Voters of Tamil Nadu did not affected due to election campaign on WhatsApp... | Loksatta

तमिळनाडूचे मतदार ‘व्हॉट्सॲप’मुळे बधले नाहीत…

व्हॉट्सॲपचा प्रभाव मतदारांवर किती पडतो, याचा एक रीतसर समाजवैज्ञानिक प्रयोगासारखा अभ्यास तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीदरम्यान ‘व्हॉट्सॲप’च्या आधारे झाला होता. भाजपचा प्रभाव नसलेल्या या राज्यातील दोन प्रमुख पक्षांच्या मतदारांबद्दल काय निष्कर्ष निघाले?

तमिळनाडूचे मतदार ‘व्हॉट्सॲप’मुळे बधले नाहीत…
तमिळनाडूचे मतदार ‘व्हॉट्सॲप’मुळे बधले नाहीत…

केव्हिन कार्नेे

भारतातील सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत समाज माध्यमांची भूमिका निर्णायक ठरत आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी समाज माध्यमांचा वापर वाढवला आहे. लोकशाही प्रक्रियेतील समाज माध्यमांच्या या वाढत्या प्रभावाबाबत चिंताही व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी (२०२१) तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत व्हॉट्सॲप या समाजमाध्यमाची नेमकी काय भूमिका होती याच्या अभ्यासावर हा लेख आधारित आहे.

समाज माध्यमांच्या राजकीय परिणामांवर जगभरातील लोकशाही देशांमध्ये चर्चा होते. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून गणल्या गेलेल्या भारतात सर्वाधित लोकप्रिय समाज माध्यम म्हणजे व्हॉट्सॲप. भारतात व्हॉट्सॲपचे ५०० दशलक्ष वापरकर्ते आहेत. याच लोकप्रियतेमुळे राजकीय पक्ष आणि राजकीय नेते त्यांच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रूप्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसतात. त्यामुळेच याचा लोकशाही प्रक्रियेवर नेमका काय परिणाम होतो याचा शोध घेण्यासाठी सदर अभ्यास करण्यात आला.

लोकांना एकमेकांशी तसेच जगाशी जोडण्यासाठी समाज माध्यमाचा उगम झाला. त्यापलीकडे ही समाज माध्यमे विविध राजकीय विचारसरणींमध्ये विभागलेली आपल्याला दिसतात. मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या माहितीचा धोरणांवर निश्चित परिणाम होत असतो हे डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्समधील अनेक अभ्यासातून (पांडे २०११) सिद्ध झाले आहे. त्यामुळे समाज माध्यमांमधून प्रसारित होणाऱ्या अफवा, चुकीची माहिती आणि केंद्रीकरण हा कायमच चिंतनाचा विषय राहिला आहे.

समाजमाध्यमांचे वेगळेपण

तमिळनाडूसारख्या मोठ्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत व्हॉट्सॲपसारख्या समाज माध्यमांचा नेमका काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी समाज माध्यमे अन्य पारंपरिक माध्यमांपेक्षा कशी वेगळी आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. समाज माध्यमांमध्ये वापरकर्ता (यूजर) एकाच वेळी समांतर संवाद (हॉरिझाँटल) आणि दुतर्फी संवाद करू शकतो. पारंपरिक माध्यमांमध्ये फक्त उभ्या रेषेत (व्हर्टिकल) संवाद होतो. एका बिंदूपासून अनेकांपर्यंत संदेश पाठवला जातो, मात्र त्यांच्यात परस्पर संवादाची सोय नसते. समाज माध्यमांमधील संवाद दुतर्फी आणि बहुगामी असतो. संदेश प्राप्तकर्ता एकाच वेळी त्यावर प्रतिक्रिया देऊ शकतो आणि तोच संदेश दुसऱ्याही अनेकांना पाठवू शकतो.

व्हॉट्सॲप सारख्या समाज माध्यमांमधून एकाच वेळी अनेकांपर्यंत तो ही स्वस्तात संदेश पोहोचत असल्याने राजकीय पक्ष त्याचा अधिक वापर करताना दिसतात. त्यामुळे त्यांचा नेमका मतदारांच्या विचारांवर आणि संवादाच्या परिणामावर नेमका काय परिणाम होतो, राजकीय पक्षांसाठी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी समाज माध्यमे प्रभावी साधने आहेत की मतदारांवर केवळ प्रभाव टाकणारी साधने आहेत हे शोधण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला.

असा केला अभ्यास

राजकीय पक्ष निवडणुकीच्या प्रचारासाठी व्हॉट्स अपचे अनेक स्थानिक ग्रूप्स (२५६ च्या मर्यादेत) करतात. जगभरातील लोकशाही देशांमध्ये हीच पद्धत सुरू आहे. भारतातही असेच आहे. भारतातील प्रत्येक ६ मतदारांपैकी १ मतदार अशाप्रकारच्या एखाद्या ग्रुपचा सदस्य असल्याचे गेल्या मध्यावधी निवडणुकीत झालेल्या एका अभ्यासातून पुढे आले होते. आमच्या अभ्यासासाठी आम्ही २०२१ मध्ये तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी करण्यात आलेले ग्रूप्स निवडले. अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीमके) आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) या तामिळनाडूतील दोन्ही पक्षांनी मतदार संघांच्या पातळीवर आपापले असंख्य व्हॉट्स ग्रूप्स केले होते. चेन्नईनजीकच्या अशा २५ मतदार संघातील या ग्रूप्सची अभ्यासासाठी निवड करण्यात आली. प्रत्येक गटात सरासरी ९४ सदस्य होते. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या ग्रूप्सचे ‘ॲडमिन’ असले तरी हे खुले ग्रुप होते. त्यामुळे त्यावर ‘ॲडमिन’ पक्षाचा संदेश टाकत होते आणि ग्रुपचे सदस्यही एकमेेकांशी संवाद साधू शकत होते, त्यावर प्रतिक्रिया देऊ शकत होते.

तुलनात्मक अभ्यासासाठी अशाच प्रकारचे वेगळे ग्रूप्स तयार करण्यात आले. हे पहिल्या ग्रुप्ससारखेच दिसत होते, मात्र यात युजर्सना रिप्लाय व पोस्टींगची सोय बंद करण्यात आली होती. पोस्टिंगचे अधिकार फक्त ‘ॲडमिन’कडे ठेवण्यात आले होते. या नवीन ग्रूप्सना मूळ ग्रूप्समधील राजकीय पक्षांचे संदेश वाचता, पाहाता येत होते, परंतु त्यावर चर्चा, प्रतिक्रिया काय सुरू आहे हे कळत नव्हते.

तीन हजार इच्छुकांची यासाठी निवड करण्यात आली. त्यांचा बेसलाईन सर्व्हे घेतल्यावर त्यांना वरीलपैकी एका ग्रूपमध्ये सहभागी होण्यास सांगण्यात आले. निवडणुक प्रक्रियेदरम्यान चार आठवडे ही प्रक्रिया सुरू होती. यात त्यांच्यावर परिणाम झाला हे तपासण्यासाठी निवडणुकीनंतर तत्काळ एंडलाईन सर्वेक्षण करण्यात आले. यात त्यांचे राजकीय ज्ञान आणि बातम्यांच्या सत्यासत्यतेबाबतची धारणा तपासण्यात आले. एका प्रश्नावलीच्या माध्यमातून त्यांच्या राजकीय ज्ञानाची पडताळणी करण्यात आली तर तीन प्रकारचे मथळे दाखवून त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. त्यात दैनिकात छापून आलेल्या खऱ्या बातम्यांचे मथळे होते, सोशल मीडियावर पसरलेल्या परंतु फॅक्ट चेकर्सनी पडताळणी करून जाहीर केलेल्या अफवांचे (खोट्या बातम्यांचे) मथळे आणि प्रसारित झाल्याच नाहीत अशा (काल्पनिक) बातम्यांचेही मथळे अशा तीन प्रकारचे मथळे त्यांना दाखवण्यात आले.

अँडमिन नियंत्रित ग्रूप्सपेक्षा खुल्या ग्रूप्समधून मतदारांची जागृती अधिक झाल्याचे या अभ्यासातून पुढे आले.

अफवा आणि खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसले, मात्र त्यातील फरक फारच अल्प अंशी होता.

दुसरी पडताळणी होती ती समाज माध्यमांमुळे पक्षांचा पसंतीक्रम बदलण्याची व मतांच्या ध्रुवीकरणाची. या निकषावरही व्हॉट्सॲप ग्रूपवरील संदेश तमिळनाडूतील मतदारांच्या मनातील पक्षाची पसंती बदलण्यात फार प्रभाव टाकू शकले नाहीत.

तमिळनाडू निवडणुकीतील हा निष्कर्ष अमेरिकेतील निवडणुकीच्या विपरीत आहे. समाजमाध्यमांवरील संदेशांमुळे मतदारांनी पक्षांची पसंती बदलण्याचा कल तेथे अधिक दिसून आला. तमिळनाडूत तो होता, पण फारच नगण्य. तीच बाब व्हॉट्सॲप वरील नकारात्मक प्राचाराची. अमेरिकेतील निवडणुकीदरम्यान विरोधी पक्ष, विरोधी नेते व त्यांचे समर्थक यांच्याबद्दल समाज माध्यमांमधून मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रचार झाला होता. तमिळनाडूत हे प्रमाणही फारसे लक्षणीय आढळले नाही.

पक्षापेक्षा सदस्यांचा प्रभाव अधिक

पक्षाचे कार्यकर्तेच संदेश पाठवू शकत होते अशा बंदिस्त ग्रूप्सच्या तुलनेत जेथे ग्रूप्सचे सदस्य एकमेकांशी संवाद साधू शकत होते, प्रत्युत्तर, प्रतिक्रिया देत होते आणि वादविवाद घालत होते. या ग्रूप्समधील सदस्यांचे तत्कालीन राजकीय घडामोडींबद्दलचे ज्ञान अधिक वाढल्याचे दिसून आले. त्या तुलनेत फक्त कार्यकर्ते ‘ॲडमिन’ असलेल्या व सदस्यांना व्यक्त होण्याची संधी नसलेल्या ग्रुप्समधील ही राजकीय सजगता कमी दिसली. याचा अर्थ व्हॉट्स अपसारख्या समाज माध्यमात ‘वरून येणाऱ्या’ (व्हर्टिकल) संदेशांपेक्षा आपापसातील (हॉरिझाँटल) संदेश वहन अधिक परिणाम करणारे ठरते.

सर्व ग्रूप्सवर दिवसातून तीन वेळा नमुना संदेश टाकून तेेथील सदस्य त्यास कसा प्रतिसाद देतात याचे पुढील ४८ तासांतील मोजमाप ठेवले गेले. त्यात ग्रुप सदस्यांमध्ये परस्पर संदेशांची देवाणघेवाण खुली ठेवलेल्या ग्रूप्समध्ये अर्थातच सदस्यांचा सहभाग अधिक असल्याचे दिसले. ग्रूप्सवरील कोणत्या पोस्ट्सना सदस्य किती वेगाने व किती वेळा प्रतिसाद देतात या डेटाच्या आधारे हा सहभाग जोखण्यात आला. उदाहरणार्थ, ग्रूपवर मेसेज पडल्यावर किती सदस्य किती वेळाने तो बघतात याचे तुलनात्मक विश्लेषण केले असता फक्त ‘ॲडमिन’ने नियंत्रित केलेल्या पक्षांच्या ग्रूप्सच्या तुलनेत सगळ्यांना व्यक्त होण्याची संधी देेणाऱ्या ग्रूप्समध्ये सदस्यांचा सहभाग संख्यात्मक व वेगात्मक अधिक होता. खुल्या ग्रुपमधील सदस्य दररोज त्यावर सरासरी १६ मिनिटे घालवत होते. पक्षांचे कार्यकर्ते ‘ॲडमिन’ असलेल्या व सदस्यांना व्यक्त होण्याची, शेअर करण्याची मुभा नसलेल्या ग्रूपमध्ये हे प्रमाण कमी होते.

मतदारांवर समाज माध्यमांचा परिणाम होतो, राजकीय घडामोडींबाबत मतदार सजग होतात, अफवा व सत्य यातील फरक करायला शिकतात हे यातून सिद्ध झालेच. मात्र, या ग्रूप्सवरील संदेश फारसे विखारी, विद्वेषी, जहाल नव्हते तर माहितीपूर्ण, वास्तववादी व सौम्य होते. त्यामुळे त्यांचा मतदारांची पक्ष पसंती बदलण्यावर त्या ठिकाणी व्हॉट्सॲप या समाज माध्यमांचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. तमिळनाडूमधील दोन्ही पक्ष एकाच राजकीय चळवळीमधून जन्माला आल्याने अन्य राज्यांमधील व देशांमधील संदेशांमध्ये दिसणारे दुभंगलेपण, दुस्वास आणि विद्वेष या ग्रूप्समध्ये दिसून आले नाही. शिवाय, फेसबुक किंवा ट्विटरप्रमाणे व्हॉट्सॲप अल्गोरिदमवर चालत नाही. वापरकर्त्याच्या खात्यात संदेश क्रमानुसार येतात. त्यामुळे अल्गोरिदमवर चालणाऱ्या समाज माध्यमांवर स्फोटक संदेश ज्या वेेगाने पसरतात त्या तुलनेत व्हॉट्सॲपवर त्यांच्या प्रसाराचे प्रमाण कमी दिसले.

(केव्हिन कार्नेे हे हारवर्ड विद्यापिठातील ‘सार्वजनिक धोरण’ या विषयात पीएचडी असून वर्तनाधारित अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत. विकसित देशांमधील धोरण-बदलात त्याच्या संशोधनाचा मोलाचा वाटा राहिला आहे.

प्रस्तुत लेख ‘आयडियाज फॉर इंडिया’मधील कार्ने यांच्या लेखाचा स्वैर अनुवाद असून मूळ इंग्रजी लेखाचा दुवा : https://www.ideasforindia.in/topics/governance/the-whatsapp-effect-evidence-on-political-engagement-preferences-and-polarisation.html

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अदनान सैयद २३ वर्षांनंतर निर्दोष ठरेल?

संबंधित बातम्या

भगवा रंग निळ्याला मतदान करणार का?
महाराष्ट्रातल्या कांद्याला इतर राज्यांनी रडवले…
‘आम्ही भारताचे लोक’ खरोखरच ‘आम्ही’ झालो आहोत का?
बेडय़ा तोडणारा संन्यासी!
काळजी निवृत्तांची की ‘पेन्शन फंडा’ची?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“आजचं भाषण म्हणजे वैफल्यग्रस्त…” अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!
“ताई हुशार निघाल्या” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना भावना गवळींचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “माझ्यावर झालेले आरोप…”
गौतमी पाटीलचा अश्लील नाच थांबवा, नाहीतर गृह मंत्रालय..; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कठोर शब्दात पत्र
VIDEO: “आपल्या ताई मोठ्या हुशार निघाल्या, त्यांनी मोदींना राखी बांधली आणि…”, उद्धव ठाकरेंचा भावना गवळींवर गंभीर आरोप
Video : भिंतीचा आधार घेत पार्टीतून बाहेर पडली सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी; नेटकरी म्हणाले, “धड चालताही…”