सुकल्प कारंजेकर
‘व्हॅलेन्टाइन डे’चं प्रस्थ भारतात वाढलं नव्हतं, तेव्हाची ही गोष्ट- नेमकं सांगायचं तर (भारतीय वेळेनुसार) १४ फेब्रुवारी १९९० च्या सकाळी १० वाजून १८ मिनिटांच्या सुमारास घडलेली. आज ३६ वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांना ‘त्या दिवशी, त्या सकाळी तुम्ही काय करत होतात?’ हा प्रश्न विचारला गेल्यास काही आठवणं खूप अवघड आहे. पण मानवजातीच्या इतिहासात हा क्षण महत्त्वाचा आहे कारण त्या वेळी पृथ्वीचा ठेवा आपल्या पृथ्वीचा ‘सेल्फी’ टिपला गेला. त्या वेळी जगाची लोकसंख्या अंदाजे ५.३ अब्ज इतकी होती आणि भारताची लोकसंख्या ८६ कोटींच्या आसपास होती. हे सगळेजण अप्रत्यक्षरीत्या त्या छायाचित्राचा भाग बनले. हे होतं ‘व्हॉयेजर १’ अंतराळयानानं टिपलेलं पृथ्वीचं छायाचित्र. ते ‘सेल्फी’ कसं काय, हे नंतर कळेलच; पण त्यासाठी छायाचित्राची पार्श्वभूमी आणि त्याचं महत्त्व याबद्दल थोडं अधिक माहीत करून घेऊ.

ते असं की, शतकात माणसानं चांगल्या-वाईट दोन्ही बाबतीत उत्तुंग कर्तृत्व दाखवलं. या शतकात एकीकडे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विलक्षण प्रगती झाली तर दुसरीकडे दोन विध्वंसक महायुद्धे, प्रचंड प्रदूषण, जंगलतोडही झाली. अंतराळ प्रवासाच्या बाबतीत तर माणसाने अविश्वसनीय वाटावी अशी भरारी मारली. १९०३ साली राईट बंधूनी विमानाचं पहिलं उड्डाण केलं आणि १९६९ मध्ये माणसाने थेट चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं (तेव्हा चंद्रावरूनही पृथ्वीचा फोटो टिपला गेला होताच, पण मुद्दा तो नाही)… याच विसाव्या शतकातल्या सर्वोत्तम मानवी कर्तृत्वाचं एक उदाहरण म्हणजे व्हॉयेजर अंतराळयानांची मोहीम. ‘नासा’नं १९७७ साली व्हॉयेजर १ आणि २ अशी दोन अंतराळयानं सोडली. या अंतराळयानांनी सूर्यमालेतील गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून या ग्रहांचं निरीक्षण केलं. पण व्हॉयेजर मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट त्यापलीकडचं होतं. ही अंतराळयानं आपल्या सूर्यमालेच्याही पलीकडल्या ताऱ्यांकडे कूच करण्याच्या हेतूनं पाठवलेली होती. या अंतराळयानांवर ‘गोल्डन रेकॉर्ड’ नावाची फोनोग्राफ रेकॉर्ड होती. आकाशगंगेत दुसऱ्या ग्रहांवर कुठे बुद्धिमान जीवसृष्टी असल्यास त्यांच्यासाठी माणसानं पाठवलेला संदेश ‘गोल्डन रेकॉर्ड’ मध्ये जतन केलेला होता. यात पृथ्वीबद्दल, माणसाबद्दल माहिती दिली होती. जगभरातील निवडक छायाचित्रं होती, गुजरातीसह वेगवेगळ्या भाषांमधील अभिवादनं होती, जगभरातलं उत्तम संगीत होतं प्राण्या-पक्ष्यांचे आवाजही होते. थोडक्यात हे पृथ्वीवरील माणसाच्या, जीवसृष्टीच्या अस्तित्वाचं सार होतं. विश्वाच्या अथांग महासागरात ही माणसाने सोडलेली कालकुपी (टाईम कॅप्सूल) होती – “आम्ही दूरवरच्या, छोट्याश्या ग्रहावरून हा संदेश पाठवतो आहोत. यात आमचे आवाज आणि संगीत, आम्ही लावलेले विज्ञानाचे शोध, आमची छायाचित्रे, आमचे विचार आणि भावभावना जतन केल्या आहेत. भविष्यात तुम्हाला जेव्हा ही कालकुपी मिळेल तोपर्यंत आमचं अस्तित्व टिकावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,” असा संदेश तेव्हाचे अमेरिकेचे राष्ट्रपती जिमी कार्टर यांनी ‘गोल्डन रेकॉर्ड’ सोबत पाठवला होता. १९७७ साली सोडलेलं व्हॉयेजर १ अंतराळयान १९९० च्या सुमारास नेपच्यून आणि प्लूटोच्या कक्षेच्या पलीकडे पोहोचलं होतं… म्हणजेच, ते सूर्यमालेच्या बाहेर पडायला सज्ज होतं. ‘व्हॉयेजर १ ने सूर्यमाला सोडण्यापूर्वी त्याला पृथ्वीकडे वळवून पृथ्वीचं अखेरचं छायाचित्र घ्यावं,’ असं शास्त्रज्ञ कार्ल सेगन यांनी सुचवलं. त्यावेळी व्हॉयेजर १ चं पृथ्वीपासून अंतर अंदाजे ६ अब्ज किलोमीटर्स इतकं होतं. तितक्या अंतरावरून व्हॉयेजर १ ने पृथ्वीचं छायाचित्र घेतलं. हे छायाचित्र ‘पेल ब्ल्यू डॉट’ नावाने प्रसिद्ध आहे. कारण त्यात पृथ्वी अंतराळाच्या काळ्या पार्श्वभूमीवर छोट्याशा फिकट निळ्या बिंदूप्रमाणे दिसते.

या छायाचित्रावर कार्ल सेगन यांनी केलेलं भाष्य आवर्जून वाचण्यासारखं आहे. “प्रचंड विश्वात पृथ्वीचं स्थान हे प्रकाशाच्या कवडश्यात क्षणभर चकाकणाऱ्या धुळीच्या कणासमान आहे. पण याच टीचभर कणावर आपल्या सगळ्यांचं अस्तित्व आहे. मानवासहित जीवसृष्टीच्या कोट्यवधी प्रजातींचं सर्वस्व याचं फिकट निळ्या बिंदूवर अवलंबून आहे. या बिंदूला माणसाने अनेक देशांमध्ये, प्रांतांमध्ये विभाजित केलं आहे. या बिंदूवर वर्चस्व मिळवण्याच्या हव्यासापोटी माणसाने अनेक विध्वंसकारी युद्धे केली, परस्पर द्वेषापोटी रक्तपात घडवला. हे मानवी वर्तन बदलायला हवं. प्रचंड विश्वामध्ये पृथ्वी हे आपलं एकमेव घर आहे. चुकीच्या वर्तनामुळे इथे आपलं अस्तित्व धोक्यात आलं तर आपल्याला वाचवायला कोणीही येणार नाही. हा फिकट निळा असामान्य बिंदू जपायला हवा!” अशा स्वरूपाचे विचार कार्ल सेगन यांनी मांडले. हे ३६ वर्षांपूर्वीचे विचार आजच्याही काळासाठी समर्पक आहेत. युद्धं, हिंसाचार, क्षुल्लक कारणांस्तव द्वेष याची अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषण, जागतिक तापमानवाढ हे प्रश्न अधिकच बिकट झाले आहेत.

इतर प्रजाती सध्या इतक्या मोठ्या प्रमाणात नामशेष होत आहेत की सध्या जीवसृष्टीच्या ‘महाविनाशाचा’ कालखंड सुरू असल्याचा इशारा शास्त्रज्ञ देत आहेत. पृथ्वीवर माणसांसकट इतर प्रजातींचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे. ‘फिकट निळ्या बिंदूला’ जपण्याबद्दलचे कार्ल सेगन यांचे शब्द आज अधिकच मोलाचे ठरतात. भारतातल्या, गोव्यातल्या गायिका केसरबाई केरकर यांचा आवाज त्या ‘गोल्डन रेकॉर्ड’मध्ये आहे… त्यांनी ‘जात कहाँ हो, अकेले कुंजन में’ ही भैरवी गायलीय. आणि व्हॉयेजर १ अंतराळयान आता २५ अब्ज किलोमीटरहून अधिक अंतरावर पोहोचलं आहे.

एवढ्या अंतरावरून पृथ्वीचं परत छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला तर त्यात पृथ्वी कदाचित दिसणारही नाही. हे अंतर प्रचंड वाटलं तरीही अंतराळातील ताऱ्यांच्या एकमेकांपासूनच्या अंतराची तुलना करता व्हॉयेजर अंतराळयानाचा प्रवास नुकताच सुरू झालेला आहे. इतर ताऱ्यांजवळ पोहोचायला ‘व्हॉयेजर’ला पुढे हजारो, लाखो वर्षं लागतील. आकाशगंगेत आतापर्यंत माणसानं अनेक ग्रहांचा शोध लावला. त्यापैकी काही ग्रहांचं वातावरण जीवसृष्टीला अनुकूलही आहे. मात्र आकाशगंगेतील इतर ग्रहांवर बुद्धिमान जीवसृष्टीच्या अस्तित्वाचे पुरावे अजूनही मिळालेले नाहीत. अशा परिस्थितीत व्हॉयेजर अंतराळयानं पाठवणं, गोल्डन रेकॉर्ड पाठवणं भाबडेपणाचं वाटू शकतं. पण या निमित्तानं जगभरातल्या देशांमधील, विविध संस्कृतींमधील मानवी सृजनाची, ज्ञानाची सर्वोत्तम चिन्हं शोधण्यात आली, त्याचबरोबर पृथ्वीवरील इतर प्रजातींच्या अस्तित्वाबद्दलही सारासार विचार केला गेला हे खूप महत्त्वाचं आहे.

जात, धर्म, पंथ, आर्थिक वर्ग, भाषा, वर्ण, प्रदेश, देश अशा असंख्य तुकड्यांमध्ये विखुरलेल्या आपल्या जगाला समग्रपणे बघण्याची दृष्टी ‘फिकट निळ्या बिंदू’च्या छायाचित्रानं दिली- स्माइल करणाऱ्या किंवा दात विचकणाऱ्या ‘सेल्फीं’ची ओळख आपल्याला मोबाइलमुळेच झाली हे खरं, पण ‘सेल्फी’मध्ये आपलं अवघं असणंच उमटावं अशी अपेक्षा ठेवली तर कायकाय असेल त्यात? आपला भोवताल, आपलं सांस्कृतिक/ वैज्ञानिक/ जैविक अस्तित्व… हे सगळंच… त्या अर्थानं हा पृथ्वीचा ‘सेल्फी’ होता! तोही ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ ला काढण्यात आला, हा सुंदर योगायोग आहे. प्रेम आभाळाएवढं असावं, आपल्यापेक्षा वेगळ्या पार्श्वभूमीच्या माणसांबद्दल आणि इतर प्रजातींबद्दलही स्नेह असावा याची आठवण हे छायाचित्र करून देतं. १४ फेब्रुवारी १९९० ला कोण काय करत होतं यापेक्षा वर्तमानात आणि भविष्यात आपण ‘फिकट निळ्या बिंदूला’ जपण्यासाठी काय करणार आहोत हे महत्वाचं ठरतं.

writetosukalp@gmail.com