अमिताभ पावडे

वर्धा नगरीत ४ व ५ फेब्रुवारी २०२३ रोजी दोन मराठी साहित्य संमेलने पार पडली. एक ९६ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन जे न्या. चपळगावकरांच्या अध्यक्षतेत राजकीय चाकोरीत, शासकीय नियंत्रणात, अगदी पाठ्यपुस्तकी तथाकथित प्रस्थापित साहित्यिकांनी शासकीय पैशाने घृतकुल्या व मधुकुल्या करत पार पाडले. तर दुसरीकडे अभिव्यक्तीवर कुठलीही शासकीय अथवा राजकीय नियंत्रणे नसलेले, अभिजात मराठीऐवजी गावरान मराठीतील मूलभूत गोडव्याचे मुबलक प्रदर्शन विद्रोही साहित्य संमेलनात दिसले. विद्रोही साहित्य संमेलन हे ‘एक रुपया देणगी व मूठभर धान्य’ अशा पद्धतीने सर्वसामान्यांच्या मदतीतून उभारण्यात आले. परिणामी, विद्रोही साहित्य संमेलनाला मोठा लोकाश्रय लाभला. काही वेळा तर खुर्च्यादेखील कमी पडल्या. याउलट प्रस्थापित साहित्य संमेलनातील रिकाम्या खुर्च्यांचे छायाचित्रच काही वर्तमानपत्रांनी दाखवले. कोट्यवधीच्या देणग्या, अनुदान, शासकीय यंत्रणा व भपकेबाज सजावट लोकांची गर्दी खेचण्यात अयशस्वी ठरली.

Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
Political divisiveness, campaign material,
राजकीय फूट प्रचार साहित्य निर्मात्यांच्या पथ्यावर, मागणीत वाढ झाल्याने कारागिरांची रात्रंदिवस मेहनत
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप

विद्रोहींनी मात्र ३ फेब्रुवारीलाच संमेलनाची पार्श्वभूमी बनवली होती. येथे तीन विद्रोही नाटके सादर झाली. ४ फेब्रुवारीला सकाळी नंदुरबार, नवापूर, धुळे, नाशिक, औरंगाबाद भागांतून स्वयंस्फूर्तीने आलेल्या आदिवासींनी अदम्य उत्साहात रॅलीचे नेतृत्व केले. वर्धेकरांनीदेखील या भिन्न-भिन्न आदिवासी नृत्य परंपरांना दाद दिली. या रॅलीत बहुतांश पुरोगामी संघटनांनी हजेरी लावली. तद्नंतर अत्यंत साध्या पद्धतीने १७ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. गांधींच्या कर्मभूमीत ‘गांधी का मरत नाही’ या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक चंद्रकांत वानखेडे यांनी उद्घाटनपर भाषणातच सकारात्मक विद्रोहाची नांदी दिली. “जमिनीत गाडलेले बीज जेव्हा मातीला घेऊन उजेडाच्या दिशेने उगवते, तेव्हा ते बीज विद्रोह करत असते’’ अशा वाक्याने त्यांनी विद्रोहामधली सकारात्मकता अधोरेखित केली.

आपल्या उद्घाटनीय भाषणात सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री, नाट्य दिग्दर्शक व लेखक रसिका आगाशे-अय्युब यांनी हिंदू व मुस्लीम एकमेकांबाबत जे विनाकारण पूर्वग्रह बाळगून असतात त्याचे मार्मिक विश्लेषण केले. त्यांनी आपले दोन्ही संस्कृतींतील समान भावना, चिंता व मानवी स्वभावांवर प्रकाश टाकून ‘लव्ह जिहाद’सारखे प्रतिगामी व बुरसटलेल्या विचारांचा समाचार घेतला. मावळते संमेलनाध्यक्ष गणेश विसपुते यांनी अत्यंत थोडक्यात पण चिंतनशील भाषण केले. संमेलनाध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांनी विद्रोही साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा गांधीविचारांना मानणारा आहे याबद्दल समाधान व्यक्त केले व सध्या देशात चाललेल्या द्वेष व तिरस्काराच्या वावटळीला प्रेमाची व करुणेची गरज आहे, असे सांगितले.

प्रस्थापित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाअगोदर धार्मिक पूजापाठ करवून घेतले जाते. मात्र विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन हे शेतकरी व्यवस्थेतील सांकेतिक पेरणीने केले गेले. जणू पुरोगामी विचारांची पेरणीच यानिमित्ताने केली गेली. संमेलनस्थळावर ‘लेखणीची तोफ’, महात्मा फुलेंचा पुतळा व संमेलनाचा लोगो हे सेल्फी पॉइंट ठरले. तसेच नानू नेवरे यांचे ‘माझा शेतकरी’ हे छायाचित्रांचे प्रदर्शन व गणेश वानखडे यांचे व्यंगचित्र प्रदर्शन, बालमंच, युवा मंच काष्ठकला प्रदर्शनदेखील लोकांच्या उत्सुकतेचा विषय होते. उद्घाटनानंतर लगेच व्यवस्थेविरोधात विद्रोह करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात प्रा. कुमुद पावडे (आंबेडकरवादी लेखिका व संस्कृततज्ज्ञ), ज. वि. पवार (दलित पँथर्सचे संस्थापक व लेखक), नागेश चौधरी (संपादक- बहुजन संघर्ष, नागपूर), डॉ. हरिश्चंद्र बोरकर (झाडीबोलीचे अभ्यासक), मतिन भोसले (भटके-विमुक्त संघटक, मंगरूळ चवाळा), महादेवराव भुईभार (ज्येष्ठ सत्यशोधक व शिक्षणतज्ज्ञ), देवाजी तोफा (आदिवासी नेते लेखामेंढा) व स्मृतिशेष सुरेश धोपटे (शोधपत्रकार, वर्धा) यांचा सहभाग होता.

वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयांवर परिसंवाद घेण्यात आले. त्यातील ‘मराठी साहित्य संस्कृतीला अब्राह्मणी धर्मप्रवाहांनीच समृद्ध केले’ या विषयावर अविनाश काकडे (नागपूर), ह.भ.प. धर्मकीर्ती महाराज परभणीकर, अध्यक्ष गंगाधर बनबरे (पुणे) व इतर वक्त्यांनी आपले परखड मत मांडले. दुसरा महत्त्वाचा परिसंवाद विषय होता ‘महामानवांची बदनामी, माफीवीरांचे उदात्तीकरण, इतिहासाचे विकृतीकरण व संस्कृतीच्या मिरासदारांचे राजकारण’. या परिसंवादात प्रा. वैशाली डोळस, ईसादास भडके, सतीश जामोदकर व अध्यक्ष निरंजन टकले यांनी आपली मते मांडली. निरंजन टकले यांनी पत्रकारितेतील लांगूलचालनावर आक्षेप नोंदवला. तसेच गुजरात निवडणुकीच्या आधी बिल्कीस बानो यांच्या बलात्काऱ्यांना सोडून त्यांचा जाहीर सत्कार करणाऱ्या धर्मवादी राजकारण्यांचा समाचार घेतला. तसेच वारंवार माफी मागणाऱ्या, एकीकडे वैज्ञानिकतेचा आव आणत दुसरीकडे दलितांना ‘अशुद्ध’ समजून त्यांचे ‘शुद्धीकरण’ करणाऱ्या, दलितांसाठी वेगळे ‘पतित’पावन मंदिर उभारणाऱ्या तसेच इंग्रजांच्या पेन्शनवर जगणाऱ्यांवर ताशेरे ओढले.

दुसऱ्या दिवशी गटचर्चा पार पडली. यात कष्टकरी, दलित, आदिवासी, शेतकरी, कामगार, स्त्रिया, अल्पसंख्याक, विविध पुरोगामी प्रवाहांतील विचारक, शिक्षक, प्राध्यापक व सर्वसामान्य प्रेक्षक हिरिरीने भाग घेताना दिसले. त्यांचे विषय अत्यंत समकालीन व सर्वसामान्यांच्या प्रश्नांना हात घालणारे होते. अगदी नागरिकत्वाच्या प्रश्ना (हम कागज नहीं दिखाएंगे) पासून शेतकरी आत्महत्यांपर्यंत व माध्यमांची गळचेपी व अभिव्यक्तिस्वातंत्र्यापासून प्रेमाला जातधर्माचे कुंपण : महाराष्ट्र सरकारचे नवे कारस्थानापर्यंत… या सत्रात व्यक्त होणारे अगदी पोटतिडिकीने आपल्या व्यथा व कथा मांडत होते. भांडवलदारांचे ‘मिंधे’ होऊन आदिवासी बांधवांना कसे नक्षली किंवा देशद्रोही ठरवून जमिनी व निसर्गाचा ऱ्हास सरकारी यंत्रणा करत आहे किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होऊनदेखील सरकार कसे दुर्लक्ष करीत आहे, याकडे या चर्चांमध्ये लक्ष वेधले गेले. या १६ विषयांवर सखोल व प्रदीर्घ चर्चा झाल्यावर यातील १६ गटनेत्यांनी अमिताभ पावडे (नागपूर) व मनोज भोयर (संपादक, मुंबई) यांच्या अध्यक्षतेत आपली मते मांडली. या वेळी संविधान फाऊंडेशनचे संस्थापक, माजी प्रशासनिक अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेत समारोप झाला. या सत्रात प्रा. जावेद पाशा म्हणाले, या देशातील मुसलमान हा मूलत: भारतीयच आहे. ज्या ‘शूद्रा’वर अत्याचार झालेत ते समतेच्या शोधात धर्मांतर करीत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी हे दोघेही पुरोगामी विचारप्रवाह आणि आंतरजातीय विवाहांचे खंबीर पक्षधर होते. या वेळी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहित जोडप्यांचा सत्कार करण्यात आला.

या संमेलनात ३२ पुस्तकांच्या स्टॉलवरून ५० लाख रुपयांची पुस्तके विकली गेली. कार्यक्रमाची सांगता पावरी, झिबली, ढोल व ताशांच्या पारंपरिक आदिवासी नृत्याने झाली. एक पुरोगामी कौटुंबिक जिव्हाळा माणुसकीने जोडला गेला. या साहित्य संमेलनात सुमारे २०० कवींनी भाग घेतला. तसेच या संमेलनासाठी सत्यशोधक किशोर ढमाले व प्रा. प्रतिमा परदेशी यांनी अथक परिश्रम घेतले. म्हणून समारोपीय सत्रात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रत्येकाच्या मनात हे संमेलन अनेक आठवणी साठवून गेले.

amitabhpawde@rediffmail.com