संजय साळुंखे
विद्यानंद बापट काय बोलत आहेत, त्यांचे म्हणणे काय आहे, यापेक्षाही ते कसे बोलतात याकडेच सर्वांचं अधिक लक्ष दिसतं. म्हणजे ‘बिनबापटांच्या मराठी’त सांगायचं तर, ‘बापटांच्या कन्टेन्टपेक्षा त्यांच्या मराठी स्टाइलवर लोक फिदा झालेत’! बापटांचा कन्टेट मुळात जबरदस्त आहेच पण ज्या तऱ्हेनं व ज्या अस्सखलितपणे त्यांनी मुद्दा मांडतात आणि स्टाइल-कन्टेन्ट यांचे ‘कॅाम्बिनेशन’ झाले, त्याचाच जणू लोकांना सुखद धक्का बसला असावा. त्यातून ‘बापटांचे मराठी’ हाच कौतुकाचा, थट्टेचा, कुचेष्टेचा विषय ठरला… त्यातून, या मराठीमुळे लोकांना धक्का बसलाय की लोकांनी धसका घेतलाय असाही प्रश्न काहींना पडला.

वस्तुतः बापट जे बोलतात ते काही फार ‘वेगळं’ मराठी नाहीच मुळी!

मग बापटांच्या मराठीचा लोकांनी जणू काही धसका घेतलाय, असं चित्र का उभं राहिलंय? किंबहुना बापट जे बाेलतात त्यापेक्षाही ते जसं बोलतात त्यावर, म्हणजे त्यांच्या मराठीवर हजारो रील्स का तयार होताहेत? तर याचं उत्तर गेल्या कित्येक वर्षात मराठीवर आपल्याच लोकांनी व मायबाप सरकारने केलेली ’अत्यल्प बौद्धिक तरतूद’!

मराठी वाचन किंवा मराठी लेखन हे आपल्यातून गेल्या तीसएक वर्षांत जवळपास हद्दपार झालेलं आहे. याला कारण लोकांचा इंग्रजी शाळांचा सोस. त्यांच्या बेगडी शिक्षणाला आपणच दिलेलं चंदेरी स्वरूप आणि त्या शाळांतून इंग्रजीचंही जेमतेमच ज्ञान असलेल्या आणि तदनुषंगानं अल्पवेतनानुज्ञित शिक्षकांचं फोफावलेलं पीक! मग इंग्रजी शाळांत भाषा म्हणून इंग्रजीची वाट तर लागलीच पण मराठी भाषा तर भिकेला लागली, नव्हे आम्हीच ती लावली!

मराठी बोलायची लाज वाटणारे आम्ही, बापटांची मराठी ऐकून एकदमच शहारून गेलो..भेदरून गेलो. ‘मराठी अशी असते तर?’ असं म्हणायची नामुष्की आमच्यावर आली व त्यामुळे आम्ही बापटांच्या बोलण्यातला कन्टेन्ट म्हणजे आशय दुय्यम ठरवला व त्यांच्या मराठी, संस्कृत व इंग्रजी भाषेवरच्या प्रभुत्वानं – ‘स्टाइल’नंच आम्ही भारावून गेलो. त्यांनी मराठीचे ‘क्लास’ घ्यावेत असं त्यांना सुचवण्यापर्यंत लोकांची उथळ मानसिकता सामोरी आली. त्यांच्या मुलाखती घेतल्या जाऊ लागल्या ज्यात त्यांना आपले मराठी इतकं ‘भारी’ कसं… किंवा आपल्याला ‘आवडत’ असलेला श्लोक कुठला…. असले प्रश्न विचारले जाऊ लागले. त्यात ‘घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्यात् गर्दभरोहणम् । येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत् ।। या श्लोकाचा पुनरुच्चार त्यांच्या ताेंडून करवून घेण्याचा, किंवा याच श्लोकाचा अर्थ बापटांकडून वदवून घेण्याचा उच्छ्रंखल सपाटाच माध्यमांनी लावला! यात त्या माध्यमांची भाषेची ‘पोहोच’ किती मर्यादित आहे हेच तर दिसलं. पण विद्यानंद बापट यांनी न चिडता- वैतागाची रेषाही दिसू न देता सांगितलं की, ‘चीप पब्लिसिटी ज्यांना हवी असते, म्हणजे सवंग प्रसिद्धी मी म्हणतो ते. त्याचा उपहास म्हणजे सटायर करणारे संस्कृतमधील ते सुभाषित आहे. घटम् म्हणजे मातीची मडकी, ती फोडावी आणि पटं छिन्द्यात्, पट म्हणजे कापड आणि छिन्द्यात् म्हणजे फाडावी. कुर्यात गर्दभरोहणम्, गर्दभ म्हणजे गाढव. ते सामान वाहून नेण्यासाठी वापरलं जातं. त्याच्यावर घोड्यासारखं माणसांनी बसावं- आरोहण करावं. म्हणजे मडके फोडावे, वस्त्र फाडावे आणि गाढवावर बसावे आणि कोणत्याही प्रकारे प्रसिद्ध व्हावे असा याचा अर्थ आहे..” – लोक भाळलेच!

अर्थात या श्लोकाच्या अर्थानुसार फक्त प्रसिद्धी, प्रसिद्धी आणि प्रसिद्धी याच एका उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून वाटचाल करणाऱ्या किंवा मनोरंजन हाच एकमेव कन्टेट राबवणाऱ्या विविध ‘समाजमाध्यमकर्मीं’ना आपल्या रील्सरूपी ‘गर्दभारोहणा’ची जाणीव आतातरी व्हावी की नाही? हे शेकडो वर्षांपूर्वीचं सुभाषित बापटांनी आता लोकप्रिय केलं; तर मग आमच्या शालेय अभ्यासक्रामातले संस्कृत- किंवा मराठीसुद्धा- इथल्या अनेकांनी फक्त ‘पासापुरतंच’ अभ्यासलं, मार्कांपुरतंच वापरलं, हेच यातून सिद्ध होत नाही का..?

मुळात आपलीच मातृभाषा मराठी आपण इतकी वर्षं ‘खुंटीला टांगून’ ठेवण्याचा हा परिपाक आहे हेच यातून सिद्ध होतं, असंच म्हणावं लागेल!
शाळेचा उपयोग फक्त ‘सूचीबद्ध ज्ञान’ मिळवण्यासाठीच केला जातो तेव्हा हे असले ‘बापट धक्के’ आपल्याला बसतात हेच धक्कादायक वास्तव.

लहानपणापासून चिमणीला ‘स्पॅरो’ म्हणायचा अट्टाहास करणाऱ्या ‘नवाधुनिक मम्मी’ आपापालं ‘पॅरेंटहूड’ अंगी बाणवून आपल्या पोरांना बाटलीला आवर्जून ‘बॅाटल’ म्हणायला लावून त्याच ‘बॅाटल’ मध्ये मराठीचं ‘भूत’ बंद करून टाकतात, यासारखे घरोघरी घडणारे प्रयोग आपल्या अख्ख्या शिक्षणव्यवस्थेचं विदारक वास्तव अधोरेखित करतात.

‘ज्याचे मातृभाषेवर प्रभुत्व त्याचे जगातल्या कोणत्याही भाषेवर प्रभुत्व,’ हे आचार्य अत्रे यांनीही सांगितलं होतं मातृभाषा शिक्षणाची गरज मोठमोठे भाषातज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ यांनीही प्रतिपादन केली आहे. अत्रे हे भाषाप्रभू होतेच आणि शिक्षणतज्ज्ञही होते… त्यांनी ‘बालभारती’च्या काळाआधी ‘नवयुग वाचनमाला’ तयार केली आणि ‘हा सुवेझ कालवा, थक्क करिल मानवा’ सारख्या साध्यासोप्या मराठी कवितांतून ज्ञानही वाढवलं. पण हेच अत्रे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात राजकारणातही महत्त्वाचे नेते ठरले, ते केवळ भाषेमुळे नव्हे- त्यांची भूमिका लोकांना पटत होती म्हणून!

आज नेमकं याउलट घडतं आहे. लोकांना मराठी येत नाही म्हणून, बापटांच्या वैचारिक भूमिकेपेक्षा त्यांच्या भाषेकडेच लक्ष वेधलं जातं आहे. बापटांचं म्हणणं आपण भाषेपुरतंच मर्यादित केलं हा आपला करंटेपणा!

sanjaysalunkhe1963@gmail.com