प्रा.(डॉ.) विश्वांभर धर्मा गायकवाड
धर्म व संस्कृतीच्या अंगाने सुरू झालेल्या परंपरा व रुढी सार्वजनिक ठिकाणी साजरा करण्यास विद्यानंद बापट हिरिरीने करत असलेला विरोध घातक मानला जातो आहे. कारण हे परंपराजन्य उत्सव, कर्मकांडे, विधी इत्यादींच्या पाठीमागे असलेले अर्थकारण व त्यावर उभे असलेले राजकारण त्यामुळे संपुष्टात येत आहे. धर्म-अर्थकारण (Eco-religious) व यातील संबंध (Nexus) याला धक्का पोहोचत आहे. भारतासारख्या धर्म, संस्कृती, परंपरा, जातीय उतरंड, पुरुषसत्ताक, अर्धसरंजामशाही परंपरेत टोकाचा उदारमतवाद, विज्ञानवाद, स्वातंत्र्यवाद, धर्मचिकित्सा आम्हाला रुचणार नाही. आम्ही सूक्ष्म आक्रमकतेचा (Micro aggression) वापर करतो. म्हणजे उघडपणे विरोध न करता “तुम्हाला सण आवडत नसेल तर घरी बसा. हा आमचा सण आहे, तुम्ही विरोध करू नका.” एखाद्याला संस्कृतीविरोधी किंवा धर्मविरोधी म्हणणे “थोडे सहन करा”, “तू असहिष्णू आहेस” असे म्हणणे इत्यादी पद्धतींचा वापर करतो. म्हणून तर आम्ही हल्ले करतो, धमक्या देतो.
आज बापट जे बोलतात ते उत्तर-भांडवलशाही (Post-capitalism) व्यवस्थेतील विकसित होणारी सामाजिक-आर्थिक व्यवस्था कशी एकसंध नसते, हेच दाखवून देणारे आहे. या व्यवस्थेत धर्म, संस्कृती व कर्मकांड पूर्णपणे नाहीसे होतील असे आवश्यक नाही. मात्र त्याचे सामाजिक स्वरूप व कार्य बदलू शकते. उदा : धर्म वैयक्तिक श्रद्धा व नैतिकतेचा विषय म्हणून टिकू शकतो. समावेशक व बहुविविध संस्कृती तयार होतात. ज्या परंपरा मानवी मूल्य, समानता आणि सामाजिक ऐक्य वाढवतात त्या टिकतील. भेदभावकारी परंपरांवर प्रश्न उपस्थित केले जातील. कर्मकांडे धार्मिक बंधनांपेक्षा सांस्कृतिक किंवा वैयक्तिक अभिव्यक्ती म्हणून त्याचे स्वरूप बदलू शकते. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सक विचार वाढल्यास अंधश्रद्धांना आव्हान मिळू शकते. पण आजची समकालीन व्यवस्था ही सत्त्योत्तरी (Post-truth) दृष्टिकोनातून विचार करते. कारण ‘पोस्ट ट्रुथ’ एकदा स्वीकारले की, ज्ञान-राजकारणात किंवा सार्वजनिक संवादात वस्तुनिष्ठ तथ्यांपेक्षा भावना, ओळख, श्रद्धा आणि वैयक्तिक विश्वास यांना अधिक महत्त्व मिळते. ज्याचे हाकारे जास्त त्याचे म्हणणे मान्य केले जाते. त्यामुळे धर्म, संस्कृती, परंपरा आणि कर्मकांडाचा वापर सामाजिक किंवा राजकीय भावनिक हाकाऱ्यांसाठी (Mobilization साठी) होताना दिसतो. त्यात परंपरा ‘आपली ओळख’ म्हणून अधिक दृढ होतो, धार्मिक ‘भावनिक सत्याचे’ स्वरूप घेऊ शकते. कर्मकांडे सामूहिक ओळख आणि भावनिक एकात्मकतेचे साधन बनते. सण हे सांस्कृतिक उत्सवाबरोबर राजकीय-सामाजिक गतिशीलतेचे माध्यमे होतात. तथ्याधारित चिकित्सेपेक्षा भावना आणि विश्वास प्रभावी ठरू शकतात. याउलट बापट उत्तर-संरचनावादी (Post-structuralism) विचार करतात. ज्यात धर्म, संस्कृती, परंपरा, कर्मकांड यांना स्थिर, सार्वत्रिक आणि अंतिम सत्य मानले जात नाही. त्याऐवजी ते विचारतात की, या गोष्टीचे अर्थ कोण निर्माण करतो, कोणत्या सत्ता संबंधामुळे टिकतात आणि कोणाला त्यातून लाभ किंवा वंचना मिळते? म्हणून उत्तर-संरचनावादाचा उद्देश धर्म किंवा परंपरा नष्ट करणे हा नाही; तर त्यांना नैसर्गिक अपरिवर्तनीय आणि अंतिम सत्य मानण्यामागील भाषा, सत्ता, चर्चाविश्व आणि अर्थनिर्मिती उघड करणे हा आहे.
बापट यांनी पुण्यातील गणेश उत्सवातील ध्वनीप्रदूषण व रस्त्यावरील आक्रमण यांचा सार्वजनिक उपद्रव (Nusence) म्हणजेच लोकांच्या आरोग्याशी होणारा दुष्प्रभाव याला आक्षेप घेतला आहे. गणेशोत्सव साजरा करण्यास त्यांनी विरोध केलेला नाही. पण उत्सवाची प्रासंगिकता व तिचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम याची योग्य ती चिकित्सा ते करताना दिसतात. ही चिकित्सा त्यांनी व्यापक प्रमाणात केलेली आहे. त्यांच्यावरील हल्ला याचा संबंध पुण्यातील उत्सवामागील अर्थकारण व राजकारण याला बसलेल्या धक्क्याशी आहे. जेव्हा उत्सव व परंपरेच्या नावाखाली सार्वजनिक रस्ते अडवणे, ध्वनीप्रदूषण, द्वेषपूर्ण भाषण, सामाजिक ध्रुवीकरण, हिंसक शक्तीप्रदर्शन किंवा सार्वजनिक शांततेचा भंग करणे याचे सैद्धांतिक समर्थन असे केले जाते की, काही परंपरा अत्यंत प्राचीन असल्याचे सांगितले जाते. खरे तर ईरिक हॉबसबॉम, ट्रेंस रेंजर या अभ्यासकांच्या मते अशा परंपरांचा उपभोग सामाजिक एकात्मता, समूहओळख आणि राजकीय वैधता निर्माण करण्यासाठी होऊ शकतो. तसेच असे उत्सव राजकीय-सामाजिक शक्तीसंघर्षाचे साधन बनू शकतात? सणाच्या नावाखाली नेमके कोणते सामाजिक वर्तन सामान्य किंवा वैध ठरवले जात आहे?
उत्सव समाजाच्या सांस्कृतिक गरजा व्यक्त करतो की, बाजारव्यवस्था आणि प्रदर्शनवादी संस्कृती उत्सवाचे स्वरूप ठरवू लागते हा प्रश्न महत्वाचा आहे. उत्सवाची मूळ सांस्कृतिक भूमिका म्हणजे सणामागील मूळ सामाजिक-सांस्कृतिक उद्देश समुदायाची एकता, परंपरेचे जतन, धार्मिक श्रद्धा किंवा सामाजिक संवाद. परंतु कालांतराने तोच उत्सव ‘व्यावसासयिक दृश्य /प्रेक्षणीय उपभोग’ (Commercial spectacle) बनतो. म्हणजे उत्सवाचा भर आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक आाशयापेक्षा मोठे प्रदर्शन, जाहिरात, महागडी सजावट, मोठ्या आवाजातील संगीत, गर्दी आणि उपभोग यावर केंद्रीत होतो. जेव्हा ‘सांस्कृतिक उत्सव ’, सामूहिक सांस्कृतिक अभिव्यक्ती पासून Public spectacle मध्ये रुपांतरित होतो तेव्हा एका समुहाचा उत्सव साजरा करण्याचा अधिकार इतर नागरिकांच्या शांतता, सार्वजनिक अवकाश आणि नागरी हक्कांवर परिणाम करू शकतो, यालाच ‘उत्सवाचे व्यापारीकरण व प्रेक्षणीयीकरण’ असे म्हटले जाते.
अलीकडच्या काळात राजकारणी लोक अशा उत्सवास आर्थिक-प्रशासकीय पाठबळ पुरवतात. याच्या बदल्यात आयोजकाला मान्यता, संसाधने, परवानग्या, संरक्षण, राजकीय प्रवेश तसेच गर्दी, सामाजिक नेटवर्क, स्थानिक प्रभाव व मतदारांशी थेट संपर्क मिळवतात. राजकीय पक्ष थेट मत मागण्याऐवजी संस्कृती, धर्म, परंपरा, सण, प्रतिके आणि सामूहिक भावना यांच्यामार्फत सामाजिक आधार तयार करत असतात. परंपरा केवळ प्राचीन असल्यामुळे राजकीयदृष्ट्या प्रभावित होत नाहीत तर एखादी परंपरा नव्या सामाजिक किंवा राजकीय उद्देशासाठी पुनर्रचित केली जाऊ शकते. जेव्हा सांस्कृतिक किंवा धार्मिक उत्सव राजकीय आश्रय (Patronage), गतीशिलतेशी (Mobilization) जोडली जातात. तेव्हा सार्वजनिक अवकाश ध्वनी, निवडणुका, प्रतिके आणि गर्दी यांचा वापर राजकीय शक्तीप्रदर्शनासाठी होतो.
पुण्यातील गणेश उत्सव आणि ध्वनीप्रदूषण हा प्रश्न आता ‘उत्सवाचा अधिकार विरुद्ध शांततेने जगण्याचा अधिकार’ या स्वरूपात चर्चेला येताना दिसतो. बापट किंवा त्यांच्यासारखी इतर अनेक मंडळी समाजात नागरी जाणीव (Civic Sense) व नागरिक सक्रियता वाढावी यासाठी प्रयत्न करताना दिसतात. बापट यांनी मुलाखतीत वारंवार वापरलेला ‘व्यक्तिकेंद्रित आक्षेप’ (Ad-hominem) घेण्याची तार्किक चूक हा मुद्दा , हेच त्यांच्या विरोधकांना निष्प्रभ करणारा ठरतो. म्हणजेच युक्तवादाला उत्तर देण्याऐवजी त्या व्यक्तीच्या चारित्र्य, व्यक्तिमत्त्व, जात, धर्म, शिक्षण, नास्तिक, हेतू इत्यादींवर हल्ला करणे पण बापट सर समस्येवर चर्चा करा असे सांगतात. समस्या कोण सांगतो येथे गौण असते. पण त्यांचा तार्किक युक्तीवाद कोणीही करताना दिसत नाहीत. त्याऐवजी त्यांना पाखंडी, परंपराभंजक, धर्मविरोधी, डावा, दिमागी नक्षल, नास्तिक, पुण्याबाहेरून आलेला, उत्सवविरोधक, अव्यहारिक इत्यादी विशेषणे लावली गेली. म्हणून तर बापट यांच्या मराठीची शुद्धता, संस्कृत व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, बहुशाखीय अभ्यास, तार्किक युक्तिवाद इत्यादी गुणांचे कौतुक करून त्यांच्या मुख्य मुद्याची धार कमी केली जात आहे. यापासून सावध होणे गरजेचे आहे. बापटांच्याच भाषेत सांगायचे तर, ‘कार्यसिद्धी’साठी सतत लढत राहणे हे अंतिम उत्तर आहे.
लेखक उदगीर येथील छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
vishwambar10@gmail.com
