळे त्यांचं नाव पीटर ठेवलं गेलं. त्यांचे वडील प्रसिद्ध पक्षिनिरीक्षक सलीम अलींचे चुलत भाऊ होते आणि आई गरीब कुटुंबातली होती. अली यांना लहान भाऊही होता. पण ही मुलं लहान असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या आईनेच काबाडकष्ट करून मुलांना शिकवलं, वाढवलं. आपल्या मोठ्या मुलाची अभ्यासातली प्रगती पाहून, विशेषत: त्याने लिहिलेल्या कविता आणि निबंधांना बक्षिसे मिळताना पाहून तिला फार समाधान वाटत असे.
‘स्क्रीन’मध्ये रुजू झाल्यानंतर अल्पावधीतच ते चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींमध्ये लोकप्रिय होऊ लागले. त्यांच्या खास शैलीमुळे त्यांना ‘स्क्रीन’साठी सदर लिहिण्याची संधी मिळाली आणि हे सदर लोकप्रिय झालं. त्यांना पत्रकारितेत येण्याची संधी देणाऱ्या पिल्लाईसाहेबांचं १९७८ मध्ये निधन झालं. तो अलीसह आम्हा सर्वांसाठीच मोठा धक्का होता.

कलाकारांचे मित्र

तोपर्यंत अली केवळ त्यांच्या खास लेखनशैलीसाठीच नव्हे, तर एक प्रेमळ व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ लागले होते. देव आनंद, प्राण, शशी कपूरसारख्या ज्येष्ठ अभिनेत्यांशी त्यांचे मैत्रिपूर्ण संबंध निर्माण झाले होते. देव आनंद यांचे तर ते अगदी लाडके मित्र होते. ते अली यांना बोलावून तासन् तास गप्पा मारत बसत. अली यांचा स्वतःचा एक करिश्मा होता. खरं तर ते चारचौघांपेक्षा काहीसे वेगळे दिसत. पोशाखही दर वेळी नीटनेटका असेलच, असं नाही; पण तरीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असं काही तरी होतं, ज्यामुळे कोणीही त्यांच्याकडे सहज आकर्षित होत असे. संवाद साधण्याची कला त्यांना अवगत होती. पण त्यांच्या या मैत्रिपूर्ण वर्तनाचा गैरफायदा अनेक संधिसाधूंनी घेतला. याचा त्यांना त्रास होत असे, पण तरीही गरजूंना मदत करण्याची वृत्ती ते कधीही सोडू शकले नाहीत.

स्मरणरंजन

ते गोष्टीवेल्हाळच होते. चित्रपटसृष्टीतल्या कोणत्याही व्यक्तीचं आयुष्य गोष्टीरूपात सांगत. आमच्या काळातील अनेकांप्रमाणेच स्मरणरंजन हा त्यांचा आवडता प्रकार होता. त्या स्वरूपाचं लेखन त्यांना उत्तम जमत असे. ते एखाद्या अभिनेत्याला भेटून त्याचं बालपण, संघर्ष या सगळ्याची माहिती घेत आणि मग ते एखाद्या कथेप्रमाणे लिहून काढत. चंद्रशेखर, प्रेमनाथ, कामिनी कौशल, सुरैय्या यांच्यासारख्या अतिशय ज्येष्ठ कलाकारांशी त्यांचे उत्तम ऋणानुबंध होते. त्यांचा संयमी आणि नम्र स्वभाव ज्येष्ठांना भावत असे. इतर तरुणांसारखे ते उद्धट नव्हते. पण याचा दुष्परिणाम असा की, त्यांना कोणत्याही विषयावर लिहायला सांगितलं की ते त्या व्यक्तीच्या बालपणापासूनच सुरुवात करत.
उदाहरणार्थ- अनिल कपूरला त्याच्या वडिलांची कार चालवायला आवडत असे. पण त्याचं वर्णन अली करत तेव्हा ते लिहीत, ‘अनिल कपूरने सुरुवातीच्या काळात आपल्या वडिलांचा ड्रायव्हर म्हणून काम केलं.’ हे सत्य असलं तरी अली यांच्या शैलीतून काहीसा अजब अर्थ ध्वनित होत असे. पण अनिल कपूरला मात्र स्वत:विषयी असं काही लिहिलं जाणं फार आवडत असे. हळूहळू अली स्मृतिरंजनातच रमू लागले, ते वर्तमानात यायला तयारच नसत.

स्ट्रगलर्सचा त्राता

अली कोणाला मदत करताना कधीही मागेपुढे पाहत नसत. स्टार होण्याची स्वप्नं घेऊन मुंबईत आलेले अनेक तरुण कलाकार त्यांना येऊन भेटत. अलीसुद्धा काहीच ओळखदेख नसताना त्यांची चित्रपटसृष्टीतल्या बड्या हस्तींशी सहज ओळख करून देत. असे अनेक होतकरू ऑफिसमध्ये येऊन अलींशी गप्पा मारत बसलेले दिसत. राज बब्बर, अनुपम खेर, मनोज वाजपेयी, चंद्रचूड सिंग ही त्यापैकीच काही नावं. अनुपम खेर जेव्हा मुंबईत आले तेव्हा भूमिका मिळवण्यासाठी त्यांनी ज्यांची भेट घेतली, त्यातली पहिली व्यक्ती होती अली पीटर जॉन. ‘कुछ भी हो सकता है’ या आपल्या शोमध्ये त्यांनी याचा उल्लेख केला आहे.

‘स्क्रीन’ एक्स्प्रेस टॉवरच्या लॉनवर दरवर्षी एक मोठी पार्टी आयोजित करत असे. त्यात चित्रपटसृष्टीतील जवळपास सर्व कलाकारांना आमंत्रित केले जात असे. अनुपम खेर यांना या पार्टीत सहभागी होण्याची इच्छा होती. त्यांनी ती अली यांच्याकडे व्यक्त केली. पण तेव्हा अनुपम एक होतकरू नाट्य अभिनेते होते. अली यांनी मला विचारलं, एका कलाकार खाली आला आहे. त्याला पार्टीत सहभागी व्हायचं आहे, येऊ देऊ का? मी परवानगी दिली. अली अनुपम यांना घेऊन आले. ते दोघे लिफ्टमधून बाहेर पडले तेव्हा दुसऱ्या लिफ्टमधून दिलीप कुमार आले. त्यांनी अली यांना अभिवादन करत अनुपम खेर यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांना घेऊन आत गेले. एकही चित्रपट न केलेल्या नवख्या तरुणासाठी तो खूपच सुखद धक्का होता आणि पार्टीतले सगळे, ‘हा कोण नवीन?’ म्हणून अनुपम यांच्याकडे पाहत होते. राजकुमार बडजात्यांनी अनुपम खेर यांना पाहिलं. त्यांनी महेश भट यांना सांगितलं या मुलाचा ‘सारांश’साठी विचार करता येईल. भट यांनीही त्याला होकार दिला. दुसऱ्याच दिवशी अनुपम यांना ‘राजश्री’त बोलावणं आलं आणि त्यांची ‘सारांश’साठी निवड झाली. हे सारं अनुपम खेर यांनी त्यांच्या आत्मचरित्रातही लिहिलं आहे. हा सगळा आमच्या संपादकांच्या- पिल्लाई सरांच्या संस्कारांचा भाग होता. ते नेहमी सांगत, ‘कोणाकडेही दुर्लक्ष करू नका, उद्धटपणे वागू नका. आज जो कोणीच नाही तो उद्या मोठा स्टार होऊ शकतो.’ अली यांनी त्यांचा सल्ला कायम लक्षात ठेवला.

व्यक्तिगत जीवन

अली अगदी लहान वयात मॉली नावाच्या मुलीच्या प्रेमात पडले होते, पण पुढे ती मुलगी ‘नन’ झाली. या प्रेमभंगाचं दु:ख त्यांना पचवता आलं नाही. तिची एखादी झलक दिसेल, या आशेने ते तिच्या घराबाहेर जाऊन तासन् तास उभे राहत. आम्ही दोघेही अंधेरी परिसरात राहात होतो. मी मरोळमध्ये तर ते कोंडीविटा भागात राहात. तिथे कॅथलिक ईस्ट इंडियन वस्ती होती. बसचा प्रवास अनेकदा एकत्र होत असे, तेव्हा कधी तरी त्यांनी मला मॉलीविषयी सांगितलं होतं. पण त्यांची ती प्रेमकहाणी अर्धवटच राहिली.
पुढे त्यांच्या आयुष्यात एक दु:खद घटना घडली. त्यांच्या लहान भावाचं- रॉयचं अपघाती निधन झालं. अली अतिशय संवेदनशील होते. भाऊ गमावल्याचं वास्तव स्वीकारणं त्यांना फार कठीण गेलं. यातून त्यांना मद्यपानाचं व्यसन जडलं. या रॉय यांना मुलगी झाली होती, तेव्हा अली खूप खूश झाले होते. मला विचारलं बाळाचं नाव काय ठेवू? मी सहज म्हटलं, स्वाती छान नाव आहे आणि त्यांनी खरोखरच त्या बाळाचं नाव स्वाती ठेवलं. ‘स्क्रीन’मध्ये सर्वांचे असे एखाद्या कुटुंबासारखे संबंध होते. पुढे भावाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या पत्नीशी विवाह केला आणि स्वातीला दत्तक घेतलं.

व्यसनाधीनतेतून अनेक संधिसाधूंचं टोळकं त्यांच्याभोवती गोळा झालं. ते वारंवार आजारी पडू लागले. पण त्यांच्या लेखनात मात्र कधीही खंड पडला नाही. रुग्णालयात दाखल असतानाही, त्यांनी सदर लिहिण्याची शिस्त कायम ठेवली.अली शेवटपर्यंत टायपिंग शिकलेच नाहीत. ऑफिसमध्ये संगणकाचं युग सुरू झालेलं पाहून ते गोंधळून गेले होते. हळूहळू त्यांचं लेखन काहीसं आध्यात्मिक होऊ लागलं. त्यांच्या सदरात अनेकदा देवाचे संदर्भ येऊ लागले. अली उत्तम पत्रकार होतेच, पण त्यांना कौटुंबिक आयुष्यात स्थैर्य लाभलं असतं, तर त्यांची कारकीर्द अधिक बहरली असती.

लेखिका ‘स्क्रीन’ या मनोरंजनविषयक साप्ताहिकाच्या माजी संपादक आहेत.

शब्दांकन – विजया जांगळे